Saturday 9 October 2021

बाधितग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी शासन कटीबध्द-ना.शंभूराज देसाई ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबियांना तात्पुरत्या निवारागृहाचे करण्यात आले वाटप.

 


दौलतनगर दि.09(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- माहे जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावात भुस्खलन होऊन घरे बाधित झाली होती. या गावातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून कोयनानगर येथील माध्यमिक व प्राथमिक शाळेत तात्पुरत्या स्वरुपात रहात होते.या आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी कोयनानगर येथील शासकीय वसाहतीमधील १५० मोडकळीस आलेल्या खोल्यांची तातडीने दुरुस्ती करुन पहिल्या टप्प्यात 70 आपत्तीग्रस्त कुटुंबियांना या तात्पुरत्या निवारागृहाचे वाटप आज होत असून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांतील कुटुंबांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी शासन कटीबध्द आहे. लकरच या बाधितग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविणार असल्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभुराज देसाई यांनी सांगीतले आहे.

            अतिवृष्टीमुळे दरड कोसळून घरांचे पूर्णत: नुकसान झालेल्या कुटुंबांना तात्पुरत्या निवारागृहाचे वितरण गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते झाले.यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,धोंडीराम भोमकर,शैलेंद्र शेलार,विजय बाकाडे,उपविभागीय अधिकारी सुनिल गाढे,तहसिलदार रमेश पाटील, कार्यकारी अभियंता नितीश पोतदार,सा.बा.उपअभियंता अजित पाटील व बाधित कुटुंबिय यांची  उपस्थिती होती.

           यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावांत भूस्खलन होवुन आपत्तीचा डोंगर काळ बनुन गावांवर कोसळला होता. यामध्ये मिरगाव, ढोकावळे व हुंबरळी येथील घरे जमीनदोस्त झाली होती. यामुळे या तीन गावांचे अस्तित्व धोक्यात आले होते. या तीन गावांतील सर्व ग्रामस्थांना कोयनानगर,चाफेर,मिरगाव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत तर हुंबरळी येथील लोकांना पर्यटन महामंडळ व खाजगी मालकाच्या रिसॉर्टमध्ये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले.अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बाधितग्रस्तांची तातडीने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन देण्यास महाविकास आघाडीच्या सरकारने प्राधान्य दिले. त्यानुसार कोयना प्रकल्पाच्या शासकीय वसाहतीतील मोडकळीस आलेल्या खोल्या दुरूस्त करून त्या खोल्यांमध्ये आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन या दुरुस्तीचे कामासाठी तातडीने मान्यता घेऊन मोडकळीस आलेल्या खोल्या तातडीने नव्या स्वरूपात उभारण्याचे काम युध्द पातळीवर सुरु करुन बाधितग्रस्तांचा तात्पुरत्या निवाऱ्याचा विषय निकाली काढण्यास आपल्याला यश आल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की. कोयनानगर येथील कोयना वसाहतीमधील या खोल्यांमध्ये मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या आपत्तीग्रस्त गावातील बाधितांचे तात्पुरते निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.दरम्यान मिरगाव,हुंबरळी  व ढोकावळे या गावांना कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याकरीता जागा पसंती करण्यासंदर्भात अधिकार दिले आहेत. महसूल विभागाकडून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येत असून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना कायमस्वरुपी घरे उभारुन देण्यासाठी शासन सकारात्मक असून बाधितग्रस्तांचे  कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी महाविकास आघाडीचे शासन कटीबध्द असल्याचे त्यांनी शेवटी म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment