Thursday 14 December 2017

पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांनी आमदार शंभूराज देसाई यांचेकडून मागविला पाटण तालुक्यातील पर्यटन विकासाचा आराखडा.



                        प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील पर्यटन तसेच तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरीता व येथील मुलभूत सुविधांच्या विकासकामांकरिता निधी उपलब्ध करुन दयावा अशी आग्रही मागणी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी राज्याचे पर्यटन विकास मंत्री ना.जयकुमार रावल यांच्याकडे केली होती. आमदार देसाई यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत या कामांना निधी उपलब्ध करुन देणेकरीताचे प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी, सातारा यांचेमार्फत राज्य पर्यटन विकास समितीस सादर करावेत अशा सुचना मंत्री ना.रावल यांचे सुचनेवरुन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय यांनी जिल्हाधिकारी, सातारा यांना दिल्या आहेत. तर या आशयाचे पत्रही ना.जयकुमार रावल यांनी आमदार शंभूराज देसाई यांचेकडे पाठविले आहे व या विषयासंदर्भात ना.रावल व आमदार देसाई यांची दुरध्वनीवरुन चर्चा देखील झाली आहे. पर्यटन मंत्री ना.रावल यांनी मागविलेल्या प्रस्तावानुसार लवकरच पाटण तालुक्यातील पर्यटन तसेच तीर्थक्षेत्रांच्या  विकासाकरीता व येथील मुलभूत सुविधांच्या विकासकामांकरिता निधी उपलब्ध होण्याचा सविस्तर प्रस्ताव सादर करणार असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी आमचे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.
                       याप्रसंगी प्रतिनिधींशी बोलताना आमदार देसाई म्हणाले, पाटण तालुका निर्सगरम्य आणि सौदर्यांने नटलेला तालुका असुन तालुक्यामध्ये आठ विभागात विखरुलेल्या भागात अनेक ठिकाणी पर्यटन विकासास वाव आहे. तसेच तालुक्यातील देवस्थाने व तीर्थक्षेत्रांचा नावलौकीक संपुर्ण महाराष्ट्र राज्यासह शेजारील राज्यामध्येही आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात पर्यटक आणि देवस्थांना व तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याकरीता राज्याच्या व शेजारच्या राज्याच्या विविध भागातून भाविक भक्त येत असतात. ही पर्यटन स्थळे तसेच तीर्थस्थळे चांगल्याप्रकारे विकसीत होण्याकरीता राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याने शासनाच्या पर्यटन विभागामार्फत प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत राज्य  पर्यटन विकास समितीच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध करुन दिला जातो तो निधी पाटण तालुक्यातील पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्र असणा-या देवस्थांनाच्या विकासाकरीता देण्यात यावा व पाटण तालुक्यातील सर्व विभागातील पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांची माहिती एकत्रित करुन या स्थळांना व देवस्थांनाना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दयावा याकरीता मी राज्याचे पर्यटन विकास मंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे सातत्याने पाटपुरावा करीत होतो. पर्यटन विकास मंत्री यांनी पाटण तालुक्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्र ठिकाणांच्या विकासाकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मला दिले होते त्यानुसार सदर ठिकाणांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी सातारा यांचेमार्फत मागविण्यात आले आहेत. असे सांगून ते म्हणाले, पाटण तालुक्यात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण आहे. कोयना धरणाच्या १० किलोमीटरच्या अंतरात प्रादेशिक पर्यटन विकासास चांगला वाव आहे तसेच या परिसरात पुरातन एैतिहासिक अशी अनेक ठिकाणे आहेत ज्या ठिकाणांची अजुनही पर्यटकांना माहिती नाही ही ठिकाणे विकसीत झाल्यास पाटण तालुका पर्यटन क्षेत्रात अग्रेसर तालुका होईल.तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगावर राज्यातील सर्वात जास्त प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत आहेत. कोयना धरण, येथील मोठमोठ धबधबे पर्यटकांचे खास आकर्षण आहेत. तसेच नाईकबा, येराड,येराडवाडी येथील रुद्रेश्वर,धारेश्वर दिवशी  व चाफळ येथील श्रीराम मंदीर, जळव येथील श्री.जोतिबा मंदीर,निवकणे येथील श्री.जानाई मंदीर व दौलतनगर येथील श्री.गणेश मंदीर ही देवस्थाने व तीर्थक्षेत्र भाविकांची श्रध्दास्थाने आहेत.तर एैतिहासिक किल्यांची निर्मितीही पाटण तालुक्यात झालेली आहे. घेरादातेगड, गुणवंतगड,रामघळ यासारखे अनेक गड व ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. महत्वाच्या असणा-या सर्व पर्यटनस्थळांचा तसेच देवस्थाने व तीर्थक्षेत्रांचा विकास व येथील मुलभूत सुविधांच्या विकासकामांकरिता आवश्यक असणारा निधी मिळणेकरीताचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सातारा यांचेबरोबर बैठक घेवून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेसाठी तपशिलवार प्रकल्प अहवाल पाठविताना सादर करावयाच्या सर्व बाबींची माहिती लवकरच राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने निर्माण केलेल्या राज्य पर्यटन विकास समितीकडे सादर करणार असून तालुक्यातील महत्वाच्या पर्यटनस्थळांना व तीर्थक्षेत्र विकासाकरीता शासनाकडून निधी उपलब्ध करुन आणण्यास मी कठीबध्द असल्याचेही त्यांनी शेवठी बोलताना सांगितले.


No comments:

Post a Comment