Monday, 8 November 2021

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या आदराने पोलीस अधिकारी भारावले..! प्रोटोकॉल चा विचार न करता शेजारी बसवून केला 'दिवाळी फराळ' *मंत्री देसाई यांच्या उपस्थित रंगली 'दिवाळी फराळ सायंकाळ' *पाटणमध्ये शासन,प्रशासन आणि जनता यांचा अनोखा संगम

 




दौलतनगर दि.08(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-संगीताचे सुमधुर स्वर.....गायक गायिकांच्या कर्णमधुर आवाजामुळे सजलेली मैफिल...मनाचा ठाव घेणारे वादन... रंगीबेरंगी दिव्यांची झगमगाट...आणि संगीतमय तालावरचा 'दिवाळी फराळ !'तो ही स्वतः राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई व  जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी,पोलीस अधिकारी आणि पदाधिकारी,सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्या समवेत दिवाळी फराळ....!असा अनोखा मिलाफ दौलतनगर, ता. पाटण येथे रविवारी सायंकाळी अनुभवायला मिळाला.दरम्यान दस्तुरखुद्द राज्याचे गृहराज्यमंत्रीच आपल्या शेजारी बसवून अत्यंत आदराने दिवाळी फराळ खाण्यासाठी आग्रह करीत असल्याने उपस्थित पोलीस अधिकारी ही अक्षरशः भारावून गेले.

              खाऊ दिवाळी, लेवू दिवाळी आणि सजवू दिवाळी या उद्देशातून महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री ना.शंभुराज देसाई हे प्रतिवर्षी आपल्या दौलतनगर येथील निवास्थानी दिवाळी फराळचे अनोखे असे आयोजन करतात. गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. मात्र यावर्षी राज्यातील कोरोना परिस्थिती निवळल्यामुळे पुन्हा  त्यांच्या दौलतनगर ता.पाटण येथील निवासस्थानी दिवाळी फराळ आणि 'मेघ मल्हार' वाद्यवृंद हा मराठी गाण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

       दिवाळी हा सर्वच सणातील सर्वात मोठा आणि महत्वपूर्ण सण समजला जातो.राजकारणात बहुतांशी लोकप्रतिनिधी  'दिवाळी' हा सण  आपल्या कुटुंबासमवेत कधी जिल्हा बाहेर तर कधी राज्य आणि देशाच्या बाहेर ही साजरा करतात.मात्र पाटणचे शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास आणि पणन राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी गेल्या  सहा वर्षापासून आपल्या पाटण विधानसभा मतदार संघातील शासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासमवेत दिवाळी फराळ या नावाने 'दिवाळी' हा सण साजरा करणेचा  अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

            रविवारी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत त्यांच्या दौलतनगर (ता.पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी  'दिवाळी फराळ' या अनोख्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री शंभुराज देसाई यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबातील मंत्री देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई,बंधू रविराज देसाई,चि.जयराज देसाई यांच्यासाहित शासनाच्या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी,जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी,पत्रकार आणि तालुक्याच्या विविध भागातून आलेले पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमुळे 'लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि सामान्य जनता' यांचा अनोखा संगम या दिवाळीच्या फराळ कार्यक्रमातून पाहवयास मिळाला. यावेळी मंत्री देसाई स्वतः सर्वांची आस्थेवाईक पणे विचारपूस करून प्रत्येक टेबल जवळ जाऊन फराळ मिळाला की नाही ,'बरेच दिवस दिसला नाही','कसे चालले आहे',अशी हक्काने विचारपूस करताना कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी ही भारावून जाताना दिसत होते.दरम्यान तब्बल दोन तास सुरु असलेल्या या मैफिलीत आणखी रंग भरला तो  मुंबई येथील 'मेघ मल्हार' वाद्यवृंद या  मराठी गाण्यांचा कार्यक्रमाने.या कार्यक्रमात अनेक मराठी गीतांबरोबर हिंदी बहारदार गीतांनी ही मैफिल अधिकच रंगदार झाली.त्यामुळे संगीताच्या ठेक्यावर फराळाचा आनंद द्विगुणित झाला.

  चौकट: गृहमंत्री असावा तर असा..!

              एरव्ही नेहमीच मंत्र्यांची सुरक्षा आणि बंदोबस्त या कामासाठी गृहराज्य मंत्र्यांच्या सेवेसाठी असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना या कार्यक्रमात दस्तुरखुद्द गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई हे  स्वतः पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची 'प्रोटोकॉल' चा विचार न करता आपुलकीने चौकशी करून आपल्या शेजारी बसवून दिवाळी फराळाचा आग्रह करताना दिसत होते.दरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळात इतर वेळी  कडक आणि दरारा असणाऱ्या गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी स्वतः पोलिसांनाच शेजारी बसवून दिवाळी फराळ आग्रहाने खाऊ घातल्याने कर्तव्यात कडक आणि दरारा असलेला मंत्री प्रत्यक्षात मात्र एक साधाच आणि प्रेमळ मंत्री असल्याने  'गृहमंत्री असावा तर असा' अशी   चर्चा उपस्थित पोलीस दलात सुरू होती.

 चौकट : राज्याच्या वतीने मंत्री देसाई यांच्याकडून  शुभेच्छा..!

         प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी  आयोजित केलेल्या 'दिवाळी फराळ सायंकाळ'या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी,वरिष्ठ शासकीय  अधिकारी,पोलीस अधिकारी,पाटण मतदार संघातील शासकीय निमशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी माझ्या विनंतीला मान देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि 'दिवाळी फराळ'कार्यक्रमाची शोभा वाढविली याबद्दल सर्वांचा मी मनःपूर्वक आभार व्यक्त करीत असल्याचे मत व्यक्त करून मंत्री देसाई म्हणाले,वर्षभर लोकप्रतिनिधी प्रशासन आणि कार्यकर्ते यांच्या मध्ये केवळ विकासकामे यांच्या माध्यमातून संपर्क असतो मात्र लोकप्रतिनिधी, शासकीय वरिष्ठ अधिकारी,सामान्य नागरिक यांच्यामध्ये कोणत्याही ताण तणावाशिवाय, कामाशिवाय एक मंगलमय  बैठक... आस्थेवाईक पणे आणि आदराने विचारांची देवाण घेवाण घडण्यासाठी.....एक अनोखा संगम.....या उद्देशाने दिवाळी फराळाची कल्पना पुढे आली आणि गेल्या सहा वर्षापासून हा उपक्रम यशस्वीपणे सुरु आहे आणि यापुढे ही असाच सुरु राहावा,अशी अपेक्षा व्यक्त करून  मंत्री ना.देसाई यांनी शेवटी राज्याच्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या वतीने त्यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Wednesday, 3 November 2021

यंदाची दिवाळी साजरी करताना आरोग्याची काळजी घ्या ! गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे जनतेला आवाहन. दिवाळी सणाच्या दिल्या मतदारसंघ व जिल्हावासियांना शुभेच्छा.

 

दौलतनगर दि.03(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या विविध सणापैकी दिवाळी हा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण.हा सण साजरा करण्यासाठी बाहेरगावी असलेली मंडळी आपल्या गावी परत येऊन कुटुंबासोबत एकत्रितपणे हा सण साजरा करतात. कोरोना संसर्गाचा धोका कमी झाला असला तरी यंदाची दिवाळी प्रत्येकाने आनंदात पण साधेपणाने साजरी करा, आरोग्याची काळजी घ्यावी व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनता व सातारा जिल्हावासियांना केले आहे. 

                 कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. कुठेही गर्दी होणार नाही याबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे. यंदाची दिवाळी साजरी करताना आरोग्याची काळजी  घ्यावी.

                  दिवाळी हा सण दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवात दरवर्षी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करतांना फटाके फोडणे टाळावे.फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम श्वसनावर होतो.त्यामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करतांना दिव्यांची आरास करून हा उत्सव साजरा करावा,असे आवाहनही शेवटी गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई केले असून त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनता व सातारा जिल्हावासियांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Friday, 29 October 2021

महाविकास आघाडीचे सरकार देसाई कारखान्याच्या पाठीशी ठाम-गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा 48 वा गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न.

 



दौलतनगर दि.२9(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्यातील  साखर उद्योगाची परिस्थिती  सध्या अडचणीत असून ही लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील आहे.त्यामुळे या पुढे ही देसाई कारखान्याने पारदर्शक कारभार करून  आपले उद्दिष्ट पार करून पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार देसाई कारखान्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,अशी ग्वाही राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.दरम्यान कारखाना कार्यक्षेत्रातील बाहेर जाणाऱ्या ऊसाची गंभीर पणे दखल घेऊन त्यासाठी कारखान्याने गोपनीय यंत्रणा उभी करावी,अशा सूचनाही गृहराज्यमंत्री देसाई यांनी दिला.

       ते दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ मधील ४8 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद श्री.निवृत्ती बाळकू कर्पे करपेवाडी, श्री. सदाशिव पांडूरंग चव्हाण विहे, श्री. यशवंत रामचंद्र तोळसणकर सळवे, श्री. विष्णू शंकर पानस्कर मंद्रुळहवेली, श्री. बापूराव दगडू शिवदास माजगाव,श्री.शशिकांत महादेवशिंदे कोरिवळे,श्री.सर्जेराव यशवंत चव्हाण आवर्डे,श्री.रंगराव बाळू जाधव मेंढोशी,श्री.लक्ष्मण आबा जामदार नावडी, श्री.भाऊसो पांडूरंग सुर्वे वाडीकोतावडे, श्री. तुकाराम धोंडीबा डफळे येराड या ज्येष्ठ 11 सभासदांचे शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवा नेते यशराज देसाई,चि.आदित्यराज देसाई,चेअरमन अशोकराव पाटील, व्हा.चेअरमन राजाराम पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,ॲङमिलिंद पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,संचालक पांडूरंग नलवडे,सोमनाथ खामकर,गजानन जाधव,शशिकांत निकम,अशोकराव डिगे, विजय जंबुरे देशमुख,बबनराव भिसे,विकास गिरी,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,दादा जाधव,सुरेश पानस्कर, पंजाबराव देसाई,भरत साळूंखे,अभिजित पाटील,सर्व संचालक मंडळ,पदाधिकारी व कार्यकर्ते,कारखाना अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

       ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले,राज्यातीला सहकारी साखर उद्योग सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालला असून सहकारी साखर कारखाने शंभर टक्के शासनाच्या नियमाचे पालन करूनच  कारखाने चालवावे लागतात    लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिेक क्षेत्र हे डोंगंरी भागात आहे. कोयनानदीकाठी अल्प प्रमाणात ऊसाचे कार्यक्षेत्र आहे. संपुर्ण पाटण तालुक्यातील ऊसाची लागवड पाहिली तर तीन ते साडेतीन लाख मे.टनाच्या वर जात नाही. ही वस्तूस्थिती असताना देखील आपले कारखान्याने कारखान्याच्या सभासंदाना व ऊस उत्पादक शेतक-यांना इतर मोठया कारखान्यांच्या बरोबरीने प्रतिवर्षी दर दिला आहे.

    मात्र पाणी,बियाणे,चोवीस तास वीज यासाठी मदत कारखान्याची आणि शासनाची घेऊन  जाणीवपूर्वेक बाहेरच्या काऱखान्याला ऊस घालणार्याची मानसिकता बदलली पाहिजे. बाहेर जाणार ऊस थांबवण्यासाठी संचालक मंडळाने दिवाळी पूर्वी बैठक घेऊन बाहेर जाणाऱ्या ऊसा संदर्भात गांभीर्यपूर्वक नियोजन करावे.त्यासाठी कारखान्याने गोपनीय यंत्रणा उभी करून विशेष मोहीम आखली पाहिजे तरच त्याचे योग्य परिणाम दिसतील अशा सूचना ही त्यांनी यावेळी कारखान्याच्या प्रशासन यंत्रणा आणि संचालक मंडळाला देऊन हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सर्वोत्परी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

चौकट: 'मरळी साखरेला परदेशात मागणी'

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या पारदर्शक कारभार आणि उत्कृष्ट नियोजन यामुळे आजही जागतिक बाजारात 'मरळी साखरे'चा दर्जा उत्कृष्ठ असून परदेशी बाजारपेठेत  'मरळी साखरेला चांगली मागणी असल्याचे सांगून हा दर्जा असाच टिकवून ठेवावा अशी अपेक्षा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.

 चौकट: केंद्र सरकारकडून सकारात्मक भूमिका..!

          केंद्र सरकारने साखर कारखान्यांनी दिलेल्या जादा ऊस दरावर कारखान्याचा नफा लावण्यात आलेल्या  इन्कम टॅक्स मूळे  आज पर्यंत राज्यातील कारखान्यांच्या डोक्यावर  कोट्यवधी रुपयांचा इन्कम टॅक्स ची तलवार लटकत होती.यासंर्भात नागपूर येथे अधिवेशनादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आम्ही राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटून राज्यातील तमाम कारखान्याच्या डोक्यावरील इन्कम टॅक्स ची टांगती तलवार कमी करण्याची मागणी केली होती.त्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे दिसत असून यामुळे राज्यातील कारखान्यांना  निश्चितच 'इन्कम टॅक्स' पासून दिलासा मिळेल असे मत  व्यक्त करून केंद्र सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगीतले.

निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच सत्तेत मानाचं स्थान- ना.शंभूराज देसाई. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर मारुल हवेली ते दिवशी बुद्रुक रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

 



 दौलतनगर दि.२9(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण मतदारसंघामध्ये राजकीय वाटचाल करत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागला, संघर्ष करावा लागला.असे असतानाही गावा-गावांमध्ये निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते यांची मजबूत फळी प्रत्येक गावांमध्ये निष्ठेने काम करत होती.काही वेळा पराभव झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना नाहक त्रासही झाला,पण कार्यकर्ते न डगमगले नाहीत,त्यांनी नाहक त्रास सहन केला. पण मनामध्ये संघटनेबाबतची निष्ठा कायम ठेवली.तालुक्यामध्ये गावा-गावांत असलेल्या निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मानाचं स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

              ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मारुलहवेली ते दिवशी बुद्रुक या रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी  बोलत होते.यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲङ मिलिंद पाटील, ॲङडी.पी.जाधव, ॲङबाबूराव नांगरे,अधिक पाटील,संचालक पांडूरंग नलवडे,शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,दादा जाधव,बाळासो सुर्यवंशी,अशोक सुर्यवंशी,सखाराम पाटील,बबनराव सुर्यवंशी,व्ही.जी.डोंगरे,बाळासो डोंगरे,प्रशांत चव्हाण,आनंदा पाटील, हणमंत सुर्यवंशी,श्रीमंत डोंगरे, टी.पी.कदम, एकनाथ गवळी, रामभाऊ महापूरे,प्रल्हाद महापुरे,भगवान महापुरे,राजाभाऊ सुर्यवंशी,पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.

                   ना. देसाई पुढे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रगती होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. त्यांनी तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावे व वाडया-वस्त्यामधील सामान्य माणसांच्या उन्नतीसाठी व प्रगतीकरीता मंत्रीपदाच्या कालावधीत अनेक धाडसी निर्णय घेतले. शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावल पाहिजे हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता. त्याकाळात नोकरीसाठी बाहेरगावी जाण्याची पध्दत होती,मिळेल त्या ठिकाणी मोल मजुरी करायची आणि कुटुंबाचा उदर-निर्वाह करण्याची मानसिकता माणसांच्यामध्ये होती.त्यामुळे खेडो-पाडयात शिक्षणाच्या सुविधा झाल्या पाहिजेत, त्याचबरोबर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातातून शेतकरी समृध्द झाला पाहिजे ही दूरदृष्टीचा त्यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई यांची होती. कोयना नदीवर 25 उपसा जलसिंचन उभारल्या.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या उपसा योजनांना मदत करुन निश्चितपणे शेतकऱ्यांच्या उन्नतीकरीता स्व.लोकनेते साहेब व स्व. शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांनी त्या काळात प्रयत्न केला असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,पाटण तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये पहिल्यापासून आपण संघर्ष केला. दिवशी बुद्रुक सारख्या गावाचा विचार केला तर कै.शिवराम पाटील (नाना) व कै.प्रेमनाथ पाटील (तात्या) हे ज्येष्ठ कार्यकर्ते या गावांमध्ये संघटना टिकवण्याचे व वाढविण्याचे प्रामाणिक काम करत होते. निवडणूकींमध्ये पराभव झाला की या मंडळींना नाहक त्रास दिला जायचा,पण हे कार्यकर्ते डगमगले नाहीत. त्यांनी निष्ठा कायम ठेवली. परंतू दिवशी हे गाव विकासापासून वंचित का राहिलं याचाही सामान्य जनतेने विचार करणे गरजेचे आहे.सन 2004 साली आमदार झाल्यानंतर विरोधी बाकावर असतानाही 250 कोटींची विकास कामे केली. सन 2014 ते 2019 याकाळात 1800 कोटींची विकास कामे केली. त्यासाठी विकासाची दूर दृष्टी ठेवून काम करण्याची तळमळ असावी लागते.सर्वसामान्य जनतेच्या आशिर्वादने कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे सन 2019 साली पुन्हा आमदार झालो,मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृतवाखाली  राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी देत महत्त्वाच्या पाच खात्यांची जबाबदारी आपल्यावर पडली. माझ्या कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प विधान परिषदेमध्ये सादर केला. त्यानंतर कोविड 19 या आजारामुळे संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले. असे असले तरी पहिल्या टाळेबंदीच्या काळात गृहविभागाची जबाबदारी 13 तर दुसऱ्या टप्प्यात 9 जिल्हयांमध्ये दौरा केला. जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलिस कर्मचारी यांचे कामाचे ठिकाणी जाऊन त्यांच्या अडचणींची विचारपूस केली, त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला.मंत्री झाल्यानंतर जनतेच्याही अपेक्षा वाढल्याआहेत,त्याही अपेक्षा जबाबदारीने पूर्ण करण्याचं काम यापुढील काळात करायचे आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की, ज्या सामान्य शिवसैनिकांमुळे,पदाधिकारी व कार्यकर्त्यांमुळे आपण या पदापर्यंत पोहोचलो आहे,त्या शिवसैनिकांना व कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण ठेवली आहे.मंत्रीपद हे लोकांची काम करण्यासाठी असून कार्यकर्त्यांनी जमिनीवर राहून सामान्य जनतेचे प्रयत्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. आपल्यावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे संस्कार असून त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा जोपासत सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याठी तसेच गावा-गावांतील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी वित्त राज्यमंत्री म्हणून आपल्या मतदारसंघाला विकास निधीमध्ये नेहमीच यापुढे झुकते माप दिले जाईल.तसेच दिवशी गावातील प्रलंबित विकास कामांसाठी भरघोस निधी दिला जाईल,अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.प्रास्ताविक दादा जाधव,स्वागत आप्पासो राक्षे यांनी केले तर आभार जालिंदर डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमास दिवशी बुद्रुकसह आस-पासच्या गावातील,विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Thursday, 28 October 2021

शिवशंभू सहकारी दूध संघाकडून दुध उत्पादकांची दिवाळी गोड. म्हैशीचे दुधासाठी प्रति लिटर 1.30 रुपये तर गायीसाठी 60पैसेप्रमाणे बोनस रक्कम बँक खाती वर्ग.

 

 

दौलतनगर दि.२8: दौलतनगर,ता.पाटण येथील शिवशंभू सहकारी दूध संघाने सन २०२०-२१ मध्ये दुध पुरवठा केलेल्या दुध उत्पादकांना म्हैसीचे दुधासाठी प्रतिलिटर 1.30 रुपये तर गायीच्या दुधासाठी 60 पैसेप्रमाणे होणारी बोनसची रक्कम दूध संस्था तसेच दूध सेंटरचे चालकांच्या बँक खाती वर्ग केली आहे. शिवशंभू दूध संघाने कार्यक्षेत्रामधील इतर दूध संघांच्या तुलनेत सर्वोच्च बोनस देत दिवाळीपूर्वी  बोनसची रक्कम बँक खाती वर्ग केली असल्याने शिवशंभू सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाला दूध पुरवठा केलेल्या दूध उत्पादकांची  दिवाळी गोड होणार आहे.महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मा.यशराज  देसाई (दादा) व सर्व संचालक मंडळ यांनी संघाला दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना चांगला बोनस देऊन दूध उत्पादकांच्या फायद्याचा निर्णय घेतला असल्याचे शिवशंभू दूध संघाचे चेअरमन अधिकराव पाटील यांनी सांगीतले आहे.

         प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, शिवशंभू दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने नुकताच दूध शितकरण प्रकल्प कार्यान्वित केला असून त्यामुळे दैनंदिन दूध संकलनामध्ये मोठया प्रमाणांत वाढ होत आहे. शेतकरी हे शेतीला जोड म्हणून गायी-म्हैशींचे पालन करुन दूधाचे उत्पादन घेत असतात. उत्पादित केलेल्या दूधाला चांगला दर मिळावा ही दूध उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा असते. त्याच्या अपेक्षेला खरे करुन शिवशंभू दूध संघ हा दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना आतापर्यंत चांगला दर देऊन त्यांचे आर्थिक जिवनमान उंचवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलेला आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मा.यशराज  देसाई (दादा) व सर्व संचालक मंडळाने दूध उत्पादकांना आणखी जादा दर देण्याकरीता दौलतनगर,ता.पाटण या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवशंभू दूध संघाचा शितकरण प्रकल्प उभारला असून या शितकरण प्रकल्पाची 15 हजार लिटर एवढी क्षमता आहे. शितकरण प्रकल्पामुळे दूधाचे नुकसान होण्याचे प्रमाण कमी  झाले असून वेळेत या दूधावर प्रक्रिया होत असल्याने  दूध उत्पादकांना दुधाच्या गुणवत्तेनुसार चांगला दर मिळत आहे.त्यामुळे शिवशंभू दूध संघाचे दैनंदिन दूध संकलनामध्ये वाढ झाली आहे.लवकरच शिवशंभू दूध संघाचा दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा प्रकल्प उभारणार असून दुग्धजन्य पदार्थ उत्पादन करणार आहे. त्यामुळे तालुकयातील दूध उत्पादक यांचेसह नव्याने दूध उत्पादन व्यवसायमध्ये येणाऱ्या युवा उद्योजकांना यामुळे प्रेरणा मिळेल व जास्तीत जास्त दूध उत्पादन होईल तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे सांगत तालुक्यातील इतर दूध संघाच्या तुलनेत जादा दर आणि बोनस देऊन दूध उत्पादकांच्या विश्वासास पात्र ठरला आहे. दुध पुरवठा केलेल्या दुध उत्पादकांना म्हैसीचे दुधासाठी प्रतिलिटर 1.30 रुपये तर गायीच्या दुधासाठी 60 पैसेप्रमाणे होणारी बोनसची रक्कम दूध संस्था तसेच दूध सेंटरचे चालकांच्या बँक खाती वर्ग केली असून तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या संघाला जास्तीत जास्त दूध घालून सहकार्य करावे,असे आवाहन चेअरमन अधिकराव पाटील यांनी शेवटी पत्रकांत केले आहे.

 

Wednesday, 27 October 2021

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा नामदार शंभूराज देसाई व ज्येष्ठ ११ सभासदांच्या हस्ते शुक्रवार दि.२९ ऑक्टोंबर रोजी गळीताचा शुभारंभ - अशोकराव पाटील चेअरमन

दौलतनगर दि.२7(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ मधील ४8 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ समारंभ शुक्रवार दि. २९ ऑक्टोंबर,२०२१ रोजी सकाळी 09.30 वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्मितादेवी शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते मा.यशराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                 पत्रकात म्हंटले आहे की,या वर्षीच्या गळीत हंगामातील गळीताकरीता मागील हंगामाच्या जवळपास कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील ऊसाची नोंद झाली असून कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस गळीताचे उद्दीष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवले आहे. चालु गळीत हंगामाची पुर्वतयारी पुर्ण झाली असून गाळप हंगाम पुर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व कामकाज पुर्णत्वाकडे गेले आहे. कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूकीकरीता पुरेसे तोडणी मजुर व वाहनांचे करार पुर्ण केलेले असून कारखान्याकडे करार केलेली सर्व ऊस तोडणी व वाहतूक तोडणी मजुर यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात दाखल झाली आहे.यंदाचाही गळीत हंगाम कारखान्याचे सभासद,ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्यातून यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत या गळीत हंगामाचा शुभारंभ हा प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद श्री.निवृत्ती बाळकू कर्पे करपेवाडी, श्री. सदाशिव पांडूरंग चव्हाण विहे, श्री. यशवंत रामचंद्र तोळसणकर सळवे, श्री. विष्णू शंकर पानस्कर मंद्रुळहवेली, श्री. बापूराव दगडू शिवदास माजगाव,श्री.शशिकांत महादेवशिंदे कोरिवळे,श्री.सर्जेराव यशवंत चव्हाण आवर्डे,श्री.रंगराव बाळू जाधव मेंढोशी,श्री.लक्ष्मण आबा जामदार नावडी, श्री.भाऊसो पांडूरंग सुर्वे वाडीकोतावडे, श्री. तुकाराम धोंडीबा डफळे येराड या ज्येष्ठ 11 सभासदांचे शुभहस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवा नेते यशराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असून या गळीत हंगाम शुभारंभानिमित्त कारखान्याचे संचालक शशिकांत मोहनराव निकम व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. दिपाली शशिकांत निकम यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा आयोजीत केलेली आहे. तरी या समारंभास कारखान्याचे सर्व सभासद,ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी शुक्रवार दि. २९ ऑक्टोंबर,२०२१ रोजी  सकाळी 09.30 वा. बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही चेअरमन अशोकराव पाटील यांनी शेवठी पत्रकात केले आहे.

Thursday, 21 October 2021

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने अदा केली 100 टक्के एफआरपी. एफआरपीचे उर्वरीत 277 रु.प्रमाणे 06 कोटी 47 लक्ष रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.

 

 

दौलतनगर दि.22 :- दौलतनगर मरळी ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याने हंगाम 2020-21 मध्ये गाळप केलेल्या संपूर्ण ऊसाची एफआरपीनुसार प्रतिटन रु.2807/- प्रमाणे उर्वरीत राहिलेली 277 रुपये ही रक्कम गुरुवार दि.21.10.2021 रोजी वर्ग केली आहे. मा.यशराज देसाई यांनी बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी जाहिर केले प्रमाणे कारखान्याने एफआरपीनुसार सर्वच्या सर्व 100 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खाती अदा केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकांव्दारे दिली आहे.

             पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 चे गळीत हंगामात 02 लाख 33 हजार 326 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.91% सरासरी साखर उताऱ्यांने 02 लाख 78 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याचे सन 2020-21 चे गळीत हंगामातील ऊसबिलाची एफआरपी रक्कम प्र.मे.टन रुपये 2807/- इतकी आहे.एफआरपीप्रमाणे एकूण गळीताच्या ऊसबिलाची प्र.मे.टन रक्कम रुपये 2530 प्रमाणे होणारी रक्कम यापूर्वीच ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मा.यशराज देसाई व सर्व संचालक मंडळाने शेतकऱ्यांचे हिताचे धोरण राबवित असून कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी मा.यशराज देसाई यांनी जाहिर केलेप्रमाणे आठ दिवसाच्या आत उर्वरित एफआरपीप्रमाणे शिल्लक असणारी 277 रुपये प्रमाणे होणारी रुपये 06 कोटी 47 लाख रक्कम कारखान्याने गुरुवार दि. 21.10.2021 रोजी ऊस पुरवठादारांच्या बँक खाती वर्ग केलेली आहे. कोविड महामारीतून उद्योगधंदे सावरत असताना,बाजारपेठांमधील खरेदी विक्री पुर्वपदार येत असून वेळोवेळी साखर विक्री दरामध्ये झालेला बदल,कामगारांची देणी,वाहतुक खर्च,वित्तीय कर्जाची उपलब्धता आदी अनेक आव्हांनांना तोंड देत एफआरपीची उर्वरित रक्कम सभासदांना देण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवानेते यशराज देसाई व कारखाना व्यवस्थापनाने निधीची उपलब्धता करुन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 च्या गळीत हंगामातील 100 टक्के एफआरपी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक सभासद,शेतकरी यांनी संबंधित बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा असे सांगत  सन 2021-22 चे गळीत हंगामाची आवश्यक ती सर्व पुर्व तयारी झालेली आहे. लवकरच गळीत हंगाम शुभारंभ झाल्यानंतर कारखान्याचे गळीत हंगामास पुर्ण क्षमतेने सुरुवात होईल.यासाठी आवश्यक असणारी ऊस तोडणी मजूर यंत्रणेचे नियोजन करण्यात आले आहे.त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला गळीतास देऊन सन 2021-22 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन शेवटी पत्रकांत करण्यात आले आहे.