Wednesday 18 March 2020

कोरोनो आजाराच्या दक्षतेसाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली तालुका प्रशासनाची बैठक संपन्न. ग्रामीण रुग्णालयातील दक्षता विभागाची केली प्रत्यक्ष पहाणी.




                 दौलतनगर दि.१८:- महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो विषाणूचे सुमारे ४१ विषाणू बाधित लोक आढळून आले असून पाटण या ग्रामीण विधानसभा मतदारसंघात कोरोनो आजाराची दक्षता घेणेकरीता तालुका प्रशासनाने सतर्क रहावे,मतदारसंघातील ग्रामीण आणि डोंगरी भागामध्ये या विषाणूसंदर्भात माहिती देणेकरीता तसेच नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याकरीताची माहिती प्रक्रिया तालुका प्रशासनाने त्यांच्या अख्यारितीतील सर्व यंत्रणामार्फत राबवावी अशा सक्त सुचना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना देवून कोरोनो विषाणू बाधित लक्षणे आढळली तर पाटण या तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कशाप्रकारे उपाययोजना करावयाच्या याच्या नियोजना संदर्भात त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील दक्षता विभागाची संबधित सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेत प्रत्यक्ष पहाणी केली.
               कोरोनो आजाराच्या दक्षतेसाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय याठिकाणी आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या. बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,सहाय्यक पोलीस निरिक्षक तृप्ती सोनवणे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव यांची उपस्थिती होती.
                या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांचेकडून पा्ररंभी पाटण मतदारसंघात बाहेरील देशातून, राज्यातून आपले मतदारसंघात कोणी व्यक्ती आल्या आहेत का? आल्या असतील तर या १५ ते २० दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांची आरोग्य तपासणी केली  आहे काय? त्या तपासणीमध्ये कोरोनो विषाणू बाधित काही लक्षणे आढळून आली नाहीत ना ? अशाप्रकारे प्रश्न करुन माहिती घेतली यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी पाटण मतदारसंघातील बाहेरील देशातून, राज्यातून सुमारे १५ व्यक्ती मतदारसंघात या १५ ते २० दिवसाच्या कालावधीमध्ये आले आहेत त्यांची तपासणी करण्याचे काम करण्यात आले असून कोणाही व्यक्तीमध्ये कोरोनो विषाणू बाधित काही लक्षणे आढळून आली नाहीत तसेच कोरोनो विषाणू संक्रमणापासून बचाव करणेकरीताचे उपाय करणेसंदर्भात तालुका प्रशासनातील अधिकारी यांचया मागील १५ दिवसात ४ ते ५ वेळा बैठका घेवून कोरोनो विषाणू संक्रमण होवू नये याकरीता मतदारसंघातील गावागावामध्ये शासकीय यंत्रणेमार्फत जनजागृती करण्याचे काम सुरवातीपासूनच सुरु करण्यात आले आहे.महसूल यंत्रणेमार्फत मंडलाधिकारी,तलाठी,कोतवाल तसेच पंचायत समितीमार्फत विस्तार अधिकारी,ग्रामसेवक,पोलीस यंत्रणेमार्फत पोलीस पाटील यांना गावा गांवामध्ये जावून जनजागृती करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत या सर्वांवर नियंत्रण ठेवणेकरीता आरोग्य विभागाचे वरीष्ठ अधिकारी यांच्या नेमणूकाही करण्यात आल्या आहेत.मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खोकला,सर्दी,ताप, श्वासोच्छवासात अडथळा येणे अशी लक्षणे दिसून आल्यास रुग्णांनी निष्काळजीपणे न वागता अशा व्यक्तींनी तात्काळ तपासणी करुन घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.असे आजार जाणवणाऱ्या व्यक्तींच्या विलगीकरणाची व्यवस्थाही प्राथमिक आरोग्य,केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये करण्यात आली असल्याचे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मतदारसंघातील यात्रा,मोठे बाजार,लग्न कार्य यालाही मज्जाव करण्यात आला असून मोठमोठया यात्रा रद्द करणेसंदर्भात संबधित गांवामध्ये यात्रा कमिटी यांच्याबरोबर बैठका घेवूनही यात्रा रद्द करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.
           दरम्यान यासंदर्भात शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे, कोणत्याही व्यक्तीला कोरोनो विषाणू बाधित जर लक्षणे आढळून आल्यास तात्काळ त्यांच्यावर तपासणी करुन उपचार करण्यात यावेत अशा सुचना करुन मतदारसंघातील कोणीही व्यक्तींना या आजारासंदर्भात घाबरु नये. मतदारसंघातील जनतेनेही खोकला,सर्दी,ताप,श्वासोच्छवासात अडथळा येणे अशी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ आपली तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील जनतेला या बैठकीच्या माध्यमातून केले. अशा प्रसंगाच्या काळात कोणीही शासकीय अधिकाऱ्यांनी हयगय करु नये अशा सक्त सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या व प्राथमिक आरोग्य केंद्रात उशीरा आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांस कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सक्त सुचना गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना ना.देसाई यांनी केल्या.


No comments:

Post a Comment