Monday 30 March 2020

बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येकांने स्वत:ची आरोग्य तपासणी करुन घ्या. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांना जाहीर आवाहन.



                               दौलतनगर दि.३० :-  महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणू बाधित व्यक्तींची संख्या सुमारे २०० च्या वर गेली असून दिवसेंदिवस यामध्ये वाढच होत आहे.पाटण मतदारसंघात मोठया संख्येने नागरिक मुंबई,पुणे तसेच बाहेर गांवाहून आपआपल्या गांवी आले आहेत.बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तालुका प्रशासनातील आरोग्य विभागाने तात्काळ तपासणी करुन घ्यावी जेणेकरुन कोणताही धोका निर्माण होणार नाही.अशा सुचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत परंतू आपली आरोग्य तपासणी करुन घेण्याची जबाबदारी ही बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येकाची आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकांने स्वत:ची आणि त्यांच्या परिवाराची काळजी घेणेकरीता सर्दी, ताप, खोकला याची काही लक्षणे दिसताच तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून आरोग्य तपासणी करुन घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे जाहीर आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.
            कोरोना आजाराच्या दक्षतेसाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय याठिकाणी आज आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे बैठकीच्या माध्यमातून पाटण मतदारसंघात बाहेरगांवाहुन आलेल्या प्रत्येक नागरिकांना हे आवाहन केले आहे.बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, सपोनि तृप्ती सोनवणे,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.
         कोरोना आजारापासून मुक्तता मिळणेकरीता राज्यामध्ये देशामध्ये सर्वच स्तरावरुन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.बाहेरील देशातून,राज्यातून तसेच मुंबई,पुणे शहरातून मोठया प्रमाणांत नागरिक आपल्या पाटण मतदारसंघात आले असून याची नोंद मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्यामार्फत करण्यात आली आहे तसेच संबधित विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत बाहेरगांवाहून आलेल्या व्यक्तींना सर्दी, ताप, खोकला आहे का ? याची माहितीही घेतली जात आहे. अशी कोणी व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर तात्काळ उपचारही करण्यात येत आहेत. बाहेर गांवाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तींने आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्दी, ताप, खोकला अशी काही लक्षणे जाणवू लागल्यास तात्काळ आपण स्वत: व आपल्या कुटुंबिंयाची आरोग्य तपासणी ही जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून करुन घ्यावी तसेच सर्दी,ताप,खोकला ही लक्षणे जाणवत असूनही कुणी यासंदर्भात निष्काळजीपणा करु नये आपल्या स्वत:च्या तसेच कुटुंबियांच्या व पर्यायाने गावांतील व्यक्तींच्या आरोग्याकरीता आपल्याला जाणवत असलेल्या आजाराची माहिती प्रशासनातील कोणत्याही अधिकारी,कर्मचारी यांचेकडे दयावी जेणेकरुन आपल्यांला त्यांची तपासणी करुन त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा देता येतील. बाहेरुन आलेला प्रत्येक व्यक्ती हा आजारीच आहे असे काही नाही परंतू कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव लक्षात घेता आपल्या व आपल्या कुटंबियांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपण आरोग्य तपासणी करुन घेणे यात गैर असे काहीच नाही. आपणच आपले रक्षक असून आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची दक्षता ही ज्याची त्याने घ्यावयाची आहे. आपल्याला मुंबई, पुणे शहरातून सुरक्षित आपले गावी येता आले आहे. गावापर्यंत सुरक्षित आलोच आहोत तर गांवातही सुरक्षित राहूया याकरीता ही आरोग्य तपासणी करुन घेणे गरजेचे आहे ती तपासणी बाहेर गांवाहून आलेल्या प्रत्येकांनी करुन घ्यावी असे मी बैठकीच्या माध्यमातून सर्वांनाच आवाहन करीत असल्याचे सांगून ना.शंभूराज देसाईंनी कोरोनासंदर्भात पाटण मतदारसंघात करावयाच्या इतर उपाययोजना संदर्भात उपस्थित सर्व अधिकारी यांना सुचना केल्या.
चौकट:- ना.शंभूराज देसाईंनी अचानक दिली मल्हारपेठ आरोग्य केंद्राला भेट.
            कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना सतर्क राहण्याच्या सुचना करण्यात आल्या असून आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी खरोखरच सतर्क आहेत का ?  हे पाहण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी अचानक पाटण मतदारसंघातील मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली त्यावेळी सर्व यंत्रणा ही सज्ज व सतर्क असल्याचे दिसून आले.

No comments:

Post a Comment