Thursday 3 May 2018

महिंद ल पा.तलाव गाळमुक्त करणेकरीता तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ. आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते गाळ काढण्याचे कामाचा शुभारंभ. शेतक-यांनी गाळ नेण्याचे आमदार देसाईंकडून आवाहन.


       महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत कार्यरत असणा-या पाटण तालुक्यातील महिंद येथील लघू पाटबंधारे तलावाचे काम ब-याच वर्षापुर्वी करण्यात आले असून या तलावांमध्ये मोठया प्रमाणात गाळ साचला असल्याने पाणी साठवण क्षमता कमी होत होती दरम्यान राज्य शासनाने गाळमुक्त धरणे या योजनेतंर्गत धरण,तलावातील गाळ काढणे व पाणी साठवण क्षमता वाढविणे ही योजना सुरु केली असून या योजनेतंर्गत महिंद लघू पाटबंधारे तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ करण्यात आला असून गाळ काढण्याचे कामांचा शुभारंभ दि.०१ मे,महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ही योजना पाटण तालुक्यात राबविणारे पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती डी.आर.पाटील,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे,उपअभियंता दाभाडे,कारखान्याचे संचालक विकास गिरीगोसावी,वसंतराव कदम,बबनराव भिसे,नारायण कारंडे,शिवाजीराव शेवाळे, टी.डी.जाधव, जयवंतराव जानुगडे, पोपटराव पाटील,नाना साबळे, दत्तात्रय कदम,सुनिल देसाई,सळवे सरपंच शंकर कुंभार,किसन घाडगे,यंत्रणा पुरविणारा ठेकेदार महेश पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
       मागील १५ दिवसापुर्वी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता विजयराव घोगरे,पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, कार्यकारी अभियंता संजय बोडखे यांची संयुक्त अशी बैठक पाटण येथे घेतली होती. या बैठकीत तात्काळ या कामांना सुरुवात करावी अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी क़ृष्णा खोरे व सिंचन मंडळाच्या अधिका-यांना केल्या होत्या. त्यानुसार दि.०१ मे,महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने याचा प्रारंभ करण्यात येवून याचा शुभारंभही आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
      यावेळी आमदार शंभूराज देसाई यांनी येत्या दोन महिन्यावर पावसाळा येवून ठेपला असून शासनाने पुढाकार घेवून गाळमुक्त धरणे व तलाव करण्याचे धोरण राज्य शासनाने आखले आहे. या योजनेमध्ये धरण, तलावातील गाळ काढणे व पाणी साठवण क्षमता वाढविणे ही कामे हाती घेतली आहेत याकरीता आवश्यक असणारी यंत्रणा पुरविण्याचे काम सिंचन मंडळ व महसूल विभागामार्फत करण्यात येणार आहे. धरणातील व तलावातील गाळ काढणेकरीता लागणारे पोकलॅन्ड, जेसीबी ही यंत्रणा सिंचन मंडळ व महसूल विभागाकडून देण्यात येणार असून याकरीता लागणारे इंधनही शासन देणार आहे. शेतक-यांनी आणि ज्यांना आवश्यक आहे अशा व्यक्तींनी केवळ धरणातून आणि तलावातून काढण्यात आलेला गाळ उचलून नेण्याचे काम करावयाचे आहे.ज्या शेतक-यांना हा गाळ आवश्यक आहे त्यांनी तो नेण्यात यावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी या विभागातील शेतक-यांना केले असून सोन्यासारखे धान्य पिकविण्याची ताकत धरणातील आणि तलावातील गाळामध्ये असून शासनाने राबविलेल्या या योजनेचा लाभ शेतक-यांनी घ्यावा. विभागातील शेतक-यांनी हा गाळ नेणेकरीता आपण आवाहनही करीत असून या योजनेमध्ये महसूल विभागाच्या प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यांचे मंडलाधिकारी तसेच तलाठी यांना या कामांमध्ये हातभार लावण्याच्या तसेच अशाचप्रकारे चाफळ विभागातील डेरवण या तलावातीलही गाळ काढण्याकरीता महसूल विभागामार्फत प्रशासकीय मान्यता देवून या तलावातील गाळ काढण्यास लवकर सुरुवात करण्याच्या सुचना प्रांताधिकारी व तहसिलदार यांना केल्या आहेत असेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना सांगितले.
    चौकट:- मी नाही माजी आमदारांनी झोपा काढल्याने तलावातील गाळ निघाला नाही.
           पाटणच्या माजी आमदारांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चात गाळ काढणेसंदर्भात इतक्या वर्षे झोपा काढल्या का? असा सवाल आमदार शंभूराज देसाईंना केला होता. यासंदर्भात त्यांना विचारले असता मी जागा आहे म्हणूनच या तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली परंतू इतक्या वर्षे माजी आमदारांनीच झोपा काढल्याने महिंद असो वा डेरवण असो या तलावातील गाळ काढणे त्यांना जमले नाही असा टोला आमदार शंभूराज देसाईंनी बोलताना लगाविला.


No comments:

Post a Comment