Tuesday 7 August 2018

दि.०९ ऑगस्टचे ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आमदार शंभूराज देसाईंचे आवाहन.


दौलतनगर दि.07 :- मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासंदर्भात दि.०९ऑगस्ट रोजी जिल्हा,तालुकापातळीवर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.आतापर्यंत संपुर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजातील नागरिकांनी,महिलांनी,युवक,युवतींनी लाखोंच्या संख्येने एकूण ५८ मोर्चे कोणतेही गालबोट न लागता शांततेच्या मार्गाने पार पाडले आहेत व समाजापुढे एक आदर्श निर्माण करुन दिला आहे.आतापर्यंत निघालेल्या शांततेच्या मोर्चांना काही दिवसात वेगळेच तसेच हिंसक वळण लागू लागले आहे.यामुळे मराठा समाजाचेच मोठे नुकसान होत आहे.दि.०९ ऑगस्टचे ठिय्या आंदोलनात आपण स्वत: सहभागी होणार असून जिल्हा,तालुकापातळीवर दि.०९ ऑगस्ट रोजी होणारे ठिय्या आंदोलन किंवा यानिमित्ताने पाळण्यात येणारा बंद हा शांततेच्या मार्गाने कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावे.आपल्याला नक्कीच न्याय मिळेल अशी मला आशा आहे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनीही शांततेने आंदोलन पार पाडण्याकरीता पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.
               आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे,इतके वर्षे आरक्षणापासून वंचीत राहिलेल्या मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे याकरीता सर्वपक्षीय मराठा आमदारांनी वेळोवेळी राज्य शासनाकडे यासंदर्भातील आपली ठाम भूमिका मांडून मराठा क्रांती मोर्चाची असणारी भूमिकाही तसेच विविध मागण्या या शासनापर्यंत पोहचविण्याचे कसोशीने प्रयत्न केले आहेत.आरक्षणाच्या मागणीवर आम्ही आजही राज्यातील तमाम मराठा समाजाबरोबर ठाम आहोत आणि कायम ठाम राहणार आहोत. संपुर्ण राज्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाने आत्तापर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात शांततेत कोणतेही गालबोट न लागता केलेली ५८ आंदोलने आणि आता काही दिवसात आंदोलनाला लागलेले हिंसक वळण तातडीने थांबविणेकरीता व मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर करुन घेणेकरीता राज्य शासनाने नेमलेल्या राज्य मागास प्रवर्ग आयोगाचे माननीय अध्यक्ष यांनी महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्वपक्षीय मराठा आमदारांची यासंदर्भातील आग्रही मागणी जाणून घेणेकरीता राज्य मागास प्रवर्ग आयोगाचे माननीय अध्यक्ष यांचे समवेत लवकरात लवकर सर्वपक्षीय मराठा आमदारांची एकदिवसीय उच्चस्तरीय बैठक आयोजीत करण्याची विशेष विनंती राज्याचे मुख्यमंत्री यांनी मागास प्रवर्ग आयोगाचे माननीय अध्यक्ष यांना करावी अशी आग्रही मागणी मी स्वत: महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा आमदारांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे लेखी पत्राव्दारे केली होती.मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील विविध भागातील अनेक युवकांवर मृत्यूला कवटाळण्याची दुर्दैवी वेळ आली या घटना दुर्दैवी असून युवकांच्या आत्महत्यांचे सत्र तात्काळ थांबणे गरजेचे आहे.मराठा आरक्षणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांनी कालच येत्या नोव्हेंबरअखेर ज्या काही वैधानिक प्रक्रिया पुर्ण करावयाच्या आहेत त्याची पुर्तता येत्या ३ महिन्यात करुन राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकरात लवकर मागवून घेवून यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवून एका महिन्याभरातच मराठा आरक्षणासंदर्भात प्रकिया पुर्ण करण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे स्पष्टपणे जाहीर केले आहे.मराठा समाजाला दयावयाचे आरक्षण कायदयाच्या कसोटीवर टिकायचे असेल तर या सर्व वैधानिक प्रक्रिया पुर्ण करणे गरजेच्याच आहेत.मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत यात कुणाचेही दुमत नाही परंतू या कायदेशीर बाबींचाही आपण विचार करणे तितकेच गरजेचे आहे आणि या बाबींचा सकल मराठा समाजातील नागरिकांनी, युवक, युवतींनी सखोल विचार करावा अशी माझी सर्व मराठा बांधव भगिनींना नम्रतेची विनंती आहे.
                 दि.०९ ऑगस्ट रोजीचे आंदोलनात मराठा समाजाकडून मांडण्यात येणा-या भूमिका त्यांच्या भावना व मागण्या या शासनापर्यंत तसेच राज्य मागास आयोगापर्यंत पोहचविण्यासाठी पाटण तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून कटीबध्द असल्याची ग्वाही यानिमित्ताने पाटण तालुकावासियांना देत असून तालुकापातळीवरील मराठा क्रांती मोर्चाचे दि.०९ऑगस्ट रोजीचे ठिय्या आंदोलन हे अत्यंत शांततेच्या मार्गाने कोणताही अनुचित प्रकार न घडता अथवा आंदोलनाला गालबोट लागेल अशा घटना न घडता पार पडावे अशी माझी व्यक्तीश: सर्वांना विंनती असून मराठा समाजातील प्रत्येक नागरिकांने हे आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गाने पार पाडावे. आपल्या आंदोलनाचा त्रास बसने तसेच इतर वाहनाने प्रवास करणा-या प्रवाशांना तसेच सर्वसामान्यांना होवू नये याची काळजीही आपण सर्वांनी घ्यावी अशी विनंतीही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात केली आहे.


3 comments: