मंगळवार, १० ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारुढ पुतळा पाटण तालुक्यातील नवारस्ता येथील चौकामध्ये उभारणार असून हा पुतळा पाटण तालुक्याचे नवे आकर्षण ठरेल असा अनोखा संकल्प लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,युवा नेते मा.यशराज देसाई यांनी व्यक्त केला.दरम्यान हा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी लवकरच जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन मा.यशराज देसाई यांनी दिली.
यावेळी बोलताना मा.यशराज देसाई
पुढे म्हणाले की,रयतेच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ
पुतळा पाटण तालुक्यात असावा आणि तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला छत्रपती शिवरायांच्या
या पुतळ्याच्या दर्शनाने सदैव प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा पुतळा उभारण्यात येणार
आहे. छत्रपती शिवरायांचे तेजस्वी व्यक्तित्व, त्यांचे विचार आणि कार्याचा वारसा पुढील
पिढीपर्यंत पोहोचावा हीच यामागील प्रांजळ भावना आहे, असे सांगत ते म्हणाले की, आमचे
कुटुंब नेहमीच छत्रपती शिवरायांच्या विचार आणि कार्याने भारलेले आहे. त्यांच्या प्ररणेनेच
आम्ही जनसेवेत सक्रिय आहोत. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया
व छ. शिवाजी पार्क,शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात
पुढाकार घेतला होता. आजही त्या दोन्ही ठिकाणी असणारे पुतळे नव्या पिढीबरोबरच देशी-परदेशी
पर्यटकांना महाराजांच्या विचार व कार्याची आठवण करून देत असतात. लोकनेते बाळासाहेब
देसाई यांनी आम्हाला दिलेला जनसेवेचा हा वारसा जपताना पाटण तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी
महाराज यांचा कुठेही अश्वारुढ मोठा पुतळा नसल्याने पाटण तालुक्याची मध्यतर्वी बाजारपेठ
असलेल्या नाडे-नवरस्ता येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे.नवारस्ता ही अल्पावधीतच नावारुपास आलेली बाजारपेठ आहे. तर दौलतनगर ता.पाटण येथे
लेाकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुह,लोकनेते बाळासाहेब देसाई सर्वसोयींनीयुक्त
असलेले शताब्दी स्मारक तसेच श्री गणेश मंदिर हे क वर्ग तिर्थक्षेत्र असलेले ठिकाण असल्याने
या परिसराला पर्यटनाचे रुप आले. त्यामुळे नवारस्ता बाजारपेठेला अनन्य साधारण महत्तव
प्राप्त झाले असल्याने नाडे-नवारस्ता या बाजारपेठेच्या ठिकाणी असलेल्या मुख्य चौकामध्ये
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा मनोदय लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई यांनी त्यांचे वाढदिवसा दिनी संकल्प
मांडला असून मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली लवकरच छत्रपती शिवाजी
महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणी संदर्भात एक समिती गठीत करण्यात येणार असून लवकरात
लवकर या पुतळ्याच्या उभारणीचे काम हे येत्या काही दिवसांमध्ये हाती घेण्यात येणार आहे.दरम्यान
चेअरमन मा.यशराज देसाई यांचे या घोषणेमुळे केवळ तालुक्यातीलच नव्हे तर जिल्हयातील शिवप्रेमींमध्ये
आनंदाचे वातावरण पसरले आहे.
चांगला निर्णय आहे. पाटण तालुक्यात महाराज यांचा एकही पुतळा नाही...लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी....👌👌
ReplyDelete