दौलतनगर दि.२४:-पाटण
विधानसभा मतदारसंघामध्ये गत तीन महिन्यापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे
शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून मतदारसंघातील शेतकरी हवालदिल झाला
आहे.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानीची भरपाई मतदारसंघातील शेतक-यांना तात्काळ
मंजुर करावी याकरीता नुकसानीचे संयुक्तपणे पंचनामे करण्याचे आदेश महसूल आणि कृषी
विभागास दयावेत व नुकसानग्रस्त शेतक-यांना
विशेष बाब म्हणून तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी पाटण विधानसभा
मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस
यांना केली आहे.
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना
दिलेल्या पत्रामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की,पाटण विधानसभा
मतदारसंघामध्ये गत माहे जून, जुलै व ऑगस्ट, 2018 या तीन महिन्यांमध्ये सलग सुमारे
70 दिवसांपेक्षा जास्त कालावधीत मोठया प्रमाणांत अतिवृष्टी सुरु आहे. गेली तीन
महिने अखंडपणे सुरु असलेल्या
अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतक-यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठया
प्रमाणांत नुकसान होवून पिकांची हानी झालेली आहे. सदरच्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये
मोठया प्रमाणांत पाणी साठल्याने शेतातील पिके पुर्णत: कुजली असून यामध्ये या हंगामातील विशेषत:
सोयाबीन,हायब्रीड,भुईमुग,भात व ऊस या पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले आहे. तर
काही पिकांवर अतिवृष्टीमुळे कीडीचा प्रादुर्भावही झाला आहे.त्यामुळे मतदारसंघातील
शेतकरी हवालदिल झाला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघ हा मुळातच डोंगरी व दुर्गम
भागातील अतिवृष्टीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. डोंगरी व दुर्गम भागातील शेतक-यांचे
शेती हे एकमेव उदर-निर्वाहाचे साधन आहे. अल्पभूधारक शेतक-यांची मोठया प्रमाणात
संख्या असून सततच्या होणा-या अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणात
नुकसान झाल्यामुळे शेतकरी कुटुंबांचे फार मोठया संख्येने आर्थिक नुकसान झाले आहे. सलग
तीन महिने सततच्या कोसळणा-या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त
शेतक-यांना झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळणेकरीता तात्काळ या शेतीपिकांच्या
नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पंचनामे होवून या नुकसानग्रस्त
शेतक-यांना तातडीची आर्थिक मदत मंजुर करणे गरजेचे आहे.त्याकरीता पाटण विधानसभा
मतदारसंघातील महसूल व कृषी विभागास संयुक्तपणे या शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे
करण्याचे आदेश आपण दयावेत व नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने आर्थिक मदत मंजूर करावी
असे आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रामध्ये म्हंटले आहे. तर यासंदर्भात लवकरच राज्याचे
मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेवून पाटण विधानसभा मतदारसंघात गत तीन महिन्यापासून
सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतक-यांना त्यांच्या
नुकसानीची भरपाई मिळणेकरीता आग्रही राहणार असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी
पत्रकात म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment