Wednesday 13 December 2017

पाटण मतदारसंघात दुस-या टप्प्यात कोयना नदीकाठच्या पुरसंरक्षक भिंतीकरीता 04 कोटी 41 लाख रुपये मंजूर. मंद्रुळहवेली, पश्चिम सुपने व केसे या तीन गावांना निधी मंजूरीचा शासन निर्णय पारित.

पाटण विधानसभा मतदार संघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना कोयना नदीस अतिवृष्टीच्या काळात येणा-या पुरामुळे धोका निर्माण होत असल्याने या गावांना पुर संरक्षक भिंती बांधण्यास व कोयना नदीवर घाट बांधणेस राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी माझी सातत्याची मागणी होती. युतीच्या शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने शासनाने पाटण मतदार संघातील दुस-या टप्प्यात तीन गावांना कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीता 04 कोटी 41 लाख 42 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या जलसंपदा विभागाने दि. 08/11/2017 रोजी पारित केला असून मंद्रुळहवेली, पश्चिम सुपने (थोरात मळा) व केसे या तीन गावांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांव्दारे दिली आहे.
             आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, पाटण मतदार संघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना पावसाळयामध्ये कोयना धरणातून वारंवार सोडण्यांत येणा-या पाण्यामुळे कोयना नदीस पुर आल्यानंतर नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होत असल्याने मतदार संघातील कोयना नदीकाठच्या अशा 10 गावांना कोयना नदीवर घाट व संरक्षक भिंत बांधणेच्या कामांस राज्य शासनाने जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन द्यावा अशी माझी सन 2004 पासून राज्य शासनाकडे मागणी होती. या विषयासंदर्भात तत्कालीन आघाडी शासनाने केवळ आश्वासने देण्याचे काम केले त्यामुळे हा निधी इतक्या वर्षात मिळू शकला नाही परंतू सन 2014 पासून सातत्याने युतीच्या शासनाकडे या विषयासंदर्भात मी पाठपुरावा सुरु केला. दरम्यान यासंदर्भात मी दि. 03/08/2016 रोजी लक्षवेधी सुचनाही विधानसभा सभागृहात मांडली होती त्यावेळी तात्काळ या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना जलसंपदा मंत्री यांनी मला दिले होते.मतदार संघातील कोयना नदीकाठी वसलेल्या व पुराचा धोका निर्माण होणा-या सांगवड, बनपेठवाडी, मंद्रुळहवेली, नेरळे, गुंजाळी, गिरेवाडी, पश्चिम सुपने,केसे,साजूर व तांबवे या 10 गावांना कोयना नदीवर घाट व पुरसंरक्षक भिंती बांधण्यास आवश्यक असणारा निधी उपलब्ध होणेकरीताचा सविस्तर प्रस्ताव तयार करुन तो शासनाच्या मान्यतेकरीता शासनाकडे सादर करुन हा निधी देणे किती आवश्यक आहे याचे गांभीर्य शासनाचे निदर्शनास आणून दिलेनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी तात्काळ हा निधी मंजूर करण्यात यावा असे जलसंपदा विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 01 कोटी रुपयांच्या आत अंदाजपत्रक असणा-या गिरेवाडी गावाकरीता 92 लाख 04 हजार, नेरळे 83 लाख 44 हजार, तांबवे बौध्दवस्ती 93 लाख 97 हजार व साजूर 65 लाख 27 हजार असे एकूण 3 कोटी 34 लाख 72 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामांना दि. 05/07/2017 रोजी प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय जलसंपदा विभागाने पारित केला आहे. तर दुस-या टप्प्यात एक कोटी रुपयांच्या वरील मंद्रुळहवेली गावास 01 कोटी 10 लाख 19 हजार, पश्चिम सुपने (थोरात मळा) 1 कोटी 17 लाख 37 हजार व केसे 2 कोटी 15 लाख 86 हजार असा 04 कोटी 41 लाख 42 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या जलसंपदा विभागाने दि. 08/11/2017 रोजी पारित केला आहे. तर उर्वरित सांगवड गावाकरीताचा 5 कोटी 43 लाख 72 हजार, बनपेठवाडी (येराड) 2 कोटी 38 लाख व गुंजाळी 3 कोटी 46 लाख 85 हजार या तीन गावांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीकरीता प्रलंबीत असून या तिन्ही गांवाच्या कामांनाही आवश्यक असणारा निधी मंजुर करुन घेणेकरीता मी कटीबध्द आहे. असे त्यांनी पत्रकात म्हंटले आहे. दरम्यान सदर तीन गांवाना हा निधी मंजुर केल्याबद्दल मंद्रुळहवेली, पश्चिम सुपने (थोरात मळा) व केसे या तिन्ही गावातील ग्रामस्थांनी आमदार शंभूराज देसाई यांचा सत्कार करुन निधी मिळवून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
चौकट :- एकूण 07 गांवातील कामांना 07 कोटी 76 लाख 14 हजार रुपयांचा निधी मंजूर.
               कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीता पहिल्या टप्प्यात चार गांवाना 03 कोटी 34 लाख 72 हजार व आता दुस-या टप्प्यात तीन गावांना 04 कोटी 41 लाख 42 हजार असा एकूण 07 कोटी 76 लाख 14 हजार रुपयांचा निधी शासनाच्या जलसंपदा विभागाकडून मंजूर करुन आणला आहे जो यापुर्वीच्या लोकप्रतिनिधींना गेल्या 26 वर्षात कधी आणता आला नाही. असा टोलाही त्यांनी पत्रकात लगाविला आहे.


No comments:

Post a Comment