मुंबई, दि. ७ : सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चॅरिटेबल रुग्णालयांतील गैरप्रकारांबाबत दिलेल्या उत्तरावर विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पालकमंत्री तथा प्रभारी मंत्री शंभूराज देसाई सभागृहात त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावले.
राज्यमंत्री मिसाळ यांनी योग्य आणि वस्तुनिष्ठ उत्तर दिल्याचे स्पष्ट करत देसाई यांनी केवळ त्यांचा ठाम बचावच केला नाही, तर विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक पूरक प्रश्नाला सविस्तर, समर्पक आणि समाधानकारक उत्तरे देत शासनाची भूमिका स्पष्ट केली.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी संबंधित रुग्णालयांवरील कारवाईची माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची ग्वाही दिल्यानंतर विरोधकांनी अधिक कठोर भूमिका घेतली. त्यावेळी शंभूराज देसाई यांनी हस्तक्षेप करत, राज्यातील सर्व चॅरिटेबल रुग्णालयांमध्ये डॅशबोर्ड सक्तीने लावण्याचे आदेश आजच महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे जाहीर केले. तसेच जिल्हास्तरीय समित्यांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवून त्रुटी आढळणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी न्यायालयीन प्रकरणांमध्ये वरिष्ठ वकिलांच्या नियुक्तीची मागणी केली असता, गरज भासल्यास विशेष शासकीय वकील नेमण्याचा विचार केला जाईल, अशी सकारात्मक भूमिका देसाई यांनी मांडली. आमदार राजीव पोतदार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व पात्र रुग्णालयांमध्ये सक्तीने राबविण्यात येतील, तसेच जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठका तातडीने घेण्याच्या सूचना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या एकत्रित डॅशबोर्डच्या सूचनेचे स्वागत करत महानगरपालिका आणि जिल्हास्तरावर स्वतंत्र केंद्रीकृत डॅशबोर्ड विकसित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. चित्रा वाघ यांच्या प्रश्नावर त्यांनी विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर विद्यमान कायद्यानुसार कठोर कारवाईचा इशाराही दिला.
आमदार बच्चू कडू यांनी कायद्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केल्यानंतर नगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची संयुक्त बैठक घेऊन अधिक कडक नियमावली तयार करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. निरंजन डावखरे यांच्या प्रश्नावर जिल्हास्तरीय समित्यांचे गठन तातडीने पूर्ण करण्यासाठी सर्व पालकमंत्र्यांना पत्र पाठविले जाईल, असे सांगितले.
आमदार भाई जगताप यांच्या सूचनेनुसार एका महिन्याच्या आत सर्व रुग्णालयांमध्ये डॅशबोर्ड लावण्याची मुदत देण्यात येईल, अन्यथा कठोर कारवाई होईल, असे स्पष्ट करत देसाई यांनी शासनाची भूमिका ठामपणे मांडली. प्रमोद जठार यांनी उपस्थित केलेल्या ग्लोबल हॉस्पिटलच्या प्रश्नावर वर्मा मेडिकल रिसर्च ट्रस्टच्या नावानेच धर्मादाय मदत स्वीकारण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. तर डॉ. मनिषा कायंदे यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून अचानक पाहणी आणि विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देशही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभागृहातील संपूर्ण चर्चेदरम्यान शंभूराज देसाई यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उत्तराचे समर्थन करत विरोधकांच्या प्रत्येक शंकेचे निरसन केले. विविध सदस्यांच्या सूचनांचा स्वीकार करून कालबद्ध उपाययोजना, कठोर अंमलबजावणी आणि आवश्यक कायदेशीर बदलांची घोषणा केल्याने त्यांच्या उत्तरांना सभागृहात विशेष महत्त्व प्राप्त झाले.

No comments:
Post a Comment