Monday 14 June 2021

कोरोना बाधितांच्या संपर्कातील तपासण्या वाढवा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना.

­­­­­­

 

           दौलतनगर दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या पाहता कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या वाढवा याकरीता पोलीस विभागाची मदत घ्या. बाधित व्यक्तींच्या संपर्कातील तपासण्या करण्यास कोणी नकार देत असेल तर कारवाई करा. कोरोना बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या तपासण्या करण्याची मोहिमच तालुका प्रशासनाने हाती घ्या  अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

               पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांच्यावर करण्यात येणारे उपचार व वाढत्या कोरोना संख्येला रोखण्याकरीता आज दौलतनगर ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना दिल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार  योगेश टोमपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,डॉ.श्रीनिवास बर्गे,डॉ.बहुलेकर,पाटणचे पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे, उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार, कोयनानगरचे सपोनि चंद्रकांत माळी,मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डॉ.दिपक कुऱ्हाडे, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शिकलगार,कोयनानगर कोवीड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिंदे आदींची उपस्थिती  होती.

                बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,तालुक्याचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे. त्यामानाने तपासण्या फार कमी आहेत.आज तालुक्यात एकूण 472 कोरोना बाधित रुग्ण आहेत त्यातील 95 गृहविलगीकरणामध्ये आहेत. तर 251 कोरेाना बाधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे तर पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी या तिन्ही कोरोना केअर सेंटरमध्ये 84 कोरेाना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.तर 22 कोरोना रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. तालुक्यात जी गांवे हॉटस्पॅाट आहेत.त्या गांवामध्ये कॅम्प लावून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या कराव्यात.तपासण्या वाढल्या पाहिजेत याकरीता कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करण्याची मोहिम तालुका प्रशासनाने हाती घ्या.तालुका प्रशासनाने प्रत्येक गांवातील ग्रामस्तरीय समिती सक्रींय करा. कोरोना आल्यापासून तालुक्यात एकूण 6025 कोरोना बाधित झाले होते त्यातील 5286 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण खुप चांगले आहे. गर्दी टाळणे याकरीता तालुक्यातील पोलीस यंत्रणा काम करीत आहे.अजूनही कोरोना बाधितांची संख्या वाढू नये याकरीता आपण खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.असे सांगून ते म्हणाले,पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी याठिकाणी उभारण्यात आलेल्या कोवीड केअर सेटंरमध्ये तालुक्यातील कोरोना बाधितांना चांगले उपचार देण्याचे काम आपण करीत आहोत त्यामुळे पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांना बाहेरील खाजगी रुग्णालयात जाण्याची जास्त वेळ येत नाही. या तिन्ही कोवीड केअर सेंटरमध्ये औषधोपचाराकरीता काही आवश्यकता लागली तर याकरीता आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल निधीची कसलीही चिंता न करता तालुक्यातील कोरोना बाधितांना चांगले उपचार दया असेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेवठी बैठकीत सांगितले.

चौकट:- तपासणी मोहिमेमध्ये कुणी अडथळा आणला तर सरळ गुन्हे दाखल करा.

            कोरोना बाधित व्यक्ती सापडल्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करण्यामध्ये कुणी अडथळा आणत असेल किंवा प्रशासनाचे एैकत नसेल तर पोलीस विभागाची मदत घेवून सरळ अडथळा आणणाऱ्यावर गुन्हे दाखल करा अशाही सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना दिल्या.

 

No comments:

Post a Comment