Tuesday 2 July 2019

तालिका अध्यक्ष म्हणून आमदार शंभूराज देसाईंची उत्तम कामगिरी. मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष व मान्यवरांकडून आमदार शंभूराज देसाईंचे विशेष अभिनंदन.






            दौलतनगर दि.०२:-  सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिकमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड झालेले व आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित झालेले पाटणचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेच्या आत्ताच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभा सभागृहात बजावलेल्या उत्तम कामगिरीबद्दल तसेच सभागृहाचे कामकाज कोणताही गोधंळ सभागृहात न होता उत्कृष्ठरित्या चालविल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष ना.विजयराव औटी,शिवसेना गटनेते व सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याबरोबर विधानसभेतील विविध पक्षाचे सत्ताधारी व विरोधी बाकावरील विधानसभा सदस्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
             विधानसभेतील अभ्यासू आमदार म्हणून पाटणचे लोकप्रिय तरुण आमदार शंभूराज देसाईंची विधानसभेत व संपुर्ण महाराष्ट्रात ओळख आहे.२००४ साली महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्या अभ्यासू आणि मुद्देसुद अशा व राज्यातील सर्व घटकांना स्पर्श करणाऱ्या भाषणांनी उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून त्यांना देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.शिवसेना पक्षाने त्यांचेवर विधिमंडळ पक्षप्रतोद म्हणून जबाबदारी दिली असून शिवसेनेचा विधानसभेतील बुलंद आवाज व बलस्थान चेहरा म्हणून त्यांनी ही जबाबदारी लिलया पेलली आहे.आमदार शंभूराज देसाई हे पाटणसारख्या डोंगरी आणि दुर्गम तालुक्यातून आमदार म्हणून निवडून आले असून आमदारकीचा कोणताही पुर्वानुभव नसताना सन २००४ ला आमदार म्हणून विधानसभेची पायरी चढल्यानंतर संसदीय कामकाजाचा खडान्‌खडा अभ्यास करुन त्यांनी आपल्या हुशारीचे कर्तृत्व सिध्द करुन दाखविले आहे.त्यांच्या हुशारीचे मुल्यमापन महाराष्ट्र विधीमंडळाने नेहमीच केले आहे.
              महाराष्ट्र विधानसभा हे राज्यातील लोकशाहीचे सर्वोच्च असे सभागृह असून या सभागृहात अधिवेशन काळात विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हे महाराष्ट्र विधानसभा नियम ८ अन्वये विधानसभेच्या सदस्यांमधून सभाध्यक्ष तालिकेवर विविध पक्षाच्या विधानसभा सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. महाराष्ट्र विधानमंडळाने शिवसेना पक्षाचे आमदार शंभूराज देसाईंचे विधानसभेतील कामकाज पाहून त्यांची सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिक मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या तालिकाध्यक्षपदी चौथ्यांदा नियुक्ती केली.सन २०१६ चे पावसाळी अधिवेशन,२०१८ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन, २०१९ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन व सध्याचे पार पडलेले पावसाळी अधिवेशन अशा चार अधिवेशनात आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून बसण्याचा बहूमान मिळाला.
               विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून संपुर्ण पावसाळी अधिवेशनात विधानसभेचे कामकाज पाहताना दररोज त्यांनी निपक्ष:पातीपणे सभागृहाचे कामकाज चालविले. अनेकवेळा विधानसभा सभागृहात विरोधी बाकावरुन गोंधळाचे प्रसंग निर्माण झाले तरी आमदार शंभूराज देसाईंनी ते शिताफीने हाताळत सभागृहात गोंधंळाची वेळ कधीच येवू दिली नाही. तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा जेव्हा सभागृहाचे कामकाज त्यांनी पाहिले तेव्हा तेव्हा सभागृहातील सत्ताधारी व विरोधी बाकावरील सदस्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याची, बोलण्याची खुप संधी मिळवून दिली. विशेष म्हणजे  शुक्रवार दि.२८ जुन रोजी विधानसभा कामकाजाच्या दिनक्रमामध्ये  सकाळी ०९ ते १०.४५ वाजेपर्यंत सभागृहाचे स्पेशल सेटिंग ठेवण्यात आले होते या पावणेदोन तासाच्या काळात एकूण १० लक्षवेदी सुचना दिनक्रमामध्ये घेण्यात आल्या होत्या. १० पैकी ०८ लक्षवेदी सुचनांच्या संदर्भात सभागृहात चर्चा व यावर संबधित मंत्री यांचे उत्तराचे कामकाज तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली पार पडले.आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून सर्वच पक्षाच्या वतीने नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक मान्यवरांनी त्यांच्या या कामकाजाचे तोंडभरुन कौतुक करुन तुम्हाला विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरुन कामकाज चालविताना पहाताना आम्हाला नेहमीच लोकनेते बाळासाहेब देसाई यांची आठवण येते अशा स्पष्ट प्रतिक्रिया सत्ताधारी मंत्री, सदस्य तसेच विरोधी पक्षातील सदस्यांनी आमदार शंभूराज देसाईंना दिल्या. विधानसभा सभागृहात बजावलेल्या उत्तम कामगिरी तसेच विधानसभेचे कामकाज सुरळीत चालविलेबद्दल मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आमदार शंभूराज देसाईंचे विशेष अभिनंदन केल्यानंतर त्यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.

No comments:

Post a Comment