Monday, 9 March 2020

कोयना धरणात बोटींग सुरु करणेसंदर्भात प्रत्यक्ष पहाणी करुन अहवाल गृहमंत्रालयाकडे सादर करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकांना आदेश.


                दौलतनगर दि.:- कोयना धरणात बोटींग सुरु करणेसंदर्भात मागील आठवडयात उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे बैठक झाली होती या बैठकीमध्ये धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.या चर्चेमध्ये कोयना धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णय घेणेकरीता गृह विभागाचा  सविस्तर अहवाल प्राप्त होणे गरजेचे असून यासंदर्भात गृहविभागाची बैठक घेण्याचे ठरविण्यात आलेनुसार जिल्हाधिकारी,सातारा व सातारा पोलीस अधीक्षक या दोघांनी बोटींग सुरु करण्याच्या जागांची संयुक्त पहाणी करुन याचा तात्काळ अहवाल गृहमंत्रालयाकडे सादर करावा जेणेकरुन यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांचेकडे अधिवेशन काळात बैठक घेवून निर्णय घेणे शक्य होईल असे आदेश गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह,पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांना दिले.
              उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे झालेल्या बैठकीत गृह विभागाची बैठक घेण्याचे ठरल्यानुसार आज सातारा विश्रामगृह याठिकाणी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या विषयासंदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीस सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह,पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते,कोयना धरण व्यवस्थापन अधीक्षक अभियंता एस.एल.डोईफोडे,कार्यकारी अभियंता कुमार पाटील,वन्यजीवचे विभागाचे प्रभारी उपसंचालक महादेव मोहिते,वन्यजीव कोयना विभागाचे सहाय्यक वनसरंक्षक सुरेश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                  याप्रसंगी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापन अधीक्षक अभियंता एस. एल.डोईफोडे यांचेकडून कोयना धरणाच्या जलाशयातील बोटींग करण्याच्या जलक्षेत्र उपलब्ध असणाऱ्या ठिकाणांची माहिती घेतली.यामध्ये धरणाच्या भिंतीपासून सुमारे ५ किमी अंतरावर बोटींग करणेकरीता मान्यता दयावी याकरीता मी स्वत: तत्कालीन गृहमंत्री केसरकर व तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी हवाई तसेच प्रत्यक्ष जागांची पहाणी केली होती. तसेच यासंदर्भात तत्कालीन गृहराज्यमंत्री यांच्याकडे बैठकाही झाल्या होत्या.कोयना धरणामध्ये बोटींग सुरु व्हावे याकरीता मी स्वत: आग्रही आहे.परंतू धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बोटींग करण्याकरीताची जागा निश्चित करणे आवश्यक आहे. कोयना धरणामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्या ठिकाणी बोटींग सुरु करण्याकरीता वाव आहे हे पहाण्याकरीता जिल्हाधिकारी, सातारा व सातारा पोलीस अधीक्षक या दोघांनी बोटींग सुरु करण्याच्या जागांची संयुक्त पहाणी करुन याचा तात्काळ अहवाल गृहमंत्रालयाकडे सादर करावा.अधिवेशनाचा कालावधी अजुन दोन आठवडयाचा आहे यापुर्वी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या जागांची प्रत्यक्ष पहाणी करावी व अहवाल तयार करावा म्हणजे अधिवेशन काळातच उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे उच्चस्तरीय बैठक घेवून या बोटींग सुरु करणेसंदर्भात निर्णय घेता येईल असे ना.शंभूराज देसाईंनी सुचित केले यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी कोयना धरण व्यवस्थापनचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व वन्यजीव विभागाचे संबधित वरीष्ठ अधिकारी एकत्रितपणे लवकरच त्या जांगाची प्रत्यक्ष पहाणी करुन लवकरच या विषयासंदर्भातील अहवाल सादर करतो असे सांगितले.


Sunday, 8 March 2020

“चुल आणि मुल ” या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिलांनी बाहेर येवून आपली प्रगती साधावी. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे प्रतिपादन.


                दौलतनगर दि.:- जगभरात आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत असून  ग्रामीण भागातील महिलांनीचुल आणि मुल ” या संकल्पनेतुन बाहेर येवून आपली प्रगती साधण्याकरीता पुढाकार घ्यावा. आजच्या युगात महिलांना विविध क्षेत्रात पाऊल ठेवून आपली प्रगती साधता येणे सहज शक्य झाले आहे. शहरातील सर्व मुली,महिला सर्वच क्षेत्रात जी प्रगती करीत आहेत हे आश्चर्यकारक आहे.ग्रामीण भागातील महिलांमध्येही बुध्दीमत्ता,कल्पनाशक्ती मोठया प्रमाणात आहेत.आपली प्रतिमा आणि प्रतिभा निर्माण करुन ग्रामीण भागातील महिलांनी विविध क्षेत्रामध्ये आपली चमक दाखवावी असे प्रतिपादन राज्याचे गृह,वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.
               मरळी ता.पाटण येथे जागतिक महिला दिनानिमित्त मारुलहवेली पंचायत समिती गणाच्या वतीने महिलांचा ५ वा सस्नेह मेळावा व हळदी कुंकु कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता या मेळाव्याचे उदघाटन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमास मारुलहवेली जिल्हा परीषद गटाच्या जि.प.सदस्या सौ.सुग्रा खोंदू,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,पाटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.मीना साळुंखे,जि.प.सदस्य विजय पवार,माजी सदस्य जालंदर पाटील, सामाजीक कार्यकर्त्या श्रीमती राणी पाटील,पाटण तालुका महिला सरपंच परीषदेच्या अध्यक्षा सौ.वैशाली मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
              याप्रसंगी मार्गदर्शन करताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,आपल्या देशामध्ये विविध भागातील महिलांनी देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे.आपल्या भारतात भारताच्या पहिल्या पंतप्रधान होण्याचा मान स्व.इंदिरा गांधी यांना मिळाला,पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना मिळाला. अनेक कतृत्ववान महिला आज देशाचे, राज्याचे, जिल्हयाचे, तालुक्याचे नेतृत्व करीत असताना आपण पहात आहोत. आजची महिला अबला राहिली नसून पुरुषाच्या खादयांला खांदा लावून ही महिला सर्व क्षेत्रात काम करु शकते तेवढा आत्मविश्वास या महिलांमध्ये निर्माण झाला आहे.गेल्या पाच दशकातील महिलांना जे हाल सोसावे लागले,अपरिमित असे हाल सहन करावे लागले, ते आजच्या सावित्रीच्या लेकींना निश्चीतच सहन करावे लागत नाही याचे कारण आजच्या मुलींना,महिलांना विविध क्षेत्रामध्ये आपले कृर्तत्व दाखविण्याच्या अगणित संधी मिळत आहेत.स्वालंबन हा त्यांच्या जगण्याचा मुलमंत्र होवू पहात आहे ही खरोखरच गौरवास्पद बाब आहे. ग्रामीण भागातील महिलांनीही याचे अनुकरण करावे. आपल्याला ग्रामीण भागात मिळणारा वेळ याचा सदुपयोग करुन महिलांनी एकत्रित येवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे महिलांकरीता व्यवसाय उभारणी करावी तसेच महिला बचत गटांची निर्मिती करावी. जेणेकरुन याचा लाभ महिलांच्या प्रगतीकरीता त्यांच्या कुटुंबाकरीता होईल. ग्रामीण भागातील महिलांसाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्याचे नियोजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी केले आहे.महिलांवरील अत्याचाराच्या होणाऱ्या घटना पाहून मुख्यमंत्री यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हयात सर्व अधिकारी व कर्मचारी महिला असणाऱ्या किमान एक महिला पोलीस ठाण्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून मी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये विधानपरीषदेमध्ये याची घोषणा देखील केली आहे. असेही ते शेवठी बोलताना म्हणाले व त्यांनी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
               यावेळी सामाजीक कार्यकर्त्या श्रीमती राणी पाटील यांनी “चला नाती जपुया” व पाटण तालुका महिला सरपंच परीषदेच्या अध्यक्षा सौ.वैशाली मोकाशी “महिला व्यवसाय उभारणी व बचत गट” या विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी राज्य शासनाच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीचे सादरीकरणही याठिकाणी करण्यात आले. मेळाव्याचे आयोजन पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,ग्रामपंचायत मरळी,मरळी विकास सेवा सोसायटी,ज्योतिर्लिंग दुध संघ,शंभूराज युवा संघटना मरळी यांच्या वतीने करण्यात आले होते.


लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा दि.10 मार्च रोजी ११० वा जयंती सोहळा कार्यक्रम. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची प्रमुख उपस्थिती.


दौलतनगर दि.:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा ११० वा जयंती सोहळा कार्यक्रम मंगळवार दि.१० मार्च, २०२० रोजी सकाळी १०.०० वा.दौलतनगर (मरळी), ता.पाटण या ठिकाणी संपन्न होणार असून हा कार्यक्रम महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमास राज्याचे नवनिर्वाचीत गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी पाटण तालुक्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी मंगळवार दि.१० मार्च, २०२० रोजी स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा ११० वा जयंती सोहळा कार्यक्रम दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी आयोजीत करण्यात आला असून हा कार्यक्रम अतिशय दिमाखदार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राज्याचे नवनिर्वाचीत गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यांचेसोबत मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई हेही उपस्थित राहणार आहेत.


Friday, 6 March 2020

बनपेठवाडी (येराड),गुंजाळी येथे कोयना नदीकाठी घाट व पुरसंरक्षक भिंतीच्या कामांना वित्तमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले 06 कोटी 26 लाख 38 हजार रुपये मंजूर.प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय दि.06 मार्च रोजी पारित.




 दौलतनगर दि.०६:- पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना कोयना नदीस अतिवृष्टीच्या काळात येणाऱ्या पुरामुळे धोका निर्माण होत असल्याने १० गावांना पुर संरक्षक भिंती बांधण्यास व कोयना नदीवर घाट बांधणेस राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी राज्याचे अर्थमंत्री ना.शंभूराज देसाईंची सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिकमध्ये आमदार असताना सातत्याची शासनाकडे मागणी होती.गत पंचवार्षिकमध्ये आमदार असताना त्यांनी ०७ गावांना कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीता भरघोस असा निधी मंजुर करुन आणला होता यातील तीन गांवाना निधी मिळणे बाकी होते त्यातील बनपेठवाडी (येराड), गुंजाळी या दोन गावांना कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीता अर्थमंत्री ना.शंभूराज देसाईंनी 06 कोटी 26 लाख 38 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या जलसंपदा विभागाने दि. 06 मार्च 2020 रोजी पारित केला आहे.
                          पाटण मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना पावसाळयामध्ये कोयना धरणातून वारंवार सोडण्यांत येणाऱ्या पाण्यामुळे कोयना नदीस पुर आल्यानंतर नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होत असल्याने मतदारसंघातील कोयना नदीकाठच्या अशा 10 गावांना कोयना नदीवर घाट व संरक्षक भिंत बांधणेच्या कामांस राज्य शासनाने जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन द्यावा अशी त्यांची सन 2004 पासून राज्य शासनाकडे मागणी होती. यासंदर्भात त्यांनी दि. 03.08.2016 रोजी लक्षवेधी सुचनाही विधानसभा सभागृहात मांडली होती त्यावेळी तात्काळ या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन लक्षवेधी सुचनेला दिले होते.त्यानुसार मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या व पुराचा धोका निर्माण होणाऱ्या मंद्रुळ हवेली,नेरळे,गिरेवाडी,पश्चिम सुपने,केसे,साजूर व तांबवे या ०७ गावांना कोयना नदीवर घाट व पुरसंरक्षक भिंती बांधण्यास आवश्यक असणारा निधी त्यांनी गत पंचवार्षिकमध्येच मंजुर करुन आणला होता आज या कामांना प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली असून यातील अनेक कामे प्रगतीपथावर असून लवकरच पुर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
                    उर्वरीत राहिलेल्या सांगवड,बनपेठवाडी(येराड)  गुंजाळी या दोन गांवातील  कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीता ना.शंभूराज देसाईंनी अर्थमंत्री झालेनंतर जलसंपदा विभागाकडून सविस्तर प्रस्ताव मागवून घेतला व या तीन गावापैकी बनपेठवाडी(येराड)  गुंजाळी या दोन गांवाना अनुक्रमे ०२ कोटी ६९ लाख  ८१ हजार व ०३ कोटी ५६ लाख ५७ हजार असा एकूण 06 कोटी 26 लाख 38 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.याचा शासन निर्णयही दि.०६ मार्च रोजी जलंसपदा विभागाने पारित केला आहे.सांगवड या गावाला नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीताचे अंदाजपत्रक सुमारे ०५ कोटी रुपयांच्या वर गेल्यामुळे या कामांस विशेष मान्यता घेवून निधी मंजुर करण्यात येणार असल्याने १० पैकी केवळ ०१ गांवास नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीताचा निधी मंजुर करणे प्रलंबीत असून लवकरच सांगवड या गावाच्या कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीताचा निधी मंजुर करण्यात येईल असेही अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.
                      

अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईकडून अर्थसंकल्पात सातारा जिल्हयाला न्याय. डोंगरी तालुक्याच्या विकासासह सातारा जिल्हयाच्या पदरात भरघोस निधी.




दौलतनगर दि.०६:-महाराष्ट्र राज्याचे गृह व अर्थ,नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज महाराष्ट्र विधान  परिषदेमध्ये महाराष्ट्र शासनाचा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पामध्ये आपले होमपिच असणाऱ्या सातारा जिल्हयाच्या पदरात झुकते माप त्यांनी टाकले असून सातारा येथे नविन वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करणेकरीता,पाचगणी महाबळेश्वर पर्यटनाला चालना देणेकरीता विकास आराखडा मंजुरी,सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकरीता निधी देण्याबरोबर डोंगरी तालुक्याच्या विकासासह पाटण विधानसभा मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टीने धोरणात्मक असे निर्णय घेत सातारा जिल्हयाच्या पदरात भरघोस असा निधी मंजुर करुन घेत आवश्यक तेवढया निधीची तरतूद करुन घेण्यास अर्थराज्यमंत्री म्हणून ते यशस्वी झाले आहेत.
                                 घार हिंडे आकाशी,चित्त तिचे पिलापाशी” या म्हणीप्रमाणे सातारा जिल्हयाचे सुपुत्र व राज्याचे नवनिर्वाचित गृह व अर्थ,नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज राज्याचे अर्थराज्यमंत्री या नात्याने महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये महाराष्ट्र शासनाचा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.सुमारे ०१ तास ११ मिनींटे सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या सातारा जिल्हयाला राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी अनेक वर्षापासून राजकीय नेत्यांच्या केवळ आश्वासनावर अवलंबून राहिलेले सातारा येथील नविन वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यास व सन २०२१-२२ पासून सदरचे साताऱ्याचे नविन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्याचे शासनाचे नियोजन असल्याची जाहीर घोषणा सभागृहात केली. तसेच सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास रुपये १२ कोटी उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगून पाचगणी महाबळेश्वर येथे पर्यटनाला चालना मिळणेकरीता विकास आराखडयाला १०० कोटी रुपये इतका नियतव्यय राखीव ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी जाहीर केले.नविन वैद्यकीय महाविद्यालय,छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय,पाचगणी महाबळेश्वर विकास आराखडयामुळे सातारा जिल्हयाच्या वैभवात वाढच होणार असून जिल्हयाच्या सुपुत्रांने जिल्हयाला या निर्णयामुळे न्याय मिळवून दिल्याची भावना सबंध सातारा जिल्हयातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.अर्थराज्यमंत्री म्हणून विधानपरिषदेमध्ये अर्थसंकल्प मांडत असताना सातारा जिल्हयातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने घोषणा करीत असताना ना.शंभूराज देसाईंनी इंचभर छाती फुगवून सातारा या डोंगरी जिल्हयाला राज्याच्या अर्थसंकल्पात मानाचे स्थान मिळवून दिले आहे.
                              आपण ज्या मतदारसंघातून राज्याचे नेतृत्व करतो तो पाटण विधानसभा मतदारसंघ ज्याप्रमाणे डोंगरी आणि दुर्गम मतदारसंघ आहे तशाच प्रकारे सातारा जिल्हयातील इतर मतदारसंघही डोंगरी आणि दुर्गम मतदारसंघ आहेत ही भावना मनी बाळगून त्यांनी राज्याचे अर्थराज्यमंत्री या नात्याने डोंगरी तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने तसेच डोंगरी भागाच्या विकासाकरीता व डोंगरी तालुक्यातील प्रलंबीत कामे गतीने पुर्ण करण्याची आवश्यकता ओळखून आवश्यक असणारा निधी राज्याच्या अर्थसंकल्पातून मंजुर करण्याची भूमिका घेतली आणि डोंगरी तालुक्याच्या विकासाकरीता पहिल्यांदाच सुमारे ९५ कोटी रुपयांचा नियतव्यय यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केला.तर परिवहन महामंडळाच्या जुन्या बस बदलून सुमारे १६०० नवीन बस विकत घेण्यात येणार असून यातील जास्तीत जास्त बस व मिनीबस सातारा जिल्हयातील डोंगरी तालुक्यात विभागून देण्याकरीता प्रयत्नशील असून अत्याधुनिक बसस्थानके उभारण्यासाठीही निधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
                                ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागातील शेतकरी यांना न्याय देण्याबरोबर ना.शंभूराज देसाईंनी त्यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनेही अर्थसंकल्पामध्ये भरीव असा नियतव्यय मंजुर करुन घेतला आहे यामध्ये पाटण येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करुन या रुग्णालयामध्ये १०० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय करण्यास मंजुरी घेतली आहे.तसेच  पाटण तालुक्यातील तीन धारी धबधबा,रामघळ धबधबा,घाटमाथा ते हुंबरळी वॉकींग ट्रॅक,केमसे नाका वॉकींग ट्रॅक या पर्यटन स्थळांनाही निधी मंजुर करुन घेतला आहे.थोर व्यक्तींच्या स्मारकांची कामे पुर्ण करणे यातून त्यांनी महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दौलतनगर ता.पाटण येथील शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाकरीताही निधी मंजुर करुन घेतला आहे.याची प्रशासकीय मान्यताही शासनाने तात्काळ दिली आहे.
                            माहे जुलै-ऑगस्ट,२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे तसेच ऑक्टोंबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या मदतीची वाट न पहाता राज्य शासनाने त्यांच्या स्वत:च्या निधीतून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली असल्याचे सांगून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. मागील दोन वर्षापासून शेतीपंपासाठी नवीन वीजजोडणी देणे बंद होते ती वीजजोडणी करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे धोरण त्यांनी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले आहे.तसेच राज्यातील विधीमंडळ सदस्यांच्या आमदार फंडामध्ये ०१ कोटीची वाढ करुन एका वर्षाला ०३ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात येत असल्याची घोषणा करुन विधीमंडळ सदस्यांना सुखद असा धक्का दिला असून पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांचेकडे असणाऱ्या वित्त व नियोजन विभागामुळे त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनहितार्थ अनेक कामे राज्याच्या अर्थसंकल्पातून मंजुर होणेकरीता प्रस्तावित केली असून अर्थराज्यमंत्री म्हणून या सर्व कामांना कालबध्द मंजुरी घेणेकरीता मी कटीबध्द असून मी विधानपरिषदेमध्ये सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेश असून राज्यातील शेतकरी वर्गापासून सर्व जनतेला न्याय देणारा असल्याची प्रतिक्रिया ना.शंभूराज देसाईंनी दिली आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांस राज्य शासनाची मान्यता. दि.०५ मार्च रोजी प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय पारित. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई



दौलतनगर दि.०6:-महाराष्ट्राचे पोलादी पुरुष माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दौलतनगर,ता.पाटण येथील शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी रुपये 1499.98 लक्ष एवढया रक्कमेच्या सादर केलेल्या अंदाजित किंमतीस वित्त विभाग व नियोजन विभागाने कामांच्या आराखडा व अंदाजपत्रकाचे प्रस्तावांस प्रशासकीय मान्यता दिली असल्याचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून दि. 05 मार्च, 2020 रोजी पारित केला असल्याची माहिती गृह,वित्त व नियोजन राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
 राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी म्हंटले आहे,महाराष्ट्राचे पोलादी नेतृत्व राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कर्म आणि जन्मभूमित लोकनेतेसाहेब यांचे सन २०१० चे जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील भव्य असे शताब्दी स्मारक उभारण्याचा आपण सर्वांनी संकल्प केला होता.आपल्या सर्वांचा संकल्प माझे सातत्याच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने पुर्ण केला असून सन २०१५ मध्ये दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेतेसाहेब यांचे जन्मभूमित हे शताब्दी स्मारक उभारण्याकरीता मान्यता देवून राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला होता.सदर शताब्दी स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम दौलतनगर येथे दिमाखात उभे असून या शताब्दी स्मारकामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या स्मृती जिवंत ठेवण्याचे काम आपण केले आहे. लोकनेतेसाहेब यांचे चिरंतन स्मारक म्हणून या शताब्दीकडे पाहिले जात असून महाराष्ट्र दौलत या नावाने उभे राहिलेल्या या स्मारकामध्ये ग्रामीण भागातील मुलांना एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी.चा अभ्यास करता यावा याकरीता चांगली डिजीटल अभ्यासिका आपण उभारली आहे.
 शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांस राज्य शासनाने वाढीवचा १५ कोटी रुपयांचा निधी मंजुर करावा अशी मागणी आपली राज्य शासनाकडे होती. राज्याचा अर्थ खात्याचा मंत्री म्हणून माझी निवड झालेनंतर तात्काळ लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकामास आवश्यक असणारा १५ कोटी रुपयांचा निधी मिळावा याकरीता शासनाकडे पाठपुरावा केला त्यानुसार दोन महिन्याच्या आतच महाविकास आघाडीच्या शासनाला १०० दिवस पुर्ण होत असताना राज्य शासनाने दौलतनगर,ता.पाटण येथे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी रुपये 1499.98लक्ष एवढया रक्कमेच्या सादर केलेल्या अंदाजित किंमतीस वित्त विभाग व नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याचा शासन निर्णय ही सामान्य प्रशासन विभागाकडून दि. 05 मार्च, 2020 रोजी पारित केला आहे. दि.१० मार्च २०२० रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची ११० जयंती दौलतनगर येथे साजरी होत आहे. ११० व्या जयंती कार्यक्रमापुर्वी राज्य शासनाने शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता दिल्याचा अत्यानंद आहे. या दुसऱ्या टप्प्याच्या शताब्दी स्मारकामध्ये भव्य असे ऑडिटोरिय तसेच एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. चा अभ्यासिकेमध्ये अभ्यास करण्याकरीता येणाऱ्या ग्रामीण भागातील मुला- मुलींचे वसतीगृह उभारण्याचा आमचा मानस आहे. महाविकास आघाडीच्या शासनाने लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांकरीता प्रशासकीय मान्यता दिल्याबदृल राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे, अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांचे मी आभार व्यक्त करतो असेही ना.शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.
चौकट:- राज्याच्या अर्थसंकल्पात शताब्दी स्मारकाच्या कामांस भरीव निधीची तरतूद.
सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प मी विधानपरिषदेमध्ये दि.०६ मार्च रोजी सादर केला असून या अर्थसंकल्पामध्ये सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरीता ३५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद राज्यातील महान व्यक्तींच्या स्मारकांकरीता केली आहे यातून लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांस भरीव अशी निधीची तरतूद केली असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.

Wednesday, 4 March 2020

सातारा जिल्हयाच्या विकासाला कालबध्द गती देण्याचे मुख्यमंत्री यांचे आश्वासन. कृषी सिचाई योजनेतंर्गत धरणाच्या कामांना मिळणार गती. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची माहिती.




            दौलतनगर दि.०४:- सातारा जिल्हयातील प्रलंबीत विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी विधानभवनात घेतलेल्या आढावा बैठकीत सातारा जिल्हयातील जलसिंचनाच्या कृषी सिचाई योजनेतंर्गत समाविष्ठ असणाऱ्या धरण प्रकल्पासह,इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांवरील रस्ते,ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या कामांना व प्रलंबीत असणाऱ्या विकासकामांना कालबध्द गती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी दिले आहे.मुख्यमंत्री यांचेकडे झालेल्या बैठकीमुळे सातारा जिल्हयातील पंतप्रधान कृषी सिचाई योजनेतंर्गत सहा धरण प्रकल्पांचा समावेश असून यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील वांग मराठवाडी,तारळी आणि मोरणा गुरेघर या तीन मध्यम धरण प्रकल्पांचा समावेश असून या प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार असून तारळी धरण प्रकल्पातील धुमकवाडी,आवर्डे,कोंजवडे,बांबवडे व तारळे  या पाच उपसा जलसिंचन योजनांची कामे मुदतीत पुर्ण करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री यांनी बैठकीत दिल्या असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिली आहे.
          मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली सातारा जिल्हयाच्या प्रलंबीत विकासकांमासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीस जिल्हयाचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील,माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सातारा जिल्हयातील सर्व आमदार, मुख्य सचिव अजोय मेहता व सर्व संबधित विभागांचे सचिव यांची उपस्थिती होती.
            मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी या बैठकीची सुरुवात करण्याची संधी मला दिल्यामुळे सातारा जिल्हयातील प्रलंबीत विविध विकासकामांचा आढावा बैठकीमध्ये देत असताना पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रलंबीत असणाऱ्या काही बाबींकडे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे लक्ष वेधले यामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत सातारा जिल्हयातील पंतप्रधान कृषी सिचाई योजनेतंर्गत सहा धरण प्रकल्पांचा समावेश असून पाटण मतदारसंघातील तीन मध्यम धरण प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.यातील तारळी मध्यम धरण प्रकल्पातून नदीच्या दोन्ही तीरावरील शेतकऱ्यांच्या ५० मीटर उंचीच्या वरील डोंगरपायथ्यापर्यंतचे १०० टक्के जमिन क्षेत्रास धुमकवाडी, आवर्डे,कोंजवडे,बांबवडे व तारळे येथे उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी देण्यास शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता देवून आवश्यक असणारा निधीही दिला आहे. या योजनांची कामे संथगतीने सुरु आहेत त्यास गती देण्याची गरज आहे तसेच मोरणा गुरेघर प्रकल्पाच्या उजव्या बाजूच्या कालव्यामुळे डोंगरपायथ्यापर्यंतचे क्षेत्र ओलिताखाली येत नसल्याने या क्षेत्राला उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी देण्याकरीता सदर प्रस्ताव शासनाचे तत्वत: मान्यतेकरीता सादर करण्यात आला असून ही बाब व्याप्ती बदलामध्ये समाविष्ट आहे.यास सुधारित प्रशासकीय मान्यता देणे गरजेचे आहे.तसेच सातारा जिल्हयातील डोंगरी आणि दुर्गम भागातील जिल्हा परीषदेच्या अख्यारित इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांच्या कामांना आवश्यक असणारा निधी शासनाकडून मंजुर होवून या ग्रामीण रस्त्यांची कामे होणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.
               यावेळी मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी संपुर्ण सातारा जिल्हयातील प्रलंबीत कामांचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान कृषी सिचाई योजनेतंर्गत समाविष्ठ पाटण विधानसभा मतदारसंघातील वांग मराठवाडी, तारळी आणि मोरणा गुरेघर या तीन मध्यम धरण प्रकल्पांच्या कामांना गती देणेसंदर्भात शंभूराज देसाई हे आमदार असताना आग्रही होतेच आताही मंत्री झालेनंतर त्यांचा या कामांसाठी पाठपुरावा सुरुच आहे.पंतप्रधान कृषी सिचाई योजनेतंर्गत केंद्राचा हिस्सा धरणाच्या कामांना देण्यात येतो राज्याच्या वाटयाचा हिस्साही लवकरच या धरणांच्या कामांना देवून पंतप्रधान कृषी सिचाई योजनेतंर्गत समाविष्ठ असणाऱ्या कामांना कालबध्द गती देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहिल.तसेच मोरणा गुरेघर प्रकल्पाच्या उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी देण्याकरीताचा जो विषय आहे तो विभागाने मंत्रीमंडळापुढे आणावा त्यावर मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.तर ग्रामीण भागातील जिल्हा परीषदेच्या अख्यारित इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांच्या कामांसदर्भात सातारा जिल्हयाचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री यांनी संयुक्त बैठक घेवून या ग्रामीण रस्त्यांचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेकरीता सादर करावा अशा सुचना मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी आढावा बैठकीत देवून सातारा जिल्हयातील प्रलंबीत विकासकामांच्या संदर्भात कालबध्दपणे गती देण्याकरीता राज्य शासनाकडून प्रयत्न केले जातील.असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. बैठकीमध्ये सातारा जिल्हयाच्या सर्वांगीण विकासकामांवर मुख्यमंत्री यांचेकडे सकारात्मक व सविस्तर चर्चा झाल्याने सातारा जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री ना.ठाकरे यांचे जाहीर आभार व्यक्त केले.