Thursday, 7 March 2019

पाटणकरदादा, तुमची मापे काढायला वेळ आहे कुणाला? विकासाचा अनुशेष तुम्ही एवढा शिल्लक ठेवलाय तोच पुर्ण करतोय. आ.शंभूराज देसाईंचे पाटणकरांना प्रतिउत्तर.




दौलतनगर दि.०७:-वनकुसवडे पठारावरील पवनचक्कीकडे जाणारा एकमेव रस्ता सोडला तर तालुक्यातील इतर डोंगरपठारावरील रस्ते पाटणकरदादा तुम्हाला दिसले नाहीत का? भविष्यात ज्याठिकाणी पवनचक्की प्रकल्प येणार आहेत त्याठिकाणी रस्ता करुन मी रस्त्याचे जाळे विणले असे सांगत सुटणारे पाटणकरदादा,ज्या वनकुसवडे आणि घाणबीच्या गुळगुळीत रस्त्यावरुन तुम्ही गेलात तो रस्ता या शंभूराज देसाईंनी गुळगुळीत करायला कोटयावधीचा निधी दिला आहे. रस्त्याचे जाळे कुणी विणले आणि कुणाच्या काळात रस्ते करायचे राहून गेले व तालुक्याच्या पठारावरील रस्ते कुणाच्या माध्यमातून झाले व होत आहेत हे तालुक्यातील जनतेला चांगलेच माहिती पडले आहे.तुमच्या विकासकामांची मापे काढायला तुम्ही विकास केला तर पाहिजे ना दादा.तो झाला नाही म्हणूनच तुमची मापे निघत आहेत.गेली अनेक वर्षे तालुक्याला विकासापासून झुलवत ठेवणाऱ्यांची मापे काढायला येथे वेळ आहे कुणाला? विकासाचा अनुशेष तुम्ही एवढा शिल्लक ठेवला आहे तोच पुर्ण करण्याचे काम मी करीत आहे. असे प्रतिउत्तर आ.शंभूराज देसाईंनी पाटणकरांना दिले आहे.
                     येराड ता.पाटण येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत कराड चिपळूण रस्ता ते येराड ते रोमणवाडी या रस्त्याचा भूमिपुजन समारंभ आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते आयोजीत करण्यात आला होता.याप्रसंगी ते बोलत होते. या योजनेकरीता त्यांनी २ कोटी ३३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परीषद सदस्या सौ.सुग्रा खोंदू,माजी सदस्य बशीर खोंदु,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,कारखाना संचालक राजेंद्र गुरव,निवृत्ती कदम,नवनाथ सुर्यवंशी,सदानंद साळुंखे,प्रकाश साळुंखे,आबासो साळुंखे, निलेश साळुंखे,दिलीप सकपाळ,दिलीप कांबळे,किसन माने,लक्ष्मण जाधव,महिपती जाधव,सौ.सुनिता गुरव,बळीराम साळुंखे,रामचंद्र साळुंखे,यशवंत जाधव,दत्तात्रय साळुंखे,नानासो पवार या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह येराड,बनपेठवाडी, रोमणवाडी,रामाचावाडा येथील कार्यकर्ते, युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                  याप्रसंगी बोलताना आ.शंभूराज देसाई म्हणाले,माजी आ.पाटणकर हे पाटण तालुक्याचे २१ वर्षे आमदार आणि ५ वर्षे मंत्री राहिलेले आहेत. इतक्या वर्षे आमदार राहिलेल्या माजी आमदारांना जिल्हा नियोजन समितीला लघू समिती असते आणि या लघू समितीवर जिल्हयाच्या पालकमंत्र्यांनंतर एकमेव आमदार निवडला जातो आणि तो मी आहे हे माहिती नसावे यापेक्षा दुसरे कोणते दुर्दैव? जिल्हा नियोजन समितीच्या आराखडयामध्ये मंजुर होणारी सर्व कामे ही लघू समिती ठरवते आणि मगच जिल्हा वार्षिक आराखडयास मंजुरी मिळते.काठी येथील आडवा पाठ बांधणे हे काम कशाप्रकारे आराखडयात बसवून ते मंजुर करुन आणले आहे हे येथील ग्रामस्थ व महिलांनाही तुम्हाला सांगितले असेलच. काम कुणी दिले तालुक्याच्या आमदारांनी का तुमच्या जिल्हा परीषदेच्या सदस्यांनी हे आम्हालाही आणि तुम्हालाही चांगलेच माहिती आहे.निवडणूका जवळ आल्या की कोण डोंगरपठारावर येतात आणि पाच वर्षे या डोंगरपठारावरील जनतेच्या सुखदु:खात कोण सहभागी होतात हे माझेपेक्षा येथील जनताच तुम्हाला सांगेल.ही निवडणूक ते ती निवडणूक जनतेच्या दारात जाणाऱ्यांनी पठारावर माणसे राहतात का ?  याचा शोध मला घ्यावा लागला का? किंवा मी कधी आणि कुठे जायचे हे त्यांनी मला शिकवू नये.पठारावरच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमंतीने पवनचक्की कंपन्यांना विकुन या शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्यांनी पठारावरील जनतेचा विकास केल्याच्या गप्पा हाणणाऱ्यांना हे शोभत नाही.काठी,मरड,वनकुसवडे रस्त्यांची काय अवस्था आहे हे प्रत्यक्षात जावून पाहिले आहे. तुम्ही हे रस्ते केले असते तर मला जावून त्या रस्त्यांना कोटयावधी रुपयांचा निधी देण्याची वेळ आली नसती.तुमचे रस्ते पाटणकरदादा,या विभागात शोधावे लागत आहेत.घाणबीचा रस्ता केलात कारण त्या पठारावर पवनचक्क्या येणार होत्या.पाटणकरदादा,घाणबीसारखे तालुक्यात असे अनेक रस्ते डोंगरपठारावर आहेत.यामध्ये वरची केळेवाडी, जन्नेवाडी,बोर्गेवाडी,जंगलवाडी,गणेवाडी,गाढखोप,बाहे,हुंबरणे,पाळशी,नाटोशी जाधववाडी,भालेकरवाडी,महिंद ते वर्पेवाडी, मोडकवाडी,सातर,गुढे शिबेवाडी,करपेवाडी,टेटमेवाडी,डाकेवाडी,लोहारवाडी,माटेकरवाडी,वरेकरवाडी हे रस्ते तुम्हाला दिसले नाहीत का ? मी तुम्हाला हे तालुक्यातील रस्ते तुम्ही का करु शकला नाहीत असा सवाल देखील केला होता. परंतू यावर तुमची बोलतीच बंद.नको ते विषय वाडयात बसून पत्रकातून मांडायचे आणि जनतेची दिशाभूल करायची या सवयी पाटणकरदादा आता तरी सोडा.तुम्हाला मंत्री आणि आमदार म्हणून जेवढा विकास जमला नाही तेवढा विकास केवळ गेल्या साडेचार वर्षात माझे माध्यमातून सुरु असून संपुर्ण तालुक्याचा आणि मतदारसंघाचा सुरु असलेला विकास पाहून तुम्हाला चांगलाच पोटसुळ उठला आहे हे आम्हालाही कळते आहे.त्यामुळेच निष्क्रीय माजी आमदारांची मापे मी नाही आता जनताच काढू लागली असून येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत याच मापांचे प्रतिउत्तर मतदारसंघातील जनता तुम्हाला मतांच्या रुपाने नक्कीच देईल असा विश्वासही आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप सकपाळ यांनी केले व उपस्थितांचे आभार सचिन साळुंखे यांनी मानले.
चौकट:- पाटणकरदादा, तुमच्या सवयी आमच्याकडे आणू नका.
          गांवागावांत भांडणे लावण्यासाठी दारु, मटण वाटपासाठी पथके नेमण्याच्या सवयी पाटणकरदादा, तुमच्या आहेत हे अवघा तालुका ओळखून आहे. निवडणूकीच्या अगोदर १५ दिवस गांवागावांत मटण आणि दारु देवून जनतेला निवडणूकीत मते देण्यास भाग पाडायचे आणि निवडणूकीनंतर पाच वर्षे मतदारांच्या सुखदु:खात सहभागीही व्हायचे नाही.या सवयी तुमच्या आहेत.तुमच्या या सवयी पाटणकर दादा आमच्यावर ढकलून असल्या वाईट सवयी आमच्याकडे आणू नका असेही आ.शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.

