Saturday 1 December 2018

मराठा आरक्षण कायदा प्रक्रियेत खारीचा वाटा मिळाल्याचे समाधान- आमदार शंभूराज देसाई. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख व युती शासनाचे मानले जाहीर.



दौलतनगर दि.01:   राज्यातील यापुर्वीच्या आघाडी शासनाने पंधरा वीस वर्षे सत्तेत राहून राज्यातील मराठा समाजाला आरक्षणापासून झुलवत ठेवले. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही अनेक वर्षांची मागणी आहे ते आरक्षण आघाडी शासन देवू शकले नाही.मात्र राज्यातील चार वर्षापुर्वी सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना युती शासनाने घटनात्मक बाबींची पूर्तता करून कायदयाच्या चौकटीत टिकेल आणि तेही इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहचणार नाही असे पूर्ण राज्यातील मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.शासनाच्या या ऐतिहासिक निर्णय प्रक्रियेत राज्य शासनाचा घटक म्हणून मला सहभागी होता आले हे माझे भाग्य असून हा ऐतिहासिक निंर्णय घेणाऱे राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे,युती शासनाचे आणि राज्यातील सर्व आमदारांचे आभार मानुन युतीच्या राज्य शासनाचे अभिनंदन करतो असे गौरवोद्गार आमदार शंभूराज देसाई यांनी काढले.           
                नवारस्ता ता.पाटण येथे राज्य शासनाने सकल मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत व युतीच्या शासनाचे जाहीर अभिनंदन व आभार मानणेकरीता पाटण मतदारसंघाच्या वतीने आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत आभार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पाटण मतदारसंघातील युवक,सकल मराठा समाजातील कार्यकर्ते, शिवसेना व शंभूराज युवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. प्रारंभी मुंबई अधिवेशनातून मतदारसंघात आलेले आमदार शंभूराज देसाईंचे स्वागत निसरेफाटा ता.पाटण याठिकाणी करण्यात आले.मानाचा फेटा बांधून आमदार शंभूराज देसाईंना हजारो युवकांनी पेढे व साखर भरवली त्यानंतर मोटारसायकल रॅलीवरुन आमदार शंभूराज देसाईंबरोबर हजारो युवक हे नवारस्ता येथील आभार कार्यक्रमस्थळी आले.
                     यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले, गेली 15 /20 वर्षे सातत्याने सत्तेत असणाऱ्या आघाडी सरकारने 2014 मध्ये निवडणूकीच्या तोंडावर घाईघाईने मराठा आरक्षण जाहीर केले मात्र हे आरक्षण कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर चौकटीत न बसविल्यामुळे केवळ दोनच दिवसांत ते आरक्षण रद्द झाल्याचे जाहीर झाले.सातत्याने सत्तेत राहूनही तत्कालीन आघाडी शासन आणि या शासनात  मिरविणाऱ्यांना गेल्या अनेक वर्षात सकल मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. अनेक वर्षाची असणारी मागणी पुर्ण होत नाही म्हणून राज्यामध्ये एकूण ५८ ठिकाणी लाखोंच्या संख्येने मोर्चे,आंदोलने झाली. कायदयाच्या चौकटीत बसेल आणि ते ही कोणत्याही इतर समाजांच्या आरक्षणला धक्का पोहचणार नाही असे आरक्षण देण्यासाठी युतीच्या शासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि या युतीच्या शासनाने हे मराठा आरक्षण जाहीर केले. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी ज्यावेळी भाजप शिवसेना या युती सरकारची भगवी लाट आली त्याचवेळी राज्यातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीपणे सुटणार अशी महाराष्ट्र राज्यातील सकल मराठा समाजाला आशा वाटत होती ते काम युतीच्या शासनाने करुन दाखविले.कोणतेही आरक्षण देण्याचा अधिकार हा केवळ मंत्री समिती नेमून या मंत्री समितीला नव्हे तर राज्य मागास आयोगाला असतात याची साधी कल्पना आघाडी शासनकर्त्यांना नसावी हे राज्याचे दुर्दैव आहे अशी टीका तत्कालीन आघाडी सरकारवर करुन ते म्हणाले, मराठी समाजाची मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करायची असेल तर कायद्याच्या चौकटीत बसणारेच आरक्षण दिले पाहिजे यासाठी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न केला आमचे शिवसेना पक्षानेही सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली. विधानसभेत विधानसभेतील सर्व मराठा समाजातील विधानसभा सदस्यांनी मराठा आरक्षणाची मागणी सातत्याने शासनापुढे आणली. मंत्री ना.चंद्रकांत पाटील, ना. एकनाथ शिंदे यांच्या समितीने दिवसरात्र काम केले आणि अखेर सर्व घटनात्मक बाबींची पूर्तता करून आणि कायद्याच्या चौकटीत बसेल असे मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण केवळ जाहीर केले नाही तर दोन्ही सभागृहात संमत करुन घेतले या संदर्भात कायदाही संमत झाला.त्यामुळे हे आरक्षण जाहीर करून त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी गेल्या चार वर्षापासून प्रयत्नशील असणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे,सत्तेत असणारे युतीचे शासन व राज्यातील सर्व आमदार या सर्वांचे आपण पाटण मतदारसंघाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करुन युती शासनाचे जाहीर अभिनंदन करतो असे सांगत राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्नही शासन येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा लागतो तसेच मुस्लिम आरक्षणासाठी ही शासन सकारात्मक असल्याचे आमदार देसाई यांनी यावेळी बोलताना सांगितले.
चौकट :मुख्यमंत्री यांना श्रेयच घ्यायचे असते तर...!
मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडिविण्यासाठी फार मोठे दिव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पार करावे लागले. विरोधकांना गेल्या 20 वर्षात जमले नाही ते अवघ्या 4 वर्षात त्यांनी करून दाखवले.मराठा आरक्षण हा तर ऐतिहासिक निर्णय यशस्वी झाला.याचे श्रेयच घ्यायचे असते तर... मुख्यमंत्र्यांनी सभागृहात तासभर भाषण केले असते मात्र मराठा आरक्षण प्रक्रियेत त्यांना कोणताही धोका पत्कारायचा नव्हता असे आमदार देसाई यांनी स्पष्ट केले.दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील एकूण 5८ मोर्चातील 42 मराठा बांधव शहीद झाले त्यामध्ये पाटण तालुक्यातील खोनोली येथील रोहन तोडकर याचा समावेश आहे.त्यामुळे सर्व शहीद यांना श्रद्धांजली व्यक्त करून तोडकर यांच्या कुटुंबाला शासनाकडून सर्वोतोपरी मदत देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट: नोकरीत भूकंपग्रस्तांना होणार दुहेरी फायदा - राज्यात लवकरच 80 हजार पदांची मेगा भरती सुरु होणार असून या मेगा भरतीत मराठा समाजातील तरुणांना 16 टक्के आरक्षण तर मिळणारच आहे त्यात अधिक भर म्हणून पाटण तालुक्यातील तरुणांना ३ टक्के भूकंपग्रस्त म्हणून ही दुहेरी आरक्षणाचा फायदा होणार असल्याचे सांगताच सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला.कार्यक्रमात ॲड डी पी जाधव ,डॉ दिलीपराव चव्हाण, शिवसेना पक्षाचे जयवंतराव शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment