Tuesday 8 January 2019

कोयना धरणातील पाणीसाठयाचे नियोजन करा. आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुन जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना.






दौलतनगर दि.०8:- पाटण तालुक्यातील ११० गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. पाटण आणि कराड तालुक्यातील कोयना नदीकाठचे जमिनक्षेत्र हे उपसा जलसिंचन योजना व खाजगी योजनांच्या माध्यमातून ओलिताखाली येत असते.पाटण तालुक्यातील कोयना धरणामध्ये गतवर्षीपेक्षा १२.२९७ टीएमसी ने पाणीसाठा कमी आहे. पुर्वेकडे मोठया प्रमाणात सिंचनाकरीता पाण्याची मागणी होत असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आल्याने ते थेट सांगली जिल्हयाकडे जात आहे त्यामुळे पाटण व कराड तालुक्यातील कोयना नदीपात्र कोरडे पडत आहे. धरणातील पाणी हे माहे जुन महिन्यापर्यंत प्रथम प्राधान्याने पिण्याच्या वापराकरीता तसेच शेतामधील उभी पिके वाचविण्याकरीता राखून ठेवणे गरजेचे असल्याची मागणी आमदार शंभूराज देसाईंनी जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांचेकडे केली यावर कोयना धरणातील पाणीसाठयाचे नियोजन करा अशा सुचना जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी सातारा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर यांना बैठकीत दिल्या.
                 आमदार शंभूराज देसाई यांच्या मागणीवरुन जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांचे दालनात पाटण तालुक्यातील कोयना धरणातील व कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत विविध धरण प्रकल्पातील पाणी हे पाटण तालुक्यात ११० गांवामध्ये दुष्काळ जाहीर झालेच्या पार्श्वभूमिवर राखून ठेवणेसंदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती.याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई यांचेसह सातारा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर,रोहयो उपजिल्हाधिकारी संजय पाटील,कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
              सुरवातीस आमदार शंभूराज देसाईंनी,शासनाने पाटण तालुक्यातील ११० गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.तालुक्यातील कोयना धरणासह कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत विविध धरण प्रकल्पातील पाण्याची पातळी गतवर्षीपेक्षा घटलेली आहे.कोयना धरणातील तर १२.२९७ टीएमसी पाणीसाठा गतवर्षीपेक्षा कमी आहे.पाटण तालुक्यातील ११० गांवे दुष्काळ जाहीर केली आहेत तशीच कराड तालुक्यातीलही १०० हुन अधिक गांवामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.दोन्ही तालुक्यातील कोयना नदीकाठचे जमिनक्षेत्र हे उपसा जलसिंचन योजना व खाजगी योजनांच्या माध्यमातून ओलिताखाली येत आहे.धरणातील घटलेला पाणीसाठा लक्षात घेता या तालुक्यातील सर्व धरणातील पाणी हे माहे जुन महिन्यापर्यंत प्रथम प्राधान्याने पिण्याच्या वापराकरीता तसेच शेतामधील उभी पिके वाचविण्याकरीता राखून ठेवावे यासंदर्भात योग्य नियोजन होणे गरजेचे आहे यासंदर्भात मी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्येही हा विषय जिल्हयाचे पालंकमंत्री व आपलेकडे मांडला होता जिल्हयाचे पालकमंत्री तथा जलसंपदा राज्यमंत्री ना.विजय शिवतारे यांनाही मी यासंदर्भात आपले अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करावी अशी मागणी केली आहे ही बाब जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून दिली.तसेच मोरणा गुरेघर धरण प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षी ९० टक्के होता आता तो ६५ टक्केपर्यंत आला आहे.ही गंभीर बाब आहे.तारळी,उत्तरमांड व वांग मराठवाडी तसेच महिंद धरण प्रकल्पातील पाणीसाठा समाधानकारक आहे परंतू पिण्याच्या पाण्याकरीता व शेतातील उभी पिके वाचविण्याकरीता नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
                  यावर सातारा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी १ जुन ते ३१ मे असा पाणीसाठा मोजला जातो.पुर्वेकडे यावर्षी गतवर्षीपेक्षा सिंचनाकरीता पाण्याचा वापर मोठया प्रमाणात झाला आहे.पुर्वेकडून सांगली जिल्हयातून पाण्याची मागणी होत असल्याने पाणीवापराचे फेरनियोजन करणे आवश्यक आहे.सांगली पाटबंधारे मंडळ यांना पाणीवाटप समितीची बैठक आयोजीत करण्याचे लेखी पत्र दिले आहे.त्यानुसार दि.08 रोजी ही बैठक असून १० ते २० टक्के पाणी गतवर्षीपेक्षा कोयना धरणामध्ये जादा ठेवण्याची गरज असल्याची मागणी आम्ही बैठकीत करणार आहे.असे त्यांनी सांगितले यावर जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी सातारा जिल्हयातील पाटण आणि कराड तालुक्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या गांवाची परिस्थिती पहाता आमदार शंभूराज देसाईं यांचे मागणी आहे त्याप्रमाणे कोयना धरणातील पाण्याचे नियोजन करावे व आम्हास पाण्याची यावेळी मोठया प्रमाणात गरज असल्याचे सांगली पाटबंधारे मंडळ यांना कळविण्यात यावे असे सुचित केले तर पाटण तालुक्यातील इतर धरण प्रकल्पातील पाणीसाठा राखून ठेवणेसंदर्भात आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर बैठका आयोजीत कराव्यात अशाही सुचना जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या व कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


No comments:

Post a Comment