पाटण दि.१२:- कोरोनाच्या प्रतिबंधासाठी काल जिल्हयाच्या ठिकाणी पालकमंत्री,जिल्हयातील सर्व आमदार,खासदार यांची बैठक पार पडली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करुन जिल्हयामध्ये कोरोनावर कशाप्रकारे प्रतिबंध आणता येईल याबाबत काही निर्णय घेण्यात आले. आपल्या तालुक्यात सुमारे ६५ हजार नागरिक पुर्वीच आपल्या मुळगांवी आलेले आहेत तर अजुनही १७ ते साडेसतरा हजार लोक मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर शहरातून येणे अपेक्षित आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता काल झालेल्या बैठकीत जे
निर्णय घेण्यात आले आहेत त्या निर्णयानुसार तालुकास्तरावर सर्व उपाययोजना राबविण्यात याव्यात अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज पाटण तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच ज्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण नाहीत अशा ठिकाणी दि.१७ मे नंतर कदाचित लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर बाहेरगांवाहून पाटण तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांने शासकीय नियमांचे पालन करुन खबरदारी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय येथे पाटण तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्या नंतर तालुक्यात काय काय उपाययोजना राबवावयाच्या यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी विविध विषयांवर बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना केल्या.यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर
यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी. पाटील, पाटणच्या सपोनि तृप्ती सोनावणे,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी,पाटण आगाराचे आगारप्रमुख उथळे,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,माजी जि.प.सदस्य बशीर खोंदू, माजी प.स.सदस्य बबनराव भिसे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, शासकीय माहितीनुसार पाटण तालुक्यात यापुर्वीच ६५ हजार नागरिक आले आहेत व अजुन सतरा ते साडेसतरा नागरिकांनी येण्याकरीता मागणी केली आहे. दि.१७ मे नंतर कदाचित लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर मुंबई,पुणे तसेच राज्यातील इतर शहरातील नागरिक हे आपल्या मुळ गांवी परततील परंतू कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता प्रशासन म्हणून आपण खबरदारी घेवून काळजी घेणे आवश्यक तर आहेच परंतू बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनेही स्वत:ची तसेच त्याच्या कुटुंबांची काळजी घेणेकरीता त्याची त्यानेच खबरदारी घेणे गरजेचे आहे.बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांने होम कॉरन्टाईन होणेकरीता सरकारी कर्मचाऱ्यांमार्फत अधिकृत सुचना देण्याची अंमलबजावणी प्रशासनाने करावी याकरीता मंडलाधिकारी,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांना
तालुक्यातील विभाग वाटून देवून त्यांचे देखरेखी खाली गावांगांवातील तलाठी,ग्रामसेवक,पोलीस पाटील ही यंत्रणा कार्यरत ठेवावी. बाहेरगांवाहून आलेला प्रत्येक नागरिक हा या कालावधीत होम कॉरन्टाईन झाला आहे का? याची तपासणी या यंत्रणेमार्फत करुन घ्यावी. यावर प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नियंत्रण ठेवावे.
मुंबई तसेच पुणे येथील कन्टेटमेंन्ट झोनमधील नागरिकांना मुळगांवी जाण्याची परवानगी देणेबाबत अजुनही काही निर्णय झाला नाही. असे असले तरी आपण प्रशासनाने सर्वच बाजूने काळजी आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांना होम कॉरन्टाईनचा शिक्का मारल्यानंतर तो व्यक्ती बाहेर कुठे फिरत नाही ना? हेही तपासण्याचे काम वरील सर्व यंत्रणांना लावावे तसेच पोलीस यंत्रणेने ज्या ज्या ठिकाणी चेकनाके तयार केले आहेत त्या त्या चेकनाक्यावरुन बाहेरगांवाहून किती व्यक्ती कोणत्या गांवात आले याचीही माहिती संबधित गावकऱ्यांना देण्यात यावी व संबधित गांवातील त्या व्यक्तींना होम कॉरन्टाईन करताना तेथील ग्रामसमितीलाही विश्वासात घ्यावे. पोलीस यंत्रणेनेही फिरते पथक कार्यान्वीत करुन विभागाविभागात याची तपासणी करुन घ्यावी. आतापर्यंत प्रशासनाने योग्यप्रकारे कोरोनाचा प्रतिबंध करण्याकरीता नियोजन केले आहे त्याचपध्दतीने यापुढेही करावे असे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत सांगितले.
चौकट: बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करा- ना.शंभूराज देसाई.
कोरोनाचे संकट मोठे आहे,काही दिवसानंतर लॉकडाऊनमध्ये शिथीलता आली तरी बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपल्या स्वत:च्या, कुटुंबांच्या तसेच गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासकीय नियमांचे
पालन करुन होम कॉरन्टाईन व्हावे. जेणेकरुन कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येकाची असून ती काळजी प्रत्येकांनी घ्यावी असे आवाहन ना.शंभूराज देसाईंनी या बैठकीत केले.
No comments:
Post a Comment