Saturday, 22 April 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थितीत रविवारी दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा 40 वा पुण्यतिथी सोहळा व श्री ग्रंथराज पारायण सोहळ्याची होणार सांगता.

 

दौलतनगर दि.22:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुह व पाटण तालुका वारकरी संघ यांचे सौजन्याने दौलतनगर,ता. पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये  आयोजित  ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता व लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा पुण्यतिथी सोहळा रविवार दि.23 एप्रिल,2023 रोजी  ना.शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत साजरा होणार असून यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकांत म्हंटले आहे.

            सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून पाटण तालुक्यात दौलतनगर येथे भव्य प्रमाणांत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी हि दौलतनगर येथे तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. यंदा या पारायणाचे तेरावे वर्ष असून प्रति वर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 40 व्या पुण्यतिथीनिमित्त दि. २० ते २३ एप्रिल, २०23 पर्यंत तीन दिवसीय पारायण या ठिकाणी होत आहे.

दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये 758 वाचक सहभागी झाले आहेत.पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील किर्तनकार, प्रवनचनकारांना एक चांगले तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त रविवार दि. २३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी 8. ०० ते 9. ०० वा.नामदार श्री. शंभूराज देसाई व  सौ.स्मितादेवी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा आयोजित केला आहे. त्यांनतर कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येऊन लोकनेते साहेबांना विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.त्यानंतर दौलतनगर येथे भव्य रिंगण सोहळा होणार असून सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. विजय महाराज रामिष्टेवाडी यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता होणार आहे.

 चौकट :- लोकनेते साहेब,स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुतळा व समाधी स्थळावर होणार हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी.

महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येते. लोकनेते साहेब यांचा पुण्यतिथी सोहळा दि. 23 एप्रिल रोजी भक्तीमय वातावरणात साजरा करत या दिवशी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता होते.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाचे वर्षी मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून दौलतनगर कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुर्णाकृती पुतळा व समाधी स्थळ यांचेवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येऊन लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्त त्यांचे पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.

Wednesday, 19 April 2023

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 40 व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर,ता.पाटण येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन तज्ञ डॉक्टरांमार्फत होणार मोफत आरोग्य तपासणी. पाटण मतदारसंघातील नागरीकांनी या शिबीरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन.

 

दौलतनगर दि.19 :- महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 40 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने शारिरीक तपासणी करुन तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचेकडून योग्य तो सल्ला व आवश्यक ते औषधोपचार करुन आरोग्याची काळजी घेण्यासाठी शुक्रवार दि. 21 एप्रिल,2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 या वेळेमध्ये दौलतनगर,ता.पाटण येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

                                 प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून दौलतनगर,ता.पाटण येथे तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व रोग निदान शिबीरामध्ये स्त्रीरोग तपासणी,बालरोग तपासणी,नेत्ररोग तपासणी अस्थिरोग तपासणी कान,नाक,घसा तपासणी,त्वचारोग तपासणी,माता सुरक्षित तर घर सुरक्षित अंतर्गत 18 वर्षे वरील सर्व स्त्रियांची तपासणी,एन.सी.डी.विभाग,रक्तदाब,ब्लड शुगर,कॅन्सर तपासणी,आयुष्यमान भारत डिजीटल मिशन कार्ड नोंदणी, आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट नोंदणी,रक्तदान शिबीर, इ.सी.जी. तपासणी, रक्त लघवी तपासणी या आरोग्यविषयक तपासण्या होणार आहेत. रुग्णाच्या आरोग्याची तज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक ती तपासणी करण्यात येऊन त्याचा आजार बरा होण्यासाठी आवश्यक तो प्राथमिक औषधोपचार करुन डॉक्टरांकडून रुग्णांना आरोग्‍य विषयक योग्य तो सल्ला देण्यात येणार आहे. तसेच संबंधित रुग्णांना या ठिकाणी आवश्यकतेनुसार औषधांचे वाटप करण्यात येणार आहे.तरी या सर्व रोग निदान शिबीराचा लाभ पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ गौरव यात्रेची उत्साहात मिरवणूक. लोकनेते साहेबांना पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेने केले विनम्र अभिवादन.

 

दौलतनगर दि.१9:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त लोकनेते साहेब यांचे जीवन कार्यावरील काही महत्त्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मार्गी लागलेली व नियोजित विकास कामांचे दर्शन घडविणारे चित्ररथ व गौरव यात्रेची व पालखीची भव्य मिरवणूक पाटण तालुक्यात बुधवारी मोठया उत्साहात पार पडली. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून साकारलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जीवन कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रेला तालुक्यातील जनतेने चागला प्रतिसाद दिला.तसेच या चित्ररथ गौरव यात्रेमधील पालखीमध्ये ठेवलेल्या लोकनेते साहेब यांचे पादुकांचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

                         लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रतिवर्षी दौलतनगर,ता.पाटण येथे  श्री ग्रंथराज पारायण सोहळा आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त गुरुवार दि. 20 ते रविवार दि. 23 एप्रिल पर्यंत दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये तीन दिवसीय श्री ग्रंथराज पारायण सोहळा संपन्न होत आहे. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पारायण सोहळयाच्या अगोदर लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याकरीता केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख करुन देण्याकरीता त्यांच्याकार्याचा मागोवा घेणारे,लोकनेते साहेब यांनी राज्यासाठी,जिल्हयासाठी तसेच तालुक्यासाठी दिलेल्या योगदानाची युवा पिढीला माहिती देणारे तसेच लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संकल्पनेतून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मतदारसंघात साकारलेले तसेच नियोजित विकास कामे या सर्वांचे चित्ररथांची गैारवयात्रा व गौरवयात्रेच्यापुढे लोकनेते यांच्या पादुकांचा पालखीरथ असा सोहळा साजरा करण्यातय येऊन तालुक्यातील 22 गावातून हे चित्ररथ व गौरवयात्रेचे मार्गक्रमण झाले. बुधवारी सकाळी 09 वाजता कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पादूकांचे पूजन करुन या चित्ररथ गौरवयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी श्रीमती विजयादेवी देसाई, लोकनेते बाळासहोब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,पोलिस अधिक्षक समीर शेख, जयराज देसाई, आदित्यराज देसाई,डॉ.सुभाष चव्हाण,उपविभागीय अधिकारी,सुनील गाडे,तहसिलदार रमेश पाटील,जयवंतराव शेलार,अशोकराव पाटील, विजय पवार, संतोष गिरी,भरत साळूंखे,अभिजित पाटील,बबनराव शिंदे,सोमनाथ खामकर,संजय देशमुख,जालंदर पाटील यांचेसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे अभिवादन करण्यासाठी दौलतनगर येथे उपस्थित होते.

             लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ व गौरवयात्रेमध्ये विविध वाद्य,लोकनेत्यांची आकर्षक पालखी,फटाक्यांची आतषबाजी यामुळे तालुक्यातील सर्व वातावरण दुमदुमुन गेले होते.तालुक्यातील दौलतनगर, चोपदारवाडी, मारुलहवेली, निसरे फाटा, मल्हारपेठ, नाडे नवारस्ता,पाटण असा मार्ग होता.एकूण 22 गावातून जाणारा हा चित्ररथ गौरवयात्रेच्या सोहळयाचे मोठया उत्साहात ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करुन लोकनेत्यांच्या पालखी मधील पादुकांचे महिला वर्गाकडून पूजन करुन या चित्ररथ गौरवयात्रेचे स्वागत करण्यात आले.या चित्ररथ गौरवयात्रेमध्ये जिल्हास्तरीय शासकीय विभागांचा प्रथमच सहभाग होता.यामध्ये वन विभाग,वन्यजिव विभाग,जिल्हा आरोग्य विभाग,कृषी विभाग,जलसंपदा विभाग,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,शिक्षण विभाग,सामाजिक न्याय विभाग,ग्रामविकास विभाग,महिला व बालकल्याण विभाग,सहकार विभाग,गृह विभाग,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, जिल्हा अग्रणी बँक,जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा अधिकारी, मध संचनालय विभाग,पशुसंवर्धन विभाग,रेशीम विभाग,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,नगरपंचायत पाटण यांचेसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना,कोयना परिसर साखर कामगार संघटना,शिवदौलत सह.बँक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पाटण, सार्वजनिक बांधकाम उपविभाग उत्तर व दक्षिण, न्यू इग्लिश स्कूल नाटोशी व  धावडे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पाटण, शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे,मल्हारपेठ पोलीस ठाणे, दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्था व श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनि.व सिनि. कॉलेज, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे 36 आकर्षक चित्ररथ या सोहळयामध्ये सहभागी झाले होते. या चित्ररथ गौरव यात्रेची मिरवणूक भर उन्हातही अत्यंत उत्साहात संपन्न झाली. यावेळी चेअरमन मा. यशराज देसाई(दादा), मा.रविराज देसाई(दादा) यांचे ठिकठिकाणी महिलांकडून औक्षणही करण्यात येऊन ग्रामस्थांचेवतीने सत्कारही करण्यात आला. या अनोख्या सोहळयामध्ये प्रत्येक गावाच्या ठिकाणी मिरवणूकीत सहभागी झालेल्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. पाटण येथे चित्ररथ गौरव यात्रेच्या सांगता समारंभामध्ये चेअरमन मा.यशराज देसाई यांनी या चित्ररथ गौरव यात्रेमध्ये सहभागी झालेल्यांचे तसेच चित्ररथ तयार करुन सहभागी झालेल्या सर्व संस्था तसेच शासकीय विभागांचे आभार मानले. दरम्यान आज  मंत्रीमंडळांच्या कॅबिनेट बैठकीमुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांना आजच्या लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ गौरव यात्रेप्रसंगी आज उपस्थित राहता आले नाही . जनसेवेसाठी संवेदनशीलता आणि कर्तव्यतत्परतेचा आदर्श लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्यापुढे ठेवला असल्याचे सांगत त्यांचा हा वारसा जपण्याच्या दृष्टीने नेहमीच कटिबद्ध असल्याने राज्याचा महत्वाच्या खात्याचा मंत्री  या नात्याने जबाबदारी पार पाडत असताना, गेल्या १५ वर्षांत यंदा प्रथमच आपल्या पारायण सोहळ्याच्या प्रारंभदिनी आज येता आले नसले, तरी उद्यापासून ना.शंभूराज देसाई  हे पारायण सोहळ्यात  उपस्थित राहणार आहेत.

चौकट: लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ गौरवयात्रेतील चित्ररथांनी वेधले सर्वांचे लक्ष.

शासकीय विभागांच्या विविध योजनांची माहितीसाठी दौलतनगर येथे चार दिवस राहणार प्रदर्शन.

लोकनेते बाळासाहेब देसाई  यांचे पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे जीवन कार्यावरील काही महत्त्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मार्गी लागलेली व नियोजित विकास कामांचे दर्शन घडविणारे चित्ररथ व गौरव यात्रेमध्ये शासनाच्या विविध शासकीय विभागांनी तयार केलेल्या चित्र रथांनी उपस्थित सर्वांचे लक्ष वेधले.तसेच या चित्ररथ गौरव यात्रेमध्ये सहभागी झालेल्या विविध शासकीय योजनांची माहिती असणारे चित्ररथ हे पाटण तालुक्यातील नागरिकांसाठी प्रदर्शनामध्ये दौलतनगर येथे ठेवण्यात आले असून या माध्यमातून लोकांना संबंधित योजनांची आवश्यक ती माहिती देण्यासाठी त्या त्या विभागाचे अधिकारीही चार दिवस उपस्थित राहणार असल्याने शासनाच्या सध्या सुरु असलेल्या शासकीय योजनांची जत्रा या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होऊन या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा हा उपक्रम फायदेशीर होणार आहे.

Monday, 17 April 2023

दि.१९ रोजी पाटण तालुक्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रा निघणार. मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते होणार गौरव यात्रेचा शुभारंभ.

                                                     


दौलतनगर दि.17:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जीवन चरीत्राची तसेच कार्याची विविधांगी माहिती देणारे व लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधीचे चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक पाटण तालुक्यात काढण्यात येणार आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्यावरील चित्ररथ व गौरव यात्रेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार दि.19 एप्रिल 2023 रोजी सकाळी 08.00 वा. दौलतनगर,ता.पाटण येथे होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने पत्रकाव्दारे दिली आहे.

सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात येतो. यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल,२०२3 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दि.२० ते २३ एप्रिल,२०२3 पर्यंत तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पारायण सोहळा कारखाना कार्यस्थळावर साजरा होत असताना बुधवार दि.१9 एप्रिल रोजी सकाळी ०8.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहात कार्यान्वित असणाऱ्या विविध संस्थांचे वतीने तसेच जिल्हा व तालुकास्तरीय सर्व शासकीय विभागांकडून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्य शासनाच्या विविध खात्यांचे कर्तबगार मंत्री आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून केलेल्या अतुलनीय कार्याचे व त्यांच्या जीवनचरित्रावरील काही महत्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधित तसेच पाटण तालुक्यामध्ये पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून राज्य शासनाच्या विविध योजनांमधून साकारलेल्या विविध विकास कामांचे,राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेले  चित्ररथ व गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. या चित्ररथांचे व गौरव यात्रेचा प्रारंभ हा कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयापासून करण्यात येणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्यावरील चित्ररथ व गौरव यात्रेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार दि.19 एप्रिल 2023 रोजी सकाळी 08.00 वा. दौलतनगर,ता.पाटण येथे होणार आहे. दरम्यान  चित्ररथ व गौरव यात्रा चोपदारवाडी, गव्हाणवाडी, सुर्यवंशीवाडी, पापर्डे, मारुलहवेली फाटा,गारवडे बहुले फाटा, सोनाईचीवाडी, नावडी वसाहत,निसरे,निसरे विहिर,निसरे फाटा, आबदारवाडी,गिरेवाडी, मल्हारपेठ, नारळवाडी,येराडवाडी,नवसरी, नाडे नवारस्ता, आडूळ गावठाण, आडूळपेठ, सुभाषनगर, लुगडेवाडी सोनगाव,येरफळे,म्हावशी स्टॉप ते पाटण पर्यंत अशी चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक काढण्यात येणार असून चाफोली रोड, पाटण येथील प्रांगणामध्ये या चित्ररथ व गौरव यात्रेची सांगता होणार आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 40 व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जीवनचरीत्राची तसेच कार्याची विविधांगी माहिती देणारे व लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधीचे चित्ररथ व गौरवयात्रेचा तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा व या चित्ररथ गौरवयात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ही पत्रकांत करण्यात आले आहे.

चौकट:लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ गौरव यात्रेमध्ये 32 चित्ररथांचा सहभाग, चित्ररथांचे चार दिवस प्रदर्शन.

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथी निमित्त आयोजित चित्ररथ गौरव यात्रेमध्ये यंदाच्या वर्षी जिल्हा व तालुकास्तरीय विविध शासकीय विभागांच्या 32 चित्ररथांचा सहभाग राहणार आहे.तसेच दौलतनगर येथे हे चित्ररथ प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.या दरम्यान राज्य शासनाकडून सध्या सुरु असलेल्या शासकीय विभागांच्या योजनांची जत्रा या योजनेअंतर्गत शासकीय विभागांचे अधिकारी हे त्या त्या विभागाशी संबंधित योजनांची माहिती देण्यासाठी उपस्थित राहणार असल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.


Monday, 10 April 2023

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास प्रारंभ. चेअरमन मा.यशराज देसाई यांचे शुभहस्ते वाहतूक कंत्राटदार यांना करारपत्राचे वितरण.



दौलतनगर दि.10: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली यंदाचा गळीत हंगामात कारखान्याच्या सर्वच विभागांनी चांगली कामगिरी बजावली असून गळीत हंगामात गाळपाचा टप्पा पुर्ण करण्यासाठी कारखान्याशी निगडीत प्रत्येक घटकाने दिलेल्या योगदानामुळे कारखान्याने चांगले गाळप केले आहे. येणारा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात करण्यात आली असून आज या वाहतूक कंत्राटदार यांना करारपत्राचे वितरण करत असल्याची माहिती चेअरमन यशराज देसाई(दादा) यांनी यावेळी  दिली.

             चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 च्या गळीत हंगामातील ऊस तोडणी वाहतूक करारपत्र ऊस वाहतूक कंत्राटदार यांचेकडे सुपुर्द केली. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी  कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,माजी चेअरमन अशोकराव पाटील, कार्यकारी संचालक सुहास देसाई,चिफ अकौंटंट विनायक देसाई, शेती अधिकारी वैभव नलवडे यांचेसह अधिकारी व कर्मचारी तसेच तोडणी वाहतूक संस्थेचे चेअरमन राजाराम जाधव,तोडणी वाहतूक कंत्राटदार श्री.प्रकाश जाधव,पंडीत राठोड,संजय पवार,सुभाष गव्हाणे,जय पाटील हे उपस्थित होते.

                यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई पुढे म्हणाले की, कारखान्याच्या सन 2023-24 या गळीत हंगामासाठी नोंदविलेल्या संपुर्ण ऊसाचे गाळप पुर्ण करण्याच्या दृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करण्याचे काम  कारखाना व्यवस्थापनाने सुरु केली आहे. आपले कारखान्याचे नुकतेच पहिल्या टप्प्यातील विस्तारवाढीचे काम पुर्णत्वास गेले आहे. त्यामुळे संस्थेसहित सभासद शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. यापुढील काळात ही अनेक तांत्रिक आणि आधुनिक बदल करून त्याचा जास्तीत जास्त फायदा येणाऱ्या गळीत हंगामामध्ये आपल्याला होईल. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब,स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे विचारांचा वारसा जोपासत ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्यामध्ये काटकसरीचे धोरण राबवित ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून सभासदांच्या प्रगतीसाठी कारखाना व्यवस्थापनाकडून नेहमीच प्रामाणिक प्रयत्न सुरु असल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हंटले आहे की,येणारा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्याकरीता कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपल्या राहिलेल्या ऊसाची नोंद करण्याकरीता कारखान्याचे संबंधित शेती गट ऑफीसशी संपर्क साधावा व आपण पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास देऊन गळीत हंगाम यशस्वी करण्यास सहकार्य करावे आवाहनही त्यांनी शेवटी पत्रकांत केले आहे.