Wednesday 11 August 2021

पंचनाम्यापासून कोणीही बाधित वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्या- गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या सूचना.

 


दौलतनगर दि.11(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- माहे जुलै महिन्यामध्ये पाटण मतदारसंघात मोठया प्रमाणात झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे पाटण मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी,शेतीपिकांसह सार्वजनिक मालमत्तेचे मोठया संख्येने नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे संबंधित यंत्रणेमार्फत पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देणेकरीता कटीबध्द असून बाधितांना नुकसानीची मदत मिळणेकरीता आवश्यक असणारे पंचनाम्यापासून कोणीही बाधित वंचीत राहू नये याची शासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

           दौलतनगर,ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईं यांचे अध्यक्षतेखाली अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे करावयाचे पंचनाम्या संदर्भात आयोजित आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार  योगेश टोमपे, गटविकास अधिकारी मीना साळूंखे, मराविमचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख,तालुका कृषी अधिकारी ताकटे,सार्व.बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील, विद्याधर शिंदे, जिल्हा परिषद बांधकामचे भंडारे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे बसुगडे,पाटणचे पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार, मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील यांचेसह अन्य शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती  होती.

                  याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, माहे जुलै महिन्यामध्ये पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण होऊन डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांवर कडा कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने अनेक गावे बाधित झाली होती. धोकादायक स्थितीमधील या गावांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. सलग दोन ते तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या आणि ओढयांना मोठया प्रमाणांत आलेल्या पुराच्या पाण्यामुळे रस्ते,साकव पूल, मोरी, नळ पाणी पुरवठा योजना अशा सार्वजनिक मालमत्तांचे मोठया अतोनात नुकसान झाले.अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या मतदारसंघातील अनेक गांवातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व शेत जमिनींचे नुकसानीचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे शासकीय यंत्रणेकडून पंचनामे  करणेसंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांच्या तातडीच्या बैठका घेवून अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेला कोणीही शेतकरी नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचीत राहू नये याची शासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सुचना कृषी व महसूल,ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या. अतिवृष्टीमुळे  झालेल्या नुकसानीच्या संदर्भात कालच जिल्हास्तरीय अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात येऊन नुकसानीचा आढावा घेण्यात आला, असे सांगत अतिवृष्टीमध्ये जीवितहानी,शेतीचे नुकसान तसेच रस्ते,साकव पूल, मोरी, नळ पाणी पुरवठा योजना अशा सार्वजनिक मालमत्ता यासंह घरांचे नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या नुकसानीच्या आराखडयामध्ये कोणताही अतिवृष्टी बाधित वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व शासकीय यंत्रणेकडून घेण्यात यावी अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी या बैठकी दरम्यान सर्व अधिकाऱ्यांना केल्या.

No comments:

Post a Comment