Thursday, 9 July 2020

दि.१२ जुलै रोजी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची ३४ वी पुण्यतिथी साध्यापध्दतीने. पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर परिसरात ५००० वृक्षलागवडीचा शुभारंभ. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती.


                            

               दौलतनगर दि. 09:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३४ वा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.१२ जुलै,२०२० रोजी सकाळी १०.३० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने दौलतनगर (मरळी) ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ५००० वृक्षलागवडीचा शुभारंभ राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला आहे.
               प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षा प्रमाणे यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३४ वा पुण्यतिथी कार्यक्रम रविवार दि.१२ जुलै,२०२० रोजी सकाळी १०.३० वा. दौलतनगर ता.पाटण येथे आयोजीत केला आहे.कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम अत्यंत साध्या पध्दतीने होणार असून पुण्यतिथीनिमित्त राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळावरील स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुतळयास,समाधीस पुष्पचक्र व शताब्दी स्मारकामध्ये स्व.आबासाहेब यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.प्रतिवर्षाप्रमाणे स्व.(आबासाहेब) यांचे प्रतिमेसमोर भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने दौलतनगर (मरळी) ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते सुमारे ५००० वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात येणार असून दोन ते तीन दिवसात या परिसरात ५००० वृक्षांच्या लागवडीचे काम पुर्ण करण्यात येणार आहे.

Tuesday, 7 July 2020

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफआरपीचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकखाती वर्ग. चेअरमन अशोकराव पाटील यांची माहिती.



                   

             दौलतनगर दि.07:  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2019-20 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन 2130 रुपयांप्रमाणे एफआरपीची 80 टक्के रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर यापुर्वीच वर्ग केली असून एफआरपीचा प्रतिटन 200 रुपयेप्रमाणे दुसरा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2019-20 चे गळीत हंगामात 02 लाख 02 हजार 414 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 12.10% सरासरी साखर उताऱ्यांने 02 लाख 45 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे.मागील सन 2019-20 च्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील गाळपास आलेल्या ऊसाला एकूण एफआरपीच्या 80 टक्केप्रमाणे होणारा पहिला हप्ता प्रतिटन रुपये 2130 नुसार होणारे बिल ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचे बँक खाती यापुर्वीच अदा केले आहे.
दरम्यान माहे मार्च महिन्यापासून देशासह संपूर्ण राज्यामध्ये कोरोना महामारी रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सन 2019-20 च्या गळीत हंगामाध्ये उत्पादित झालेल्या साखर विक्रीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे या गळीत हंगामात उत्पादित साखरेचा उठाव न झाल्याने तसेच साखरेच्या दरात झालेली घसरण यामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला होता. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजनामध्ये मोठी काटकसर  करण्याचे धोरण राबविले असून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन आलेल्या परिस्थितीचा योग्य नियोजनातून सामना करत केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार एफआरपीचा रक्कमेपोटी दुसरा हप्ता माहे जुलै महिन्यामध्ये पहिल्या आठवडयात देण्याचे नियोजन केले असल्याचे यापुर्वीच सांगीतले होते. महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवा नेते यशराज देसाई व कारखाना संचालक मंडळाने सन 2019-20 च्या गळीत हंगामात कारखान्याला गळीतास आलेल्या ऊसाला एफआरपीच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतिटन 200 रुपये इतकी रक्कम लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खाती वर्ग केली आहे. तरी सन 2019-20 च्या गळीत हंगामामध्ये कारखान्याला गळीतास पुरविलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.



कराड ते संगमनगर धक्का या रस्त्याचे संपुर्ण काम डिसेंबर २०२० पर्यंत पुर्ण करा. कारणे नको, रिझर्ल्ट दाखवा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना व यंत्रणेला ना.शंभूराज देसाईंच्या बैठकीत सुचना.



          दौलतनगर दि.०७ :- कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते संगमनगर धक्का हा ४८ किलोमीटरचा भाग पाटण मतदारसंघात येतो ४८ किलोमीटरपैकी केवळ २८ किलोमीटरचे काम पुर्ण झाले हे २० किमी अंतरातील रस्त्याचे काम होणे अद्यापही बाकी आहे.उर्वरीत राहिलेले संपुर्ण काम हे माहे डिसेंबर २०२० अखेर पुर्ण करा.डिसेंबर नंतर कोणतीही मुदतवाढ संबधित यंत्रणेला देवू देणार नाही.मला कारणे नकोत रिझर्ल्ट दाखवा अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाच्या व एल.ॲन्ड टी कंपनीच्या सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.
         आज पाटण तहसिल कार्यालयातील लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहामध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते संगमनगर धक्का रस्त्याच्या अपुऱ्या कामां संदर्भात आढावा बैठक झाली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.या बैठकीस राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता प्र.शां.औटी,पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समिर यादव,राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही.सागांवकर,उपअभियंता श्रीमती पी.जी.बारटक्के,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,पाटण नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी अभिषेख परदेशी,एल अँड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रविंद्र भोईटे,एल अँड टी कंपनीचे सहाय्यक विनायक कोरे,टी.आर.देवरे,सार्व.बांध विभागाचे उपअभियंता अजित पाटील,पाटणच्या सपोनि तृप्ती सोनावणे,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक महेश पाटील यांच्यासह एल.ॲन्ड टी कंपनीचे सर्व प्रमुख अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
         याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,कराड चिपळूण रस्त्याच्या अपुऱ्या कामांसंदर्भात मागे दोनदा बैठका झाल्या आहेत.पाटण मतदारसंघातील कराड ते संगमनगर धक्का या लांबीमधील रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया महसूल विभागाने पुर्ण करुन दिली आहे.काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत ती पोलीस बंदोबस्तात काढणेसंदर्भात मागील बैठकीतच सुचना केल्या आहेत.अतिक्रमणधारकांना संबधित यंत्रणेकडून अनेकदा नोटिसा देवून झाल्या आहेत.कुणी अडथळा करीत असेल तर एल.ॲन्ड टी कंपनीच्या वरीष्‍ठ अधिकाऱ्यांने उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मदतीने तात्काळ ती अतिक्रमणे करणाऱ्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. सार्वजनीक बांधकाम विभागाने रस्ता हस्तातंर करताना रस्त्याची रुंदी याचे सविस्तर नकाशे राष्ट्रीय महामार्गाचे तसेच एल.ॲन्ड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.अतिक्रमणे काढून कामाला गती देण्याचे काम आता राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व एल.ॲन्ड टी कंपनीची आहे.कराड ते पाटण या भागातील सुमारे ०६ किमी लांबीचे रस्त्याचे काम अद्यापही बाकी आहे.१५ ऑगस्टनंतर हे काम सुरु करुन सप्टेंबर २०२० पर्यंत हे काम पुर्ण करण्याचे नियोजन संबधित यंत्रणेने करावे. मल्हारपेठ असो वा नवारस्ता या मोठया बाजारपेठामध्ये अतिक्रमण धारकांनी स्वत:हून आपआपली अतिक्रमणे काढून घेतली आहेत मल्हारपेठ,नवारस्ता या मुख्य बाजारपेठांना जो नियम लावला आहे तोच नियम या मार्गावरील सर्व प्रमुख ठिकाणी लावावा.जिथे जिथे कंपनीला अडथळा निर्माण होत आहे त्या त्या ठिकाणी तालुका प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना तसेच एल.ॲन्ड टी कंपनीस वेळोवेळी सहकार्यच केले आहे त्यामुळे आता सर्वस्वी जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्गाची व एल.ॲन्ड टी कंपनीची आहे पाच महिन्यांचा कालावधी कंपनीला दिला आहे या पाच महिन्यांच्या कालावधीत उर्वरीत राहिलेला संपुर्ण रस्ता पुर्ण करुन दयावा डिसेंबर २०२० नंतर कंपनीचे कोणतेही म्हणणे एैकून घेतले जाणार नाही.त्यामुळे रिझर्ल्ट दाखवा असे शेवठी ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बैठकीत उपस्थितांना सांगितले.
चौकट:- अधिक्षक अभियंत्यांनी कंपनीला बार चार्ट करुन दया.
             आजच्या बैठकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिक्षक अभियंत्यांनी एल.ॲन्ड टी कंपनीस उर्वरीत राहिलेल्या कामांचा बार चार्ट आजच करुन दयावा व बार चार्टप्रमाणे कंपनीकडून रस्त्याचे काम सुरु आहे का ? याच्यावर नियत्रंण कार्यकारी अभियत्यांनी ठेवावे असे सांगून ना.शंभूराज देसाईंनी उर्वरीत कामाचा केलेला बारचार्ट मला दोन दिवसात दाखवून घ्यावा अशाही सुचना यावेळी केल्या.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाईंचे गुरु शिष्याचे नाते. ना.शंभूराज देसाई व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ बोटे यांच्या मोझरी येथील भेटीने जुन्या आठवणींना उजाळा.


         
        दौलतनगर दि.०७ :- महाराष्ट्र राज्यात आधुनिक काळातील महान संत होऊन गेलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे गुरुशिष्याचे नाते होते.या नात्यासदंर्भात आजपर्यंत आपण सर्वजण अपरिचित होतो.अत्यंत महत्त्वाच्या व दुर्लक्षित राहिलेल्या या नात्यातील धागा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ बोटे महाराज या दोन मान्यवरांच्या भेटीमुळे समोर आला आहे.ना.शंभूराज देसाई व अध्यक्ष राजाभाऊ बोटे या दोघांच्या मोझरी येथील भेटीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यामधील अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
           वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री असणारे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे दि.26.06.2020 रोजीचा वाशिम जिल्हयाचा दौरा आटपून अमरावती मार्गे येत असताना मोझरी येथील शासकीय विश्रामगृह येथे थांबले होते लोकनेते बाळासाहेब देसाईंचे नातू मंत्री ना.देसाई हे शासकीय विश्रामगृह येथे असल्याची माहिती मिळताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ बोटेमहाराजांनी ना.शंभूराज देसाईंची सदिच्छा भेट घेतली.यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यामध्ये गुरु शिष्य असे नाते होते याचा उलघडा श्री.बोटे महाराजांनी करुन या दोघांमधील जुन्या आठवणींना तसेच पूर्वीच्या अत्यंत महत्त्वाच्या व दुर्लक्षित राहिलेल्या गोष्टींना उजाळा देत अनेक घटना ना.शंभूराज देसाईंना सांगितल्या.प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहलेले ग्रंथ देऊन श्री.बोटेमहाराजांनी ना.शंभूराज देसाईंचा सत्कार केला.
         श्री.बोटेमहाराज यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यामधील नात्याचा उलघडा करताना तसेच जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांचा कंठ दाटून आला होता.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विदर्भात विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करीत होते. तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना “राष्ट्रसंत” या उपाधीने सन्मानित केले आहे.आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब मंत्री असताना जेव्हा जेव्हा विदर्भाच्या दौऱ्यावर  येत तेव्हा तेव्हा ते आर्वजुन महाराजांच्या भेटीकरीता गुरूकुंज आश्रमामध्ये येत असत महाराजांचे आणि त्यांचे गुरु शिष्यांचे नाते होते.ते नाते इतके घट्ट होते की महाराजांचे निधन दि.11 ऑक्टोंबर 1968 रोजी झाले. महाराजांनी मृत्यूपत्र तयार केले होते. त्यावेळी असा उल्लेख आढळून येतो की,महाराजांनी माझे मृत्यूपत्र हे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचेसमोर व त्यांचे हस्ते वाचन करावे असे लिहिले होते.सदर मृत्यूपत्र वाचन करताना लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेबांचे डोळे डबडबून आले होते व नकळत त्यांचे अश्रू त्या मृत्यूपत्रावर पडले होते.सदर मृत्यूपत्र अजूनही आश्रमामध्ये जपून ठेवले असल्याचे बोटे यांनी सांगीतले.
             भारत हा खेड्यांचा देश आहे,हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल,अशी त्यांची श्रद्धा व विचारसरणी होती.त्यांनी समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल,याविषयी नेहमीच काळजी वाहिली,चिंता केली.ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता.त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरुपाचा विचार केला व त्या कशा सोडवाव्यात,याविषयी उपाययोजनाही सुचविल्या.महाराष्ट्राचे ग्रामविकासात लोकनेतेसाहेबांचे मोलाचे कार्य व स्थान आहे.अध्यात्मातून ग्रामविकास करणेचा मंत्रच जणू राष्ट्रसंतांनी लोकनेत्यांना दिला होता.सन १९६२ ला कोयना भुकंपामुळे उडालेला हाहाकार यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचनात्मक मदत कार्याकरता आघाडीवर होते. राष्ट्रसंतांचे अंत्यविधीला लोकनेते बाळासाहेब देसाई हे आवर्जुन उपस्थित होते व त्यांनी त्यांचे देहाला खांदासुध्दा दिला होता. राष्ट्रसंतांचे मृत्यूपश्चात सलग 1 वर्षे कामकाजासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई आश्रमात जात असत त्यावेळी कधीही न भरुन येणारी पोकळी लोकनेत्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. ज्या शासकीय विश्रामगृहात ना.शंभूराज देसाई थांबले होते ते विश्रागृहाचे उद्घाटनसुध्दा लोकनेतेसाहेबांनी केले होते.याप्रकारची बरीचशी विश्रामगृह त्या काळात रोजगार हमी योजनेतून बांधल्याचे यावेळी सांगणेत आले.
         यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आश्रम सध्या बंद असल्यामुळे इच्छा असूनही आश्रमामध्ये जाता येत नसल्यामुळे ना.शंभूराज देसाईंनी दु:ख व्यक्त करीत नंतरच्या दौऱ्यामध्ये आर्वजुन आश्रमाला भेट देणेकरीता येणार असल्याचे सांगून शासनाच्या माध्यमातून आश्रमाकरीता कोणतीही मदत लागल्यास नि:संकोचपणे सांगावे असे सांगत ना.शंभूराज देसाईंनी अंतःकरणापासुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्रध्दांजली अर्पण करतो ज्यांनी समाजात परिवर्तन घडवुन आणण्याकरता भक्ति आणि कर्माला एकमेकांशी जोडण्याचे अवघड कार्य करुन दाखविले. त्यांचा आदर्श नेहमीच लोकनेतेसाहेबांप्रमाणे आम्हाला देखील प्रेरणादायी राहील असे सांगून अशा बऱ्याचशा अप्रकाशित गोष्टींवर अभ्यास व संशोधन होणे आवश्यक आहे असे वाटते असेही शेवठी या भेटीत ना.शंभूराज देसाईं म्हणाले.

Thursday, 2 July 2020

पाटण तालुक्यातील कोरोना बाधीत गावांना मंत्री देसाई यांच्या भेटी नागरिकांना दिला दिलासा तर प्रशासनाला सतर्कतेचा सूचना



 दौलतनगर दि.02 :- पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या पाटण तालुक्यातील  कुसरुंड, बेलवडे,चोपडी आणि सांगवड या गावांना  गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी शासकीय अधिकारी यांचे समवेत भेट देऊन  आवश्यक त्या सुचना  केल्या.
                             यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, संचालक बबनराव भिसे, विजयराव जंबुरे,उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
                       पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातील कुसरुंड, चोपडी, बेलवडे आणि सांगवड  या गावांत कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर चारही गावे सील करून नाकाबंदी करण्यात आली  होती. त्या गावांना गृह राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी भेट देवून योग्य त्या उपाय योजना करून सील केलेल्या परिसरात वैद्यकीय सुविधांसह जीवनावश्यक व अत्यावश्यक कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्या अशा सक्त सूचना केल्या.
                  पाटण तालुक्यात आज अखेर १०० पेक्षा ही जास्त कोरोना बाधित सापडले असल्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेले दोन महिने कसलाही कोरोनाचा संसर्ग तालुक्यात नव्हता.लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात बाहेरगांवाहून काही व्यक्ती तालुक्यात आल्यानंतर दोनचार दिवसापुर्वी कोरोनाचा चांगलाच प्रसार झाला असून कोरोना रुग्ण सापडलेल्या गांवाना भेटी देवून तेथील परिस्थितीची पहाणी करीत अधिकाऱ्यांना सतर्क ठेवण्याचे काम महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई करीत आहेत. त्यांनी आज तालुक्यातील कुसरूंड, बेलवडे, सांगवड आणि चोपडी येथे कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या  गांवाना भेटी देवून प्रत्यक्ष फिल्डवर जावून येथील परिस्थितीची पहाणी केली व या गांवातील जनतेला दिलासा दिला देत प्रशासनाने अजुन सतर्क रहा अशा सुचना केल्या.
                 या भेटीमध्ये मंत्री देसाई यांनी बाधित गांवातील रुग्णांची विचारपुस करीत तालुका प्रशासनाच्या वतीने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना इन्स्टिटयुट कॉरन्टाईंन (विलगीकरण कक्ष) करण्यात आले आहे. आपणांस जीवनावश्यक वस्तू गावपोहोच करण्याच्या सुचना तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. तसेच गांवामध्ये ग्रामस्थांना २४ तास पाणी व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेशही संबधितांना देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्तही काही अडचण आली तर मला थेट फोन करा  असेही त्यांनी प्रत्येक गांवातील नागरिकांना सांगितले.ज्या  गांवामध्ये कोरेाना रुग्ण सापडले तेथे तालुका प्रशासनाने काय काय उपाययोजना केल्या आहेत याची प्रत्यक्ष पहाणी केली. गांवामध्ये नाकाबंदी केल्यानंतर बाहेरगांवचे कोण गांवात येत नाही ना ? याची तपासणी पोलिस विभागाने करावी. अशाही सुचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. 
दरम्यान मंत्री देसाई यांनी बाधित गावातील समस्यांचा आढावा घेतला.  सर्व नागरिकांनी आपापली आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच घाबरून न जाता गर्दी न करता शासकीय नियमांचे योग्य पालन करावे आणि आपापल्या घरातच सुरक्षित राहावे असे आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केले.
                    यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्य,महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी व कोरोना बाधित गावातील ग्रामस्थ  पदाधिकारी उपस्थित होते.


Saturday, 27 June 2020

सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या नियामक मंडळाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये कोयना पर्यटन आराखडयाचा समावेश. - गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईं यांची माहिती


