Saturday, 24 December 2022

केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) मधून नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे रस्त्यासाठी 25 कोटींचा निधी मंजूर. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीनजी गडकरी यांचेकडील पाठपुराव्याला यश.

 

 

दौलतनगर दि.24: पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे रस्त्यांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचेकडे पाठपुरावा करुन सन 2022-23 चे आर्थिक वर्षात केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) मधून 25  कोटी रुपायांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती  महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

           पत्रकात पुढे म्हणाले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील गुहाघर चिपळूण कराड जत विजापूर या राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी रस्ता म्हणून नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता या रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा मिळणेसाठी ना. शंभूराज देसाईंनी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता 148 क्रमांकाचा राज्य मार्गाचा दर्जा देण्यात आला. सध्या हेळवाक मोरगिरी ते गारवडे या रस्त्यावर मोठया प्रमाणांत वाहनांची ये-जा सुरु असते.माहे जुलै 2021 महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या राज्य मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली होती या मार्गावरुन प्रवास करताना वाहनधारकांसह प्रवाशांची दळण-वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने या राज्य मार्गावरील हेळवाक ते मोरगिरी ते गारवडे या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) योजनेतून भरीव निधी मंजूर करावा,अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे केली  होती. या मागणीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग असलेल्या राज्य मार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे कोळे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता कि.मी.32/500 ते 62/500 ची सुधारणा करण्यासाठी भारत सरकारचे केंद्रीय मार्ग निधी(सी.आर.एफ.) मधून 25 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीनजी गडकरी  यांनी मंजूर केला असून कुसवडे ते तालुका हद्दीपर्यंतच्या 30 कि.मी.लांबीमध्ये संपूर्ण रस्ता साडेसात मीटरने  डांबरीकरणासह पूर्ण करण्यात येणार असून या कामामध्ये आवश्यक तेथे 10 छोटे पूल व 04 मोठे पूल बांधले जाणार आहेत.तसेच या राज्य मार्गावरील लेंढोरी,काढोली,किल्ले मोरगिरी, मान्याचीवाडी, शिंदेवाडी व सुळेवाडी या गावांचे हद्दीतील रस्त्याच्या दुतर्फा आर.सी.सी.गटराचे बांधकाम  केले जाणार आहे.त्याचबरोबर छेद रस्त्यांची कामेही करण्यात येणार असल्याने या राज्य मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचेकडे या राज्य मार्गाचे मजबुती करण्यासाठी  केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.)मधून निधी मंजूर होणेकरीता सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचे सांगत लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया करण्यात येऊन तातडीने राज्य मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे,अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या असून या रस्त्याच्या कामांस आवश्यक असणारा निधी तातडीने मंजुर करुन दिलेबद्दल ना. शंभूराज देसाई यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचे विशेष आभार मानले असल्याचेही त्यांनी शेवटी  पत्रकात म्हंटले आहे. 

 

Monday, 12 December 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून सन 2022-23 चे गळीत हंगामासाठी 2800 रु. ऊस दर चेअरमन यशराज देसाई यांची माहिती.

 


 दौलतनगर दि.12:  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन 2022-23 चा गळीत हंगाम राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे चालू केला असून गळीतास येणाऱ्या ऊसाला 2800 रु.प्र.मे.टन ऊस दर जाहिर करण्यात आला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना ऊसबिलापोटी पहिला हप्ता प्र. मे.टन 2500 रुपयांप्रमाणे रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर लवकरच वर्ग केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हंटले आहे की, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजन करुन पहिल्या टप्प्यातील विस्तारवाढ चालू गळीत हंगामापुर्वी केली असून, दुस-या टप्प्याचे काम ही चालू गळीत हंगाम समाप्त झाल्यानंतर करणार आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन सन 2022-23 गळीत हंगाममध्ये कारखान्यास गळीतास आलेल्या ऊसाला 2800 रु.प्र.मे.टन दर जाहिर करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत कारखान्यास गळीतास आलेल्या ऊसापोटी 2500 रु.प्र.मे.टन प्रमाणे पहिल्या हपत्याची होणारी रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करणार असल्याचे सांगत पुढे म्हणाले की, सध्या सर्वत्र ऊस गळीत हंगाम सुरु असून आपले कारखान्याचे पहिल्या टप्प्यातील गाळप क्षमता वाढविण्याचे काम पुर्णत्वाकडे गेल्यानंतर गळीत हंगाम सुरु केला आहे. आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 चे गळीत हंगामामध्ये आज पर्यंत 44 हजार 110 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 44 हजार 750 क्विंटल साखर उत्पादन केले आहे.जिल्हयासह राज्यात सर्वच कारखान्यांकडे  ऊस तोडणी मजूरांची कमतरता असून देखील  राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने सन 2022-23 च्या गळीत हंगामा यशस्वीपणे चालवला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपला पिकविलेला सर्व ऊस आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास गळीतास घालून सन 2022-23 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

Friday, 9 December 2022

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पाटणवासीयांनी दिलेले हे यश जनसेवेसाठी ऊर्जा देणारे. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई दौलतनगर,ता.पाटण येथे बिनविरोध ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न.

 

दौलतनगर दि.09:- पाटण विधानसभा मतदारसंघातील ९० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीपैकी १६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय तेथील ग्रामस्थांनी घेतला. त्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा भगवा झेंडा फडकला आहे. तसेच इतर ५ ग्रामपंचायतींमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये मिळून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तब्बल १६१ सदस्य आणि १८ सरपंच बिनविरोध निवडून आले. सुजाण नागरिक नेहमीच विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देतात. पाटणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांकडे पाहून पाटणवासीयांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला बळ देण्याचे ठरवले आहे याचा आनंद आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पाटणवासीयांनी दिलेले हे यश जनसेवेसाठी ऊर्जा देणारे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.

              दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील  ९० ग्रामपंचायतींपैकी  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेतृत्व मानत बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीमधील सरपंच व नवनिर्वाचित सदस्य यांचे सत्कार समारंभप्रसंगी  ते बोलत होते. यावेळी  या सत्कार समारंभास आमदार श्री. शहाजीबापू पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व युवा नेते मा. यशराज(दादा) देसाई, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सातारा जिल्हाप्रमुख मा. जयवंतराव शेलार,बबनराव शिंदे,विजय पवार,प्रदिप पाटील,राजाराम पाटील,भरत साळूंखे,विजय पवार,विजय शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, वैद्यकीय सहायता मदत निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

               यावेळी बोलताना ना.देसाई पुढे म्हणाले की, सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये मोठया संख्येने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडूण आले.बिनविरोध झालेल्या 16 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायतीमध्ये आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाची सत्ता आली.ग्रामस्थांनी विकास कामांकडे बघूनच ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये आपला निर्णय घेतला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे नेतृत्वाखालील सरकारमध्ये सातारा जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना सातारा जिल्हयासह आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी नेहमीच झुकते माप दिले आहे. सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांत रस्ते, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत याबाबत नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक संपन्न झाली. या बैठकीत डोंगरी तालुक्यांतील नागरी सुविधांचा आढावा घेऊन त्यासंदर्भातील विकासकामांसाठी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी १०० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचे सांगते ते पुढे म्हणाले की कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर  व मंत्रालयीन कामकाजामुळे मतदारसंघामध्ये वेळ देण्यासाठी मर्यादा पडत आहेत. असे असले तरी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना गावच्या विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द हा माझ्यावतीने दिला गेला आहे. गावांच्या विकासासाठीचे प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल, असा विश्वास ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

चौकट:- सर्वांगिण विकासासाठी ना.शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाची मतदारसंघाला गरज-आमदार शहाजीबापू पाटील

            मी स्वत: खुप नशिबवान आहे कारण मला ना.शंभूराज देसाई यांचे बरोबर काम करण्याची संधी मिळाली. पाटण तालुक्याला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे विचारांचा वारसा असून पाटण तालुका महाराष्ट्राच्या नकाशावर नेण्याचे काम लोकनेते यांनी केले.त्यांचा वारसा आज ना.शंभूराज देसाई हे राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री व पालकमंत्री म्हणून समर्थपणे पार पाडत असल्याचा अभिमान वाटतो. तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ना.शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाची मतदार संघाला गरज असून त्यांच्या पाठीशी  तुम्ही ठामपणे उभे राहून पाठबळ देण्याचे आवाहन यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपस्थितांना केले.

Saturday, 26 November 2022

पोलीस भरती प्रक्रीयेचे अर्ज सादर केल्यानंतरच्या कालावधीत भूकंपग्रस्त दाखला सादर करण्याची सवलत देणेसंदर्भात राज्य शासन सकारात्मक - पालकमंत्री ना.शंभूराज देसाई

 


दौलतनगर दि.२6:- महाराष्ट्र शासनाचे गृह विभागाकडून सध्या राज्यात 20 हजार रिक्त पदांसाठी पोलीस भरती  प्रक्रिया सुरु करण्यात आली असून या भरती प्रक्रिये अंतर्गत उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी  दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. परंतु नुकताच माझे सातत्याचे पाठपुराव्यानंतर भूकंपग्रस्त प्रमाणपत्राचे हस्तांतरण व सुधारित व्याख्येबाबतचा शासन निर्णय महसूल व वन (मदत व पुनर्वसन) विभागाने दि. 24 नोव्हेंबर, 2022 रोजी  पारित केला आहे. यामुळे आता मूळ भूकंपग्रस्ताने किंवा त्याच्या पात्र कुटुंबियाने नामनिर्देशित केलेल्या कुटुंबातील नातू, नातूची पत्नी, व नात, पणतू, पणतूची पत्नी व पणती, खापर पणतू खापर पणतूची पत्नी, खापर पणती या पिढीपर्यंत भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करता येणार असून राज्य शासनामार्फत सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये भूकंपग्रस्त दाखल्यांचे सुधारित व्याख्येनुसार पात्र उमेदवार वंचित राहू नये या करीता पोलीस भरती प्रक्रीयेचे अर्ज सादर केल्यानंतरच्या प्रक्रिये दरम्यान सुधारित व्याख्येनुसार मिळणारा भूकंपग्रस्त दाखला सादर करण्याची सवलत देण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे विनंती केली असून महाराष्ट्र शासन या निर्णयासंदर्भात सकारात्मक असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                   पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पुढे म्हंटले आहे की, सन १९६७ साली कोयना जलाशय परिसरात झालेल्या 6.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाने पाटण तालुक्यात होत्याचे नव्हते केले होते. थरकाप उडवणाऱ्या त्या घटनेने पाटण तालुका दु:ख आणि वेदनेच्या गर्तेत गेला होता. पण तेव्हा लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी भूकंपग्रस्तांना धीर दिला. इथे पाय रोवून उभे राहून त्यांनी परिस्थिती पूर्ववत केली होती. कोयना भूकंपग्रस्तांना भूकंपग्रस्त म्हणून मिळणारे दाखले १९९५ च्या शासन निर्णयातील संकुचित व्याख्येमुळे मिळणे बंद झाले होते. मात्र सन २००४ साली मी आमदार झाल्यापासूनच कोयना भूकंपग्रस्तांवरील या अन्यायाबाबत सभागृहात आणि सभागृहाबाहेरही कायम आवाज उठवून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच २०१५ पासून भूकंपग्रस्तांना दाखले पूर्ववत मिळू लागले.परंतु भूकंपग्रस्तांना शासकीय नोकरीत २ टक्के आरक्षणाचा लाभ १९९५ च्या शासन निर्णयातील व्याख्येनुसारच दिला जात होता. त्यामुळे मूळ भूकंपग्रस्तांच्या वारसांना लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. तसेच मूळ भूकंपग्रस्त मृत पावला असल्यास किंवा वयोमानानुसार तो नोकरीसाठी अपात्र ठरत नसल्यास भूकंपग्रस्त प्रमाणपत्र त्याच्या पात्र कुटुंबियांना हस्तांतरित करण्याबाबतही धोरण निश्चित नव्हते. याबाबत मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्याकडे याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. भूकंपग्रस्तांच्या कुटुंबियांच्या वेदना जाणून घेत मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे नेतृत्वाखालील राज्य शासनाने व्याख्येत बदल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता मूळ भूकंपग्रस्ताने किंवा त्याच्या पात्र कुटुंबियाने नामनिर्देशित केलेल्या कुटुंबातील नातू, नातूची पत्नी, व नात, पणतू, पणतूची पत्नी व पणती, खापर पणतू खापर पणतूची पत्नी, खापर पणती या पिढीपर्यंत भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करता येणार  आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाचेवतीने गृह विभागातील विविध सुमारे 20 हजार रिक्त पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरु असून या पोलीस भरती  प्रक्रिये अंतर्गत उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी  कालावधी  दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत आहे. या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघासह राज्यातील भूकंपग्रस्त कुटुंबातील अनेक युवक-युवती सहभागी झाले असून नुकताच भूकपंग्रस्त प्रमाणपत्राचे हस्तांतरण व सुधारित व्याख्येबाबतचा शासन निर्णय पारित झाला असल्याने राज्य शासनामार्फत सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये भूकंपग्रस्त दाखल्यांचे सुधारित व्याख्येनुसार पात्र उमेदवार वंचित राहू नये या करीता सदरची पोलीस भरती प्रक्रीयेच्या अर्ज सादर केल्यानंतरच्या प्रक्रिये दरम्यान सुधारित व्याख्येनुसार मिळणारा भूकंपग्रस्त दाखला सादर करण्याची सवलत देण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे विनंती केली असून महाराष्ट्र शासन या निर्णयासंदर्भात सकारात्मक असून लवकरच यासंदर्भात शासनाचे धोरण स्पष्ट होईल असे शेवटी त्यांनी सांगीतले.

Friday, 25 November 2022

कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर २७ वर्षांनंतर न्याय! मा. ना. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे शासन निर्णय जारी भूकंपग्रस्तांच्या पात्र कुटुबियांच्या तिसऱ्या पिढीपर्यंत शासकीय नोकरीतील 2 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार



दौलतनगर दि.२5:- सन १९६७ साली कोयना जलाशय परिसरात झालेल्या भूकंपाची झळ सोललेल्या भूकंपग्रस्तांच्या पात्र कुटुंबियांना शासकीय नोकरीतील २ टक्के आरक्षणाचा लाभ घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या १९९५ च्या शासन निर्णयातील 'भूकंपग्रस्त कुटुंब' या व्याख्येत सुधारणा करणारा शासन निर्णय पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या अखंड पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने जारी केला आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भूकंपग्रस्तांच्या वेदना समजून घेत याबाबत संवेदनशीलतेने निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे ५४ हजार कोयना भूकंपग्रस्तांच्या तिसऱ्या पिढ्यांमधील आणि पात्र कुटुंबियांमधील वारसदारांना आता भूकंपग्रस्त दाखला मिळून शासकीय नोकरीतील आरक्षणाचा लाभ घेता येईल.  

                सन १९६७ साली कोयना जलाशय परिसरात झालेल्या साडेसहा रिश्टर स्केलच्या भूकंपाने पाटण तालुक्यात होत्याचे नव्हते केले होते. त्यात शेकडो जणांचे जीव गेले, हजारभर पशुधन बळी गेले, ४० हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली. थरकाप उडवणाऱ्या त्या घटनेने पाटण तालुका दु:ख आणि वेदनेच्या गर्तेत गेला होता. पण तेव्हा लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी भूकंपग्रस्तांना धीर दिला. इथे पाय रोवून उभे राहून त्यांनी परिस्थिती पूर्ववत केली होती. त्यांचा वारसा लाभलेल्या मा. ना. शंभूराज देसाई यांनीदेखील कोयना भूकंपग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका घेतली. कोयना भूकंपग्रस्तांना भूकंपग्रस्त म्हणून मिळणारे दाखले १९९५ च्या शासन निर्णयातील संकुचित व्याख्येमुळे मिळणे बंद झाले होते. मात्र, २००४ साली आमदार झाल्यापासूनच मा. ना. शंभूराज देसाई यांनी कोयना भूकंपग्रस्तांवरील या अन्यायाबाबत सभागृहात आणि सभागृहाबाहेरही कायम आवाज उठवला. त्यांच्या अखंड पाठपुराव्यामुळेच २०१५ पासून भूकंपग्रस्तांना दाखले पूर्ववत मिळू लागले. 

                परंतु भूकंपग्रस्तांना शासकीय नोकरीत २ टक्के आरक्षणाचा लाभ १९९५ च्या शासन निर्णयातील व्याख्येनुसारच दिला जात होता. त्यामुळे मूळ भूकंपग्रस्तांच्या वारसांना लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. तसेच मूळ भूकंपग्रस्त मृत पावला असल्यास किंवा वयोमानानुसार तो नोकरीसाठी अपात्र ठरत असल्यास भूकंपग्रस्त प्रमाणपत्र त्याच्या पात्र कुटुंबियांना हस्तांतरित करण्याबाबतही धोरण निश्चित नव्हते. याबाबत गेल्या तीन वर्षांपासून मा. ना. शंभूराज देसाई पाठपुरावा करत होते. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे याबाबत सोमवारी झालेल्या बैठकीत त्यांची याबाबत सविस्तर चर्चा झाली. भूकंपग्रस्तांच्या कुटुंबियांच्या वेदना जाणून घेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी व्याख्येत बदल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता मूळ भूकंपग्रस्ताने किंवा त्याच्या पात्र कुटुंबियाने नामनिर्देशित केलेल्या कुटुंबातील अन्य व्यक्तीच्या तिसऱ्या पिढीपर्यंत भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करता येणार आहे. यामुळे कोयना भूकंपग्रस्तांना २७ वर्षांनंतर न्याय मिळाला असून भूकंपग्रस्त आणि पाटणवासीयांमध्ये आनंद व समाधानाची भावना आहे. 

 चौकट:- भूकंपग्रस्तांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी नेहमी कटिबद्ध-नामदार शंभूराज देसाई

आमचे आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी कोयना भूकंपानंतर संवेदनशीलतेने इथे स्थिती पूर्ववत केली होती. त्यांच्या प्रेरणेमुळे मी देखील विधानसभेत आणि सभागृहा बाहेरही भूकंपग्रस्तांच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवत आलो आहे. भूकंपग्रस्तांच्या पात्र वारसदारांना व कुटुंबियांना शासकीय नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने याबाबतच्या शासन निर्णयातील व्याख्येत सुधारणा करावी यासाठी गेली तीन वर्षे पाठपुरावा करत होतो. व्याख्येतील सुधारणेमुळे आता कोयना भूकंपग्रस्तांच्या कुटुंबियांना तिसऱ्या पिढीपर्यंत शासकीय नोकरीतील आरक्षणाचा लाभ घेता येईल, याचा आनंद आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना या निर्णयाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. भूकंपग्रस्तांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी नेहमी कटिबद्ध राहू, हा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो.  

Sunday, 20 November 2022

स्व.शिवाजीराव देसाईसाहेब (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत- नामदार शंभूराज देसाई. दौलतनगर,ता.पाटण येथे 79 वा जयंती सोहळयात प्रतिपादन.


दौलतनगर दि.20:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत असून मुंबई याठिकाणी एक प्रसिध्द उद्योजक म्हणून नावारुपाला आलेले स्व.शिवाजीराव देसाई हे आपल्या वडीलांच्या शब्दाखातर पाटण तालुक्यात आले आणि लोकनते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी करुन त्यांनी तालुक्याला प्रथमत: सहकाराची दिशा मिळवून दिली.सहकाराबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी चांगली कामगिरी केली.शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लावलेल्या रोपटयाचे आज लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूल नावाने वटवृक्षात रुपातंर झाले आहे.त्यांचा सहकाराचा आणि शैक्षणिक वारसा आम्ही लिलया पेलत आहोत. स्व.आबासाहेब यांचे अधुरे स्वप्न मतदारसंघातील जनतेने पुर्ण करुन दाखविले.लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व.आबासाहेब यांच्या पश्चात मतदारसंघातील जनतेने प्रामाणिकपणे आम्हास जे पाठबळ दिले आहे त्या पाठबळाच्या जीवावर आपली यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी केले.

                ते दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आयोजित स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे 79 व्या जयंती सोहळया प्रसंगी बोलत होते.यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा),मा.जयराज देसाई(दादा) यांचेसह व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,मा.चेअरमन अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालक शशिकांत निकम,बबनराव शिंदे,प्रशांत पाटील,भागोजी शेळके,शंकरराव पाटील,सोमनाथ खामकर,सुनील पानस्कर, विजय सरगडे,संचालिका श्रीमती जयश्री कवर, सौ.दिपाली पाटील,विजय पवार,जालंदर पाटील,डी.एम.शेजवळ,संतोष गिरी,पांडूरंग शिरवाडकर, बबनराव भिसे, विजयराव जंबुरे,शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख,बशीर खोंदू,विजय पवार,विजय शिंदे,अभिजित पाटील,आनंदराव चव्हाण,कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई,चिफ अकौंटंट विनायक देसाई यांचेसह सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी व कार्यकर्ते,कारखाना अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान दि. 12 जुलै रोजीचे पुण्यतिथी कार्यक्रमावेळी पाटण‍ विधानसभा मतदारसंघातील माध्यमिक,उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व मुक-बधीर विद्यार्थ्यांना गणेश वाटप हे कार्यक्रम या जयंती सोहळया दिवशी घेण्यात आला.

                 याप्रसंगी बोलताना नामदार शंभूराज देसाई म्हणाले,मरळीच्या माळरानावर सहकारी साखर कारखाना उभा करणे शक्य नव्हते,त्या काळात एक लाख टनही ऊस तालुक्यात उपलब्ध नव्हता परंतू आदरणीय लोकनेते साहेबांच्या शब्दाखातर मरळीच्या माळरानावर साखर कारखाना उभारण्याची जबाबदारी स्व.आबासाहेब यांनी लिलया पार पाडली. पाटण तालुकयात मरळीला सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली नसती तर आज पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि या विभागाची परिस्थिती काय असती याचाही सारासार विचार करणे गरजचे आहे.लोकनेते साहेबांनी तालुक्याचे नंदनवन करण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते तालुक्यातील कोयना धरणामुळे,पाटण खोऱ्यातील घाट फोडून रस्ते करण्याच्या दुरदृष्टीच्या निर्णयामुळे पुर्ण झाले कोयना नदीकाठी उपसा जलसिंचन योजना उभारुन या माध्यमातून साखर कारखान्यांस मोठया प्रमाणात ऊस उपलब्ध होईल हा त्यांचा दृष्टीकोन होता तो सफल झाला.स्व.शिवाजीराव देसाईसाहेब पाटण तालुक्यात आले आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना उभा करण्यात त्यांनी खुप कष्ट सोसले,भागभांडवल उभा करण्यात मोठया अडचणी असतानाही तालुकाभर फिरुन त्यांनी भागभांडवल गोळा केले आणि सहकारी तत्वावर साखर कारखान्याची उभारणी केली,अल्पावधीतच कारखाना कर्जमुक्त करुन तो शेतकऱ्यांच्या मालकीचा करुन दिला.स्व. आबासाहेबांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्याचे ऋृण तालुक्यातील तुम्हा शेतकऱ्यांना कधीही न फेडता येणारे आहे.देसाई कारखान्याची उभारणी हि आबासाहेबांच्या आणि आपल्या सर्वांच्या जीवनातील आणि तालुक्याच्या इतिहासातील महत्त्वाची घटना असून त्यांनी घालून दिलेले शेतकरी हिताचे धोरण राबविणे हिच खऱ्या अर्थाने स्व.शिवाजीराव देसाईसाहेबांना श्रध्दांजली ठरणार असून पाटण तालुक्यात सहकार क्षेत्रात स्व.शिवाजीराव देसाईसाहेबांनी केलेले कार्य या विभागाच्या इतिहासातील सोनेरी पर्व ठरले आहे.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब स्व.आबासाहेब यांचेपासून देसाई कुटुंबांशी नाळ जुळलेल्या पाटण तालुक्यातील जनतेने देसाई कुटंबिंयाना प्रामाणिकपणे पाठबळ दिले असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की कारखान्याचा 49 वा गळीत हंगाम अनेक अडचणींना सामोरे जात पार पाडत आहोत.कमी क्षमता असलेल्या कारखान्यांना गाळप क्षमता वाढ करण्यासाठी शासकीय भागभांडवल देण्याचा चांगला निर्णय राज्य शासनाने घेतल्याने आपल्या कारखान्यास 16 कोटींचे शासकीय भागभांडवल मिळाले आहे. मरळीच्या माळरानावर लोकनेते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेला साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा करुन देण्यात स्व.आबासाहेबांचे मोलाचे योगदान आहे. लोकनेते साहेब व स्व.आबासाहेब यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही पाटण तालुक्यात काम करीत आहोत.गेल्या 25 वर्षापासून आपण लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचेवतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. हाच विचार आणि आदर्श घेवून आम्ही भविष्यातही कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी शेवठी बोलताना सांगितले.