Tuesday 17 July 2018

पाऊस वाढला आहे, तालुका प्रशासनाने सतर्क रहा. - आमदार शंभूराज देसाईंच्या तालुका प्रशासनाला सुचना.



दौलतनगर दि. 17:  पावसाचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असून तालुक्यातील सर्व धरणे पाण्याने तुंटुंब भरली आहेत. कोयना धरणातही पाण्याचा मोठया प्रमाणात ओघ सुरु असून कोयना धरण हे सुमारे 76 टीएमसीकडे गेले आहे.80 टीएमसी पाणी भरलेनंतर कोयना धरण व्यवस्थापनाने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.नवजा,कोयनानगर व महाबळेश्वर याठिकाणी मोठा पाऊस होत असल्याने यंदाच्या वर्षी एक महिना अगोदरच कोयना धरणात पाणीसाठा जादा प्रमाणात झाला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील तारळी,वांग मराठवाडी,मोरणा गुरेघर व उत्तरमांड धरणप्रकल्पातून धरणे पुर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.पावसाच्या पाण्यामुळे कोयना नदीसह तालुक्यातील इतर नदयाही दुथडी भरुन वाहू लागल्या असून कोयना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झालेनतंर कोयना नदीतील पाण्याची पातळी वाढणार असल्याने तालुका प्रशासनाने सतर्क आणि जागृत रहावे अशा सुचना आमदार शंभूराज देसाई यांनी तालुका प्रशासनाला दिल्या.
                     पावसाचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असल्याने व तालुक्यातील धरणातील पाण्याच्या पातळीत झपाटयाने वाढ होत असल्याने पाटण तहसिल कार्यालय याठिकाणी आमदार शंभूराज देसाई यांचे सुचनेवरुन त्यांचे अध्यक्षतेखाली तालुका प्रशासनाची तातडीची बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे तालुका प्रशासनाला सुचना केल्या. यावेळी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,पाटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजीव गायकवाड,कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,उपअभियंता मोरे,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता एस.जी. हिरे,गायकवाड,सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश अहिरे,वसंत खाडे, पाटणचे प्रभारी पोलीस निरीक्षक पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे,गटशिक्षणाधिकारी निकम,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक साळुंखे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत यादव,सार्वजनीक बांधकाम व जिल्हा बांधकाम विभागाचे सर्व शाखाअभियंता यांचेबरोबर तालुकास्तरीय सर्व विभागांचे विभागप्रमुख यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.
                     याप्रसंगी प्रारंभी आमदार शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांचेकडून कोयना धरणातील पाणीसाठयासंदर्भात व पाणी विर्सगासंदर्भातील सविस्तर माहिती घेतली यावेळी पाटील यांनी 80 टीएमसी पाणीसाठा धरणात झालेनंतर पाण्याचा विसर्ग सुमारे 30 हजार कयुसेक्स नी करणार असल्याचे निदर्शनास आणून दिलेनंतर मुळातच कोयना नदीपात्रात पावसाच्या पाण्यामुळे कोयना नदीपात्र दुथडी भरुन वाहू लागले आहे.त्यातच धरणातील पाणी विसर्ग केल्यानंतर नदीपात्रात पाण्याची वाढ होणार आहे.त्यामुळे नदीकाठच्या गांवाना सतर्क राहण्याच्या सुचना यंत्रणेने तात्काळ दयाव्यात अशा सुचना आमदार शंभूराज देसाई यांनी दिल्या.कोयना नदीकाठी असणा-या पाटण येथील कळके चाळ, जमदाडवाडी,मंद्रुळहवेली व नावडी या गांवाना लगेच पाणी लागते त्यामुळे जागृत रहावे. धरणातील जलसाठयाच्या व पाणी विसर्गाच्या निर्णयात आम्हाला कोणाला हस्तक्षेप करावयाचा नाही परंतू कोयना धरण व्यवस्थापनाने पाण्याचा विसर्ग करताना योग्य नियोजन करावे असे सांगत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रत्येक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सहाययक पोलीस निरीक्षक, सार्वजनीक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी २४ तास अलर्ट रहावे.आपले विभागाकडील अधिकारी,कर्मचारी यांची नेमणूक आपआपल्या कार्यालयामध्ये संबधित अधिकारी वर्गाने करावयाची असून संबधित अधिकारी व कर्मचारी यांचे दुरध्वनी क्रमांक तहसिलदार यांचेकडे तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षात दयावेत. आपतकालीन व्यवस्थापन कक्षामध्ये एक जबाबदार अधिकारी आणि कर्मचा-याची नेमणूक करण्यात यावी अशा सुचना त्यांनी केल्या. प्रातांधिकारी यांनी पाटण तालुक्यातील सर्व पोलीस यंत्रणांची बैठक घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
                    त्याचबरोबर त्यांनी सार्वजनीक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचेकडून तालुक्यातील प्रमुख रस्ते,ग्रामीण रस्ते,मोठे पुल,लहान मोठे पुल तसेच साकव पुलांच्या ठिकाणी कुठे अडचण तर नाही ना याचा सविस्तर आढावा घेतला यामध्ये कोठे अशा प्रकारची आपत्ती जाणवली तर तातडीने बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी आपत्ती दुर करावी असे सांगून मुळगांव येथील पुलावरुन पाणी जाते त्यामुळे पोलीस यंत्रणेने त्याठिकाणी दोन पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करुन तात्काळ वाहतूक बंद करावी. वीज विभागाच्या अधिका-यांनी प्रामुख्याने जागृत रहा. विनाकारण वीज खंडीत करु नये. प्राथमिक शाळा खोल्या कुठे नादुरुस्त असतील तर शिक्षणाधिकारी यांनी संबधित शिक्षकांना सुचना करुन शाळा अंगणवाडी तसेच इतर सार्वजनीक ठिकाणी भरविण्याची व्यवस्था करावी.प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,ग्रामीण रुग्णालय याठिकाणी यावरचा औषध साठयाचाही आढावा घेत त्यांनी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे असे नुकसान होणा-या पिकांचा कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करुन शेतक-यांना मदत मिळणेकरीता प्रस्ताव सादर करावेत.अशाही सुचना त्यांनी यावेळी केल्या.
              चौकट:- महामार्गाचे अधिकारी आणि एल अँन्ड टी कंपनीने तात्काळ उपाययोजना कराव्यात.
    कराड चिपळुण या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याचे काम सध्या सुरु आहे अनेक ठिकाणी रस्त्याचा मार्ग वळविण्यात आला आहे.रस्त्याची एकच बाजु सुरु असल्यामुळे रस्त्यावर पाणी येण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डेही पडले आहेत त्यामुळे अपघाताची भिती निर्माण होत आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी साठणारे पाणी काढून देणेकरीता महामार्गाचे अधिकारी आणि एल ॲन्ड टी कंपनीने तात्काळ उपाययोजना करावी व पावसाच्या कालावधीत कायम आपली यंत्रणा सतर्क ठेवावी अशा सुचनाही आमदार शंभूराज देसाई यांनी महामार्गाचे अधिकारी व कंपनीच्या अधिका-यांना दिल्या.

No comments:

Post a Comment