Wednesday 21 October 2020

अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी मागणी केलेली जलसंपदा विभागाकडील प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे तात्काळ सुरु करा. जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश.

 


दौलतनगर दि.21 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मागील पंचवार्षिकमध्ये जलसंपदा विभागाकडून त्यांचे  पाटण विधानसभा मतदारसंघात विविध प्रकल्पांना तसेच कामांना शासनाकडून प्रशासकीय मान्यता घेतल्या आहेत. ना.शंभूराज देसाईंनी प्रशासकीय मान्यता घेतलेली जलसंपदा विभागाकडील कामे तात्काळ सुरु करा या कामांमध्ये जलसंपदा विभागाकडून कसलीही दिरंगाई नको, मुदतीत ही सर्व कामे कशी पुर्ण होतील याकडे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करावे असे स्पष्ट आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी काल मंत्रालयीन अधिकाऱ्यांना दिले.

            राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या विनंतीवरुन राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांचेकडे मंत्रालयातील त्यांचे दालनात पाटण विधानसभा मतदारसंघातील जलसंपदा विभागा कडील विविध प्रकल्प तसेच कामांच्यासंदर्भात आढावा बैठक झाली. अर्थ व गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यासाठीचे निर्देश यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी मंत्रालयीन संबधित सर्व अधिकाऱ्यांना दिले.

           अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी या आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांचेकडे तारळी मध्यम धरण प्रकल्पातील 50 मीटर उंचीच्या वरील पाच उपसा जलसिंचन योजनांच्या कामांना गती देणे व सदरच्या योजनांची कामे मुदतीत पुर्ण करणेसंदर्भातील विषय मांडला. त्याचबरोबर मोरणा गुरेघर धरण प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून डोंगराकडेच्या जमीन क्षेत्राला पाणी देणेकरीता सादर केलेल्या योजनेच्या कामांस सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, कोयना नदीकाठच्या नेरळे व गिरेवाडी येथील नदीकाठच्या घाटाच्या कामांची निवीदा प्रसिध्द करण्यास मान्यता देणे,तसेच बनपेठ व गुंजाळी येथील नदीकाठच्या घाटाच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे त्यास निधी उपलब्ध करुन देणे व सांगवड येथील कोयना नदीकाठच्या घाटाच्या कामांस 05 कोटीच्या आत सादर केलेल्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणे आणि मंद्रुळकोळे,मंद्रुळकोळे खुर्द,जानुगडेवाडी व शितपवाडी ही चार गांवे वांग मराठवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात घेण्यात आली असून या चारही गांवाना वांग मराठवाडी प्रकल्पाचा कोणताही लाभ नसल्याने ही चार गांवे या प्रकल्पातून वगळण्यात यावीत व चार गांवाचा समावेश या गांवाच्या वरील मंहिद धरण लाभक्षेत्रात करावा तसेच कोयना धरण प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता हे पद बदलीने रिक्त झाले असून याठिकाणी नवीन कार्यकारी अभियंता यांची नेमणूक करावी असे विषय जलसंपदा मंत्री यांचेकडे मांडले.

            यावेळी ना.शंभूराज देसाई यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर जलसंपदा मंत्री व अर्थराज्यमंत्री या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. तारळी मध्यम धरण प्रकल्पातील 50 मीटर उंचीच्या वरील पाच उपसा जलसिंचन योजनांच्या कामांना गती देणेच्या व मुदतीत ही कामे पुर्ण करण्याच्या सुचना करीत मोरणा गुरेघर धरण प्रकल्पातील योजनेच्या कामांस सुधारित प्रशासकीय मान्यता देणेचा विषय राज्य मंत्रीमंडळापुढे मांडण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचनाही दिल्या. तसेच नेरळे व गिरेवाडी येथील नदीकाठच्या घाटाच्या निवीदा प्रसिध्द कराव्यात व बनपेठ,गुंजाळी आणि सांगवड नदीकाठच्या घाटांचे निधी मागणीचे प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करावेत असे निर्देश जलसंपदा मंत्री यांनी मंत्रालयीन अधिकाऱ्यांना देत ना.शंभूराज देसाईंनी प्रशासकीय मान्यता घेतलेल्या कामांना जलसंपदा विभागाकडून अजिबात दिरंगाई नको असेही यावेळी त्यांनी संबधित सर्व अधिकाऱ्यांना सांगितले.

          जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचेकडे पाटण मतदारसंघातील जलसंपदा विभागाकडील विविध विषयावर  सकारात्मक चर्चा होवून विविध प्रलंबीत विषयांवर धोरणात्मक निर्णय घेतलेबद्दल अर्थराज्य मंत्री ना.शंभूराज देसाईंनी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment