Wednesday 27 November 2019

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाचाही गळीत हंगाम यशस्वी करणेकरीता सर्वांनी प्रयत्न करुयात. युवा नेते यशराज देसाईंचे ४६ व्या गळीत हंगाम शुभारंभात सभासद, कारखाना व्यवस्थापनास आवाहन.




दौलतनगर दि.२७ :- सातारा जिल्हयामध्ये २५००,५००० मे.टन,७५०० मे.टन दररोज ऊसाचे गळीत करणारे मोठ मोठे साखर कारखाने आपल्या आजू बाजूला आहेत या सर्व मोठया तसेच उपपदार्थ प्रकल्प असणाऱ्या साखर कारखान्यांच्या तुलनेमध्ये एखादा महिना पुढे मागे सोडला तर आपल्याकडे कोणताही उपपदार्थ प्रकल्प उभारण्यास वाव नसतानादेखील कारखान्याचे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे अभ्यासू नेते आमदार शंभूराज देसाईसाहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने कारखान्याच्या सभासदांना व ऊस उत्पादकांना शासनाने ठरवून दिलेली एफ.आर.पी.ची पुर्ण रक्कम दरवर्षी दिली आहे. सभासदांनी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पिकविलेला संपुर्ण ऊस आपल्या देसाई कारखान्यास देवून सहकार्य करावे. आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे निटनेटक्या नियोजनामुळे हे सर्व शक्य होत असून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाचाही गळीत हंगाम यशस्वी करणेकरीता आपण सर्वांनी प्रयत्न करुयात असे जाहीर आवाहन पाटण तालुक्याचे युवा नेते यशराज देसाईंनी कारखान्यांच्या सभासदांना व कारखाना व्यवस्थापनास केले.
                           दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद यांच्या हस्ते व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई,आदित्यराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, शिवदौलत बँकेचे अध्यक्ष मिलींद पाटील,कारखान्याचे तसेच शिवदौलत सहकारी बँकेचे सर्व आजी माजी संचालक,आजी माजी जिल्हा परीषद,पंचायत समिती सदस्य,यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कारखान्याचे सभासद,शेतकरी बांधव, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
                               याप्रसंगी बोलताना युवा नेते यशराज देसाई म्हणाले,आपल्या मतदारसंघाची भौगोलिक अडचण असताना व प्रतिकुल परिस्थितीमध्येही स्पर्धेच्या युगात देसाई कारखाना भक्कमपणे टिकून आहे. आज आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदारसाहेब हे मुंबई याठिकाणी आमदारपदाची शपथ घेणेकरीता गेले असल्यामुळे या समारंभास ते उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे या वर्षीच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्याचा बहूमान मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. आज कारखान्याच्या 46 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ होत आहे.मागच्या गळीत हंगामात दोन लाख मे. टन ऊसाचे आपण गाळप केले आहे.आमदार शंभूराज देसाईसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षीची संपूर्ण एफ.आर.पी.ची रक्कम ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यावर जमा केली आहे.महाराष्ट्रात आज 150 सहकारी साखर कारखाने तर 70 खाजगी कारखाने आहेत सहकार टिकला पाहिजे,सहकार वाढला पाहिजे या भूमिकेतून आमदारसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली आपल्या कारखान्याचे काम सुरु आहे. आर्थिक मंदिच्या बाबतीत टि.व्ही.वरती व पेपरमध्ये आपण वाचतो. आर्थिक मंदी आली की खाजगी कंपनीमध्ये काम करत असलेलं व्यवस्थापन नोकर कपातीचे धोरण राबवितात सहकारी संस्थेमध्ये असा निर्णय घेतला जात नाही जी संस्था सभासदांच्या मालकीची आहे सभासदांचा त्यावर पहिला हक्क आहे याकरीता सहकार टिकला पाहिजे  असे माझे मत आहे. यापुर्वी कारखान्यात ऊस आला,त्याचे गळीत करुन साखर उत्पादन केले, उत्पादित साखर बाजारपेठेत विक्री केली व आलेल्या पैशातून कारखाना व्यवस्थापनाचा खर्च केला व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिले हे सुत्र होते.पण आता एफ. आर.पी.चा नियम लागू झाल्यामुळे सरकारने निश्चित केलेली एफ.आर.पी.ची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण सक्तीचं झालेल आहे. नाहीतर पुढील गळीत हंगामात गाळप परवाना दिला जात नाही.आपले कारखान्यामध्ये आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे निटनेटके नियोजन तसेच कारखाना व्यवस्थापनाकडून खर्च कमी करण्याचे नियोजन कारखाना संचालक मंडळाचे सहकार्याने केलेले आहे त्यामुळेच हे सगळं शक्य होऊ शकले आहे. सभासदांच्या मालकीची हि कारखानदारी सभासदांच्याच मालकीची राहिली पाहिजे आणि जादा दर हा सभासदांना वेळेत देता आला पाहिजे या करीता आपल्याला भविष्यात धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत या गळीत हंगामासाठी इंजिनिअरिंग व उत्पादन विभागाचे काम पुर्ण झाले आहे तर कारखाना परिसरामध्ये ऊस तोड मजूर यंत्रणाही दाखल झाली आहे. आमदारसाहेबांनी नियोजन करुन दिल्याप्रमाणे वेळेवर सभासदांचा व ऊस उत्पादकांचा ऊस आणून तो गाळप केला तर आपल्या नियोजनानुसार गळीताचे उद्दीष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे.हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुयात असेही ते म्हणाले.यावेळी रविराज देसाई, डॉ. दिलीपराव चव्हाण यांची भाषणे झाली.उपस्थितांचे स्वागत चेअरमन अशोकराव पाटील यांनी केले आभार संचालक पांडूरंग नलवडे यांनी मानले.
चौकट:- सहकारी साखर कारखान्यांनीही कॉमन मिनीमम प्रोग्राम ठरविण्याची गरज:- यशराज देसाई.
            उद्या सत्तेवर येणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने जसा महाराष्ट्रातील जनतेच्या हिताकरीता विकास आघाडीचा कॉमन मिनीमम प्रोग्रॅम तयार करण्यात आला आहे त्याप्रमाणे सहकारी साखर कारखान्यांनीही कारखान्याच्या सभासदांच्या तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताकरीता पुढील पाच वर्षाचा कॉमन मिनीमम प्रोग्रॅम तयार करण्याची गरज असून आपल्या कारखान्याने आमदारसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली या धोरणाची सुरुवात करावी असेही आवाहन यशराज देसाईंनी यावेळी बोलताना केले.

Monday 25 November 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा आमदार शंभूराज देसाई व ज्येष्ठ ११ सभासदांच्या हस्ते बुधवार दि.२७ नोव्हेंबर रोजी गळीताचा शुभारंभ - अशोकराव पाटील चेअरमन



 दौलतनगर दि.२५ :- दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०१९-२० मधील ४६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ समारंभ बुधवार दि.२७ नोव्हेंबर, २०१९ रोजी सकाळी ११.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक,उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई व कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
              पत्रकात म्हंटले आहे की,या वर्षीच्या गळीत हंगामातील गळीताकरीता मागील हंगामाच्या जवळपास कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील ऊसाची नोंद झाली असून कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस गळीताचे उदीष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवले आहे. चालु गळीत हंगामाची पुर्वतयारी पुर्ण झाली असून गाळप हंगाम पुर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व कामकाज पुर्णत्वाकडे गेले आहे. कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूकीकरीता पुरेसे तोडणी मजुर व वाहनांचे करार पुर्ण केलेले असून कारखान्याकडे करार केलेली सर्व ऊस तोडणी व वाहतूक तोडणी मजुर यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.यंदाचाही गळीत हंगाम कारखान्याचे सभासद,ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्यातून यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत या गळीत हंगामाचा शुभारंभ हा प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद श्री.जयसिंग शिर्के आडूळ,श्री.चंद्रकांत माळी नुने,श्री. जयसिंग पानस्कर (पानस्करवाडी) मल्हारपेठ,श्री.व्यंकट पानस्कर बहुले,श्री.वसंत देशमुख चाफळ,श्री.पांडूरंग निकम बाचोली,श्री. यशवंत जाधव केरळ,श्री. यशवंत पाटील साईकडे,श्री.नानासो पवार वेताळवाडी,श्री. नामदेव देसाई नाटोशी, श्री.पांडूरंग साळूंखे येराड व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक,उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ (दौलतनगर) येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवा नेते यशराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या समारंभानिमित्त कारखान्याचे संचालक वसंत कदम व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शकुंतला कदम यांचे हस्ते सत्यनारायण महापुजा आयोजीत केलेली आहे.या समारंभास कारखान्याचे सर्व सभासद,ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी बुधवार दि.27 नोव्हेंबर, २०१9 रोजी सकाळी १०.00 वा. बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही चेअरमन अशोकराव पाटील यांनी शेवठी पत्रकात केले आहे.


Wednesday 20 November 2019

घाटमाथा हेळवाक-पाटण ते कराड रस्त्याचे काम मुदतीत पुर्ण करणेकरीता राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची व ठेकेदाराची तात्काळ बैठक घ्यावी. आमदार शंभूराज देसाईंची जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी पत्राव्दारे मागणी.



दौलतनगर दि.२० :- पाटण विधानसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,राष्ट्रीय महामार्ग  विकास योजनेतंर्गत सुरु असणाऱ्या घाटमाथा हेळवाक - पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे  काम गत दोन वर्षापासून संथ गतीने सुरु असल्याने  मतदारसंघातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने या रस्त्यांचे काम तात्काळ व मुदतीत पुर्ण होणेकरीता आपले अध्यक्षतेखाली  राष्ट्रीय महामार्गाच्या संबधित अधिकारी व ठेकेदार यांची तातडीने बैठक आयोजीत करावी व या रस्त्याचे काम मुदतीत पुर्ण करण्याच्या व नागरिकांच्या व वाहनधारकांची होणारी गैरसोय दुर करण्याच्या सक्त सुचना राष्ट्रीय महामार्गाचे संबधित वरीष्ठ अधिकारी व एल.अँन्ड टी कंपनीचे संबधित ठेकेदार यांना कराव्यात अशी लेखी मागणी पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी श्रीमती श्वेता सिंघल,जिल्हाधिकारी,सातारा यांना केली आहे.
                श्रीमती श्वेता सिंघल,जिल्हाधिकारी,सातारा यांना लेखी दिलेल्या पत्रामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत घाटमाथा हेळवाक-पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजुर करण्यात आले असून गत दोन वर्षापुर्वी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास एल अँन्ड टी कंपनीने सुरुवात केली असून सदर कंपनीने या रस्त्याची पुर्णत: खुदाई केली असून रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे.रस्त्याची खुदाई करण्यात आल्याने मोठया प्रमाणात मतदारसंघातील नागरिकांना तसेच वाहनधारकांना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सदरचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या दृष्टीने वारंवार राष्ट्रीय महामार्गाचे अधिक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता तसेच संबधित एल अँन्ड टी कंपनीचे जनरल मॅनेजर व प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या संयुक्त बैठकाही घेण्यात आल्या आहेत.तरीही या कामास गती देण्यात आली नसून पाटण मतदारसंघाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. डिसेंबर,२०१९ पर्यंत या रस्त्याचे काम पुर्ण करण्याची मुदत संबधित कंपनीला देण्यात आली होती तरीही या रस्त्याचे ४० टक्केही काम पुर्ण झाले नाही. म्हणून मी स्वत: दि.28.06.2019 रोजी महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून राज्याचे तत्कालीन सार्वजनीक मंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचे याकडे लक्ष वेधले असता लवकरच यासंदर्भात बैठक घेवून या रस्त्याच्या कामांस गती देवून दिलेल्या कालावधीत रस्त्याचे काम पुर्ण करुन घेणेकरीता संबधितांची बैठक घेण्याचे आश्वासन मला तारांकीत प्रश्नास दिले होते.दरम्यान या आश्वासनानंतर तात्काळ विधानसभेची आचारसंहिता लागल्याने व माहे जुलै,ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोंबरमध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी व अवकाळी पाऊस झाल्यामुळे या कालावधीत या रस्त्याच्या कामांची बैठक तत्कालीन सार्वजनीक मंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचे कडे होवू शकली नाही.दरम्यान या रस्त्याचे कामात मोठया प्रमाणात दिरंगाई झाल्याने सध्या नागरिेकांना व वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या रस्त्याचे काम मुदतीत लवकरात लवकर पुर्ण होण्याच्या दृष्टीने आपले अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी व एल अँन्ड टी कंपनीचे संबधित ठेकेदार यांची उच्चस्तरीय बैठक घेणे अत्यंत आवश्यक असून राज्याचे तत्कालीन सार्वजनीक मंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील घाटमाथा हेळवाक - पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे कामास प्राधान्याने गती देवून या रस्त्याचे काम लवकरात लवकर मुदतीत पुर्णत्वाकडे नेणेकरीता आपले अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी व एल अँन्ड टी कंपनीचे संबधित ठेकेदार यांची उच्चस्तरीय बैठक आयोजीत करावी व या रस्त्याचे काम मुदतीत पुर्ण करण्याच्या व नागरिकांच्या व वाहनधारकांची होणारी गैरसोय दुर करण्याच्या सक्त सुचना आपण संबधितांना दयाव्यात असेही आमदार शंभूराज देसाईंनी या पत्रामध्ये म्हंटले आहे.



स्व.शिवाजीराव देसाईसाहेब (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत- आमदार शंभूराज देसाई. ७६ वा जयंती सोहळयात प्रतिपादन.



दौलतनगर दि.२० :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत असून मुंबई याठिकाणी एक प्रसिध्द उद्योजक म्हणून नावारुपाला आलेले स्व.शिवाजीराव देसाई हे आपल्या वडीलांच्या शब्दाखातर पाटण तालुक्यात आले आणि लोकनते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी करुन त्यांनी तालुक्याला प्रथमत: सहकाराची दिशा मिळवून दिली.सहकाराबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी चांगली कामगिरी केली.शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लावलेल्या रोपटयाचे आज लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूल नावाने वटवृक्षात रुपातंर झाले आहे.त्यांचा सहकाराचा आणि शैक्षणिक वारसा आम्ही लिलया पेलत आहोत. स्व.आबासाहेब यांचे अधुरे स्वप्न मतदारसंघातील जनतेने पुर्ण करुन दाखविले.लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व.आबासाहेब यांच्या पश्चात मतदारसंघातील जनतेने प्रामाणिकपणे आम्हास जे पाठबळ दिले आहे त्या पाठबळाच्या जीवावर आपली देसाई गटाची यशस्वी वाटचाल सुरु आहे याचा आनंद असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
            दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे  वा जयंती सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.याप्रसंगी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलींद पाटील, ॲड.डी.पी.जाधव या प्रमुख मान्यवरांसह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, देसाई गटावर प्रेम करणारे कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई, स्व.शिवाजीराव देसाई आबासाहेब यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. 
                      याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,मरळीच्या माळरानावर सहकारी साखर कारखाना उभा करणे शक्य नव्हते, त्या काळात एक लाख टनही ऊस तालुक्यात उपलब्ध नव्हता परंतू आदरणीय लोकनेते साहेबांच्या शब्दाखातर मरळीच्या माळरानावर साखर कारखाना उभारण्याची जबाबदारी स्व.आबासाहेब यांनी लिलया पार पाडली. पाटण तालुकयात मरळीला सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली नसती तर... आज पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि या विभागाची परिस्थिती काय असती याचाही सारासार विचार करणे गरजचे आहे. लोकनेते साहेबांनी तालुक्याचे नंदनवन करण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते तालुक्यातील कोयना धरणामुळे, पाटण खोऱ्यातील घाट फोडून रस्ते करण्याच्या दुरदृष्टीच्या निर्णयामुळे पुर्ण झाले कोयना नदीकाठी उपसा जलसिंचन योजना उभारुन या माध्यमातून साखर कारखान्यांस मोठया प्रमाणात ऊस उपलब्ध होईल हा त्यांचा दृष्टीकोन होता तो सफल झाला.स्व.शिवाजीराव देसाईसाहेब पाटण तालुक्यात आले आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना उभा करण्यात त्यांनी खुप कष्ट सोसले,भागभांडवल उभा करण्यात मोठया अडचणी असतानाही तालुकाभर फिरुन त्यांनी भागभांडवल गोळा केले आणि सहकारी तत्वावर साखर कारखान्याची उभारणी केली, अल्पावधीतच कारखाना कर्जमुक्त करुन तो शेतकऱ्यांच्या मालकीचा करुन दिला.स्व. आबासाहेबांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्याचे ऋृण तालुक्यातील तुम्हा शेतकऱ्यांना कधीही न फेडता येणारे आहे. देसाई कारखान्याची उभारणी हि आबासाहेबांच्या आणि आपल्या सर्वांच्या जीवनातील आणि तालुक्याच्या इतिहासातील महत्त्वाची घटना असून या कारखान्याची उन्नती करणे हिच खऱ्या अर्थाने स्व.शिवाजीराव देसाईसाहेबांना श्रध्दांजली ठरणार असून पाटण तालुक्यात सहकार क्षेत्रात स्व.शिवाजीराव देसाईसाहेबांनी केलेले कार्य या विभागाच्या इतिहासातील सोनेरी पर्व ठरले आहे.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब स्व.आबासाहेब यांचेपासून देसाई कुटुंबांशी नाळ जुळलेल्या पाटण तालुक्यातील जनतेने देसाई कुटंबिंयाना प्रामाणिकपणे पाठबळ दिले आहे.जनतेच्या पाठबळाला आमदार म्हणून मीही कुठेही कमी पडत नाही. मरळीच्या माळरानावर लोकनेते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेला साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा करुन देण्यात स्व.आबासाहेबांचे मोलाचे योगदान आहे.लोकनेते साहेब व स्व.आबासाहेब यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही गेली ३ ते ३ वर्षे पाटण तालुक्यात काम करीत आहोत. हाच विचार आणि आदर्श घेवून आम्ही भविष्यातही कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी शेवठी बोलताना सांगितले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अशोकराव पाटील यांनी केले कार्यक्रमास कारखान्याचे सभासद,शेतकरी, हितचिंतक, कार्यकर्ते व पदाधिकारी,देसाई कारखान्याचे कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.उपस्थितांचे आभार पांडूरंग नलवडे यांनी मानले.

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे सातवे पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते पाटण मतदारसंघात गोरगरीब महिलांना संसारपयोगी साहित्यांचे वाटप.



दौलतनगर दि.१९:- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे सातवे पुण्यस्मरण दिनानिमित्ताने दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने समुहाचे प्रमुख शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१७ नोव्हेंबर,रोजी शिवसेनाप्रमुख यांना विनम्र अभिवादन करण्याआले.यावेळी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे सातवे पुण्यस्मरण दिनानिमित्ताने पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते संसारपयोगी साहित्य व भांडयाचे वाटप करण्यात आले.
दौलतनगर,ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रतिवर्षी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो.यंदाच्या वर्षी शिवसेनाप्रमुख यांचे सातव्या पुण्यस्मरण दिनाचे व यानिमित्ताने पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना संसारपयोगी साहित्य व भांडयाचे वाटपाचा कार्यक्रम दि.१७ नोव्हेंबर, रोजी आयोजीत करण्यात आला होता.या दिनानिमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने समुहाचे प्रमुख शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमत: शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात येवून त्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने या पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील महिलांना आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते संसारपयोगी साहित्य व भांडयाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास पाटण मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ते व विविध संस्थांचे पदाधिकारी हे मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना  आमदार शंभूराज देसाई म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जिव्हाळयाचे ऋृणानुबंध होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले होते हे अवघा महाराष्ट्र जाणून आहे.शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार अनेक वर्षे तळपती ठेवली.तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगचित्रातून टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती.मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून अविरतपणे चालविला आणि पार पाडला.आपल्या लेखणीतून,व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आली आणि बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र शिवसेनाप्रमुखहिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखू लागला.आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीत परंतू त्यांनी दिलेले आदर्श विचारांतून शिवसेना पक्षाची वाटचाल सुरु आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिक व आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने मी विनम्र अभिवादन करतो.असे ते शेवठी म्हणाले.