मुंबई, दि. ७ : मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवरील दुर्घटनेप्रकरणी सरकारकडून तज्ज्ञांकडून सखोल चौकशी करण्यात येणार असून, चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुर्घटनेमागील कारणांसह संपूर्ण वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडण्यात येईल. तसेच या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली.
यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना श्री. देसाई म्हणाले की, या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री यांनी विधानसभेत प्राथमिक निवेदन केले आहे. दुर्घटनेनंतर बाधित मार्गावरील वाहतूक शक्य तितक्या लवकर पूर्ववत करणे हे सरकारचे पहिले प्राधान्य होते. त्यानुसार सर्व संबंधित यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवण्यात आल्या. कालपासून मार्गाचा एक भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, आज सकाळपासून मुंबईकडे जाणाऱ्या कनेक्टिंग लिंकवरील संपूर्ण वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
कनेक्टिंग लिंक हा अत्याधुनिक आणि महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प असून त्याचे देश-विदेशात कौतुक झाले आहे, असे नमूद करून श्री. देसाई म्हणाले की, दुर्घटना घडलेल्या परिसरात अल्पावधीतच नेहमीपेक्षा चौपट ते पाचपट अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
त्यामुळे नैसर्गिक परिस्थितीचाही सर्वंकष विचार करणे आवश्यक आहे. तथापि, केवळ त्यावर अवलंबून न राहता तज्ज्ञांकडून सखोल चौकशी करून दुर्घटनेची नेमकी कारणे शोधण्यात येतील.
चौकशी अहवालातील निष्कर्षांच्या आधारे दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या बाबींचा सविस्तर आढावा सभागृहासमोर मांडला जाईल.
तसेच जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. या प्रकरणात पारदर्शकता राखून वस्तुस्थिती सभागृहापुढे मांडण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment