Tuesday 7 July 2020

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाईंचे गुरु शिष्याचे नाते. ना.शंभूराज देसाई व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ बोटे यांच्या मोझरी येथील भेटीने जुन्या आठवणींना उजाळा.


         
        दौलतनगर दि.०७ :- महाराष्ट्र राज्यात आधुनिक काळातील महान संत होऊन गेलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे गुरुशिष्याचे नाते होते.या नात्यासदंर्भात आजपर्यंत आपण सर्वजण अपरिचित होतो.अत्यंत महत्त्वाच्या व दुर्लक्षित राहिलेल्या या नात्यातील धागा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ बोटे महाराज या दोन मान्यवरांच्या भेटीमुळे समोर आला आहे.ना.शंभूराज देसाई व अध्यक्ष राजाभाऊ बोटे या दोघांच्या मोझरी येथील भेटीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यामधील अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
           वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री असणारे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे दि.26.06.2020 रोजीचा वाशिम जिल्हयाचा दौरा आटपून अमरावती मार्गे येत असताना मोझरी येथील शासकीय विश्रामगृह येथे थांबले होते लोकनेते बाळासाहेब देसाईंचे नातू मंत्री ना.देसाई हे शासकीय विश्रामगृह येथे असल्याची माहिती मिळताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ बोटेमहाराजांनी ना.शंभूराज देसाईंची सदिच्छा भेट घेतली.यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यामध्ये गुरु शिष्य असे नाते होते याचा उलघडा श्री.बोटे महाराजांनी करुन या दोघांमधील जुन्या आठवणींना तसेच पूर्वीच्या अत्यंत महत्त्वाच्या व दुर्लक्षित राहिलेल्या गोष्टींना उजाळा देत अनेक घटना ना.शंभूराज देसाईंना सांगितल्या.प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहलेले ग्रंथ देऊन श्री.बोटेमहाराजांनी ना.शंभूराज देसाईंचा सत्कार केला.
         श्री.बोटेमहाराज यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यामधील नात्याचा उलघडा करताना तसेच जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांचा कंठ दाटून आला होता.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विदर्भात विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करीत होते. तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना “राष्ट्रसंत” या उपाधीने सन्मानित केले आहे.आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब मंत्री असताना जेव्हा जेव्हा विदर्भाच्या दौऱ्यावर  येत तेव्हा तेव्हा ते आर्वजुन महाराजांच्या भेटीकरीता गुरूकुंज आश्रमामध्ये येत असत महाराजांचे आणि त्यांचे गुरु शिष्यांचे नाते होते.ते नाते इतके घट्ट होते की महाराजांचे निधन दि.11 ऑक्टोंबर 1968 रोजी झाले. महाराजांनी मृत्यूपत्र तयार केले होते. त्यावेळी असा उल्लेख आढळून येतो की,महाराजांनी माझे मृत्यूपत्र हे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचेसमोर व त्यांचे हस्ते वाचन करावे असे लिहिले होते.सदर मृत्यूपत्र वाचन करताना लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेबांचे डोळे डबडबून आले होते व नकळत त्यांचे अश्रू त्या मृत्यूपत्रावर पडले होते.सदर मृत्यूपत्र अजूनही आश्रमामध्ये जपून ठेवले असल्याचे बोटे यांनी सांगीतले.
             भारत हा खेड्यांचा देश आहे,हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल,अशी त्यांची श्रद्धा व विचारसरणी होती.त्यांनी समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल,याविषयी नेहमीच काळजी वाहिली,चिंता केली.ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता.त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरुपाचा विचार केला व त्या कशा सोडवाव्यात,याविषयी उपाययोजनाही सुचविल्या.महाराष्ट्राचे ग्रामविकासात लोकनेतेसाहेबांचे मोलाचे कार्य व स्थान आहे.अध्यात्मातून ग्रामविकास करणेचा मंत्रच जणू राष्ट्रसंतांनी लोकनेत्यांना दिला होता.सन १९६२ ला कोयना भुकंपामुळे उडालेला हाहाकार यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचनात्मक मदत कार्याकरता आघाडीवर होते. राष्ट्रसंतांचे अंत्यविधीला लोकनेते बाळासाहेब देसाई हे आवर्जुन उपस्थित होते व त्यांनी त्यांचे देहाला खांदासुध्दा दिला होता. राष्ट्रसंतांचे मृत्यूपश्चात सलग 1 वर्षे कामकाजासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई आश्रमात जात असत त्यावेळी कधीही न भरुन येणारी पोकळी लोकनेत्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. ज्या शासकीय विश्रामगृहात ना.शंभूराज देसाई थांबले होते ते विश्रागृहाचे उद्घाटनसुध्दा लोकनेतेसाहेबांनी केले होते.याप्रकारची बरीचशी विश्रामगृह त्या काळात रोजगार हमी योजनेतून बांधल्याचे यावेळी सांगणेत आले.
         यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आश्रम सध्या बंद असल्यामुळे इच्छा असूनही आश्रमामध्ये जाता येत नसल्यामुळे ना.शंभूराज देसाईंनी दु:ख व्यक्त करीत नंतरच्या दौऱ्यामध्ये आर्वजुन आश्रमाला भेट देणेकरीता येणार असल्याचे सांगून शासनाच्या माध्यमातून आश्रमाकरीता कोणतीही मदत लागल्यास नि:संकोचपणे सांगावे असे सांगत ना.शंभूराज देसाईंनी अंतःकरणापासुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्रध्दांजली अर्पण करतो ज्यांनी समाजात परिवर्तन घडवुन आणण्याकरता भक्ति आणि कर्माला एकमेकांशी जोडण्याचे अवघड कार्य करुन दाखविले. त्यांचा आदर्श नेहमीच लोकनेतेसाहेबांप्रमाणे आम्हाला देखील प्रेरणादायी राहील असे सांगून अशा बऱ्याचशा अप्रकाशित गोष्टींवर अभ्यास व संशोधन होणे आवश्यक आहे असे वाटते असेही शेवठी या भेटीत ना.शंभूराज देसाईं म्हणाले.

1 comment:

  1. I am so lucky because I am karyakarta of home state minister Mr.Shambhuraj desai saheb.

    ReplyDelete