दौलतनगर दि. २०: राज्य शासनाच्या वन विभागाने संपुर्ण राज्यामध्ये
मोठया प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.राज्यातील ३३ टक्के भूभाग
वृक्षाखाली आणणे आवश्यक आहे.याकरीता वनविभागाच्या बरोबर विविध सामाजिक संस्था,शैक्षणिक
विभाग,शाळा,महाविद्यालये,नगरपंचायती,ग्रामपंचायती याचेमार्फत सर्वत्र वृक्ष लागवडीचा
उपक्रम राबविण्यात येत आहे.हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून केवळ वृक्षलागवड केली दाखविण्याकरीता
वृक्षलागवड केल्याचे फोटो काढून प्रसिध्द करण्यापुरता हा उपक्रम हाती घेण्यात येवू
नये तर वृक्ष लागवडीबरोबर लावलेल्या वृक्षाची जपणूक, त्याची वाढ होणकरीता काळजी घेण्याचेही
काम सर्वांनी एकत्रित येवून करुया असे आवाहन युवा नेते यशराज देसाई यांनी केले आहे.
मरळी ता.पाटण येथे मरळी ग्रामपंचायतीच्या
वतीने दि.१४ ऑगस्ट रोजी १५ ऑगस्टच्या पुर्वसंध्येला युवा नेते यशराज देसाई यांचे हस्ते
वृक्षलागवडीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे
माजी सदस्य जालंदर पाटील,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,मरळी गावचे सरपंच राजाराम माळी,उपसरपंच
विनोद कदम,संजय सणस,संतोष पाटसुते,विलास कदम,प्रशांत देसाई,पोलिस पाटील साईनाथ सुतार,
ग्रामविकास अधिकारी गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना युवा नेते यशराज
देसाई म्हणाले, गत दोन वर्षामध्ये आपले संपुर्ण राज्यात प्रत्येकी २ कोटी व ४ कोटी
वृक्षलागवड करण्याचे उदिष्ट राज्य शासनाच्या वन विभागाने केले होते तर यंदाच्या वर्षी
एकूण १३ कोटी वृक्षलागवडीचे उदिष्ट शासनाने ठरविले आहे. हे आपण रोज वाचतो आहोत त्यानुसार
राज्याच्या वनविभागाच्या बरोबरीने संपुर्ण राज्यातील विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक
विभाग, शाळा, महाविद्यालये, नगरपंचायती,ग्रामपंचायती यांनी सहभाग घेवून वृक्षलागवड हा
उपक्रम लोकचळवळ म्हणून आपण सर्वजण करीत आहोत.राज्य शासनाने आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच
वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून राज्य शासनाचा
व शासनाच्या वन विभागाचा निर्धार पुर्णत्वाकडे नेणेकरीता वृक्षलागवडीचा उपक्रम केवळ
दिखाव्यापुरता न होता. तो उपक्रम लोकचळवळीतून सर्वांनीच हाती घेण्याची आणि या वृक्षांची
चांगल्या प्रकारे जपणूक करण्याची गरज आहे. सध्या झाडांची संख्या मोठया प्रमाणांत कमी झाली असल्याने
सर्वांनाच अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळासारख्या आपत्तीला प्रतिवर्षी
सामना करावा लागत असून पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत असल्याने आजही अनेक गावांमध्ये
पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण होत आहे.या सर्वातून मार्ग काढण्यासाठी
शासनाने जनजागृती सुरु केली असून आपणही वृक्षलागवड करुन त्याचा एक भाग झालो
आहोत. आज १५ ऑगस्टच्या पुर्वसंध्येला केवळ वृक्ष लावणे हा उपक्रम आपण करायचा नाही तर
लावलेले वृक्ष चांगल्या प्रकारे जगले पाहिजे, वाढले पाहिजे याकरीता सर्वानीच प्रयत्न
करायचे आहेत. आणि सर्वजण याकरीता प्रयत्नशील आहोत असे आपण मनाशी ठाम ठरवून भविष्यात
आणखीन वृक्षांची लागवड करुन वृक्ष जगविण्यासाठी एकसंघ राहूया असेही आवाहन त्यांनी शेवठी
बोलताना केले.उपस्थितांचे स्वागत माजी सदस्य जालंदर पाटील यांनी केले व आभार सरपंच
राजाराम माळी यांनी मानले.
No comments:
Post a Comment