Wednesday, 18 March 2020

कोरोनो आजाराच्या दक्षतेसाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली तालुका प्रशासनाची बैठक संपन्न. ग्रामीण रुग्णालयातील दक्षता विभागाची केली प्रत्यक्ष पहाणी.




                 दौलतनगर दि.१८:- महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो विषाणूचे सुमारे ४१ विषाणू बाधित लोक आढळून आले असून पाटण या ग्रामीण विधानसभा मतदारसंघात कोरोनो आजाराची दक्षता घेणेकरीता तालुका प्रशासनाने सतर्क रहावे,मतदारसंघातील ग्रामीण आणि डोंगरी भागामध्ये या विषाणूसंदर्भात माहिती देणेकरीता तसेच नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याकरीताची माहिती प्रक्रिया तालुका प्रशासनाने त्यांच्या अख्यारितीतील सर्व यंत्रणामार्फत राबवावी अशा सक्त सुचना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना देवून कोरोनो विषाणू बाधित लक्षणे आढळली तर पाटण या तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कशाप्रकारे उपाययोजना करावयाच्या याच्या नियोजना संदर्भात त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील दक्षता विभागाची संबधित सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेत प्रत्यक्ष पहाणी केली.
               कोरोनो आजाराच्या दक्षतेसाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय याठिकाणी आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या. बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,सहाय्यक पोलीस निरिक्षक तृप्ती सोनवणे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव यांची उपस्थिती होती.
                या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांचेकडून पा्ररंभी पाटण मतदारसंघात बाहेरील देशातून, राज्यातून आपले मतदारसंघात कोणी व्यक्ती आल्या आहेत का? आल्या असतील तर या १५ ते २० दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांची आरोग्य तपासणी केली  आहे काय? त्या तपासणीमध्ये कोरोनो विषाणू बाधित काही लक्षणे आढळून आली नाहीत ना ? अशाप्रकारे प्रश्न करुन माहिती घेतली यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी पाटण मतदारसंघातील बाहेरील देशातून, राज्यातून सुमारे १५ व्यक्ती मतदारसंघात या १५ ते २० दिवसाच्या कालावधीमध्ये आले आहेत त्यांची तपासणी करण्याचे काम करण्यात आले असून कोणाही व्यक्तीमध्ये कोरोनो विषाणू बाधित काही लक्षणे आढळून आली नाहीत तसेच कोरोनो विषाणू संक्रमणापासून बचाव करणेकरीताचे उपाय करणेसंदर्भात तालुका प्रशासनातील अधिकारी यांचया मागील १५ दिवसात ४ ते ५ वेळा बैठका घेवून कोरोनो विषाणू संक्रमण होवू नये याकरीता मतदारसंघातील गावागावामध्ये शासकीय यंत्रणेमार्फत जनजागृती करण्याचे काम सुरवातीपासूनच सुरु करण्यात आले आहे.महसूल यंत्रणेमार्फत मंडलाधिकारी,तलाठी,कोतवाल तसेच पंचायत समितीमार्फत विस्तार अधिकारी,ग्रामसेवक,पोलीस यंत्रणेमार्फत पोलीस पाटील यांना गावा गांवामध्ये जावून जनजागृती करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत या सर्वांवर नियंत्रण ठेवणेकरीता आरोग्य विभागाचे वरीष्ठ अधिकारी यांच्या नेमणूकाही करण्यात आल्या आहेत.मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खोकला,सर्दी,ताप, श्वासोच्छवासात अडथळा येणे अशी लक्षणे दिसून आल्यास रुग्णांनी निष्काळजीपणे न वागता अशा व्यक्तींनी तात्काळ तपासणी करुन घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.असे आजार जाणवणाऱ्या व्यक्तींच्या विलगीकरणाची व्यवस्थाही प्राथमिक आरोग्य,केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये करण्यात आली असल्याचे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मतदारसंघातील यात्रा,मोठे बाजार,लग्न कार्य यालाही मज्जाव करण्यात आला असून मोठमोठया यात्रा रद्द करणेसंदर्भात संबधित गांवामध्ये यात्रा कमिटी यांच्याबरोबर बैठका घेवूनही यात्रा रद्द करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.
           दरम्यान यासंदर्भात शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे, कोणत्याही व्यक्तीला कोरोनो विषाणू बाधित जर लक्षणे आढळून आल्यास तात्काळ त्यांच्यावर तपासणी करुन उपचार करण्यात यावेत अशा सुचना करुन मतदारसंघातील कोणीही व्यक्तींना या आजारासंदर्भात घाबरु नये. मतदारसंघातील जनतेनेही खोकला,सर्दी,ताप,श्वासोच्छवासात अडथळा येणे अशी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ आपली तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील जनतेला या बैठकीच्या माध्यमातून केले. अशा प्रसंगाच्या काळात कोणीही शासकीय अधिकाऱ्यांनी हयगय करु नये अशा सक्त सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या व प्राथमिक आरोग्य केंद्रात उशीरा आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांस कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सक्त सुचना गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना ना.देसाई यांनी केल्या.


Saturday, 14 March 2020

गृह विभागामार्फत महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणार. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता प्रयत्नशील. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई




                 दौलतनगर दि.१४:- महाराष्ट्र राज्यातील महिला सर्वच बाबतीत सुरक्षित राहणेकरीता राज्याच्या गृहविभागाने ठोस उपाययोजना केल्या असून महिलांच्या सुरक्षिततेला गृहविभागामार्फत प्राधान्य देण्यासाठी संपुर्ण गृहविभागाने नियोजन केले आहे. राज्यातील गृहविभागाने महिलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश राज्यातील गृहविभागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता राज्याचे महाविकास आघाडी शासनाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व शासनातील आमचा गृहविभाग हा कायम प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी विधानपरिषदेमध्ये दिली.
             अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवठच्या दिवशी विधानपरिषद सभागृहामध्ये विरोधी पक्षामार्फत मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या गृहविभागावरील मागण्यांच्या संदर्भात उत्तर देताना ना.शंभूराज देसाईंनी वरीलप्रमाणे ग्वाही दिली.
                  अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामध्ये दिशा कायदा आणणेकरीता याच अधिवेशनात महाविकास आघाडी शासनाचे नियोजन होते पंरतू कोरोनाच्या भितीमुळे अधिवेशनाचा एक आठवडा रद्द करण्याचा निर्णय शासनाने तसेच विधिमंडळाने घेतला असून महाराष्ट्र राज्यामध्ये दिशा कायदा आणणेकरीता राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलवून या विशेष अधिवेशनात हा दिशा कायदा संमत करावा याकरीता आमचा आग्रही प्रयत्न राहणार आहे.राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे,गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे शासन व शासनाचा आमचा गृहविभाग कायम प्रयत्नशील राहणार आहे.तशा प्रकारच्या सुचना गृहविभागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.ठोस उपाययोजनेतून आणि गृहविभागाच्या योग्य नियोजनामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला
                 तसेच पोलीस वसाहती व कार्यरत पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीसंदर्भातही प्रश्न मांडण्यात आला यावर त्यांनी सन २०२०-२१ चे अर्थसंकल्पात पोलिसांचे वसाहतीकरीता चांगली तरतुद करण्यात आली आहे.राज्यातील गृहविभागातील पोलीस अधिकारी,कर्मचारी यांना शासनामार्फत योग्य सुविधा मिळाव्यात, त्यांना राहणेकरीता घरे मिळावित याकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे हे स्वत: आग्रही आहेत. त्यामुळे आम्ही नक्कीच राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस वसाहतीच्या माध्यमातून न्याय मिळवून देवू असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यामध्ये बांगलादेशी व्यक्तींच्या मोठया प्रमाणात घुसखोरी झाल्या असल्याचाही मुद्दा विरोधी पक्षाकडून मांडण्यात आला त्याला उत्तर देताना ना.देसाई म्हणाले गत चार वर्षात राज्यामध्ये घुसखोरी केलेल्या ३,४३१ बांगलादेशी व्यक्तींवर ६६० गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील सुमारे ६०६ आरोपींना महाराष्ट्र राज्यातून  परत पाठविण्यात आले आहे. मुंबईतील आळणारा परिसरात सापडलेल्या ३ बांगलादेशीवर गृहविभागामार्फत कारवाई करण्यात आली असून साकीनाका या परिसरात सापडलेल्या  २२  बांगलादेशीमध्ये १० महिला व १२ पुरुष असून त्यांचेकडे तेथील स्थानिक ग्रामपंचायतीचे रहिवाशीचे दाखले मिळून आले आहेत ते दाखले कशाप्रकारे देण्यात आले याची चौकशी सुरु असून बांगलादेशींना ग्रामपंचायतीचे बोगस दाखले देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या संबधित पदाधिकारी,अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही संबधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे सांगून त्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानपरिषद सदस्यांनी मांडलेल्या अनेक योग्य सुचनावर शासन व शासनाचा गृहविभाग गांभीर्यपुर्वक विचार करेल असे सांगितले.दरम्यान विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधी बाजूच्या सदस्यांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नांना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्यांच्या उत्तरामध्ये स्पर्श करीत प्रत्येक प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिल्याबद्दल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गृहराज्यमंत्री ना. देसाईंचे सभागृहात अभिनंदन केले.

Friday, 13 March 2020

सकाळी १० ते रात्री ११ सलग १३ तास विधानपरिषदेत उपस्थित राहून अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी अर्थसंकल्पावरील मागण्यांना सदस्यांना दिली समाधानकारक उत्तरे.


                 दौलतनगर दि.१३:- दि.०६ मार्च रोजी राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प विधानपरिषदेत सादर केला होता.या आठवडयात सलग दोन दिवस या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा विधानपरिषदेमध्ये सुरु होती.सुमारे ३० पेक्षा जास्त विरोधी व सत्ताधारी पक्षाच्या विधानपरिषद सदस्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेवून विविध मागण्या अर्थसंकल्पावर केल्या.या मागण्या तसेच सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी वित्तराज्यमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाईंच्या वर होती.मागण्यावरील चर्चेचा आणि उत्तराचा कालचा शेवठचा दिवस होता.सकाळी १० वा सुरु झालेल्या मागण्या रात्री ११ वा.संपल्या. १० ते १५ मिनीटांचा अपवाद वगळता सलग १३ तास सभागृहातील कामकाज सुरु होते.सलग १३ तास अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई सभागृहात उपस्थित होते.अर्थसंकल्पावरील मागण्यांची उत्तरे देण्याची त्यांची पहिलीच वेळ असताना देखील त्यांनी सदस्यांच्या मागण्यांना समाधानकारक उत्तरे देवून सभागृहातील सदस्यांची मने जिंकली.त्यांच्या उत्तरावेळी सभागृहात कोणताही गदारोळ न होता मागण्या केलेल्या सदस्यांचे त्यांच्या उत्तरातून त्यांनी समाधान केले.
                 यावेळी अर्थसंकल्पावरील मागण्यांना उत्तर देताना अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी यंदाचा अर्थसंकल्प ठेवून राज्यातील जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचा अर्थसंकल्प वित्तमंत्री ना.अजित पवार आणि मी विधीमंडळात मांडला असून छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित असणारे शासन आम्ही राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालवित आहोत.नरवीर कै.तानाजी मालुसरे यांच्या जन्मगांवी त्यांचे स्मारक उभारावे अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते यांनी त्यांच्या भाषणात केली त्यावर उत्तर देताना ना.देसाईंनी नरवीर कै.तानाजी मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहकार्याने हिंदूराज्य स्थापनेत मोलाचे सहकार्य केले आहे याचा सर्वांनाच अभिमान असून त्यांच्या जन्मगावी त्यांचे भव्य असे स्मारक व्हावे याकरीता स्मारकाचा आराखडा मागवून घेवून या आर्थिक वर्षात ०५ कोटी रुपयांचा निधी शासनामार्फत देण्यात येईल तसेच वाढीवचा काही निधी लागल्यास त्यावर शासन निर्णय घेईल असे घोषित करीत असल्याची घोषणा करुन त्यांनी मा.स्व.बाळासाहेब ठाकरेसाहेब माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नी मालमत्ता कर माफ योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्यातील अडीच लाख माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नी यांच्या घरांचा मालमत्ता कर हा ग्रामविकास व नगरविकास विभागामार्फत परिपुर्ती करुन माफ करण्यात येईल असल्याचेही जाहीर केले.तसेच मालेगांव जि.नाशिक येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहूरी अंतर्गत कृषी विज्ञान संकुल निर्माण करुन शासकीय कृषी महाविद्यालय,शासकिय कृषी उद्यानविद्या महाविद्यालय व शासकिय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय शासनामार्फत स्थापन करण्यात येईल त्याकरीता आवश्यक असणारा निधी शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले.अनेक सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेत, शासनामार्फत विविध मागण्या मान्य करणेकरीता त्यांनी स्वतंत्र्य बैठका घेण्यासंदर्भाने स्वतंत्र्यपणे घोषणा केल्या.
                    चर्चेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्यांच्या मागण्या कशाप्रकारे राज्य शासनाकडून पुर्ण करता येतील याचा आढावाच अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्यांच्या अर्थसंकल्पावरील उत्तराच्या भाषणामध्ये दिला. सदस्यांच्या प्रश्नांना सडेतोड व समर्पक अशी उत्तर देत सदस्यांचे समाधान होईपर्यंत त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक ना.देसाईंनी त्यांच्या अर्थसंकल्पावरील मागण्यांच्या उत्तरामध्ये केले.अर्थसंकल्पावरील मागण्यांवर बोलणाऱ्या प्रत्येक सदस्यांच्या मागण्या त्यांचे प्रश्न ना.शंभूराज देसाई हे सभागृहात टिपून घेत होते.विधानपरिषदेचे सभापती,उपसभापती यांनीही प्रत्येक सदस्यांना तुम्ही बोला,अर्थराज्यमंत्री सभागृहात उपस्थित आहेत ते तुमचे प्रश्न,तुमच्या मागण्या लिहून घेत आहेत,त्यांच्या उत्तरामध्ये आपल्या प्रश्नांची सोडवणूक ते नक्कीच करतील असा विश्वास प्रथमत:च विधानपरिषदेचे सभापती,उपसभापती या दोघांनी विधानपरिषदेतील सदस्यांना दिला.
                         ना.शंभूराज देसाईंनी अर्थसंकल्पाचे आणि अर्थसंकल्पावरील मागण्याचे उत्कृष्ट सादरीकरण करुन मागण्या करणाऱ्या सर्व सदस्यांचे त्यांच्या नावानिशी त्यांनी केलेल्या मागण्यांचा उल्लेख करुन सदस्यांचे समाधान होणारी समर्पक अशी उत्तरे त्यांच्या भाषणामध्ये दिल्याने विधानपरिषदेतील सदस्यांनी त्यांचे सभागृहात कौतुक केले. राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असून सभागृहात सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प सर्व घटकांना न्याय देणारा आहे त्यात त्रुटी काढण्यासारखे काहीच नाही म्हणूनच विरोधी सदस्यांनीही यावर समाधान व्यक्त केले असल्याचे त्यांनी अर्थसंकल्पावरील मागण्यांच्या उत्तरामध्ये शेवठी बोलताना सांगितले.
         


Tuesday, 10 March 2020

लोकनेतेसाहेब यांचे ११० जयंतीदिनी नातू शंभूराज देसाईंना लोकनेतेसाहेबांनी दिलेल्या राजकीय बाळकडूच्या छायाचित्राला उजाळा.


           दौलतनगर दि.१०:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा ११० वा जयंती सोहळा आज दि.१० मार्च रोजी साजरा होत असताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी नातू राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांना मांडीवर घेवून त्यांचे कानाला लावलेल्या फोनचे बालपणीचे त्यांचे छायाचित्र संपुर्ण सोशल मिडीयावर प्रसारित झाले आहे.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या या बालपणीच्या छायाचित्रामुळे लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी त्यांचे नातू शंभूराज देसाईंना बालपणीच राजकारणाचे राजकीय बाळकडू दिल्याने पहिल्यांदाच राज्याचे राज्यमंत्री झालेनंतर आपल्या आजोबांनी लौकिक मिळविलेले गृहखात्याचे राज्यमंत्री होण्याची त्यांना संधी मिळाली असून आजोबाप्रमाणे नातूही राज्याच्या गृहखात्यामध्ये उल्लेखनीय काम करुन दाखविणार असल्याची चर्चा फेसबुक,व्हाटस अप या सोशल मिडीयावर पहावयाला मिळत आहे.यानिमित्ताने या छायाचित्राला आज इतक्या वर्षांनी उजाळा मिळाला आहे.
          महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून अवघ्या महाराष्ट्र राज्याला लोकनेते बाळासाहेब देसाई यांची ओळख आहे. राज्यात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सार्वजनीक बांधकाम,कृषी,शिक्षण,महसूल विभागाचे मंत्री म्हणून काम पाहिलेले लोकनेते बाळासाहेब देसाई हे करारी गृहमंत्री म्हणून सर्वांना परिचित आहेत.सार्वजनीक बांधकाम,कृषी,शिक्षण, महसूल विभागाचे मंत्री म्हणून काम करताना राज्यातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आणि ते प्रत्यक्षात आमलांत आणले. तर गृहमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द संपुर्ण महाराष्ट्रात अजरामर आणि अतुलनीय ठरली.लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी गृहखात्यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याचे दाखले आजही राज्यातील मातब्बर राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात काम करीत असताना देत असतात.महाराष्ट्र राज्यामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचेसारखा दुसरा गृहमंत्री होणे नाही अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया राज्यातील मान्यवरांच्या तोंडून आजही एैकावयास मिळतात. तर त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा आजही मोठया अभिमानाने गौरव केला जातो.
          लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब राज्याचे मंत्री असताना त्यांचे वास्तव्य “मेघदुत” या शासकीय निवासस्थानी होते. त्यांचे नातू आणि आत्ताचे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा जन्म मुंबईचा. त्यांचे संपुर्ण बालपण हे मुंबई येथे “मेघदुत” बंगल्यावरच लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे सहवासातच गेले.लोकनेतेसाहेब “मेघदुत” बंगल्यावर असल्यानंतर त्या काळात आपल्या नातवंडामध्ये रममाण व्हायचे. असेच एके दिवशी “मेघदुत” बंगल्यावर लोकनेतेसाहेब असताना ते फोनवरुन बोलत असताना नातू शंभूराज देसाई हे त्यांच्या दालनात आल्याचे पाहून लोकनेतेसाहेबांनी त्यांना आपल्या मांडीवर बसवून आपल्या कानाचा फोन शंभूराज यांच्या कानाला लावून फोनवर बोलणाऱ्या पुढील व्यक्तीस लोकनेतेसाहेब म्हणाले,माझा नातू शंभूराज बोलतोय त्याच्याशी बोला.हा बोलका प्रसंग त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या छायाचित्रकारांने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला.त्याचवेळी लोकनेतेसाहेबांना भेटण्याकरीता ज्येष्ठ पत्रकार प्र.के. अत्रे हे “मेघदुत” बंगल्यावर आले होते.तेव्हा त्यांनीही हा बोलका प्रसंग पाहिल्यानंतर तात्काळ त्या छायाचित्रकाराकडून कॅमेराबंद केलेले ते छायाचित्र मिळविले आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये “महाराष्ट्राचे मंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई हे आपल्या नातवाला राजकारणाचे बाळकूड देताना” या मथळयाखाली बातमी प्रसिध्द केली. ती बातमी आज तंतोतत खरी ठरली असून आज अनेक वर्षानी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या ११० जयंती दिनी हेच छायाचित्र संपुर्ण सोशल मिडीयावर प्रसारित झाले आहे. “आजोबा गृहमंत्री तर नातू गृहराज्यमंत्री” हा योगायोग तर आहेच परंतू असे उदाहरण राज्याच्या राजकारणात कुठे पहावयास मिळत नाही.आज ना.शंभूराज देसाई राज्याचे गृहराज्यमंत्री असताना इतक्या वर्षांनी त्यांचे बालपणीच्या आजोबा लोकनेतेसाहेब यांचेसोबतच्या छायाचित्राला उजाळा मिळाला असल्याने या छायाचित्राचे सर्वत्र कौतुक होत आहेच परंतू लोकनेतेसाहेबांचा राजकीय,सामाजीक वारसा त्यांचे नातू गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे लिलया पेलत असून आपले आजोबा लोकनेतेसाहेब यांच्याप्रमाणे त्यांचे नातूही तितकेच करारी आहेत याचा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
       एखाद्या लौकीक प्राप्त व्यक्तीचा उध्दार त्याची तिसरी पिढी करते असे म्हंटले जाते,त्याचप्रमाणे आपल्या आजोबांनी केलेल्या अतुलनीय कार्याचा गौरव,त्यांच्या विचारांचा जागर तसेच लोकनेतेसाहेबांचा असणारा दरारा आणि राज्याच्या राजकारणावरील वचक व त्यांनी महाराष्ट्रातील जनतेकरीता केलेल्या तोलामोलाच्या कार्यानुसार त्याच तोलामोलाप्रमाणे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईसाहेब हे गत ३६ वर्षापासून हे कार्य पाटण मतदारसंघात आणि आता महाराष्ट्र राज्यात करीत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे.  

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कार्य अजरामर. लोकनेतेसाहेब यांच्या कार्याला शोभेल असे काम करुया. युवा नेते यशराज देसाईंनी व्यक्त केल्या भावना.




           दौलतनगर दि.१०:-महाराष्ट्राचे पोलादी पुरुष स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये केलेले कार्य सांगण्याएवढा मी मोठा नाही,स्व.लोकनेतेसाहेब यांचे कार्य अवघा महाराष्ट्र जाणून आहे. स्व.लोकनेतेसाहेब यांनी राज्याचे विविध खात्याचे मंत्री म्हणून केलेले कार्य अजरामर आहे.दुरदृष्टी लाभलेले नेते स्व.साहेबांच्या रुपाने आपल्या मतदारसंघाला नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्र राज्याला लाभले हे आपल्या सर्वांचे भाग्य असून डोंगरी आणि दुर्गम भागात वसलेल्या आपल्या पाटण तालुक्याला देशाच्या नकाशावर नेण्याचे कार्य त्यांनी केले आहे. आपल्या मतदारसंघात लोकनेतेसाहेब यांच्या कार्याला शोभेल असे कार्य आपल्या सर्वांचे लाडके नेते राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब करीत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेतेसाहेब,स्व.आबासाहेब यांच्या नावाने सुरु असणाऱ्या विविध संस्थां नावारुपास आणण्याचे कार्य या संस्थामधील पदाधिकारी, विश्वस्तांनी करावे हीच खरी लोकनेतेसाहेब यांच्या जयंतीदिनी श्रध्दाजंली ठरणार असल्याची भावना युवानेते यशराज देसाई यांनी व्यक्त केली आहे..
                दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाच्या “महाराष्ट्र दौलत” सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या ११० व्या जयंती सोहळयाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,जयराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलींद पाटील,माजी उपसभापती डी.आर.पाटील,माजी विरोधी पक्षनेते डी.पी.जाधव,लोकनेतेसाहेब यांच्याबरोबर कार्य केलेले कै.सौ. वत्सलादेवी देसाई हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक के.एल.चव्हाण,चाफळ,पाटण प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,प्रभारी तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थाचे पदाधिकारी, जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य व लोकनेतेप्रेमी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी युवा नेते यशराज देसाई,रविराज देसाई यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
                   याप्रसंगी बोलताना यशराज देसाई म्हणाले,स्व.लोकनेतेसाहेब यांनी पाटण तालुक्याचा कायापालट केला. राज्याच्या महत्वाच्या खात्यांचे करारी मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य संपुर्ण महाराष्ट्र राज्याला परिचीत आहे. त्यांच्या कार्याचे छोटसं प्रतिबंध म्हणून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांनी मागील पंचवार्षिक मध्ये आमदार असताना राज्य शासनाच्या निधीतून लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे भव्य असे चिरंतन स्मारक उभे केले. शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासही त्यांनी राज्य शासनाकडून निधी मंजुर करुन आणला. लोकनेते साहेब यांच्या नावाने सुरु असलेल्या विविध संस्था नावारुपास आणण्याचे कार्य ना.शंभूराज देसाईसाहेब करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेतेसाहेब यांच्या नावाला व कार्याला शोभेल असे कार्य या संस्थामधील पदाधिकारी, विश्वस्थांनी करणे गरजेचे आहे.लोकनेतेसाहेब,स्व.आबासाहेब यांच्या नावाने सुरु असणाऱ्या संस्था चांगल्या चालविणे आपले सर्वांचे कर्तव्य असून या दोन महान नेत्यांची जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम साजरे करीत असताना खऱ्या अर्थाने हीच श्रध्दांजली  ठरणार आहे अशा भावना व्यक्त करुन ते म्हणाले, मंत्री झालेनंतर अनेक नेत्यांचा मतदारसंघातील जनतेशी जनसंपर्क कमी होतो परंतु ना.शंभूराज देसाईसाहेबांचा जनसंपर्क कमी झाला नाही,उलट त्यामध्ये वाढच झाली असून त्यांनी त्यांच्या कार्याचा चढता आलेख ठेवला आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.
                    याप्रंसगी रविराज देसाई,जयवंतराव शेलार,माजी मुख्याध्यापक के.एल.चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निवड झालेली कु.सई मनोज मोहिते हिने लोकनेतेसाहेब यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. उपस्थितांचे स्वागत अशोकराव पाटील यांनी केले व आभार पांडूरंग नलवडे यांनी मानले. कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सह.उद्योग समुहातील सर्व संस्थाचे अधिकारी,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
चौकट :- स्व.लोकनेते यांना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा येथे  केले विनम्र अभिवादन.
              राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने मुंबईकडे तातडीने जावे लागल्यामुळे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा येथील शिवदौलत सहकारी बँकेच्या शाखेमध्ये स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या ११० जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी त्यांच्यासमवेत पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Monday, 9 March 2020

“दौलत महाराष्ट्राची” आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई.




महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहे.ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने पहिल्यांदा लोकांचा लोकनेता म्हणून पदवी बहाल केली ते आदरणीय,वंदनीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा आज दि.10 मार्च रोजी 110 वा जयंती सोहळा दौलतनगर,ता.पाटण येथे “महाराष्ट्र दौलत” या लोकनेतेसाहेब यांचे शताब्दी स्मारकामध्ये मोठया दिमाखात साजरा होत आहे.आजच्या ११० व्या जयंती सोहळयाच्या निमित्ताने...
आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात मोठया आदबीने घेतले जाते. त्यांच्या तोलामोलाचे अनेक राजकारणी महाराष्ट्रात होऊन गेले परंतु महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळविलेले लोकनेतेसाहेब यांना महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आजही विसरलेली नाही आणि विसरणार नाही. महाराष्ट्रातील त्यांच्या अलौकीक कार्यामुळे दौलत महाराष्ट्राची म्हणूनही त्यांचा नामोउल्लेख केला जातो.महाराष्ट्राची दौलत असणारे लोकनेतेसाहेब यांचे “महाराष्ट्र दौलत” नावाने चिरंतन शताब्दी स्मारक ‍त्यांचे कर्म व जन्मभूमित लोकनेतेसाहेबांचे नातू राज्याचे नवनिर्वाचीत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आमदार असताना राज्य शासनाकडून १० कोटी रुपये खर्चून उभारले आहे.राज्याचे मंत्री झालेनंतर त्यांनी याच शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांकरीता राज्य शासनाकडून वाढीवचा १५ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.लोकनेतेसाहेब यांच्या नावाला शोभेल असेच शताब्दी स्मारक त्यांचे कर्म आणि जन्मभूमित उभारले असून याचा लोकनेतेप्रेमी व पाटण मतदारसंघातील जनतेला सार्थ अभिमान आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेतेसाहेब यांना महाराष्ट्रातील जनतेने राज्याचे आदर्श मंत्री व सर्वसामान्य लोकांचा लोकनेता म्हणून जे मानाचे स्थान दिले त्या स्थानाचा मान राखत त्यांनी आयुष्यभर राज्यातील गोरगरीबांची सेवा केली. सर्वसामान्यांची श्रध्दा जाणून घेत आपल्या मंत्रीपदाच्या काळात त्यांनी केलेले कार्य राज्याच्या विकासाला दिशादर्शक देणारे ठरले असून ते अतुलनीय आहे.याची अनेक उदाहरणे आहेत.लोकनेतेसाहेब यांना महाराष्ट्रातील लोकांनी मनापासून आपला लोकनेता मानले होते व आहे. लोकांनी लोकनेत्यांना लोकनेता ही दिलेली पदवी महाराष्ट्रातील पहिली पदवी होती व आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या काळात राज्याच्या राजकारणात तोलामोलाचे अनेक नेते होऊन गेले.लोकनेत्यांचे कार्यच एवढे मोठे आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचा महाराष्ट्रातील जनतेला आजही विसर पडलेला नाही आणि तो कधीही पडणार नाही म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव आज सर्वत्र सुरु असल्याचे दिसून येते.
एखाद्या लौकीक प्राप्त व्यक्तीचा उध्दार त्याची तिसरी पिढी करते असे म्हंटले जाते,त्याचप्रमाणे आपल्या आजोबांनी केलेल्या अतुलनीय कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा जागर त्यांचे नातू राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईसाहेब हे आजही ३६ वर्षापुर्वी लोकनेतेसाहेबांचा असणारा दरारा आणि राज्याच्या राजकारणावरील वचक व त्यांनी महाराष्ट्रातील जनतेकरीता केलेल्या तोलामोलाच्या कार्यानुसार त्याच तोलामोलाप्रमाणेच पाटण मतदारसंघात करीत आहेत. सन २०१० हे लोकनेतेसाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शंभूराज देसाईसाहेब यांनी आमदार नसताना घेतला आणि संपुर्ण महिनाभर हे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात आले.लोकनेतेसाहेबांना अभिवादन करण्याकरीता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून विविध मान्यवर हे लोकनेत्यांच्या जन्मभूमित आले होते.या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने लोकनेतेसाहेबांचे आचरविचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कार्य त्या काळात झाले.शंभूराज देसाईसाहेब यांनी त्याकाळात राबविलेले उपक्रम पाहून राज्यातील विविध राजकीय मान्यवरांनी आपल्या आजोबांचा सातत्याने जागर करणारा नातू महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही या शब्दात शंभूराज देसाईसाहेब यांच्या निर्णयाचे व कार्याचे कौतुक केले होते.
आपल्या आजोबांनी केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी याकरीता लोकनेतेसाहेबांच्या कर्म आणि जन्मभूमित राज्य शासनाकडून चिरंतन असे शताब्दी स्मारक उभारावे ही मुळ संकल्पना शंभूराज देसाईसाहेबांची होती ती संकल्पना त्यांनी सत्यात उतरली.गृहराज्यमंत्री झाल्या झाल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांचा समावेश करुन या कामांस १५ कोटी रुपयांचा वाढीवचा निधी राज्य शासनाकडून मंजुर करुन घेतला.महाराष्ट्राची दौलत आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचा स्वाभिमान असणाऱे लोकनेतेसाहेब यांचे “महाराष्ट्र दौलत” हे शताब्दी स्मारक म्हणजे नामदार शंभूराज देसाईसाहेब यांचा राजकीय,सामाजीक जीवनातील मैलाचा दगड असून असे चिरंतन स्मारक संपुर्ण महाराष्ट्रात कुठेही पहावयास मिळत नाही.लोकनेतेसाहेबांचे कार्य या शताब्दी स्मारकाच्या माध्यमातून पहाण्याची संधी महाराष्ट्रातील लोकनेतेसाहेब प्रेमी जनतेला मिळत आहे.याचा सर्वांनाच मनस्वी आनंद होत असून लोकनेतेसाहेबांचे 1१० व्या जयंती सोहळयानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने त्यांना भावपुर्ण विनम्र अभिवादन...!                                                                                                       
                                                                        
 मिलिंद माळी,विशेष कार्यासन अधिकारी.

कोयना धरणात बोटींग सुरु करणेसंदर्भात प्रत्यक्ष पहाणी करुन अहवाल गृहमंत्रालयाकडे सादर करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकांना आदेश.


                दौलतनगर दि.०९ :- कोयना धरणात बोटींग सुरु करणेसंदर्भात मागील आठवडयात उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे बैठक झाली होती या बैठकीमध्ये धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.या चर्चेमध्ये कोयना धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णय घेणेकरीता गृह विभागाचा  सविस्तर अहवाल प्राप्त होणे गरजेचे असून यासंदर्भात गृहविभागाची बैठक घेण्याचे ठरविण्यात आलेनुसार जिल्हाधिकारी,सातारा व सातारा पोलीस अधीक्षक या दोघांनी बोटींग सुरु करण्याच्या जागांची संयुक्त पहाणी करुन याचा तात्काळ अहवाल गृहमंत्रालयाकडे सादर करावा जेणेकरुन यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांचेकडे अधिवेशन काळात बैठक घेवून निर्णय घेणे शक्य होईल असे आदेश गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह,पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांना दिले.
              उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे झालेल्या बैठकीत गृह विभागाची बैठक घेण्याचे ठरल्यानुसार आज सातारा विश्रामगृह याठिकाणी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या विषयासंदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीस सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह,पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते,कोयना धरण व्यवस्थापन अधीक्षक अभियंता एस.एल.डोईफोडे,कार्यकारी अभियंता कुमार पाटील,वन्यजीवचे विभागाचे प्रभारी उपसंचालक महादेव मोहिते,वन्यजीव कोयना विभागाचे सहाय्यक वनसरंक्षक सुरेश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                  याप्रसंगी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापन अधीक्षक अभियंता एस. एल.डोईफोडे यांचेकडून कोयना धरणाच्या जलाशयातील बोटींग करण्याच्या जलक्षेत्र उपलब्ध असणाऱ्या ठिकाणांची माहिती घेतली.यामध्ये धरणाच्या भिंतीपासून सुमारे ५ किमी अंतरावर बोटींग करणेकरीता मान्यता दयावी याकरीता मी स्वत: तत्कालीन गृहमंत्री केसरकर व तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी हवाई तसेच प्रत्यक्ष जागांची पहाणी केली होती. तसेच यासंदर्भात तत्कालीन गृहराज्यमंत्री यांच्याकडे बैठकाही झाल्या होत्या.कोयना धरणामध्ये बोटींग सुरु व्हावे याकरीता मी स्वत: आग्रही आहे.परंतू धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बोटींग करण्याकरीताची जागा निश्चित करणे आवश्यक आहे. कोयना धरणामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्या ठिकाणी बोटींग सुरु करण्याकरीता वाव आहे हे पहाण्याकरीता जिल्हाधिकारी, सातारा व सातारा पोलीस अधीक्षक या दोघांनी बोटींग सुरु करण्याच्या जागांची संयुक्त पहाणी करुन याचा तात्काळ अहवाल गृहमंत्रालयाकडे सादर करावा.अधिवेशनाचा कालावधी अजुन दोन आठवडयाचा आहे यापुर्वी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या जागांची प्रत्यक्ष पहाणी करावी व अहवाल तयार करावा म्हणजे अधिवेशन काळातच उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे उच्चस्तरीय बैठक घेवून या बोटींग सुरु करणेसंदर्भात निर्णय घेता येईल असे ना.शंभूराज देसाईंनी सुचित केले यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी कोयना धरण व्यवस्थापनचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व वन्यजीव विभागाचे संबधित वरीष्ठ अधिकारी एकत्रितपणे लवकरच त्या जांगाची प्रत्यक्ष पहाणी करुन लवकरच या विषयासंदर्भातील अहवाल सादर करतो असे सांगितले.