Monday, 4 March 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा दि.10 मार्च रोजी 109 वा जयंती सोहळा कार्यक्रम


     


दौलतनगर दि.०४:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा १०9 वा जयंती सोहळा कार्यक्रम रविवार दि.१० मार्च, २०१9 रोजी सकाळी १०.०० वा.दौलतनगर (मरळी), ता.पाटण या ठिकाणी संपन्न होणार असून हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने  नव्याने उभारलेल्या “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी आयोजीत करण्यात आला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई  यांचे जयंती कार्यक्रमापासून “महाराष्ट्र दौलत” शताब्दी स्मारक हे कार्यक्रमांना खुले करण्यात येणार असून दि.10 मार्च जयंती सोहळयाच्या कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जीवन चरीत्रावर शिवाजी विद्यापीठामध्ये  “एम फिल” केलेले सातारा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रा. आत्माराम थोरात हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमास पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटू आमदार शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                      प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी पाटण तालुक्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी रविवार दि.१० मार्च, २०१9 रोजी आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा १०९ वा जयंती सोहळा कार्यक्रम दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्र शासनाने  नव्याने उभारलेल्या “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी आयोजीत करण्यात आला असून हा कार्यक्रम अतिशय दिमाखदार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जीवन चरीत्रावर “एम फिल” केलेले सातारा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रा. आत्माराम थोरात हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या जीवन कार्याची माहिती देणार आहेत. या कार्यक्रमास पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटू आमदार शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून  या जयंती सोहळ्याचे कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई प्रेमी तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे सभासद,हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती रहावे, असे आवाहनही शेवटी पत्रकात करण्यात आले आहे.

Sunday, 3 March 2019

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ती १४ गांवे वगळण्याचा आदेश तात्काळ काढावा. आ.शंभूराज देसाईंचे मागणीवरुन वनमंत्र्यांचे प्रधान सचिवांना लेखी आदेश.




दौलतनगर दि.०३:- पाटण विधानसभा मतदारसंघातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी १४ गांवे बफर झोनमध्ये घेणेची शासनाकडे प्रलंबीत असणारी कार्यवाहीची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांची अधिवेशनात प्रत्यक्ष भेट घेवून केलेनंतर वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ती १४ गांवे वगळण्याचा आदेश तात्काळ काढावा असे लेखी आदेश वनविभागांचे प्रधान सचिव यांना दिले आहेत येत्या काही दिवसात ही १४ गांवे वगळणेबाबतचा आदेश पारित करण्याची कार्यवाही होईल असा विश्वास आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.
                   नुकत्याच झालेल्या मुंबई येथील विधानसभेच्या अधिवेशनात आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे वन मंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांची भेट घेवून पाटण विधानसभा मतदारसंघातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी १४ गांवे बफर झोनमध्ये घेणेची कार्यवाहीची अंमलबजावणी शासनस्तरावर प्रलंबीत आहे. लवकरात लवकर ही अंमलबजावणी पुर्ण करावी व व्याघ्र प्रकल्पातील १४ गांवे कोअर झोनमधून बफर झोनमध्ये घेणेचे आदेश काढावेत अशी आग्रही मागणी केली यावर वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी वरीलप्रमाणे वनविभागाचे प्रधान सचिव यांना आदेश दिले.
                   वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या लेखी पत्रामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात दि.०५ जानेवारी, २०१० अन्वये कोयना वन्यजीव अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा राखीव प्रदेश घोषित व अधिसुचित केला आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये दि.२१ ऑगस्ट,२०१२ रोजी अधिसुचित केलेल्या राजपत्रामध्ये परिशिष्ट १ (ब) मध्ये समाविष्ट केलेल्या १४ गांवाना प्रकल्पातील कोअर क्षेत्राप्रमाणे लागु केलेल्या अटी शर्ती या अन्यायकारक असून या अटीशर्तीमुळे पाटण मतदारसंघातील १४ गांवातील प्रकल्पग्रस्तांवर कोअर झोनप्रमाणे अनेक बंधने आली आहेत.त्यामुळे या गांवातील प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून सदरची १४ गांवे कोअर झोनमधून वगळून ती बफर झोनमध्ये घेणेकरीता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सल्लागार समितीनेही राज्य शासनाच्या वनविभागाकडे शिफारस केली आहे. शासनाच्या वनविभागानेही ही १४ गांवे कोअर झोनमधून वगळणेबाबत तत्वत: मान्यता देखील दिली आहे. याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी केली असून या भेटी दरम्यान वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना आपण कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाकरीता आला असताना ही १४ गांवे वगळण्याचा आदेश येत्या ६० दिवसात काढण्यात येईल असे आश्वासन देखील दिले असल्याची आठवण करुन दिली. यावर पाटण विधानसभा मतदारसंघातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी ती १४ गांवे बफर झोनमध्ये घेणेचे आदेश तात्काळ काढावेत असे लेखी आदेशच माझे पत्रावर वनविभागांचे प्रधान सचिव यांना दिले असून त्यांना यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचेही वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही १४ गांवे वगळणेबाबतचा आदेश पारित करण्याची कार्यवाही शासनामार्फत करण्यात येईल असा विश्वासही आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.

Saturday, 2 March 2019

केवळ मतासाठी दारात येणाऱ्यां विरोधकांना जाब विचारा. आमदार शंभूराज देसाईंचे जनतेला आवाहन.




दौलतनगर दि.०३:- ही निवडणूक ते ती निवडणूक केवळ मते मागायला जनतेच्या दारात येणाऱ्या विरोधकांना तुम्ही गत चार वर्षात आमचेसाठी नेमके काय केले म्हणून आम्ही तुम्हाला मते दयायची असा जाब विचारावा व विकासकामांच्या माध्यमातून गाव समृध्द करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी मतदारसंघातील जनतेने ठाम उभे रहावे असे आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी केले आहे.
                     काठी ता.पाटण येथे आमदार शंभूराज देसाईंनी जिल्हा नियोजन समितीतंर्गत मंजुर केलेल्या आवसरी ते काठीटेक ग्रामा ५५ या रस्त्याच्या व लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परीषदेतंर्गत काठी येथील आडवे पाटाचे बांधकाम करणे या संयुक्त कामांचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते आयोजीत करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती,सौ.मुक्ताबाई माळी,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,माजी पंचायत समिती सदस्य  सुरेश जाधव,बबनराव माळी,राम पवार,रामभाऊ बावधने,ग्रा.पं.सदस्या स्वाती शिर्के,अश्विनी पवार,सुरेश शेळके,लक्ष्मण पवार,प्रदिप पवार,योगेश शिर्के,जगन्नाथ शिर्के,कोंडिबा शिर्के,प्रकाश शिर्के,विश्वनाथ पवार,सुनिल पवार,राम झोरे,विठ्ठल येडगे,दिलीप सपकाळ,लक्ष्मण सपकाळ,तसेच शंभूराज डोंगरी संघटनेतील युवा पदाधिकारी,कार्यकर्ते व मुंबई मित्र मंडळातील युवक व गावांतील महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                  याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, काठी या गांवाकरीता या विभागातून वाहून जाणारे पाणी हे आडव्या पाठाच्या माध्यमातून आडवून दयावे अशी येथील नागरिकांची बरेच दिवसाची मागणी होती. तसेच आवसरी ते काठीटेक हा रस्ताही करुन दयावा याकरीता आग्रह होता आज या दोन्ही कामांची भूमिपुजने झाली त्यामुळे या दोन्ही कामांना लवकरच सुरुवात होईल व या दोन्ही गांवाचा निकडीचा प्रश्न सुटेल याचा आनंद वाटतो. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने आपल्याला कोणत्या गांवात किती मते पडली याचा विचार न करता जे जनतेच्या निकडीचे आहे ते ते विकासकाम देण्याची गरज आहे.मी माझ्या आमदारकीच्या काळात मला गावात, वाडीवस्तीवर किती मतदान पडले याचा विचार न करता गत साडेचार वर्षात आणि मागील आमदारकीच्या काळात विविध विकासकामे देण्याचा प्रयत्न केला.विशेषत: हा भाग माजी आमदार पाटणकरांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.आतापर्यंत आपण सर्वांनी त्यांना पोत्याने भरभरुन या विभागातून मतदान देत राहिला परंतू निवडून गेलेल्या माजी आमदारांनी तुम्हा जनतेच्या मुलभूत सुविधा असणारी कामे करण्याकरीता पोत्याने भरुन निधी मंजुर करुन दिला का? तो निधी दिला असता तर या विभागातील एकही विकासाचे काम शिल्लक राहिले नसते त्यांना पवनचक्की कडे जाणारे रस्ते दिसले परंतू याच पवनचक्कीच्या रस्त्याला लागून असणाऱ्या अवसरी किंवा काठी गांवाना जोडणारे रस्ते दिसले नाहीत.स्वत:च्या बालेकिल्लयातील गांवे आणि वाडयावस्त्यांमध्ये जर माजी आमदारांना विकासाची कामे करता आली नसतील तर त्यांनी मतदारसंघातील इतर विभागांचा काय विकास केला असेल हे तुमच्या लक्षात येईलच केवळ ही निवडणूक ते ती निवडणूक मते मागायला जनतेच्या दारात जायचे आणि मते मागून गेल्यानंतर मते दिलेल्या जनतेला काय हवे, काय नको याकडे ढुंकुनही पहायचे नाही. मग अशा नेतृत्वाच्या मागे आपले उभे आयुष्य घालविण्यात काय अर्थ आहे याचा विचार या विभागातील जनता कधी करणार आहे का नाही? का कामे करायला आमदार आणि मते घ्यायला माजी आमदार अशी परिस्थिती होवू नये. मागेल त्याचे काम करण्याचे ध्येय आपण बाळगल्यामुळेच गत साडेचार वर्षात पाटण मतदारसंघात कोटयावधी रुपयांचा विकासनिधी आपण मंजुर करुन आणू शकलो.तालुक्याचे माजी आमदार केवळ पोकळ गप्पा मारण्यात पटाईत आहेत.विकासाच्या गप्पा तर इतक्या मारल्या जातात मग मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे काठी असो अवसरी असो या गांवानी तुम्हाला निवडणूकीच्या काळात डोक्यावर घेतले होते तरीही त्यांच्या रस्त्यांची,पिण्याच्या पाण्याच्या योजनांची तसेच शेतीचे पाणी अडविण्याकरीता आडव्या पाटांची कामे तुम्हाला इतक्या वर्षाच्या आमदारीच्या काळात का मंजुर करुन देता आली नाहीत असा सवाल त्यांनी शेवठी उपस्थित केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ शिर्के, स्वागत दिनेश पवार यांनी केले व उपस्थितांचे आभार  प्रदिप पवार यांनी मानले.
चौकट:- काम मंजुर करणारा, काम करुन घेणारा व काम करणारा तुमच्यासमोर आहे.
            कोणत्याही गांवात भूमिपुजनाच्या कार्यक्रमाला जाताना माझेसोबत काम करुन घेणारा अधिकारी, काम करणारा ठेकेदार असतो. मी केवळ कामाचा दिखावा करीत नाही तुमच्या गांवाचे काम मंजुर केलेय म्हणून त्याचे भूमिपुजन करायला मी आलोय असे सांगतो. काम मंजुर करणारा पण, काम करुन घेणारा पण आणि प्रत्यक्षात काम करणारा पण तुमच्यासमोर आहेत.माजी आमदारांना असे कधी जमले का? असा टोलाही त्यांनी भाषणात लगाविला.


नुसती मापे काढत बसण्यापेक्षा झालेल्या कामांकडे बघा. आ. शंभूराज देसाईंचा विरोधकांना टोला.




दौलतनगर दि.०४:- मी आमदार म्हणून विकासकामांकरीता जो निधी आणलाय तो जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे तुम्ही काय केले असेल तर जनतेला जरुर सांगा. पण तुम्ही काही केलेच नाही अशी जनताच सांगतेय म्हणूनच विकासाची एवढी कामे मला करावी लागत आहेत. केवळ वाडयात बसायचे आणि पत्रके काढायची हा उद्योग करणाऱ्या माजी आमदारांनी आणि त्यांच्या सुपुत्रांनी नुसती करतोय त्याची मापे काढण्यापेक्षा तुम्हाला जे जमले नाही ते मी करुन दाखविले आहे गेल्या साडेचार वर्षात पाटण मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला आणि झालेला विकास व कामे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याकडून किती विकासाची कामे करणे शिल्लक राहिले होते असा टोला आ.शंभूराज देसाईंनी लगाविला आहे.
                     मत्रेवाडी ता.पाटण येथे आमदार शंभूराज देसाईंनी आमदार फंडातून मंजुर केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे उद्घाटन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते आयोजीत करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते. या योजनेकरीता त्यांनी १० लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,पंचायत समितीचे माजी उपसभापती डी.आर.पाटील, पंचायत समिती गटनेने पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सिमा मोरे,कारखान्याचे संचालक विकास गिरीगोसावी,वसंत कदम,बबनराव भिसे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण,नारायण कारंडे,मनोज मोहिते,अंकुश महाडिक,नानासो साबळे,कसणी सरपंच सौ.मिनल मस्कर,पवारवाडी सरपंच सौ.सविता देसाई,मेंढ उपसरपंच विलास जाधव,दिलीप शेलार,बाबुराव साबळे,मत्रेवाडी सरपंच दत्तात्रय मत्रे,उपसरपंच सखाराम मत्रे,भगवान मत्रे या प्रमुख पदाधिकाऱ्यां सह मत्रेवाडी गांवातील कार्यकर्ते व मुंबई मित्र मंडळातील युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                  याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, माजी आमदारपुत्रांनी मी मंजुर करुन आणलेली कामे कागदावरची आहेत असा या विभागातील एका कार्यक्रमात आरोप केला होता. मी मंजुर करुन आणलेली कामे ही कागदावर आहेत का प्रत्यक्षात आहेत हे त्यांना मतदारसंघातील जनतेनेच दाखवून दिले आहे. तरीही त्यांची खात्री पटत नसेल तर त्यांनी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात माझे माध्यमातून झालेल्या, सुरु असलेल्या  कामांची पहाणी करावी म्हणजे त्यांच्या लक्षात येईल हे आपल्याला जमले नाही ते मतदारसंघाच्या आमदारांनी करुन दाखविले आहे. मत्रेवाडी सारखे गाव इतक्या वर्षे पिण्याच्या पाण्यापासून वंचीत होते मग तालुक्याचे माजी आमदार काय करीत होते त्यांना ही योजना इतक्या वर्षात का दिसली नाही. मत्रेवाडीसारखीच या गावाच्या खालच्या जाधववाडी मेंढ या गावाची आहे. या विभागातील कार्यक्रम उरकून जाताना जाधववाडी मेंढ येथील ग्रामस्थ गढूळ पाण्याची बाटली घेवून रस्त्यावर उभे होते. त्या बाटलीतील पाणी आपण जनावरांना सुध्दा देवू शकत नाही असले पाणी त्या ग्रामस्थांनी मला दाखविले.वांग मराठवाडीचे धरण उशाला आणि गढूळ पाणी पिण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर येत होती त्याच वर्षीच्या टंचाई आराखडयामध्ये या गांवाचा समावेश करुन या गांवाला पिण्याच्या पाण्याची योजना आपले गांवाप्रमाणे मंजुर करुन दिली.आज त्या गांवातील पिण्याचे पाणी सोडण्याचा कार्यक्रम करुनच या गांवातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे उद्घघाटन करायला मी इथे आलो आहे. या विभागात रस्त्याचे काम असो, पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम असो,किंवा सार्वजनीक जनहितार्थ कोणतेही काम असो ते पुर्ण करुन देण्याचे काम मी मतदारसंघाचा आमदार म्हणून गेल्या साडेचार वर्षात केले. पाटणकरांना या तालुक्याने सलग २१ वर्षे या तालुक्याचा आमदार होण्याची संधी दिली होती तेव्हा त्यांना आमदार म्हणून या विभागातील गांवाचा का अविकसीतपणा दिसला नाही याचे आश्चर्य वाटते. मग त्यांनी आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून गेल्या २६ वर्षात नेमके काय केले असा प्रश्न माझेसारखे कार्यकर्त्याला पडणे सहाजिक आहे असे सांगून ते म्हणाले, पाण्याचे महत्व महिलांना जास्त कळते म्हणूनच या योजनेच्या उदघाटन समारंभाला उपस्थित असणाऱ्या महिला पाहिल्या नंतर आपल्या हातून आज चांगले काम झाले.याचा आनंद वाटतो.एखादा रस्ता केला,सभामंडप उभारला यापेक्षा लोकांना व महिलांना पिण्याचे पाणी मिळवून दिले याचा आनंद खुप मोठा वाटतो. या गांवाने पिण्याच्या पाण्याच्या योजनेत वितरण व्यवस्था पुर्ण करुन दयावी तसेच गावपोहोच रस्ता करुन दयावा अशी मागणी  केली आहे येणाऱ्या आर्थिक वर्षात या गावच्या पिण्याच्या पाण्याचे वितरण व्यवस्थेचे काम पुर्ण करुन दिले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण,पंजाबराव देसाई यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सखाराम मत्रे यांनी केले व उपस्थितांचे आभार  भगवान मत्रे यांनी मानले.

उरुल लघू पाटबंधाऱ्यांच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात. आमदार शंभूराज देसाईच्या हस्ते झाला शुभारंभ. २८ कोटी ३२ लाखाची सुधारित प्रशासकीय मान्यता, भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा.





दौलतनगर दि.०३:- उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या हद्दीत असलेल्या उरुल लघू पाटबंधारे तलावाचे काम भूसंपादन केलेल्या खातेदारांना त्यांच्या भूसंपादनाची रक्कम मंजुर न झाल्याने बऱ्याच वर्षापासून रखडले होते पाटणचे आमदार शंभूराज देसाईंच्या पाठपुराव्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा विषय मार्गी लागला असून या तलावाच्या कामांस प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. आमदार शंभूराज देसाई यांच्याच हस्ते श्रीफळ वाढवून या कामांचा शुभारंभ करण्यात आला. आमदार शंभूराज देसाईंच्या मुळे या तलावाच्या कामांस २८ कोटी ३२ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून यामध्ये शेतकऱ्यांच्या भूसंपदनाकरीता ६ कोटी १३ लाख ९९ हजार रुपयांची रक्कम मंजुर करण्यात आली आहे. भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकखाती जमा करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.
                  राज्याचे जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे आपली राजकीय ताकद वापरुन गतवर्षी पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी बैठक घेतल्याने उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या गांवातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा अनेक वर्षापासून प्रलंबीत राहिलेला विषय मार्गी लागला आहे येथील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या रक्कमा बँक खाती जमा झालेनंतर शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आमदार शंभूराज देसाई यांच्याच हस्ते या तलावाच्या कामांस सुरुवात व्हावी असा आग्रह शेतकऱ्यांनी धरलेनंतर आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते उरुल ता.पाटण या तलावाच्या ठिकाणीच शुभारंभाचा समारंभ आयोजीत केला होता.
                      या समारंभाप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, उरुल लघु  पाटबंधारे तलावाचे कामांस सन २००७ मध्ये ५ कोटी ९० लाख ०९ हजार इतक्या किमंतीस प्रशासकीय मान्यता मिळाली होती. भुसंपादनाची रक्कम प्रकल्पग्रस्ताना मिळाली नसल्याने या तलावाच्या बांधकामाचे काम पुर्णत: रखडले होते.राज्याचे जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे गतवर्षी या विषयासंदर्भात बैठक घेतल्याने शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा व प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा विषय मार्गी लागला. एक चांगला प्रकल्प आपल्या या विभागात होत आहे याचा आनंद वाटत आहे. या तलावाच्या कामांस शासनाने २८ कोटी ३२ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाकरीता भूसंपादनाकरीता ६ कोटी १३ लाख ९९ हजार रुपयांची रक्कम मंजुर करण्यात आली आहे. उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या गांवातील भुसंपादन प्रस्तावातील अंतिम निवाड्याची रक्कम अनुक्रमे २ कोटी ९२ लाख १० हजार ६६२ रुपये, ९४ लाख ७५ हजार ६7६ रुपये व 90 लाख ९८ हजार 678 रुपये असे एकूण ४ कोटी 77 लाख ८५ हजार 0१6 रुपये इतकी होत आहे.यातील बहूतांशी भूसंपादनाच्या रक्कमा या शेतकऱ्यांच्या बँकखाती जमा करण्याचे काम भूसंपादन अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेमार्फत प्रगतीपथावर सुरु आहे.या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उरुल लघू पाटबंधारे तलावाची उंची २०.६० मीटर असून लांबी ६६० मीटर आहे. या तलावामध्ये १९०० स.घ.मी. इतका पाणीसाठा अपेक्षित असून या तलावामुळे सुमारे २४३ हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सुधारित अंदाजपत्रकापनुसार धरणाचे काम करणेकरीता एकूण १५ कोटी ०५ लाख रुपयांचा निधी मंजुर असून यातील ५ कोटी १४ लाख रुपयांचे काम सद्यस्थितीत झाले आहे अजुनही ९ कोटी ९० लाख रुपयांचे धरणाचे काम करण्यास निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. धरणाच्या कामात सांडवा बांधकाम करणेकरीता ७३ लाख ९० हजार, सांडवा खुदाई  ४२ लाख ९७ हजार, हेड रेग्युलेटर १ कोटी ३१ लाख ४४ हजार, रिंगरोडचे काम करणेकरीता ३ कोटी ५९ लाख ५७ हजार व कॅनॉल उपचारिका करणेकरीता ८५ लाख ७० हजार रुपये अशा महत्वाच्या कामांकरीता निधीची तरतूद सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये करण्यात आली आहे.असे सांगून ते म्हणाले,बोडकेवाडी येथील बोटावर मोजता येणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा विषय अजुनही प्रलंबीत असून याकरीता मी जिल्हाधिकारी,सातारा यांची या बोडकेवाडी प्रकल्पग्रस्तांसमवेत भेट घेवून हा विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीने त्यांचेशी चर्चा देखील केली आहे भूसंपादन अधिकारी व लघू पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे याविषयी लक्ष घालून बोडकेवाडी येथील प्रलंबीत राहिलेल्या शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा प्रस्तावही शासनाकडे सादर करावा तोही मंजुर करुन घेता येईल असे आश्वासन देवून त्यांनी सदर ल पा तलावाचे काम संबधित ठेकेदाराने लवकरात लवकर पुर्ण करुन दयावे अशा सुचनाही यावेळी बोलताना दिल्या.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे संचालक शशिकांत निकम,सरपंच सौ.वैशाली मोकाशी, उपसरंपच सतीश खामकर,ठोमसे सरपंच सौ.मंगल सुर्वे,बोडकेवाडी सरपंच आण्णासो देसाई,बजरंग माने,शिवाजी देसाई, नितीन निकम,आबासो माने,आनंदा धनावडे,संग्राम मोकाशी, चंद्रकांत निकम या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह लघू पाटबंधारे विभागाचे उपअभियंता कांबळे, ठेकेदार शिवानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शुभारंभ प्रसंगी उरुल,ठोमसे व बोडकेवाडी येथील शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

Friday, 1 March 2019

वांग प्रकल्पातील निगडेतील प्रकल्पग्रस्तांचा रोख रक्कमेचा तात्काळ प्रस्ताव सादर करा. आ.शंभूराज देसाईंचे मागणीवरुन जलसंपदा मंत्र्यांचे कार्यकारी संचालकांना लेखी आदेश.





दौलतनगर दि.०२:-कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वांग-मराठवाडी धरण प्रकल्पांतर्गत अशंत: बाधित असणाऱ्या निगडे गांवातील एकूण 117 प्रकल्पग्रस्तांची जमिन प्रकल्पामध्ये बुडीत गेली असून या बुडीत जमिनींच्या बदल्यामध्ये रोख रक्कम या प्रकल्पग्रस्तांना मिळावी अशी मागणी पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे जलसंपदा मंत्री यांचेकडे केल्यानंतर जलसंपदा मंत्री यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना यासंबधीचा प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करावा असे लेखी आदेश दिले असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.
                      मुंबई येथील विधानसभेच्या अधिवेशनात आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांची भेट घेवून कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वांग-मराठवाडी धरण प्रकल्पांतर्गत अशंत: बाधित असणाऱ्या निगडे गांवातील एकूण 117 प्रकल्पग्रस्तांची जमिन प्रकल्पामध्ये बुडीत गेली आहे.या प्रकल्पग्रस्तांना कोणताही आणि कसलाही मोबदला शासनाने अथवा कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आलेला नाही.तर सदर प्रकल्पग्रस्तांनी कोणत्याही पुनर्वसित जमिनीस पसंती दिलेली नसून संबधित सर्व 117 प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे बुडीत जमिनीचे बदल्यामध्ये रोख रक्कम आम्हास मिळावी अशी आग्रही मागणी केली आहे.निगडे येथील 117 प्रकल्पग्रस्तांची नांवे आपणांकडे देत असून या प्रकल्पग्रस्तांनी रोख रक्कमेचा प्रस्ताव सर्व कागदपत्रासह स्थानिक पातळीवर तयार करुन सातारा सिंचन मंडळ,सातारा यांचे कार्यालयाकडे सुपुर्द केला आहे. सर्व प्रकल्पग्रस्त रोख रक्कमेच्या मागणीवरच ठाम असून या प्रकल्पग्रस्तांना विशेष बाब म्हणून बुडीत जमिनीचे बदल्यामध्ये रोख रक्कम मिळावी अशी आग्रही मागणी लेखी पत्राव्दारे मी केली असून या लेखी पत्रावरच जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना तात्काळ यासंबधीचा प्रस्ताव शासनास सादर करावा असे लेखी आदेश दिले आहेत असे सांगुन आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले असून आठच दिवसापुर्वी निगडे येथे कसणी निगडे-माईंगडेवाडी या रस्त्यांच्या भूमिपुजन समारंभाकरीता गेलो असता येथील प्रकल्पग्रस्तांनी जमिनीच्या बदल्यात रोख रक्कमेचा आमचा विषय जिव्हाळयाचा आणि गरजेचा असून मी यासंदर्भात लक्ष घालून आम्हास न्याय मिळवून दयावा अशी ग्रामस्थांनी आणि या प्रकल्पग्रस्तांनी मागणी केलेली होती.त्यानुसार तातडीने निगडे प्रकल्पग्रस्तांच्या मागणीच्या अनुषगांने त्यांच्या असणाऱ्या मागण्यांचे लेखी पत्र जलसंपदा मंत्री यांना दिले असून त्यांनी तात्काळ प्रस्ताव मागवून घेण्याच्या सुचना केल्या आहेत त्यामुळे या विषयाला आता गती मिळाली असून लवकरात लवकर हा प्रस्ताव सातारा सिंचन मंडळ,सातारा यांचे कार्यालया मार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांचेकडे व त्यांचेमार्फत शासनाकडे सादर करुन तो विशेष बाब म्हणून मंजुर करुन घेणेकरीता मी स्वत: प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाहीही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात दिली आहे.