Tuesday, 6 November 2018

आमदार शंभूराज देसाईंची शासकीय अधिकारी,पदाधिकारी यांचेसमवेत रंगली सुरेल दिवाळी सायंकाळ. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंसह तालुकास्तरापासून जिल्हास्तरीय सर्व अधिकारी दिवाळी फराळाला उपस्थित.



दौलतनगर दि.०६:- मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून सामाजीक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करताना एका जबाबदारीने आणि कर्तव्य भावनेने नित्यनेमाने आपल्या समवेत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर दिवाळीचा गोड फराळ करुन हा सण आंनदाने आणि उत्साहाने गोड साजरा व्हावा या उद्देशाने दिवाळीच्या पुर्वसंध्येला पाटणचे महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंनी आयोजीत केलेली सलग तिस-या वर्षातील दिवाळीची सुरेल सायंकाळ ही मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्ते,विविध संस्थांचे पदाधिकारी,तालुकास्तरापासून जिल्हास्तरापर्यंतच्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार शंभूराज देसाईंच्या दौलतनगर ता.पाटण येथील निवासस्थानच्या परिसरात चांगलीच रंगली व साजरी झाली.आमदार शंभूराज देसाईंच्या दिवाळी फराळ सायंकाळमुळे कार्यकर्ते,पदाधिकारी,अधिकारी यांचा आनंद मोठया उत्साहाने व्दिगुणीत झाला.सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेमहाराज हेही या कार्यक्रमास उपस्थित होते.
               प्रतिवर्षी मोठया उत्साहाने साजरा होणाऱ्या दिवाळी या सणांचा आनंद खुप मोठा असून आपल्या समवेत काम करणाऱ्या प्रत्येकाबरोबर हा सण गोड व्हावा आणि त्यांच्या समवेत खाऊ दिवाळी,लेवू दिवाळी आणि सजवू दिवाळी या उद्देशाने पाटणचे लोकप्रिय आमदार शंभूराज देसाई हे कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या निवासस्थान परिसरात गत तीन वर्षापासून दिवाळीचा फराळ खाणे आणि सोबत गाणे एैकणे अशापध्दतीने दिवाळी फराळ सुरेल सायंकाळ आयोजित करीत आहेत.दिवाळी फराळाची ही सुरेल सायंकाळ मोठया उत्साहाने पाटण मतदारसंघात गत तीन वर्षापासून साजरी होत आहे.यंदाच्या दिवाळी फराळ सायंकाळ कार्यक्रमास खास सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेमहाराज,जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंगल,निवासी जिल्हाधिकारी सचिन बारावकर,सातारा प्रातांधिकारी स्वाती देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील,सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज,कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे,परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक एस.एस.पळसुले,श्रीमती पी.टी.काशीद,कराडचे प्रांताधिकारी हिम्म्त खराडे,पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर,एमएसईबीचे कार्यकारी अभियंता अभिमन्यु राख,कराडचे तहसिलदार राजेश चव्हाण हे मान्यवर अधिकारी व त्यांचे सहकाऱी हे प्रमुख उपस्थित होते.   
                आपण सर्वजण आपआपल्या घरी दिवाळी सण साजरा करतो.परंतु रोजच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपल्याला प्रत्येकालाच वेळ देता येत नाही.प्रत्येकाला आर्वजून भेटण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम एक संधी असल्याचे ओळखून पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई हे मतदारसंघातील विविध क्षेत्रातील मान्यवर,शासकीय अधिकारी,कार्यकर्ते,विविध संस्थाचे पदाधिकारी,डॉक्टर,वकील मंडळी यांच्यासाठी दिवाळी फराळ या उपक्रमाचे प्रतिवर्षी आयोजन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही त्यांनी दिवाळी फराळ या उपक्रमाचे आयोजन केले होते.सातारा जिल्ह्यात एकमेव पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे अशा अनोख्या पद्धतीने दिवाळी उत्सव साजरा करीत असल्याने त्‍यांच्या या उपक्रमाकडे नेहमीच सर्वाचेच लक्ष लागलेले असते.त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे दिवाळी फराळास आलेल्या सर्वाचा आनंद व्दिगुणीत तर होतोच परंतु कार्यक्रमांस येणारे उपस्थित हे मोठया उत्साहाने या उपक्रमास चांगलीच दाद देतात.आमदार शंभूराज देसाई हे स्वतः दिवाळीचे खाद्य पदार्थ घेवून या कार्यक्रमाची सुरूवात करतात त्यानंतर स्वतः प्रत्येक टेबलजवळ जावून कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी यांनी फराळ घेतला आहे का?यांची आपुलकीने चौकशी करीत असतात.येथे येणारा प्रत्येकजण धकाधकीचे जीवन विसरुन एकमेकांशी असलेले नाते जपण्यासाठी येत असून सामान्यातील सामान्य कार्यकर्ता, पदाधिकारी,मान्यवर यांना तालुक्‍याचे आमदार शंभूराज देसाई यांच्याबरोबर दिवाळी साजरी करता आली. याचे आत्मीक समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येते.या वर्षीही कार्यक्रमस्थळी कोल्हापुरचे प्रा. सुरेश शुक्‍ल निर्मीत मधूर स्वरांगण या मराठी गाण्याचा कार्यक्रम आयोजन करुन फराळ्याच्या गोडीबरोबर गाण्याच्या आस्वादाने दिवाळी फराळाची सुरेल सायंकाळ उत्साहात साजरी झाली.सुरेल संगीतावरील गाणी ऐकत प्रत्येकजण या दिवाळी फराळ्याच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक करीत होता.आमदार शंभूराज देसाईंनी या कार्यक्रमांस आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे अगत्याने स्वागत करुन दिवाळी फराळाचा आस्वाद घेण्याची विनंती केली.त्यांच्या विनंतीवरुन प्रत्येकाने या सुरेल दिवाळी फराळ सायंकाळचा मनमुराद आस्वाद घेतला.सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समूहातील पदाधिकारी विविध गावचे सरपंच,उपसरपंच, ग्रामस्थ यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.


Monday, 5 November 2018

शेतकऱ्यांच्या ऊसबिलाचा शासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी देसाई कारखाना करेल. आमदार शंभूराज देसाईंचे ४५ व्या गळीत हंगाम शुभारंभात आश्वासन.





             देसाई कारखान्याच्या संदर्भात सुरवातीपासूनच विरोधकांकडून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो कारखाना बंद पडण्याची स्वप्ने पहाणाऱ्यां विरोधकांचे हे प्रयत्न आजही संपले नाहीत.परंतू कारखान्याच्या सभासदांना व पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना मला जागृत आणि सावध करावयाचे आहे.क्षणिक फायदयासाठी दुसरी वाट धरण्याचा निर्णय विरोधकांच्या सांगण्यावरुन अनेक शेतकऱ्यांनी यापुर्वी घेतला तो शेतकऱ्यांच्या अडचणीचा आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे धोरण आपले कारखान्याने कधीच राबविले नाही. गतवर्षी सुमारे तीन लाख टन ऊसाचे गाळप होईल असा अंदाज बांधण्यात आला होता परंतू तालुक्यातील १ लाख्‍ टन ऊस बाहेर गेल्याने गाळप कमी झाले. अंदाजाप्रमाणे ऊसाचे गाळप झाले असते तर आम्हालाही शेतकऱ्यांना ऊसाचा चांगला दर देता आला असता तरीही कोणतेही कर्ज न काढता आपण जिल्हयातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने गतवर्षी शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे ऊसाचा दर दिला यंदाच्या गळीत हंगामातील ऊसाचा दर देणेसंदर्भात शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाची अंमलबजावणी आपला देसाई कारखाना करणार असल्याचे आश्वासन देसाई कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शंभूराज देसाईंनी दिले.
                दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ४५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद यांच्या हस्ते व आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, आदित्यराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती माजी उपसभापती डी.आर. पाटील, सातारा बँकेचे माजी व्हा.चेअरमन ॲड.बी.आर.पाटील,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, सुरेश पानस्कर, संतोष गिरी, माजी जि.प.सदस्य जालंदर पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कारखान्याचे सभासद व शेतकरी बांधवाची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
              याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात १२५० मे टनाचे किती साखर कारखाने सुरु आहेत आणि त्यांनी किती दर शेतक-यांना दिला आहे याचा विचार होणे गरजेचे आहे. १०० किलोच्या पैलवानाबरोबर ५० किलोच्या पैलवानाची बरोबरी होऊ शकत नाही तसेच मोठया क्षमतेच्या कारखान्याच्या बरोबरीने आपल्या कारखान्याची बरेाबरी कधीच होवू शकत नाही.त्यामुळे मोठया क्षमतेच्या कारखान्याबरोबर तुलना करणे चुकीचे आहे.आपला आवाका पाहून हातपाय पसरणे योग्य.सवंग लोकप्रियतेकरीता ऊस दर देण्यासाठी मोठया कारखान्यांच्या बरोबर दराची स्पर्धा करायची याकरीता कारखान्यावर कर्ज काढायचे आणि त्याचा बोजा कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर ठेवायचा  असे कारखान्याने कधीच केले नाही.शेतकऱ्यांच्या पदरात न्यायच देण्याचा प्रयत्न कारखान्याने केला आहे. शेतकऱ्यांनीही साखर कारखानदारी समजुन घेणे गरजेचे आहे.मला कुठल्या कारखान्याचे नाव घ्यायचे नाही परंतू जो ऊस  शेतकरी बाहेरच्या कारखान्यांना घालतात त्या शेतकऱ्यांनी गेल्या ३ वर्षात एकाच कारखान्याला ऊस घातलेला दिसून येत नाही. दुर्देव एवढेच आहे की,कारखान्याच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून आपला ऊस भिजवायचा आणि तो बाहेरच्या कारखान्यांना घालायचा. ज्या कारखान्यांनी यापुर्वी एफआरपी एवढीही रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही.त्या कारखान्याला ऊस घालून शेतकऱ्यांचा काय फायदा झाला.अडचणीतील ऊस बाहेरचे कारखाने नेत नाहीत.लोकरी माव्याचे मागील वेळेस मोठे संकट शेतकऱ्यांवर आले तेव्हा आपल्याच कारखान्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देवून या संकटातून बाहेर काढले.कारखान्यावरही अडचणीचा आणि परीक्षेचा काळ आल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखान्याच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे आहे.अत्यंत कमी खर्चात आपण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकरीता उभारलेला हा कारखाना चालवित आहोत.खोटया आमिषांना बळी पडून शेतकऱ्यांनी आपले नुकसान करुन घेवू नये.कर्मचाऱ्यांचे वाढीव पगाराचे प्रश्न शिल्लक आहेत परंतू त्या प्रश्नांचा शेतकऱ्यांच्या ऊसदरावर कधीही परिणाम होवू दिला नाही.कर्मचाऱ्यांच्या वाढीव पगारवाढीचा निर्णयही कारखाना लवकर घेणार असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी क्षणिक फायदयासाठी खेाटया आमिषांना बळी पडून बाहेरच्या कारखान्यांना ऊस देवून त्यांनी त्यांचे नुकसान करुन घेवू नये. यंदाच्या गळीत हंगामातील ऊसाचा दर देणेसंदर्भात शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाची अंमलबजावणी आपण करणार असून आपले कारखान्याकडे नोदंविलेला संपुर्ण ऊस शेतकऱ्यांनी देसाई कारखान्यासच घालावा असे आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत चेअरमन अशोकराव पाटील यांनी केले आभार संचालक गजानन जाधव यांनी मानले.
चौकट:- ५०० रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, शासनाकडे आग्रही राहणार.- आमदार देसाई.
             साखरेचे दर मोठया प्रमाणात कोसळल्यामुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. सध्या बाजारपेठेत साखरेचे भाव प्रति क्विटंल २९०० रुपये इतका आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम अदा करताना साखर कारखान्यांना सुमारे ५०० रुपये प्रति मे टन इतकी तुट येत आहे ही तुट भरुन काढण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संयुक्तीकपणे ५०० रुपयांचे अनुदान कारखान्यांना नाहीतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे याकरीता येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शासनाकडे आग्रही राहणार असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले.




Saturday, 3 November 2018

भूकंपग्रस्तांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करणेबाबत अहवाल सादर करा. आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या सुचना.



महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९८६ च्या कलम ६ (सी) मध्ये दर्शविल्याप्रमाणे कुटुंबामध्ये पती/पत्नी/मुलगा व अविवाहित मुलगी कुटुंबात राहणारे व कुटुंब  प्रमुखावर अवलंबून असणारे भाऊ व बहिण, नातू आणि सून यांचा समावेश असून कुटुंब प्रमुखावर अवलंबून असणा-या भावाचा मुलगा (पुतण्या) / मुलगी(पुतणी), मुळ भूकंपग्रस्तांचा पणतू यांचा समावेश नसल्याने ज्या व्यक्तीस या भूकंपग्रस्त दाखल्याची नोकरीमध्ये सवलत मिळणेकरीता खरोखरच आवश्यकता आहे त्यांस भूकंपग्रस्त कुटुंबातील सर्वांच्या सहमतीने भूकंपग्रस्तांचा दाखला मिळणेकरीता भूकंपग्रस्त कुटुंबाच्या व्याख्येमध्ये सुधारणा करणे गरजेची आहे. याकरीता भूकंपग्रस्तांच्या संपुर्ण शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी, अशी मागणी भूकंपग्रस्तांचे दाखले भूकंपग्रस्तांना पुर्ववत मिळवून देणारे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे काल प्रत्यक्ष भेटून केली. यावेळी भूकंपग्रस्तांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करणेबाबत तात्काळ अहवाल सादर करा, अशा सुचना मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
शासन सेवेत नियुक्तीसाठी प्रकल्पांसाठी असलेल्या ५% आरक्षणामध्ये भूकंपग्रस्ताचा समावेश करणेबाबत शासनाने दि. ०९ ऑगस्ट, १९९५ रोजी पारित केलेल्या शासन निर्णयातील भूकंपग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाच्या व्याख्यामध्ये सुधारणा करुन मुळ कुटुंबामध्ये पती/पत्नी/मुलगा व अविवाहित मुलगी कुटुंबात राहणारे व कुटुंब  प्रमुखावर अवलंबून असणारे भाऊ व बहिण,नातू आणि सून यांचेबरोबर कुटुंब प्रमुखावर अवलंबून असणा-या भावाचा मुलगा (पुतण्या)/मुलगी(पुतणी), मुळ भूकंपग्रस्तांचा पणतू यांचाही समावेश करणेकरीता भूकंपग्रस्तांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करणेविषयीचे लेखी पत्र मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयामध्ये काल प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार शंभूराज देसाईंनी आग्रही मागणी केली. यावर मुख्यमंत्री यांनी वरीलप्रमाणे सुचना दिल्या असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे, माझे सातत्याचे विनंतीवरुन आपण स्वत: व्यक्तीश: लक्ष घालून आमचे पाटण तालुक्यात सन १९६७ मध्ये दि. ११ डिसेंबर, १९६७ ला प्रलंयकारी झालेल्या भूकंपात बाधित झालेल्या भूकंपग्रस्तांना सन १९९५ पासून राज्य शासनाने बंद केलेले भूकंपग्रस्तांचे दाखले सुरु करण्याचा धोरणात्मक आणि ऐतिहासिक असा निर्णय दि. १८ डिसेंबर २०१५ रोजीचे शासन निर्णयाप्रमाणे घेतलात आणि या निर्णयाच्या माध्यमातून पाटण तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील भूकंपग्रस्त व्यक्तींचा समावेश या निर्णयामध्ये करुन राज्यातील भूकंपग्रस्तांना न्याय मिळवून दिलात त्याबद्दल पाटण तालुक्यासह महाराष्ट्र राज्यातील तमाम भूकंपग्रस्त व्यक्तींच्यावतीने मन:पुर्वक आभार व्यक्त केले असून आपले विशेष प्रयत्नामुळेच दि. १८ डिसेंबर,२०१५  रोजीचे शासन निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील अनेक भूकंपग्रस्त व्यक्तींनी भूकंपग्रस्त दाखल्यांचा लाभ घेण्यास सुरुवात केली असून या दाखल्यामुळे भूकंपग्रस्त कुटुंबातील अनेक व्यक्ती शासन सेवेत दाखल देखील झाल्या आहेत. याचे संपुर्ण श्रेय आपले आहे याचा मला व्यक्तीश: खुप अत्यानंद असल्याचेही म्हंटले आहे.
दरम्यान तालुका महसूल विभागाच्या वतीने देण्यात येणारे भूकंपग्रस्तांचे दाखले हे शासनाने    दि. ०९ ऑगस्ट, १९९५ रोजी पारित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे देण्यात येत आहेत. यामध्ये भूकंपग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाची व्याख्या ठरवून देण्यात आली असून भूकंपग्रस्त कुटुंबप्रमुखावर अवलंबून असणा-या कोणत्याही एका वारसदारांस आणि खरोखरच ज्या व्यक्तीस या दाखल्यांची आवश्यकता आहे, अशा व्यक्तीश सदरचा भूकंपग्रस्तांच्या कुटुंबातील इतर सर्व व्यक्तीच्या सहमतीने हा दाखला मिळावा अशी मागणी भूकंपग्रस्तांकडून मोठया प्रमाणांत होऊ लागली आहे. दरम्यान भूकंपग्रस्त कुटुंबाच्या व्याख्येमुळे आणि सदरचा शासन निर्णया हा सन १९९५ सालचा जुना शासन निर्णय असल्यामुळे भूकंपग्रस्तांना भूकंपग्रस्तांचे दाखले काढणेस अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या निर्णयाचा लाभ हा लाभार्थी असणा-या भूकंपग्रस्तांच्या वारसदार व्यक्तीस मिळावा याकरीता सदर शासन निर्णयामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या भूकंपग्रस्त कुटुंबाच्या व्याख्येमध्ये सुधारणा करणे अत्यंत गरजेचे असून भूकंपग्रस्त कुटुंबाची ठराविक व्याख्या न ठरविता तसेच भूकंपग्रस्तांच्या बाबतीत व्यक्तीगत विचार न करता कुटुंबाचा विचार करण्यात येऊन भूकंपग्रस्त कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीस, ज्या व्यक्तीस या दाखल्याची खरोखरच आवश्यकता असून त्यासं नोकरीमध्ये सवलत मिळणेकरीता भूकंपग्रस्त कुटुंबाच्या व्याख्येमध्ये सुधारणा करण्याचा धोरणात्मक निर्णय आपण घ्यावा, अशी महाराष्ट्रातील भूकंपग्रस्त कुटुंबांच्यावतीने नम्र विनंती केली असून आमदार शंभूराज देसाईंच्या आग्रही मागणीवरुन भूकंपग्रस्तांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करणेबाबत तात्काळ अहवाल सादर करा, अशा सक्त सुचना मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिल्या असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.

Thursday, 1 November 2018

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा आमदार शंभूराज देसाई व ज्येष्ठ ११ सभासदांच्या हस्ते सोमवार दि.०५ नोव्हेंबर रोजी गळीताचा शुभारंभ- अशोकराव पाटील चेअरमन




             दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०१८-१९ मधील ४५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ समारंभ सोमवार दि.०५ नोव्हेंबर, २०१८ रोजी सकाळी १०.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक, उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई व कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
        पत्रकात म्हंटले आहे की, या वर्षीच्या गळीत हंगामातील गळीताकरीता मागील हंगामाच्या जवळपास कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील ऊसाची नोंद झाली असून कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस गळीताचे उदीष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवले आहे. चालु गळीत हंगामाची पुर्वतयारी पुर्ण झाली असून गाळप हंगाम पुर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व कामकाज पुर्णत्वाकडे गेले आहे. कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूकीकरीता पुरेसे तोडणी मजुर व वाहनांचे करार पुर्ण केलेले असून कारखान्याकडे करार केलेली सर्व ऊस तोडणी व वाहतूक तोडणी मजुर यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.यंदाचाही गळीत हंगाम कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्यातून यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत या गळीत हंगामाचा शुभारंभ हा प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद श्री.शंकर पाटील त्रिपुडी, श्री.रामचंद्र सावंत साखरी,श्री.शंकर चौधरी पाटण,श्री.पांडूरंग पाटील माजगाव, श्री.शिवाजी पवार बांबवडे,श्री.रामचंद्र कदम मरळी,श्री.नथुराम गायकवाड आबदारवाडी,श्री.राजाराम पानवळ खळे, श्री.दत्तात्रय देसाई कुंभारगाव, श्री.पांडूरंग शिंदे मारुलहवेली,श्री.हिंदुराव पाटील मंद्रुळकोळे यांचे व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक,उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ (दौलतनगर) येथे संपन्न होत आहे.या समारंभानिमित्त कारखान्याचे संचालक राजेंद्र गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शिल्पा गुरव यांचे हस्ते सत्यनारायण महापुजा आयोजीत केलेली आहे.या समारंभास कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी,पदाधिकारी,कार्यकर्ते,हितचिंतक यांनी सोमवार दि. ०५ नोव्हेंबर, २०१८ रोजी सकाळी १०.०० वा. बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही चेअरमन अशोकराव पाटील यांनी शेवठी पत्रकात केले आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती दया.आमदार शंभूराज देसाईंच्या अधिका-यांना बैठकीत सुचना. रस्त्यावर उतरुन अधिका-यांना बरोबर घेवून केली रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी.




        कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते पाटणच्या पुढील भागात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु करण्यात आले आहे.सदरचे काम खुप संथ गतीने सुरु असल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील पाडळी,सुपने पासून पाटणच्या पुढील हेळवाक पर्यंतच्या कामांस एल.ॲन्ड टी कंपनीने आणि काम करुन घेणा-या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका-यांनी गती दया व लवकरात लवकर या रस्त्याचे काम कसे पुर्ण करता येईल या उदीष्टाने काम करा अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाच्या व एल.ॲन्ड टी कंपनीच्या अधिका-यांना बैठकीत दिल्या.या कामांसंदर्भात बैठक घेण्यापुर्वी आमदार शंभूराज देसाईंनी स्वत: रस्त्यावर उतरुन रस्त्याच्या कामांमध्ये कुठे कुठे अडचणी आहेत यामध्ये कशा उपाययोजना करण्यात येतील याकरीता रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी केली यावेळी कंपनीचे व शासकीय सर्व अधिकारी हे आमदार शंभूराज देसाई यांच्यासमवेत पहाणी दौ-यात उपस्थित होते.
        पाटण विश्रामगृह याठिकाणी हेळवाक कराड ते पाटण अशा ४८.४२ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे कामाला गती देणेसंदर्भात आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीत व पहाणी दौ-यात वरीलप्रमाणे आमदार शंभूराज देसाईंनी सुचना दिल्या. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता व्ही.आर.कांडगावे,प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड,वनसंरक्षक विलास काळे, पाटणचे पोलीस निरीक्षक यु.एस.भापकर, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता पन्हाळकर,एल.ॲन्ड टी कंपनीचे मुंबई कार्यालयाचे प्रमुख के.हरीकृष्णा,प्रोजेक्ट मॅनेजर बीपलाब घोष,विठ्ठल सावंत,पोरे,शामल शिंदे यांच्यासह एल.ॲन्ड टी कंपनीचे सर्व प्रमुख अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
        आमदार शंभूराज देसाईंनी प्रारंभी आबदारवाडी येथून गिरेवाडी,मल्हारपेठ,नवसरवाडी,नाडे,पाटण येथील ठिकाणांची प्रत्यक्ष पहाणी केली व बैठकीमध्ये त्यांनी या रस्त्याच्या दोन्ही बाजुस जिथे जिथे गांवे आहेत त्याठिकाणी मोठमोठे गटर बांधकाम केले आहे तेथील ग्रामस्थांनी गावातून रस्त्यावर कसे यायचे हीच परिस्थिती रस्त्याला जोडून असणा-या शेतांची आहे.शेतक-यांनी शेतातील तसेच शिवारातील त्यांची वाहने,बैलगाडया कश्या बाहेर काढायच्या असा सवाल उपस्थित केला यावर कार्यकारी अभियंता यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुस जिथे जिथे गांवे आहेत, तिथे १०० ते २०० मीटर रस्ता करुन देण्याचे या कामांमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना ज्याठिकाणी शिवारातून रस्त्यांवर येण्याकरीता रस्ता हवा आहे तसा सर्व्हे आम्ही विभागामार्फत करु आणि मागणीप्रमाणे रस्ता करुन देवू असेही त्यांनी सांगितले