Wednesday 26 May 2021

पोलीस वसाहत इमारतीत लहान मुलांकरीता उभारावयाच्या कोवीड केअर सेंटरचा प्रस्ताव तात्काळ मंजुरीला पाठवा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना.

 

 

           दौलतनगर दि.26 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- लहान मुलांमध्ये कोवीड-19 च्या संसर्गाबाबत बेसावध राहून चालणार नाही. राज्यात तिसरी लाट येण्याची वाट न बघता आपण सावधानता म्हणून पाटणच्या नवीन बांधण्यात आलेल्या पोलीस वसाहत इमारतीत लहान मुलांकरीता स्वतंत्र्य असे कोवीड केअर सेंटर सुरु करण्याच्या तयारीला लागूया. हे कोवीड सेंटर सुरु करण्याकरीताचा प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडे मंजुरीला पाठवा मी स्वत: यासंदर्भात जिल्हाधिकारी, सातारा यांना सुचित करतो अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

               पाटणच्या पोलीस वसाहत इमारतीत लहान मुलांकरीता स्वतंत्र्य कोवीड केअर सेंटर सुरु करणे संदर्भात आज दौलतनगर ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. याप्रसंगी त्यांनी वरील प्रमाणे सुचना दिल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार योगेश टोमपे, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शिकलगार आदींची उपस्थिती  होती.

                बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वय वर्षे 14 च्या वरील सर्वांना कोरोना उपचार देणेकरीता आपण पाटण तालुक्यात अद्यावत अशी कोरोना उपचार केंद्र सुरु केली आहेत.परंतू वय वर्षे 14 च्या आतील लहान मुलांना या संसर्गापासून वाचविण्याकरीता लहान मुलांकरीता स्वतंत्र्य कोवीड केअर सेंटर तालुक्यात सुरु करणे गरजेचे आहे. त्याकरीता पाटणच्या नवीन बांधण्यात आलेल्या पोलीस वसाहत इमारतीत हे सेंटर सुरु करण्याच्या तयारीला अधिकाऱ्यांनी लागावे.सदरचे सेंटर सुरु करण्याकरीता आवश्यक असणारी सर्व पुर्वतयारी करुन यासंदर्भात काय काय उभारणे आवश्यक आहे त्याचा सविस्तर प्रस्ताव हा जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडे मान्यतेकरीता व निधी उपलब्धतेकरीता सादर करावा.सेंटरमध्ये संभाव्य बालकांवर उपचार करावयाचे म्हंटल्यास पोलीस वसाहतीच्या इमारतीत 14 रुम कार्यान्वीत आहेत त्याठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे, पाण्याची व्यवस्था आहे मात्र कमी प्रमाणात पाणी येते त्यामुळे याठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होणेकरीता आवश्यक असणाऱ्या उपाययोजना कराव्यात त्याठिकाणी लहान मुलगा व त्याची आई यांची राहण्याची सोय करणे आवश्यक आहे.तसेच या सेंटरकरीता बालरोगतज्ञ यांची नेमणूक करणे, बेड उपलब्ध करुन देणे, औषधोउपचाराकरीता औषधे उपलब्ध करुन देणे तसेच याठिकाणी किती ऑक्सीजन व किती नॉन ऑक्सीजन बेड उपलब्ध करावे लागतील या सर्व बांबीचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा व तो मान्यतेकरीता व निधी उपलब्धतेकरीता सादर करावा प्रस्ताव सादर होताच मी स्वत: जिल्हाधिकारी, सातारा यांना यासंदर्भात सुचित करतो.

                आपले तालुक्यात कोरोनाची तिसरी लाट आलीच तर आणि बालकांच्या संसर्गाबाबत परिस्थिती निर्माण झाल्यास अचानक आपणांला धावपळ करावी लागू नये या परिस्थितीला तोंड देण्याच्या अनुषंगाने लहान मुलांवरील उपचारांबाबत जागरुक राहून हे सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीस पोलीस वसाहतीची इमारत  व इमारतीचा सर्व परिसर हा फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात यावे असेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना सांगितले.


No comments:

Post a Comment