मुंबई, दि. ९ :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयातून किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी प्रथम टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भातील निवेदन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत सादर केले.
मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील महाबळेश्वर दौऱ्यादरम्यान विविध शिवप्रेमी संघटनांनी वीर जीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पर्यटन विभागामार्फत प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्री श्री. देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे शौर्य, स्वाभिमान आणि त्यागाचे प्रतीक आहे. प्रतापगडाच्या ऐतिहासिक लढाईत वीर जीवाजी महाले यांनी समयसूचकता, धाडस आणि पराक्रमाचे दर्शन घडवत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. "होता जीवा म्हणून वाचला शिवा" ही इतिहासात अजरामर झालेली उक्ती त्यांच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देणारी आहे.
किल्ले प्रतापगडावर दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी तसेच देश-विदेशातील पर्यटक प्रतापगडाला भेट देतात. त्यामुळे प्रतापगडाचे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व सातत्याने वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वीर जीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था, इतिहास संशोधक, शिवप्रेमी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून होत होती. शासनाने या मागणीची दखल घेत पर्यटन विभागाच्या जागेवर भव्य व आकर्षक स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकल्पासाठी प्रथम टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.
हे स्मारक उभारल्यानंतर प्रतापगडाच्या शिवकालीन वारसा पर्यटनाला नवी चालना मिळेल. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर प्रतापगडाची ओळख अधिक बळकट होऊन देश-विदेशातील पर्यटकांसाठी ते आणखी एक महत्त्वाचे आकर्षण ठरेल, असा विश्वासही मंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

No comments:
Post a Comment