त्यानंतर आमदार शंभूराज देसाईंनी कोयना तीरावरील ३२ उपसा जलसिंचन योजना तसेच अनेक गांवाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना या दक्षिणेकडून उत्तरेकडील गांवामध्ये येत आहेत त्या योजनांच्या पाईपलाईन रस्त्याच्या कामांतून पलीकडेच्या बाजूस काढून देणे व दुरुस्ती करुन देणेसंदर्भात मी पत्राव्दारे सुरवातीसच मागणी केली होती यावर राष्ट्रीय महामार्गाने आपले पत्रातील मागणीवरुनच या मार्गावरील उपसा जलसिंचन व पिण्याच्या पाण्याच्या योजना या पुरर्वत रस्त्याच्या पलीकडे काढून देण्यास मान्यता दिली आहे. अशी मान्यता यापुर्वी कधीही आणि कुठेही देण्यात आली नाही असे सांगून अधिका-यांनी त्यानुसार आम्ही कामेही सुरु केली आहेत तर काही ठिकाणी सुरु करीत असल्याचे सांगितले. तसेच गांवाच्या ठिकाणी २२ मीटरने तर गांवाबाहेर २४ मीटरने रस्ता करण्यात येणार असून रुंदीकरणासाठी शेतक-यांच्या संमती घेण्याची प्रक्रिया सुरु आहेत असे अधिका-यांनी सांगितल्यानंतर रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये ३२ गांवामध्ये ३६ किमी अंतरात १३ हेक्टर जमिनक्षेत्र भुसंपादन करावे लागत असून भूसंपादन कराव्या लागणा-या शेतक-यांना रेडीरेकनरच्या चारपट दराने या जमिनींचा भाव देण्यात यावा,भूमिसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर महसूल विभागांनी पुर्ण करावी असे आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी अधिका-यांना सुचित केले.सन २०१९ संपण्याच्या अगोदर हेळवाक- पाटण ते कराड या रस्त्याचे काम पुर्ण करण्याचे शासनाचे उदीष्ठ असून शासनाच्या उदीष्ठाप्रमाणे एल.ॲन्ड टी कंपनीने या कामांस गती दयावी जिथे यंत्रणा कमी पडत आहे त्याठिकाणी यंत्रणा वाढविण्यात यावी. रस्त्याच्या कडेला शेतकऱ्यांनी खाजगी पाईपलाईन केल्या आहेत अशा पाईपलाईनची नासधुस न करता त्यांच्या पाईपलाईन योग्यरित्या कंपनीने शिफटींग करुन दयाव्यात अशी अनेक शेतक-यांनी मागणी केली आहे त्याप्रमाणे याची प्रत्यक्ष पहाणी कंपनीने व महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी करावी व शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही याची काळजी घेत त्यांच्या पाईपलाईन शिफटींग करुन दयाव्यात असेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
चौकट:- आता कामाला चांगली गती येईल ग्रामस्थ शेतक-यांच्या प्रतिक्रिया.
        आमदार शंभूराज देसाई हे कराड चिपळुण महामार्गावरील रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन सर्व शासकीय व कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेवून पहाणी करीत असल्याचे आणि रस्त्याच्या कामांमध्ये कुठे कुठे अडीअडचणी आहेत हे अधिका-यांना दाखवित असल्याचे पाहून आता कामाला चांगली गती येईल अशा प्रतिक्रिया रस्त्यावरील अनेक गांवातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी बैठकीपुर्वी व्यक्त केल्याचे एैकावयास मिळाले.

Saturday, 27 October 2018

हरीतऊर्जा योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील ग्रामीण रस्त्याचे प्रस्ताव सादर करा. ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संबधित यंत्रणांना सुचना.




      पाटण तालुक्याच्या दौ-यावर आलेले राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील डोंगरपठारावर जाणारे ग्रामीण रस्ते हे पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे मोठया प्रमाणात खराब झाले असून या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करावा अशी मागणी ऊर्जामंत्री यांचेकडे केल्यानंतर तातडीने पाटण तालुक्यातील या रस्त्यांचे प्रस्ताव हरीतऊर्जा योजनेतंर्गत मंजुरीकरीता सादर करावेत अशा सुचना जागेवर ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबधित यंत्रणांना दिल्या.
     राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार शंभूराज देसाई यांचे मागणीवरुन पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे मोठया प्रमाणात खराब झालेल्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना यापुर्वी भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पाटण मतदारसंघाच्या वतीने ऊर्जामंत्री यांचा जाहीर सत्कार केला. या सत्काराच्या दरम्यानच आमदार शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यात पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे खराब झालेल्या ११ रस्त्यांची कामे प्रलंबीत असून या कामांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दयावा अशी आग्रही मागणी ऊर्जामंत्री यांचेकडे केल्यानंतर अशा रस्त्यांना निधी न देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून आमदार शंभूराज देसाईंची आग्रही मागणी या खात्याचा मंत्री असल्याने मला मोडवत नसल्याने निर्णयात बदल करुन पाटण तालुक्यातील अशा रस्त्यांना हरीतऊर्जा योजनेतंर्गत निधी मिळणेकरीताचे प्रस्ताव तात्काळ मंजुरीकरीता सादर करावेत अशा सुचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.यासंदर्भात आमदार शंभूराज देसाईंनी ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार मानले.
     आमदार शंभूराज देसाई यांनी ऊर्जामंत्री यांचेकडे मागणी केलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये हुंबरणे ते पांढरेपाणी रस्ता ४ किमी, कोकीसरे नवलाईवॉर्ड ते गवळीनगर रस्ता ३ किमी, वेताळवस्ती काळगांव ते मस्करवाडी रस्ता १.५०० किमी, माईंगडेवाडी ते गणेशवाडी ते हौदाचीवाडी म्हाळुंगेवाडी ते सातर रस्ता ८.५००किमी, भोसगांव ते आंब्रुळकरवाडी ते कोळेकरवाडी रस्ता ७ किमी, कोळेकरवाडी अनुतेवाडी ते कारळे रस्ता ४ किमी, नेरळे ते गुंजाळी रस्ता ३ किमी, घेरादातेगड गावपोहोच रस्ता ३ किमी, गावडेवाडी फाटा ते धुईलवाडी रस्ता ३ किमी, काठीटेक ते अवसरी रस्ता ३.५०० किमी व रामेल फाटा ते रामेल रस्ता ३ किमी असे एकूण ४३.५०० किमी लांबीचे रस्ते सुचविले आहेत. ऊर्जामंत्री यांनी सदरचे प्रस्ताव मंजुरीकरीता सादर करण्याच्या सुचना संबधित यंत्रणांना दिल्या असल्याने या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर होईल अशी आशा आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केली आहे.
चौकट:- दोन टप्प्यात मिळणार निधी- ऊर्जामंत्री यांनी केले जाहीर.
       आमदार शंभूराज देसाईंनी या ११ रस्त्यांच्या कामांसंदर्भात ऊर्जामंत्री यांचेशी सविस्तर अशी चर्चा केल्यानंतर या ११ कामांना दोन टप्प्यामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे ऊर्जामंत्री यांनी मान्य केले आहे. २०१८ च्या डिसेंबरच्या अधिवेशनात व २०१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या कामांना निधी मंजुर करुन दिला जाईल असे ऊर्जामंत्री यांनी आमदार शंभूराज देसाईंना सांगितले आहे.


Wednesday, 24 October 2018

नाडे-मरळी रस्त्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते शुक्रवारी नाडे येथे भूमिपुजन. पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार समारभांच्या अध्यक्षस्थानी आमदार शंभूराज देसाई.



      सन २०१८-१९ चे अर्थसंकल्पातून पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी मंजुर करुन आणलेल्या नाडे सांगवड-मंद्रुळकोळे- ढेबेवाडी प्रजिमा ५८ भाग नाडे नवारस्ता ते मरळी किमी ०/०० ते ५/०० या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करणे या कामांचा भूमिपुजन समारंभ राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुभहस्ते शुक्रवार दि.२६.१०.२०१८ रोजी सकाळी ०९.३० वा नाडे नवारस्ता येथे आयोजीत केला असून या समारंभात ऊर्जा मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्या विनंतीवरुन राज्याच्या हरीतऊर्जा निधीमधून पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील ग्रामीण रस्त्यांच्या कामांना भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांचा आमदार शंभूराज देसाईंचे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार शंभूराज देसाई असणार असल्याची माहिती नाडे-सांगवड-गव्हाणवाडी- चोपदारवाडी व मरळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
       पोफळी जलविद्युत प्रकल्पाच्या पहाणी दौ-यावर असणारे राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार दि.२६.१०.२०१८ रोजी पाटण विधानसभा मतदारसंघाच्या दौ-यावर येत असून त्यांचे हस्ते आमदार शंभूराज देसाईंनी सन २०१८-१९ चे अर्थसंकल्पातून सुमारे ७.५० कोटी रुपयांचा मंजुर करुन आणलेल्या नाडे सांगवड-मंद्रुळकोळे- ढेबेवाडी प्रजिमा ५८ भाग नाडे नवारस्ता ते मरळी किमी ०/०० ते ५/०० या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करणे या कामांचा भूमिपुजन समारंभ त्यांचे हस्ते आयोजीत करण्यात आला आहे या समारंभात आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या मागणीवरुन ऊर्जामंत्री यांनी राज्याच्या हरीतऊर्जा निधीमधून पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील ग्रामीण रस्त्यांच्या कामांना भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांचा आमदार शंभूराज देसाईंचे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. सदर समारंभ हा शुक्रवार दि.२६.१०.२०१८ रोजी सकाळी ०९.३० वा नाडे नवारस्ता येथे आयोजीत केला असून या समारंभास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नाडे-सांगवड-गव्हाणवाडी- चोपदारवाडी व मरळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.