Wednesday 19 December 2018

पिण्याच्या पाण्यासाठी तामकणेतील महिलांचा मोर्चा. योजना मंजूर होऊनही काम सुरु नाही, काम तातडीने सुरु न केल्यास बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा.


                  पिण्याच्या पाण्यासाठी तामकणेतील महिलांचा मोर्चा.
योजना मंजूर होऊनही काम सुरु नाही,
काम तातडीने सुरु न केल्यास बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा.
                  


दौलतनगर:-१9 - आमदार शंभूराज देसाई यांचे स्थानिक विकास निधीतून त्यांनी मंजूर करुन दिलेली नळ पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर सुरु करावी, या मागणीसाठी तामकणे ता. पाटण येथील ग्रामस्थांनी व महिलांनी मोठया संख्येने सोमवारी पाटण तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चात मंजुर असणारे पाणी पुरवठयाचे काम तातडीने सुरु करा अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी व महिलांनी दिला आहे.
             प्रांरभी पाटण येथील झेंडा चौक ते तहसिल कार्यालय असा धडक मोर्चा काढत तामकणे गावातील ग्रामस्थ व महिलांनी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तहसिलदार रामहरी भोसले यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, तामकणे गावात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने ग्रामस्थांनी व महिलांनी एकत्रित येवून तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे पाणी योजनेची मागणी केली. आमदार शंभूराज देसाई यांनी तात्काळ आमचे पाण्याचे गांभीर्य ओळखून पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सदरची योजना करणेकरीता प्रत्यक्ष पहाणी करुन अहवाल मागवला.संबंधित पाणी पुरवठा विभागाने नाथाची पाग येथून तामकणे गावच्या हद्दीतील उद्भभवातून या गावास पाणी  योजना करता येईल असा अहवाल दिल्यानंतर आमदार शंभूराज देसाई यांनी सन 2015-16 मध्ये त्यांचे स्थानिक विकास निधीतून तामकणे गांवास ग्रॅव्हीटी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सहा लाख रुपये निधी मंजूर केला. या कामाचा कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. परंतू कोणाच्या तरी राजकीय व्देषापोटी या कामात जाणिवपूर्वक अडथळा आणला जात आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे सदरच्या मंजुर योजनेचे काम लवकरात लवकर सुरु करावे याकरीता आम्ही हा मोर्चा काढला आहे. वास्तविक नाथाची पाग येथे ज्या ठिकाणी पाण्याचा उद्भभव आहे ते ठिकाण तामकणे गावच्या हद्दीत आहे. ते कुळातील असून त्या संदर्भात जमीन क्षेत्राचे संमतीपत्र येथील जमीन मालकाने दिले आहे. दुर्देवाने सध्या संमती देणारी व्यक्ती मयत झाली आहे. गेल्या 11 वर्षापुर्वी आम्ही ग्रामस्थ हे पाणी पिण्याकरीता वापरत होतो गत ११ वर्षांपासून आमच्या गावावरील डोंगरातून येणाऱ्या डोंगंरातून ओघळीतून येणाऱ्या पाण्याचा वापर आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी करीत आहोत. यामुळे आमचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नाथाची पाग येथील पाणी नाथाची पाग व तामकणे या दोन्ही गावाला पुरेल एवढे असल्याने आम्ही ग्रामस्थांनी या योजनेची मागणी केली आहे.नाथाची पाग येथील ग्रामस्थ पिण्याचे पाणी आम्हास पिण्यासाठी न देता शेतीकरीता वापरत आहेत हे अन्यायकारक आहे.
            दरम्यान सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन हे पाणी नाथाची पाग गावाला पुरेल असा अहवाल दिला आहे. तसेच योजना तात्काळ सुरु करण्याचे आदेश दिले असताना काम अद्याप सुरु करण्यात आले नाही.डोंगरातील ओघळीतून  येणाऱ्या पाण्यामुळे ग्रामस्थांचे तसेच आमचे मुलाबाळांचे आरोग्यास होणारा धोका ओळखून मंजूर करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करावे, अन्यथा सर्व ग्रामस्थ व महिला बेमुदत उपोषण करु असा इशारा निवेदनात दिला आहे.निवेदनावर दोनशेहून अधिक ग्रामस्थांच्या व महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment