दौलतनगर दि.21 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे.
सातारा जिल्हयात सरासरी प्रतिरोज 1200 ते 1400 चे पुढे कोरोना बाधित होत आहेत.सगळीकडे
रुग्णालयामध्ये बेडची क्षमता संपल्या आहेत.आपल्याकडे पाटण मतदारसंघात पाटण, दौलतनगर
आणि ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये अनुक्रमे 50, 50 व 36 याप्रमाणे ऑक्सीजनचे
बेड उपलब्ध आहेत.ज्या रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता आहे त्यांना ऑकसीजनचे बेड उपलब्ध
करुन दयावेत.ऑकसीजनअभावी रुग्णांची हेळसांड होवू देवू नका अशा सक्त सूचना गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना केल्या.
दौलतनगर ता.पाटण येथे आज
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली वाढत्या कोरोना रुग्णांच्या
संदर्भात पाटण तालुक्यातील तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक झाली.याप्रसंगी
त्यांनी वरील प्रमाणे अधिकाऱ्यांना सूचना केल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग
तांबे,तहसिलदार योगेश टोमपे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी श्रीमती
मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी. पाटील,पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,उंब्रजचे सपोनि अजय गोरड,मल्हारपेठचे
सपोनि अजित पाटील, कोयनानगरचे सपोनि माळी, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी
आदींची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येसंदर्भात व पाटण, ढेबेवाडी
व दौलतनगर येथील कोरोना उपचार केंद्रातील उपलब्ध ऑकसीजन बेडच्या संदर्भात आढावा घेतला.
आवश्यक असणारे ऑकसीजन बेड आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्यां रुग्णांना व्हेन्टीलेटरची आवश्यकता
आहे त्या रुग्णांना तात्काळ कराड अथवा सातारा येथे कुठे व्हेन्टीलेटरचे बेड उपलब्ध होतात का ? याकरीता आपण
प्रयत्नशील राहू परंतू प्राथमिक स्तरावर ऑकसीजन बेड उपलब्ध करुन देवून रुग्णांवर तातडीने
उपचार सुरु करावेत. पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये सर्व
अद्यावत सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. कोरोनाच्या तपासण्या
वाढवा. कोरोना बाधिताच्या संपर्कात कोण आले आहे का? याचीही तपासणी करा असे सांगून आपण
रेडझोनमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. लोकांच्यामध्ये भितीचे वातावरणच राहिले नाही
त्यामुळे संख्या वाढायला लागली आहे यावर वेळीच आवश्यक ते सर्व निर्बंध घालणे गरजेचे
आहे. आता तर शासनाने सकाळी 07 ते 11 पर्यंतच जीवनावश्यक वस्तूची दुकाने उघडी ठेवण्याचा
निर्णय घेतला आहे. त्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी होईल.
कोरोना बाधितांना रेमडीसिव्हर
इंजेक्शनची गरज भासत आहे. शासकीय कोटयानूसार कोरोना उपचार केंद्रांना ही इंजेक्शन उपलब्ध
करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आपल्या पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी येथे आवश्यक
असणारी इंजेक्शन तात्काळ मागवून घ्यावीत व आवश्यकतेनुसार ही इंजेक्शन रुग्णांना दयावीत
असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
चौकट:- संचारबंदी एकदम कडक करा:- ना.शंभूराज
देसाई
भाजीपाला व किराणा माल घेण्याकरीता मार्केटमध्ये
मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. शासनाने जी संचारबंदी लागू केली आहे त्याची काटेकोर
अंमलबजावणी करा. संचारबंदी कडक केल्याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार नाही.उद्यापासून
पोलीस विभागाने संचारबंदी एकदम कडक करुन लोकांच्या गर्दीवर निर्बंध आणावेत वेळप्रसंगी
कठोर पावले उचला असेही ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना सुचना केल्या.
चौकट:- तपासण्या व लसीकरणही करुन घ्या:- ना.शंभूराज देसाई
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात
वाढला असून पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने कोरोनाच्या तपासण्या करुन घ्या तसेच
शासनाने जी लस उपलब्ध करुन दिली आहे या लसीकरणाचाही लाभ घेवून आपले जीव वाचवा असे भावनिक
आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.
No comments:
Post a Comment