Wednesday, 13 May 2020

धक्काबुक्की झालेल्या “त्या ” पोलिस अधिकाऱ्याला गृहराज्यमंत्र्यांचा फोन. डगमगू नको, राज्याचा गृहराज्यमंत्री तुझ्या पाठीशी आहे.




पाटण दि.13 :- म्हसवड जि.सातारा येथील पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जावून धक्काबुक्की केल्याची घटना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या कानावर गेली. ही घटना कानावर जाताच त्यांनी तात्काळ जिल्हा पोलिस अधीक्षकांना फोन करुन संबधित पोलिस अधिकाऱ्यांला धक्काबुक्की करणाऱ्या आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करुन त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करा असे सक्त आदेश दिले.पोलिस अधीक्षकांचा फोन ठेवताच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी धक्काबुक्की झालेल्या अमोल कदम या  पोलिस  अधिकाऱ्याला फोन लावला आणि अमोल,डगमगू नकोस, राज्याचा गृहराज्यमंत्री तुझ्या पाठीशी आहे,घडलेली घटना माझे कानावर आली आहे.मी वरीष्ठांशी बोललो आहे. कर्तव्य बजावित असताना कुणीही असो वर्दीवर हात टाकलेला सहन केला जाणार नाही असा दिलासा त्यांनी “त्या” पोलिस अधिकाऱ्याला दिला आणि काळजी घे असेही त्यांनी “त्या” पोलिस अधिकाऱ्याला सांगितले.
              सातारा जिल्हयातील म्हसवड येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरीता लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्ताच्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावित असताना म्हसवड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम या पोलिस अधिकाऱ्यास अर्वाच्च भाषेत बोलत दमदाटी करुन त्या पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर म्हसवड येथील एक पदाधिकारी धावून गेला व त्या आरोपी पदाधिकाऱ्याने शासकीय कामात अडथळा निर्माण करुन अमोल कदम या पोलिस उपनिरीक्षकांस धक्काबुक्कीही केली असल्याची घटना दोन दिवसापुर्वी म्हसवड येथे घडली. घडलेली ही घटना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या कानावर गेली असता त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ जिल्हा पोलिस अधिक्षकांना फोन केला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करीत पोलिस उपनिरीक्षकाच्या अंगावर धावून गेलेल्या त्या आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करा आणि कडक कायदेशीर कारवाई करा.कोणीही किती मोठा असला तरी शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आणि कर्तव्य बजावित असताना वर्दीवर हात टाकणाऱ्यांची गय केली जाणार नाही.पोलिसांनी तर अशांची अजिबात गय करु नये तात्काळ दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करा असे ना.शंभूराज देसाईंनी सांगितलेनंतर पोलिस उपनिरीक्षकाला धक्का बुक्की करणाऱ्या त्या आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर पुढील कडक कायदेशीर कारवाई करण्याचे काम पोलिस यंत्रणेकडून सुरु आहे.
           राज्याच्या गृहराज्यमंत्री या नात्याने आपल्या विभागाच्या एका अधिकाऱ्याला शिवीगाळ होते,त्या अधिकाऱ्याच्या अंगावर जावून त्यास धक्काबुक्की होते हा प्रकार चुकीचा असून अशांना धडा शिकविण्याचे काम गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केलेच आहे त्याचबरोबर ज्या पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की झाली त्या पोलीस अधिकाऱ्याला आपण राज्याचा गृहराज्यमंत्री आहे हा अविर्भाव न बाळगता त्यांनी स्वत: त्यास फोन केला आणि आपलुकीने “त्या” अधिकाऱ्याची चौकशी करीत डगमगू नकोस, राज्याचा गृहराज्यमंत्री तुझ्या पाठीशी ठाम उभा आहे असा दिलासा देत माणूसकीही जपण्याचे काम गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले.


Tuesday, 12 May 2020

पालकमंत्र्यांच्या कालच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार उपाययोजना करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या पाटण तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सुचना. लॉकडाऊन शिथील झाले तरी नियमांचे पालन करुन खबरदारी घेण्याचे जनतेला केले आवाहन.


          पाटण दि.१२:- कोरोनाच्या प्रतिबंधासाठी काल जिल्हयाच्या ठिकाणी पालकमंत्री,जिल्हयातील सर्व आमदार,खासदार यांची बैठक पार पडली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करुन जिल्हयामध्ये कोरोनावर कशाप्रकारे प्रतिबंध आणता येईल याबाबत काही निर्णय घेण्यात आले. आपल्या तालुक्यात सुमारे ६५ हजार नागरिक पुर्वीच आपल्या मुळगांवी आलेले आहेत तर अजुनही १७ ते साडेसतरा हजार लोक मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर शहरातून येणे अपेक्षित आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता काल झालेल्या बैठकीत जे
निर्णय घेण्यात आले आहेत त्या निर्णयानुसार तालुकास्तरावर सर्व उपाययोजना राबविण्यात याव्यात अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज पाटण तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच ज्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण नाहीत अशा ठिकाणी दि.१७ मे नंतर कदाचित लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर बाहेरगांवाहून पाटण तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांने शासकीय नियमांचे पालन करुन खबरदारी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले
             गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय येथे पाटण तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्या नंतर तालुक्यात काय काय उपाययोजना राबवावयाच्या यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी विविध विषयांवर बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना केल्या.यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर
यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी. पाटील, पाटणच्या सपोनि तृप्ती सोनावणे,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी,पाटण आगाराचे आगारप्रमुख उथळे,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,माजी जि.प.सदस्य बशीर खोंदू, माजी प.स.सदस्य बबनराव भिसे यांची उपस्थिती होती.
           यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, शासकीय माहितीनुसार पाटण तालुक्यात यापुर्वीच ६५ हजार नागरिक आले आहेत व अजुन सतरा ते साडेसतरा नागरिकांनी येण्याकरीता मागणी केली आहे. दि.१७ मे नंतर कदाचित लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर मुंबई,पुणे तसेच राज्यातील इतर शहरातील नागरिक हे आपल्या मुळ गांवी परततील परंतू कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता प्रशासन म्हणून आपण खबरदारी घेवून काळजी घेणे आवश्यक तर आहेच परंतू बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनेही स्वत:ची तसेच त्याच्या कुटुंबांची काळजी घेणेकरीता त्याची त्यानेच खबरदारी घेणे गरजेचे आहे.बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांने होम कॉरन्टाईन होणेकरीता सरकारी कर्मचाऱ्यांमार्फत अधिकृत सुचना देण्याची अंमलबजावणी प्रशासनाने करावी याकरीता मंडलाधिकारी,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांना
तालुक्यातील विभाग वाटून देवून त्यांचे देखरेखी खाली गावांगांवातील तलाठी,ग्रामसेवक,पोलीस पाटील ही यंत्रणा कार्यरत ठेवावी. बाहेरगांवाहून आलेला प्रत्येक नागरिक हा या कालावधीत होम कॉरन्टाईन झाला आहे का? याची तपासणी या यंत्रणेमार्फत करुन घ्यावी. यावर प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नियंत्रण ठेवावे.
          मुंबई तसेच पुणे येथील कन्टेटमेंन्ट झोनमधील नागरिकांना मुळगांवी जाण्याची परवानगी देणेबाबत अजुनही काही निर्णय झाला नाही. असे असले तरी आपण प्रशासनाने सर्वच बाजूने काळजी आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांना होम कॉरन्टाईनचा शिक्का मारल्यानंतर तो व्यक्ती बाहेर कुठे फिरत नाही ना? हेही तपासण्याचे काम वरील सर्व यंत्रणांना लावावे तसेच पोलीस यंत्रणेने ज्या ज्या ठिकाणी चेकनाके तयार केले आहेत त्या त्या चेकनाक्यावरुन बाहेरगांवाहून किती व्यक्ती कोणत्या गांवात आले याचीही माहिती संबधित गावकऱ्यांना देण्यात यावी व संबधित गांवातील त्या व्यक्तींना होम कॉरन्टाईन करताना तेथील ग्रामसमितीलाही विश्वासात घ्यावे. पोलीस यंत्रणेनेही फिरते पथक कार्यान्वीत करुन विभागाविभागात याची तपासणी करुन घ्यावी. आतापर्यंत प्रशासनाने योग्यप्रकारे कोरोनाचा प्रतिबंध करण्याकरीता नियोजन केले आहे त्याचपध्दतीने यापुढेही करावे असे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत सांगितले.
चौकट: बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करा- ना.शंभूराज देसाई.
          कोरोनाचे संकट मोठे आहे,काही दिवसानंतर लॉकडाऊनमध्ये शिथीलता आली तरी बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपल्या स्वत:च्या, कुटुंबांच्या तसेच गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासकीय नियमांचे
पालन करुन होम कॉरन्टाईन व्हावे. जेणेकरुन कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येकाची असून ती काळजी प्रत्येकांनी घ्यावी असे आवाहन ना.शंभूराज देसाईंनी या बैठकीत केले.

Sunday, 10 May 2020

*लाॅकडाऊनच्या काळात भरऊनात कर्तव्य बजाविणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी लस्सीचे वाटप करुन दिला थंडावा*


सातारा दि.१०:- कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता लाॅकडाऊनच्या काळात बंदोबस्ताकरीता रस्त्यावर भरऊनात उभे राहून आपले कर्तव्य बजाविणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह कनिष्ठ पोलीस कर्मचारी यांना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी थंडावा दिला आहे. भरऊनात प्रत्यक्षात बंदोबस्तात कार्यरत असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या वतीने लस्सीचे वाटप करण्यात आले. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रातिनिधीक स्वरुपात सातारा येथे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस्सीचे वाटप केले तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेमार्फत लस्सीचे वाटप करण्यात आले.
       राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून नेहमीच सामाजीक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येतात. कोरोनाचे संकट वाढत असताना कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता आपला जीव धोक्यात घालून दिवसरात्र बंदोबस्तात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्याकरीता त्यांच्या आरोग्याची विचारपुस करण्याकरीता ना.शंभूराज देसाईंनी त्यांच्या संरक्षणाकरीता असणारा सर्व लवाजमा बाजूला ठेवून स्वत: दुचाकीवरून सातारा शहरात फेरफटका मारुन पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्याची तसेच बंदोबस्तामध्ये कसली अडचण नाही ना ? याची विचारपुस करुन पोलिस यंत्रणेचे मनोबल वाढविले होते. 
       आज त्यांनी संपुर्ण सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाच्या संकटसमयी लाॅकडाऊनच्या बंदोबस्तात कार्यरत असणाऱ्या आणि भरऊनात आपली ड्यूटी करून कर्तव्य बजाविणाऱ्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना भरऊनात थंडावा मिळावा याकरीता पोलिस यंत्रणेतील सर्वांना लस्सी वाटपाचा आगळावेगळा उपक्रम राबविला. प्रातिनिधीक स्वरुपात ना.शंभूराज देसाईंनी सातारा येथील बाॅम्बे रेस्टाॅरन्ट चौकात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस्सीचे वाटप केले तर जिल्ह्यातील सातारा,कराड,पाटण,वाई, माण-खटाव,कोरेगांव,फलटण या तालुक्यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेमार्फत सर्वांना लस्सीचे वाटप करण्यात आले. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेमार्फत सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सुमारे १८७५ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना लस्सीचे वाटप करण्यात आले. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या या उपक्रमांबद्दल सातारा जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी ना. शंभूराज देसाईंचे आभार व्यक्त करुन पोलिसांची काळजी घेणारा गृहराज्यमंत्री ना .शंभूराज देसाईंच्या रुपाने महाराष्ट्र राज्याला मिळाला असल्याची प्रतिक्रिया पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी व्यक्त केल्या.

Tuesday, 5 May 2020

जीवनावश्यक साहित्य खरेदी करायला सुट दिली तरी जनतेने सोशल डिस्टटींग पाळा. ना.शंभूराज देसाईंचे पाटण मतदारसंघातील जनतेला आवाहन. सोशल डिस्टटींगचे नियम पाळले जातात का ? याकरीता बाजारपेठांची ना.देसाईंनी केली प्रत्यक्ष पहाणी.




           दौलतनगर दि.०५  :- लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक साहित्य मिळत नसल्याने जनतेची मोठी अडचण होत असल्यामुळे ज्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण नाहीत अशा पाटण तालुक्यात जीवनावश्यक साहित्य खरेदी करायला सकाळी ०९ ते दुपारी ०२ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील किराणा मालाची,औषधांची दुकाने उघडण्यास सुट देण्याचे आदेश जिल्हाधिकारी,सातारा यांनी काढले आहेत.जीवनावश्यक साहित्य खरेदी करायला दुकाने उघडण्याची सुट दिली तरी साहित्य खरेदी करणाऱ्या जनतेने सोशल डिस्टटींग पाळावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला केले त्याचबरोबर त्यांनी मल्हारपेठ,नवारस्ता व पाटण येथील बाजारपेठेमध्ये प्रत्यक्ष जावून सोशल डिस्टटींगचे नियम पाळले जातात का ? याचीही अधिकाऱ्यांसमवेत पहाणी करीत जीवनावश्यक साहित्य खरेदी करणाऱ्यांची त्यांनी आपुलकीने विचारपुस करुन चौकशीही केली.
           कालच जिल्हाधिकारी,सातारा यांनी पाटण तालुक्यातील मल्हारपेठ,नवारस्ता,पाटण नगरपंचायत, तळमावले, ढेबेवाडी व तारळे येथील बाजारपेठामध्ये पाटण तालुक्यातील डोंगरी भागातील जनतेला लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक साहित्य मिळत नसल्याने या सहा बाजारपेठांमध्ये जीवनावश्यक साहित्य खरेदी करायला सकाळी ०९ ते दुपारी ०२ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील किराणा मालाची,औषधांची दुकाने उघडण्यास सुट देण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाची अंमलबजावणी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून संबधित अत्यावश्यक सेवेतील दुकानदार, केमिस्ट दुकाने यांच्याकडून होत आहे का? बाजारपेठांमध्ये जनतेकडून सोशल डिस्टटींगचे नियम पाळले जात आहेत का ? याची प्रत्यक्ष पहाणी करण्याकरीता ते मल्हारपेठ, नवारस्ता व पाटण येथील बाजारपेठेमध्ये आले होते त्यानंतर त्यांनी पाटण तहसिल कार्यालय येथे तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे जनतेला सोशल डिस्टटींगचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
          यावेळी ना.शंभूराज देसाईंनी लॉकडाऊनच्या काळात जनतेला येणाऱ्या अडीअडचणींची माहिती तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना देत जनतेला लॉकडाऊनच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून कालच जिल्हाधिकारी,सातारा यांना सुचना करुन किमान डोंगरी भागातील जनतेला दोनवेळचे अन्न सुरळीत मिळण्याकरीता जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्याकरीता सकाळी ०९ ते दुपारी ०२ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील किराणा मालाची,औषधांची दुकाने उघडण्यास आपण आदेशित केले त्यानुसार जीवनावश्यक साहित्यांची दुकाने उघडली गेली परंतू याठिकाणी सोशल डिस्टटींग राहते का? जनतेला सुरुळीत जीवनावश्यक साहित्य मिळते का? हे पहाणे प्रशासनाचे काम आहे.त्यामुळे अशा बाजारपेठांमध्ये तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी त्याकरीता मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यामार्फत दुकानदारांना सुचित करण्यात यावे.ज्या दुकानदारांकडून सोशल डिस्टटींगचे पालन केले जात नाही अशा दुकानदारांवर कारवाई करावी अशा सक्त सुचना त्यांनी यावेळी पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
          आपल्या तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही ही आनंदाची बाब आहे.कोरोनाचा संसर्ग आपल्या तालुक्यात होवू नये याकरीता आतापर्यंत जी काळजी आपण घेतली आहे तीच काळजी पुढील काळातही आपण सर्वांनी घ्यायची आहे असे सांगून शेतकऱ्यांना शेतामध्ये टाकण्याकरीता खते मिळत नाहीत बिबियाणे मिळत नाही तसेच बँकामध्ये जमा झालेले अनुदान बँका बंद असल्यामुळे मिळत नाही अशा अनेक तक्रारी आल्या आहेत यासंदर्भात जिल्हाधिकारी,सातारा यांना सुचना करुन शेतकऱ्यांना वेळेवर खते,बि बीयाणे देणेकरीता त्याचबरोबर बँकामधील अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळणेकरीताच्या उपाययोजना करण्याचे सुचित केले जाईल असे सांगून तीनचार दिवसापुर्वी झालेल्या वादळी पाऊसामुळे तालुक्यातील अनेक विभागात घरांचे, शेडांचे पत्रे उडून गेले आहेत याची दुरुस्ती करणेकरीता आवश्यक असणारे पत्रे, खिळेमुळे देणेकरीता हार्डवेअरची दुकानेही सुरु करण्यासंदर्भात सुचित केले जाईल याचेही नियोजन तालुका प्रशासनाने करावे असे त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सुचित केले.यावेळी ना.शंभूराज देसाईं यांचेसोबत पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटणच्या सहा.पोलिस निरिक्षक तृप्ती सोनावणे,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी,नायब तहसिलदार प्रशांत थोरात यांची उपस्थिती होती.

Sunday, 3 May 2020

जीवनावश्यक सुविधा घरपोहोच देण्याची जिल्हा प्रशासनाने व्यवस्था करावी. घरपोहोच सुविधा देणेस वाव नसेल त्याठिकाणी नियम पाळून किमान 03 तास दुकाने उघडावीत. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुचना.




                 

              सातारा दि.03 :- सातारा जिल्हयामध्ये सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवरती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या 77 वर गेली आहे. त्यामुळे  सातारा जिल्हा हा रेड झोनमध्ये आला आहे खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या चार पाच दिवसापासून संपुर्ण जिल्हयामध्ये लॉकडाऊन अतिशय कडक पध्दतीने राबविले जात आहे त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक सुविधा मिळणे कठीण झाले आहे याकरीता जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात जीवनावश्यक सुविधा घरपोहोच देण्याची व्यवस्था करावी तसेच ज्याठिकाणी घरपोहोच सुविधा देणेस वाव नाही अशा ठिकाणी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून सामाजीक अंतर ठेवून दुसऱ्या टप्प्यात सकाळी किमान 03 तास जीवनावश्यक साहित्यांची दुकाने उघडी ठेवावीत अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हाधिकारी यांना आज केल्या.
                 गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी वरील महत्वाच्या विषयासंदर्भात आज सगळा प्रोटोकॉल (राजशिष्टाचार) बाजुला ठेवून सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जावून प्रत्यक्ष भेट घेतली व या महत्वाच्या विषयासंदर्भात त्यांनी सुमारे एक तास जिल्हाधिकारी यांचेबरोबर चर्चा केली. यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवरती लॉकडाऊनच्या काळात शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करुन देणेकरीता जिल्हयातील सर्व अधिकारी यांची बैठक घेवून यासंबधीचा आराखडा तयार करुन आवश्यक त्या उपायायोजना केल्या जातील असे सांगितले.
                         गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह या दोघांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये ना.शंभूराज देसाईंनी लॉकडाऊनच्या काळात सातारा जिल्हयातील सर्वसामान्य जनतेची सुरु असणारी परवड मांडताना घेतलेल्या भूमिकेमध्ये  सातारा जिल्हयामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या 77 वर गेली असून सातारा जिल्हा हा रेड झोनमध्ये आला आहे खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या चार पाच दिवसापासून संपुर्ण जिल्हयामध्ये लॉकडाऊन अतिशय कडक पध्दतीने राबविले जात आहे.आता केंद्र शासनानेच 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे.सर्वसाधारण लोकांच्यामध्ये 03 तारखेपर्यतच लॉकडाऊन आहे आणि 03 तारखेला लॉकडाऊन शिथील होणार ही मानसिकता असल्यामुळे घरातील धान्य म्हणा, घरगूती साहित्य किंवा भाजीपाला म्हणा हा केवळ 03 तारखेपर्यंतचाच लोकांनी आपल्या घरात भरुन ठेवला होता लॉकडाऊन वाढल्यामुळे संपुर्ण जिल्हयामध्ये धान्याची दुकाने बंद आहेत, भाजीपाला फळफळे दुकाने बंद आहेत आता सुरु आहे काय केवळ दुध आणि औषधे घरपोहोच सेवा आणि औषधांची दुकाने उघडी आहेत या पार्श्वभूमिवरती जिल्हयातल्या ग्रामीण तसेच शहरी भागातील बऱ्याचश्या लोकांनी माझेशी संपर्क साधला आणि त्यांच्या अडचणी सांगितल्या. आमचेकडे धान्य नाही, आम्हाला भाजीपाला मिळत नाही, आम्हाला जीवनावश्यक वस्तू काहीच मिळत नाही. या संदर्भातील अडचणी समोर आल्यानंतर निश्चीतपणे लोकांची गैरसोय होत आहे याबाबत दुमत नाही.
                      लॉकडाऊनचा कालावधी वाढला असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेला धान्य, भाजीपाला या जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत.किमान दोन वेळेचे अन्न लोकांना खायला मिळाले पाहिजे याची खबरदारी,दक्षता आपण शासन म्हणून घेणे गरजचे आहे उद्याचा दिवस जावून परवाच्या दिवासापासून आपल्याला ही सेवा सुरु करता येते का हे पहावे असे ना.शंभूराज देसाईंनी पहिल्या टप्प्यात  जिल्हाधिकारी यांना सुचविले. तसेच दुसऱ्या टप्प्यात सातारा जिल्हयात येत्या दोन तीन दिवसात रुग्णांची संख्या वाढते का? कमी होते याचा ही अंदाज जिल्हा प्रशासनाने घ्यावा व त्यानंतर ज्यांना घरपोहोच सुविधा देण्यास वाव नाही त्यांना किमान जीवनावश्यक बाबी मिळणेकरीता दुकाने किमान सकाळी 09 ते 12 पर्यंत तीन तास उघडी ठेवावीत व लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून सामाजीक अंतर ठेवून गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून या जीवनावश्यक बाबी जनतेला मिळण्याची व्यवस्था करावी.या दोन्ही विषयांचा आराखडा तयार करुन यावर अंमलबजावणी व्हावी असे ना.शंभूराज देसाईंनी सांगितल्या नंतर जिल्हयातील  कुठल्या विभागात काय उपाययोजना करता येतील याचा जिल्हयातील अधिकारी यांना घेवून आराखडा तयार करुन लोकांची जीवनावश्यक वस्तूंची अडचण होणार नाही याची दक्षता घेवू आणि सेवा सुरु करु जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले त्यावर जिल्हाधिकारी मी मांडलेल्या सुचनासंदर्भात अधिकाऱ्यांना घेवून याचा आराखडा व नियोजन करतील व येत्या दोन तीन दिवसात सातारा जिल्हयामध्ये या  जीवनावश्यक सुविधा लोकांना मिळतील अशी खात्री आणि विश्वास ना.शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.


Saturday, 2 May 2020

वादळी पावसामुळे झालेल्या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या सुचना. नुकसानीच्या जागी ना.शंभूराज देसाईंनी दिल्या प्रत्यक्ष भेटी.



                 

              पाटण दि.02 :-  दि. 29 एप्रिल रोजी पाटण मतदारसंघात सर्वच विभागात मोठया प्रमाणात झालेल्या वादळी पावसामुळे डोंगरपठारावरील तसेच सकल भागातील गांवामधील घरांच्या तसेच शेडांच्या वरील पत्रे उडून जावून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर पिकांचे आणि फळबांगाचेही नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या घरांच्या,शेडांच्या,पिकांच्या व फळबागांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळणेकरीताचा अहवाल शासनाकडे सादर करावा अशा सक्त सुचना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्याचदिवशी पाटणचे प्रातांधिकारी,तहसिलदार व कृषी विभागाला दिल्या आहेत तर आज त्यांनी तारळे विभागातील वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या गांवाना भेटी देत झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी केली व नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देणेकरीता मी प्रयत्नशील असल्याचे सांगून त्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.
              कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदीच्या काळात मुळातच हैरान झालेल्या पाटण मतदारसंघातील जनतेला दि.29 एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीतून नुकसानग्रस्त जनतेला सावरण्याकरीता मतदारसंघाचे आमदार,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी नुकसानग्रस्तांपर्यंत तातडीने धाव घेतली असून कोरोनाचे संकट असतानाही त्यांनी आज तारळे विभागात जावून घोट व मरळोशी या गांवाना प्रत्यक्ष भेट दिली आणि झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महसूल,कृषी विभागाचे संबधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                  दि.29 एप्रिल रोजी पाटण मतदारसंघातील विविध भागात वादळी पावसामुळे डोंगरी भागातील गांवामधील, वाडयावस्त्यांमधील घरांचे तसेच शेडांचे पत्रे मोठया प्रमाणात उडून गेले आहेत तर शेतातील पिकांचे व फळबागांचे मोठया संख्येने नुकसान झाले आहे असे समजताच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तात्काळ पाटणचे प्रातांधिकारी,तहसिलदार यांना दुरध्वनीवरुन वादळी पावसामुळे मतदारसंघातील विविध भागात मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीचे उद्याच्या उद्या पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु करा आणि लवकरात लवकर नुकसानीचा अहवाल शासनास सादर करा जेणेकरुन नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळवून देता येईल अशा सक्त सुचना दिल्या होत्या. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या सुचनांवरुन पाटण मतदारसंघातील महसूल व कृषी विभागाकडून तात्काळ वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीची पहाणी करुन पंचनामे करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली असून पाटण मतदारसंघात मेंढोशी,बिबी,धडामवाडी,म्हावशी,सुरुल,पिपंळोशी,टोळेवाडी, नारळवाडी, आंब्रुळे,पापर्डे,मुरुड,घोट,ढोरोशी,मरळोशी,जंगलवाडी,धायटी,पाडळोशी,सडावाघापूर,काळोली,मुळगांव,   येराड,नेरळे,कवरवाडी,नेचल,गोषटवाडी,किल्लेमोरगिरी,सणबूर या गांवामध्ये व वाडयावस्त्यां मध्ये घरांचे तसेच चाफळ,पेठशिवापुर, किल्लेमोरगिरी, डोंगळेवाडी या गांवामध्ये पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल व कृषी विभागामार्फत प्रगतीपथावर सुरु आहे.
               गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज तारळे विभागातील घोट व मरळोशी या गांवातील नुकसानीच्या ठिकाणांना भेटी दिल्यानंतर दि.29 एप्रिल रोजी वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या पाटण मतदारसंघातील वरील सर्व गांवातील, वाडयावस्त्यांमधील घरांच्या, शेडांच्या,पिकांच्या व फळबागांच्या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना प्रातांधिकारी,तहसिलदार यांना दिल्या असून नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनाकडे तात्काळ सादर करण्याची प्रक्रिया महसूल व कृषी विभागामार्फत प्रगतीपथावर सुरु आहे,वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्तांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याकरीता मी प्रयत्नशील आहे असे त्यांनी यावेळी सांगितले व नुकसानग्रस्तांना आधार देत दिलासा दिला.

Tuesday, 28 April 2020

प्रतिबंध वाढविला म्हणून घाबरु नका, प्रशासन सज्ज आहे, प्रशासनाला सहकार्य करा. ना.शंभूराज देसाईंचे पाटण मतदारसंघातील जनतेला आवाहन.


           दौलतनगर दि.28 :  चाफळ विभागातील डेरवण येथील परिस्थिती आटोक्यात आली आहे मात्र शेजारील कराड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे सातारा जिल्हयात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण कराड तालुक्यात आढळून आले आहेत.आपला मतदारसंघ कराड तालुक्याला लागून असल्याने काळजी घेणेकरीता पाटण मतदारसंघातील पाटण,ढेबेवाडी,तळमावले,तारळे,मल्हारपेठ व नाडे या मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी प्रतिबंध वाढविण्यात आला आहे.प्रतिबंध वाढविला म्हणून घाबरु नका,प्रशासन सज्ज आहे, प्रशासनाला आवश्यक ते सगळे सहकार्य करा असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला केले आहे.
          पाटण तहसिल कार्यालयात ना.शंभूराज देसाईंनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पाटण मतदारसंघातील सद्यपरिस्थितीचा तालुका प्रशासनातील अधिकारी यांचेकडून आढावा घेतला त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे मतदारसंघातील जनतेला आवाहन केले. यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटणच्या सहा.पोलिस निरिक्षक तृप्ती सोनावणे, पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी,नायब तहसिलदार प्रशांत थोरात यांची उपस्थिती होती.
           याप्रसंगी ना.शंभूराज देसाईंनी चाफळ विभागातील डेरवण गांवातील १० महिन्यांच्या मुलगा याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता त्याअनुषगांने या मुलाच्या आरोग्यात सुधारणा झाली का? १४ दिवसाचा कालावधी पुर्ण होताना दुसऱ्यांदा या मुलाचे नमुने तपासणीकरीता सादर केले का? मतदारसंघात इतर ठिकाणी कोरोना सदृष्य परिस्थिती जाणवून येत नाही ना?  याकरीता आढावा बैठक घेतली यावेळी पाटण मतदारसंघातील कोरोना रुग्ण १० महिन्यांच्या मुलाचे नुमने तपासणी करण्याकरीता घेणेत आले असून ते तपासणीकरीता सादर करीत आहोत. डेरवण त्या मुलाच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून परिस्थिती आटोक्यात आली आहे.आता काळजी करण्याचे कोणतेही कारण नसले तरी कराड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्या मुळे खबरदारी म्हणून पाटण मतदारसंघातील पाटण,ढेबेवाडी,तळमावले,तारळे,मल्हारपेठ व नाडे या मुख्य बाजारपेठ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली असून प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्यापासून या मुख्य बाजारपेठामध्ये मोठया प्रमाणात जनतेची गर्दी कमी झाली आहे. मतदारसंघातील जनतेला केंद्र शासनाकडून आलेले मोफतचे धान्य ९५ टक्के लोकांपर्यंत पोहचविले आहे आता केशरी कार्डधारकांना मे महिन्याचे धान्य वाटप करण्याची कार्यवाही पुरवठा विभाग व तहसिलदार यांचेकडून सुरु करण्यात आली आहे.ज्यांची केशरी रंगाची रेशनिगंची कार्ड आहेत त्याच कार्डधारकांना रेशनिगंचे धान्य देण्यात येणार आहे. तसेच रेग्लूलर कार्डधारकांनाही माहे मे महिन्याचे धान्य देण्यात येणार असल्याचे प्रातांधिकारी तांबे यांनी यावेळी सांगितले.
          यावेळी जीवनावश्यक वस्तू जनतेपर्यंत वेळेत पोहचविण्याची कार्यवाही प्रशासनाने लवकरात लवकर पुर्ण करावी यामध्ये कुणाच्या तक्रारी येणार नाहीत याचीही खबरदारी प्रशासनाने घ्यावी असे ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सुचित करुन छुप्या मार्गाने कोणी मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर शहरातून मतदारसंघात येत नाही ना यावर गृह विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी लक्ष ठेवून रहावे  तसेच  आरोग्य विभागाने यापुर्वी कॉरन्टाईन केलेल्यांच्या आरोग्य तपासण्या करुन घ्याव्यात. मी मतदारसंघातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांना भेटी देवून सतर्क राहण्याच्या सुचना यापुर्वीच केल्या आहेत मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांनीही लक्ष ठेवून रहावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. मतदारसंघातील प्रशासन सतर्क आहे, जनतेने या प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवावी असे त्यांनी शेवठी बोलताना सांगितले.