Thursday, 6 May 2021

अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी पाटण मतदारसंघातील मुलभूत सुविधांच्या कामांना केला 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर.


दौलतनगर दि.06 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व डोंगरी भागातील गावपोहोच रस्ते नव्याने करण्याकरीता अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी ना.शंभूराज देसाईंच्या विनंती वरुन सन २०२०-२1 आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत एकूण 33 ग्रामीण रस्त्यांच्या कामांना 05 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. निधी मंजुरीचा शासन निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने दि. 30 मार्च, 2021 रोजी पारित केला असून सदर रस्त्यांची कामे पुर्ण करुन घेण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग ही यंत्रणा देण्यात आली आहे.

          डोंगरी,दुर्गम पाटण मतदारसंघातील गांवाना रस्ता ही मुलभूत सुविधा मिळवून देणेकरीता महाराष्ट्र राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे सुरवातीपासूनच आग्रही राहिले आहेत.गत पंचवार्षिकमध्ये डोंगरी आणि दुर्गम भागातील गांवामध्ये,वाडयावस्त्यांवर रस्ते करण्याकरीता त्यांनी राज्य शासनामार्फत मोठया प्रमाणात निधी आणून डोंगरी भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत.राज्याचे अर्थराज्यमंत्री झालेनंतर ना.शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील नव्याने करावयाच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत आवश्यक असणारा निधी मंजुर होणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे पाठपुरावा करत हा निधी मंजूर करुन आणला आहे

             सन २०२०-२१ आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामामध्ये मरळी,ता.पाटण येथे ग्रामसचिवालय इमारत 35 लाख,त्रिपुडी अंतर्गत रस्ता 15 लाख, नेचल (घोलपवस्ती) रस्ता 15 लाख,टेळेवाडी पोहोच रस्ता 10 लाख,वाझोली गावठाण रस्ता 15 लाख, वाडीकोतावडे रस्ता 15 लाख,विरेवाडी अंतर्गत रस्ता 10 लाख,कोंडावळे अंतर्गत रस्ता 20 लाख, डोंगरुबाचीवाडी (मुळगाव) अंतर्गत रस्ता 15 लाख, दिक्षी अंतर्गत रस्ता 10 लाख,आंब्रुळे अंतर्गत रस्ता 15 लाख, मधलीवाडी (बोंद्री) पाटण मराठीशाळा ते पाण्याची टाकी रस्ता 15 लाख,निगडे पोहोच रस्ता 15 लाख,आंबेघर तर्फ मरळी अंतर्गत रस्ता 15 लाख,सळवे बोर्गेवाडी रस्ता 10 लाख,पाचुपतेवाडी (गुढे) अंतर्गत रस्ता 15 लाख, जरेवाडी अंतर्गत रस्ता 10 लाख,पाळशी  सावंतवस्ती रस्ता 15 लाख,कसणी पाटीलवस्ती ते मुरुमवस्ती रस्ता 15 लाख,आडदेव अंतर्गत रस्ता 15 लाख,डिगेवाडी नाडोली अंतर्गत रस्ता 15 लाख,कोदळ पुनर्वसन अंतर्गत रस्ता 10 लाख,ताईगडेवाडी पुनर्वसन (वरचे घोटील) रस्ता 20 लाख,काढोली येथे अंतर्गत रस्ता 15 लाख,जंगलवाडी चाफळ पोहोच रस्ता 25 लाख,जांभेकरवाडी मरळोशी पोहोच रस्ता 10 लाख,मत्रेवाडी अंतर्गत रस्ता 15 लाख, धडामवाडी (केरळ) अंतर्गत रस्ता 15 लाख,कळकेवाडी अंतर्गत रस्ता 15 लाख,वेताळवाडी पोहोच रस्ता 15 लाख, ढोरोशी अंतर्गत रस्ता 15 लाख,गिरेवाडी पोहोच रस्ता 15 लाख,जोतिबाचीवाडी अंतर्गत रस्ता 15 लाख या विकासकामांचा समावेश असून या 33 कामांना एकूण 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सार्वजनिक बांधकाम विभाग,सातारा यांचेकडून निविदा प्रक्रिया करणेची कार्यवाही सुरु असून पावसाळा संपल्यानंतर तातडीने या रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना ना.शंभूराज देसाईंनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना 05 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे विशेष आभार मानले आहेत.

                दरम्यान ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडे सादर केलेल्या मुलभूत सुविधांचे बदल प्रस्तावांचे कामांनाही मंजूरी मिळाली असून यामध्ये कोरिवळे येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 15 लाख, कातवडी येथील अंतर्गत रस्ता 15 लाख,मान्याचीवाडी मालदन रस्ता 20 लाख तर कोळेकरवाडी(डेरवण) गावपोहोच रस्ता 30 अशा एकूण 80 लाख रुपयांचे बदल प्रस्तावांनाही मंजूरी मिळाली असून लवकरच याही कामांना सुरुवात होणार असल्याचे ना.शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

  

Tuesday, 4 May 2021

पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांकरीता अतिरिक्त सुविधा निर्माण करणेसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन देणार.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची माहिती.

 

 

           दौलतनगर दि.05 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- पाटण तालुक्यात पाटण, दौलतनगर आणि ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये अनुक्रमे 50, 50 व 36 याप्रमाणे 136 ऑक्सीजनचे बेड उपलब्ध आहेत. यामध्ये वाढ करुन दौलतनगर कोरोना उपचार केंद्रामध्ये 25 व पाटण कोरोना उपचार केंद्रामध्ये  50 याप्रमाणे 215 चे वर ऑक्सीजन बेड वाढविण्यात येणार आहेत. पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची गैरसोय होवू नये याकरीता कोरोना उपचार केंद्रामध्ये अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यासाठी येत्या आठ दिवसात आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन देणार असून या सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

          दौलतनगर ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संदर्भात तालुक्यातील तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. याप्रसंगी त्यांनी वरील प्रमाणे माहिती दिली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोमपे,अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ.कुराडे,पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,उंब्रजचे सपोनि अजय गोरड, कोयनानगरचे सपोनि चंद्रकांत माळी, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी आदींची उपस्थिती  होती.

                   या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. सातारा जिल्हयात सरासरी प्रतिरोज 2400 ते 2500 चे पुढे कोरोना बाधित होत आहेत. पाटण तालुक्यात आज तारखेला 674 कोरोना बाधित रुग्ण आहेत त्यातील 124 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 540 कोरोना रुग्णांना गृह विलगीकरण करण्यात आले आहे. सगळीकडे रुग्णालयामध्ये बेडची क्षमता संपल्या आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना उपचाराकरीता ऑक्सीजन बेडची कमतरता भासू नये याकरीता दौलतनगर कोरोना उपचार केंद्रामध्ये 25 व पाटण कोरोना उपचार केंद्रामध्ये 50 याप्रमाणे अतिरिक्त ऑक्सीजन बेड वाढविण्यात येणार आहेत.त्यामुळे पाटण तालुक्यात सुमारे 215 चे वर ऑक्सीजन बेड उपलब्ध होतील. त्याचबरोबर दौलतनगर व पाटण येथील उपचार केंद्रामध्ये प्रत्येकी दोन दोन ड्युरा ऑक्सीजन सिलेंडर कार्यान्वीत करण्यात येणार आहेत. दौलतनगर येथील उपचार केंद्रामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने एक अग्निशामन तसेच 10 अग्निरोधक सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.त्याचबरोबर पाटण, दौलतनगर आणि ढेबेवाडी येथील उपचार केंद्रामध्ये रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर, नर्स व इतर स्टाफ यांच्याकरीता प्रतिरोज लागणारे सॅनिटायझर, मास्क, पी.पी.ई कीट इत्यादी साहित्य देण्यात येणार आहे. या सर्व अतिरक्त सुविधा येत्या आठ दिवसात तिन्ही उपचार केंद्रामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच या तिन्ही उपचार केंद्राकरीता अतिरिक्त डॉक्टर, नर्सेस व स्टाफ आवश्यक आहे त्याप्रमाणे हा स्टाफ उपलब्ध करुन देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी , सातारा यांना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर आवश्यक असणारी सर्व औषधे ही उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हा नियोजनमधून आवश्यक निधी आरोग्य विभागास उपलब्ध करुन दिला आहे त्यातून आवश्यक असणारी सर्व औषधे उपलब्ध करुन देण्याचे आदेशही जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले आहेत त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची कसलीही गैरसोय पाटण तालुक्यात होणार नाही याचे नियोजन तालुका प्रशासनाने करावे अशाही सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत दिल्या आहेत.

चौकट:- पाटण कोरोना उपचार केंद्रात व्हेन्टिलेटरची सोय करणार:- ना.शंभूराज देसाई

             आवश्यक असणाऱ्या ऑक्सीजन बेडची सोय आपण पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी उपचार केंद्रामध्ये करीत आहोत त्यामुळे ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही परंतू ज्या रुग्णांना व्हेन्टिलेटरची आवश्यकता आहे त्यांना सातारा अथवा कराड येथे व्हेन्टिलेटर बेड उपलब्ध होत नाहीत याकरीता पाटण कोरोना उपचार केंद्रात व्हेन्टिलेटरची सोय करणार असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले आहे.

Thursday, 22 April 2021

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची 38 वी पुण्यतिथी साधेपणाने साजरी. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पुष्पचक्र अर्पण करुन केले अभिवादन.

 


 

           दौलतनगर दि.23 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची ३८ वी पुण्यतिथी कारखाना कार्यस्थळावर कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. दौलतनगर ता.पाटण येथील कारखाना कार्यस्थळावरील आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त पुर्णाकृती पुतळयास राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांनी पुष्पचक्र अर्पण करुन महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेच्या व राज्यशासनाचे वतीने विनम्र अभिवादन केले.

                कोविड 19 चा प्रादुर्भाव असलेकारणाने मागीलवर्षीप्रमाणे आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त श्री.गणपती मंदीरातून लोकनेतेसाहेब यांचे पादुका कारखाना कार्यस्थळावरील पुर्णाकृती पुतळयासमोर आणून पुजन करण्यात आले.त्यानंतर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांचे हस्ते पुतळयासमोर ध्वजारोहण करण्यात येवून लोकनेते साहेब यांचे पुतळयावर पुष्पवृष्टी करण्यात आली.कोविड १९ पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळत शासनाच्या सर्व नियमांचे पालन यावेळी करण्यात आले.सातारा पोलीस दलाच्या बँडचे वतीने राष्ट्रगीत सादर करुन लोकनेतेसाहेब यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, ह.भ.प.जयवंतराव शेलार, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांची उपस्थिती होती.

Tuesday, 20 April 2021

ऑक्सीजनअभावी रुग्णांची हेळसांड होवू देवू नका. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत सुचना.

 

 

           दौलतनगर दि.21 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. सातारा जिल्हयात सरासरी प्रतिरोज 1200 ते 1400 चे पुढे कोरोना बाधित होत आहेत.सगळीकडे रुग्णालयामध्ये बेडची क्षमता संपल्या आहेत.आपल्याकडे पाटण मतदारसंघात पाटण, दौलतनगर आणि ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये अनुक्रमे 50, 50 व 36 याप्रमाणे ऑक्सीजनचे बेड उपलब्ध आहेत.ज्या रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता आहे त्यांना ऑकसीजनचे बेड उपलब्ध करुन दयावेत.ऑकसीजनअभावी रुग्णांची हेळसांड होवू देवू नका अशा सक्त सूचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना केल्या.

           दौलतनगर ता.पाटण येथे आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली वाढत्या कोरोना रुग्णांच्या संदर्भात पाटण तालुक्यातील तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक झाली.याप्रसंगी त्यांनी वरील प्रमाणे अधिकाऱ्यांना सूचना केल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोमपे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी. पाटील,पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,उंब्रजचे सपोनि अजय गोरड,मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील, कोयनानगरचे सपोनि माळी, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी आदींची उपस्थिती  होती.

                   या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येसंदर्भात व पाटण, ढेबेवाडी व दौलतनगर येथील कोरोना उपचार केंद्रातील उपलब्ध ऑकसीजन बेडच्या संदर्भात आढावा घेतला. आवश्यक असणारे ऑकसीजन बेड आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्यां रुग्णांना व्हेन्टीलेटरची आवश्यकता आहे त्या रुग्णांना तात्काळ कराड अथवा सातारा येथे कुठे  व्हेन्टीलेटरचे बेड उपलब्ध होतात का ? याकरीता आपण प्रयत्नशील राहू परंतू प्राथमिक स्तरावर ऑकसीजन बेड उपलब्ध करुन देवून रुग्णांवर तातडीने उपचार सुरु करावेत. पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये सर्व अद्यावत सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. कोरोनाच्या तपासण्या वाढवा. कोरोना बाधिताच्या संपर्कात कोण आले आहे का? याचीही तपासणी करा असे सांगून आपण रेडझोनमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. लोकांच्यामध्ये भितीचे वातावरणच राहिले नाही त्यामुळे संख्या वाढायला लागली आहे यावर वेळीच आवश्यक ते सर्व निर्बंध घालणे गरजेचे आहे. आता तर शासनाने सकाळी 07 ते 11 पर्यंतच जीवनावश्यक वस्तूची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी होईल.

                   कोरोना बाधितांना रेमडीसिव्हर इंजेक्शनची गरज भासत आहे. शासकीय कोटयानूसार कोरोना उपचार केंद्रांना ही इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आपल्या पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी येथे आवश्यक असणारी इंजेक्शन तात्काळ मागवून घ्यावीत व आवश्यकतेनुसार ही इंजेक्शन रुग्णांना दयावीत असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 चौकट:- संचारबंदी एकदम कडक करा:- ना.शंभूराज देसाई

             भाजीपाला व किराणा माल घेण्याकरीता मार्केटमध्ये मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. शासनाने जी संचारबंदी लागू केली आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी करा. संचारबंदी कडक केल्याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार नाही.उद्यापासून पोलीस विभागाने संचारबंदी एकदम कडक करुन लोकांच्या गर्दीवर निर्बंध आणावेत वेळप्रसंगी कठोर पावले उचला असेही ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना सुचना केल्या.

चौकट:- तपासण्या व लसीकरणही करुन घ्या:- ना.शंभूराज देसाई

             कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला असून पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने कोरोनाच्या तपासण्या करुन घ्या तसेच शासनाने जी लस उपलब्ध करुन दिली आहे या लसीकरणाचाही लाभ घेवून आपले जीव वाचवा असे भावनिक आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.

शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ५ हजार जीप,रिक्षा वाहतूक,सलून व्यवसायिकांना धान्य वाटप.

 


दौलतनगर दि.20 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणात वाढू लागल्याने राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यभर संचारबंदी केली असून अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवसाय बंद असल्यामुळे पाटण मतदारसंघात व्यवसाय बंद झालेल्या हातावर पोट असणाऱ्या जीप,रिक्षा,टमटम यातून प्रवासी व माल वाहतूक करणारे तसेच सलून व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मायेचा आधार देत १०-१० किलोचे पॅकेट तयार करुन ५००० कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे.मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे व ना.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघात हातावर पोट असणाऱ्या २१५०० कुटुंबाना १०-१० किलो धान्याचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले होते.

            कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला असून हा संसर्ग रोखण्याकरीता राज्य शासनापुढे संचारबंदी आणि लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याने राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत १५ दिवसाची संचारबंदी जाहीर केली आहे. संचारबंदीच्या काळात सर्वत्रच रोजगार,व्यवसाय  बंद झाले आहेत.ग्रामीण भागात तर रोजगार आणि व्यवसाय बंद झाल्याने हातावर पोट असणाऱ्या जीप,रिक्षा,टमटम वाहतूक करणारे तसेच सलून व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील कुटुंबप्रमुख  हे घरीच बसून आहेत.त्यांच्या कुटुंबांना आधार देणेकरीता ना.शंभूराज देसाईंचे नेतृत्वाखाली शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १०-१० किलोचे पॅकेट तयार करुन ते व्यवसाय बंद झालेल्या कुटंबाना देण्याचे काम करण्यात येत आहे.

            या पॅकेटमध्ये गहू, तांदूळ,डाळ,तेल व साखर अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक भागामध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिलेल्या सुचनानुसार त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत ही धान्याची पॅकेट व्यवसाय व रोजगार बंद झालेल्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी जावून कोरोनाच्या परिस्थितीमध्ये गांवागांवामध्ये तसेच वाडीवस्तीमध्ये शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन सामाजीक अंतर ठेवून वाटप करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. येत्या देान दिवसात पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गांवागावांतील तसेच वाडीवस्तीतील व्यवसाय बंद झालेल्या या कुटुंबापर्यंत या धान्याचे वाटप पुर्ण होईल असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.

           अडचणीच्या काळात पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनतेकरीता नेहमीच धावून आले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मागील वर्षी सलग दोन महिने ते पाटण मतदारसंघात कोरोनाचा संसर्ग होवू नये तसेच कोरोनाच्या संसर्गावर नियत्रंण रहावे याकरीता दररोज रस्त्यावर उतरुन काम करीत होते. कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले आहेत हे पहाताच त्यांनी तातडीने दौलतनगर येथे गतवर्षी ५० ऑक्सीजन बेडचे अद्यावत कोरोना उपचार सेटंर सुरु करुन अनेक कोरेाना रुग्णांना नवसंजिवनी मिळवून दिली. आता संचारबंदी आहे तर रोजगार व व्यवसाय बंद झालेल्यांच्या व्यथा ओळखून प्राधान्यक्रमाने जीप,रिक्षा,टमटम वाहतूक करणारे,सलून व्यवसाय करणाऱ्या गरीब कुटुंबांना मायेचा आधार मिळावा लॉकडाऊनच्या काळात त्यांची धान्याची अडचण दुर व्हावी याकरीता त्यांनी मागील वर्षाप्रमाणे यंदाही पुढाकार घेत शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे धान्य वाटपास सुरुवात केली आहे.

Thursday, 15 April 2021

सांगवड कोयना नदीकाठी घाट व पुरसंरक्षक भिंतीच्या कामाला वित्तमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले 04 कोटी 99 लाख रुपये मंजूर. प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय दि.15 एप्रिल रोजी पारित.

 

दौलतनगर दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना अतिवृष्टीच्या काळात नदीस येणाऱ्या पुरामुळे धोका निर्माण होत असल्याने 10 गावांना पुर संरक्षक भिंती बांधण्यास राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करुन द्यावा,अशी आग्रही मागणी ना.शंभूराज देसाईंनी सन 2014 ते 2019 या पंचवार्षिकमध्ये आमदार असताना शासनाकडे केली होती. गत पंचवार्षिकमध्ये त्यांनी 07 गावांना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती भरघोस असा निधी मंजुर करुन आणला यातील तीन गांवाना निधी मिळणे बाकी होते त्यातील बनपेठवाडी (येराड), गुंजाळी या दोन गावांना कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती रुपये 06 कोटी 26 लाख 38 हजार रुपयांचा निधी दि. 06 मार्च 2020 रोजी मंजूर करण्यात आला तर आता वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सांगवड,ता.पाटण येथे कोयना नदीवर घाट बांधणेच्या कामांस 04 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिला आहे. या कामांस प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या जलसंपदा विभागाने दि. 15 एप्रिल 2021 रोजी पारित केला आहे.

                          पाटण मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना धरणातून सोडण्यांत येणाऱ्या पाण्यामुळे पुर आल्यानंतर धोका निर्माण होत असल्याने मतदारसंघातील कोयना नदीकाठच्या 10 गावांना घाट व संरक्षक भिंत बांधणेच्या कामांस राज्य शासनाने जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन द्यावा अशी आमदार असताना ना.शंभूराज देसाईंची सन 2004 पासून राज्य शासनाकडे मागणी होती. यासंदर्भात त्यांनी विधानसभा सभागृहात दि. 03.08.2016 रोजी लक्षवेधी सुचनाही मांडली होती त्यावेळी तात्काळ या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन लक्षवेधी सुचनेला दिले होते.त्यानुसार मतदारसंघातील मंद्रुळहवेली, नेरळे, गिरेवाडी, पश्चिम सुपने,केसे,साजूर व तांबवे या ०७ गावांना कोयना नदीवर घाट व पुरसंरक्षक भिंती बांधण्यास आवश्यक असणारा निधी त्यांनी गत पंचवार्षिकमध्येच मंजुर करुन आणला होता आज यातील बहूतांशी कामे मार्गी लागली आहेत.तर उर्वरीत राहिलेल्या सांगवड, बनपेठवाडी(येराड) व  गुंजाळी या तीन गांवातील  कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीता ना.शंभूराज देसाईंनी अर्थमंत्री झालेनंतर जलसंपदा विभागाकडून सविस्तर प्रस्ताव मागवून घेतला व या तीन गावापैकी बनपेठवाडी(येराड) व  गुंजाळी या दोन गांवाना आवश्यक असणारा निधी मंजूर केला.

                          तर जून 2011 च्या पावसाळयामध्ये अतिवृष्टी व कोयना नदीमध्ये सोडलेल्या जादा विसर्गामुळे कोयना नदीकाठच्या सांगवड गावातील सिध्देश्वर मंदीरामागील सदरची भिंत ढासळली असल्याने सिध्देश्वर मंदिर व लगतीची वस्ती यास धोका निर्माण झाला होता.वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी यापूर्वीचे दोन ते तीन अधिवेशनामध्ये लक्षवेधी सुचना मांडली तसेच दि.04.02.2020 रोजीच्या पत्रान्वये सदरची बाब पुनश्च: जलसंपदा मंत्री यांचे निदर्शनास आणून दिली. सदर पत्रावर जलसंपदा मंत्री यांनी सदर अंदाजपत्रक मान्यतेसाठी तातडीने सादर करावे असे निर्देश दिले होते.त्यानुसार मौजे सांगवड,ता.पाटण येथे कोयना नदीवर घाट व पूरसंरक्षक भिंत बांधण्याच्या कामासाठी रु.04 कोटी 21 लाख 76 हजार व अनुषंगिक खर्च रु. 76 लाख 63 हजार अशा एकूण रुपये 04 कोटी 98 लाख 39 हजार एवढया खर्चाच्या जलसंपदा विभागाच्या अंदाजपत्रकांस दि.15 एप्रिल 2021 रोजीचे जलसंपदा विभागाने पारित केलेल्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता दिली आहे.लवकरच या कामाची प्रशासकीय कार्यवाही करण्यात येऊन निविदा प्रक्रिया झालेनंतर तातडीने या कामांस सुरुवात होणार असल्याचे वित्तराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.

 

संचारबंदीचे पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई सातारा जिल्हयातील ग्रामीण भागात अलर्ट. कोरेगाव,रहिमतपूर व मसूर येथे केली बंदोबस्ताची पाहणी. गर्दी टाळण्याकरीता करावयाच्या उपाययोजनासंदर्भात अधिकाऱ्यांना केल्या सूचना.

 

सातारा दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्र राज्यामध्ये काल रात्री आठ वाजल्यापासून लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सकाळपासून रस्त्यावर उतरुन पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना समवेत घेवून सातारा जिल्हयातील ग्रामीण भागाची प्रत्यक्ष पोलीस बंदोबस्ताची व कायदा सुव्यवस्थेची पहाणी केली.बाजारपेठा, तसेच मुख्य रस्त्यावर अशा विविध सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी होऊ नये,नागरिक विनाकारण घराच्या बाहेर पडू नयेत याकरीता संचारबंदी कडक करा व गर्दी थांबविण्या करीता करावयाच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा अशा सक्त सुचना त्यांनी महसूल,पोलीस विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

         गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज सातारा जिल्हयातील कोरेगाव,रहिमतपूर व मसूर विभागातील मुख्य बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवरील ग्रामीण भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांचेसोबत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे,शिवसेना संपर्कनेते प्रा.नितीन बानुगडे पाटील हे पदाधिकारी तर कोरेगांव उपविभागीय अधिकारी श्रीमती जयश्री पाटील,कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे,कोरेगांव उपविभागीय पोलीस अधिकारी  किंद्रे,कराड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील,कोरेगांव तहसिलदार अमोल कदम,कराड तहसिलदार अमरदीप वाकडे,कोरेगांव पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे, रहिमतपुर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड, रहिमतपुर सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड असे संबधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

               यावेळी गृहराज्यमंत्री ना.देसाईंनी कोरेगांव, रहिमतपुर व मसूर विभागामध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने तालुका प्रशासनाच्या वतीने काय काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची सविस्तर माहिती अधिकारी यांचेकडून प्रथमत: घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, कोविड 19 चा संसर्ग सध्या दुप्पट वेगाने होत असल्याने राज्यात काल रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून जिल्हयामध्ये या रोगाने संसर्ग होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढू लागले असताना संचारबंदीच्या काळामध्ये गर्दी होऊ नये याकरीता पोलीस व महसूल विभागाची स्वतंत्र पथके तयार केली आहेत.तुरळक ठिकाणी भाजी मंडई आणण्याच्या नावाखाली किंवा काही किरणा खरेदी करण्याच्या नावाखाली थोडीसी गर्दी आहे.आज पहिला दिवस आहे म्हणून आपण रस्त्यावर उतरणाऱ्यांना समजून सांगण्याचे काम करावे. खरोखरच काम असेल तरच नागरिकांनी घराचे बाहेर पडावे. संचारबंदीच्या काळात विनाकारण कोणी फिरताना दिसले किंवा संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना पुर्वीच दिल्या आहेत परंतू कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्यांमध्येही संचारबंदीचे नियम पाळले जात आहेत का? याची तपासणी पोलीस यंत्रणेने करावी यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदेशीर करावी यात हयगय करु नये.कोरोनाचा संसर्ग होवू नये याकरीता जसे प्रशासन सज्ज आहे तसेच नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करुन स्वत:ची व त्यांच्या कुटुंबिंयांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

               संचारबंदीमध्ये तालुक्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असली तरी अत्यावश्यक सेवा सुरुच ठेवून नागरिकांना सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनानेही ठेवावी.अडचणीच्या काळात जशी जनतेकडून आपण सहकार्याची अपेक्षा ठेवतो तशी जनतेचीही आपल्या प्रशासनाकडून अपेक्षा असते.सर्वांच्या सहकार्यातुन कोरोना विरुध्दचा सुरु असलेला लढा यशस्वी होणार आहे त्यामुळे प्रशासनाने जशी या महामारीच्या संकटात जनतेची काळजी घेण्याची गरज आहे तशीच जनतेनेही स्वत:ची आणि स्वत:च्या परिवाराची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ती काळजी जनतेने घ्यावी अशी विनंती ना.शंभूराज देसाईंनी करुन संचारबंदीच्या पार्श्वभूमिवर प्रशासनातील अधिकाऱ्यांना तसेच जनतेला काही अडचणी असतील तर त्या त्यांनी जरुर सांगाव्यात शासनाच्या माध्यमातून त्या अडचणी सोडविण्याचा जरुर प्रयत्न केला जाईल असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगून सर्वच अधिकारीवर्ग खरोखरच चांगले काम करीत आहे या कामांबरोबर त्यांनी अजुनही सतर्क राहून काळजी घ्यावी असे ते शेवठी बोलताना म्हणाले.