सातारा दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-
महाराष्ट्र राज्यामध्ये काल रात्री आठ वाजल्यापासून लागू
केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सकाळपासून
रस्त्यावर उतरुन पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना समवेत घेवून सातारा जिल्हयातील
ग्रामीण भागाची प्रत्यक्ष पोलीस बंदोबस्ताची व कायदा सुव्यवस्थेची पहाणी केली.बाजारपेठा,
तसेच मुख्य रस्त्यावर अशा विविध सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी होऊ नये,नागरिक विनाकारण घराच्या
बाहेर पडू नयेत याकरीता संचारबंदी कडक करा व गर्दी थांबविण्या करीता करावयाच्या आवश्यक
त्या सर्व उपाययोजना करा अशा सक्त सुचना त्यांनी महसूल,पोलीस विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना
केल्या.
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज सातारा जिल्हयातील कोरेगाव,रहिमतपूर
व मसूर विभागातील मुख्य बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवरील ग्रामीण भागाची प्रत्यक्ष जाऊन
पाहणी केली. यावेळी त्यांचेसोबत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे
आमदार महेश शिंदे,शिवसेना संपर्कनेते प्रा.नितीन बानुगडे पाटील हे पदाधिकारी तर कोरेगांव
उपविभागीय अधिकारी श्रीमती जयश्री पाटील,कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे,कोरेगांव
उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे,कराड उपविभागीय
पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील,कोरेगांव तहसिलदार अमोल कदम,कराड तहसिलदार अमरदीप वाकडे,कोरेगांव
पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे, रहिमतपुर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड, रहिमतपुर सहाय्यक
पोलीस निरीक्षक अजय गोरड असे संबधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी गृहराज्यमंत्री ना.देसाईंनी
कोरेगांव, रहिमतपुर व मसूर विभागामध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने तालुका
प्रशासनाच्या वतीने काय काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची सविस्तर माहिती अधिकारी
यांचेकडून प्रथमत: घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, कोविड 19 चा संसर्ग सध्या दुप्पट वेगाने होत असल्याने राज्यात
काल रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून जिल्हयामध्ये या रोगाने संसर्ग होणाऱ्या
रुग्णांचे प्रमाण वाढू लागले असताना संचारबंदीच्या काळामध्ये गर्दी होऊ नये याकरीता
पोलीस व महसूल विभागाची स्वतंत्र पथके तयार केली आहेत.तुरळक ठिकाणी भाजी मंडई आणण्याच्या
नावाखाली किंवा काही किरणा खरेदी करण्याच्या नावाखाली थोडीसी गर्दी आहे.आज पहिला दिवस
आहे म्हणून आपण रस्त्यावर उतरणाऱ्यांना समजून सांगण्याचे काम करावे. खरोखरच काम असेल
तरच नागरिकांनी घराचे बाहेर पडावे. संचारबंदीच्या काळात विनाकारण कोणी फिरताना
दिसले किंवा संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना पुर्वीच दिल्या
आहेत परंतू कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्यांमध्येही संचारबंदीचे नियम पाळले जात आहेत
का? याची तपासणी पोलीस यंत्रणेने करावी यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदेशीर करावी यात
हयगय करु नये.कोरोनाचा संसर्ग होवू नये याकरीता जसे प्रशासन सज्ज आहे तसेच नागरिकांनीही
प्रशासनाला सहकार्य करुन स्वत:ची व त्यांच्या कुटुंबिंयांची काळजी घेणे तितकेच गरजेचे
आहे.
संचारबंदीमध्ये तालुक्यात ठिकठिकाणी
नाकाबंदी करण्यात आली असली तरी अत्यावश्यक सेवा सुरुच ठेवून नागरिकांना सहकार्य करण्याची
भूमिका प्रशासनानेही ठेवावी.अडचणीच्या काळात जशी जनतेकडून आपण सहकार्याची अपेक्षा ठेवतो
तशी जनतेचीही आपल्या प्रशासनाकडून अपेक्षा असते.सर्वांच्या सहकार्यातुन कोरोना विरुध्दचा
सुरु असलेला लढा यशस्वी होणार आहे त्यामुळे प्रशासनाने जशी या महामारीच्या संकटात जनतेची
काळजी घेण्याची गरज आहे तशीच जनतेनेही स्वत:ची आणि स्वत:च्या परिवाराची काळजी घेण्याची
आवश्यकता आहे. ती काळजी जनतेने घ्यावी अशी विनंती ना.शंभूराज देसाईंनी करुन संचारबंदीच्या
पार्श्वभूमिवर प्रशासनातील अधिकाऱ्यांना तसेच जनतेला काही अडचणी असतील तर त्या त्यांनी
जरुर सांगाव्यात शासनाच्या माध्यमातून त्या अडचणी सोडविण्याचा जरुर प्रयत्न केला जाईल
असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगून सर्वच अधिकारीवर्ग खरोखरच चांगले काम करीत आहे या
कामांबरोबर त्यांनी अजुनही सतर्क राहून काळजी घ्यावी असे ते शेवठी बोलताना म्हणाले.
No comments:
Post a Comment