           
दौलतनगर दि.27 :- केंद्र व राज्य शासनाकडून पश्चिम घाटामध्ये साकारलेल्या सहयाद्री व्याघ्र प्रकल्प प्रतिष्ठानच्या सन 2020-21 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना पर्यटन आराखडयाचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
         सहयाद्री व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या सन 2020-21 चे सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना पर्यटन आराखडयासंदर्भात गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीमध्ये शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, सहयाद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर स्थित कराडचे उपसंचालक एम.एन.मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजिव) सुरेश साळूंखे, वनक्षेत्रपाल (वन्यजिव) कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
               यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की,सहयाद्री व्याघ्र प्रकल्प हा केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाच्या माध्यमातून वनविभागामध्ये वाघाचे संवर्धन करण्याचा महत्त्वाचा हेतु असल्याने राज्य शासनाकडून यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करुन प्रतिवर्षी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील जास्तीत जास्त विकास कामे करण्यात यावीत असे निर्देश असल्याने सहयाद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये विविध विकास कामे करताना संबंधित लोकप्रतिनिधींना विचारात घेऊनच हि विकास कामे करण्यात येऊन सहयाद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या सन 2020-21 च्या आराखडयात पाटण मतदारसंघातील पर्यटन आराखडयाचा समावेश करुन जास्तीत जास्त निधीची तरतूद करावी, अशी मागणी सहयाद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरंसव्दारे  पार पडलेल्या बैठकी दरम्यान महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार संजय राठोड यांचेकडे केली होती. त्यानुसार सहयाद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटन वाढीकरीता आवश्यक असलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील पर्यटन आराखडयाचा सहयाद्री व्याघ्र नियामक मंडळाच्या सन 2020-21 च्या आराखडयात प्राधान्याने समावेश करावा अशा सुचना वनमंत्री नामदार संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या. सदर बैठकीमध्ये दिलेल्या सुचनांनुसार सन 2020-21 च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये स्थानिक लोकांचे विकासासाठी पर्यटनास व उपजिविका निर्मितीस चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या कामांचा समावेश करुन सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करणेत आले आहे.यामध्ये ओझर्डे येथील निसर्गरम्य तीन धारी धबधबा परिसर सुशोभिकरणामध्ये प्रवेशव्दाराजवळ फरसबंदी, चेंजींग रुम व टॉयलेट,पाणी व विद्युत व्यवस्था,700 मीटर वाटेचे मजबुतीकरण,धबधब्याजवळ पर्यटकांना उभे राहणेसाठी ओठा मजबुतीकरण व रेलिंग तसेच परिसरात देखरेख व नियंत्रणसाठी मजूर नेमणे,कोंडावळे रामघळ येथील धबधबा परिसरात 300 मीटर पायवाटेचे मजबुतीकरण,पायवाटेवर रेलींग,पर्यटक तपासणी नाका व स्वागत कमान बसविणे, गाढवराई धबधबा परिसरात निसर्गवाट बळकटीकरण,माहिती फलक लावणे,घाटमाथा ते हुंबरळी वॉकींग ट्रेक बळकटीकरणामध्ये निसर्ग पायवाटेचे मजबुतीकरण,जंगली जयगड येथील वॉकींग ट्रेक बळकटीकरण करणे, केमसे नाका (घाटामाथा) रासाटी संरक्षण कुटी केमसे नाका ट्रेक रुट निसर्ग पाऊलवाट बळकटीकरण करणे अशा एकूण 01 कोटी 50 लक्ष रुपयांच्या कोयना पर्यटन आराखडयाचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, सहयाद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या सन 2020-21 च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकांमध्ये पाटण मतदारसंघातील कोयना पर्यटन आराखडयाचा समावेश करण्यात आला असल्याने सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाला राज्यातून येणाऱ्या पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकरीता जागो-जागी वॉकिंग ट्रॅकची निर्मिती व पर्यटनाचे पॉईंट विकसित करुन पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी फायदा होणार असल्याचे शेवटी त्यांनी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

Thursday, 25 June 2020

यशराज' यांची देसाई कारखान्यात दमदार छाप' प्रशासनामध्ये चैतन्य

          

      दौलतनगर:- राज्याचे गृह आणि अर्थ राज्यमंत्री ना.शंभुराज देसाई यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचेच उच्चशिक्षित सुपुत्र आणि यशस्वी अभियंता युवा नेते यशराज देसाई यांनी तालुक्याच्या राजकारणाबरोबर आता देसाई कारखान्यात ही पदार्पण करून आपल्या कामाची यशस्वी छाप टाकली आहे.गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी कारखान्यात जातीने व बारकाईने लक्ष केंद्रित करून आवश्यक ते प्रशासकीय आणि तांत्रिक  बदल करून कारखान्याच्या कारभारात नवे चैतन्य निर्माण केले आहे. त्यामुळे मंत्री देसाई यांच्याच राजकीय मुशीत तयार झालेले आणि युवकांचा आयडॉल असलेले 'यशराज' यांच्या या नव्या एंट्रीने आता  साखर कारखान्यातील कारभारही अधिकच गोड होत असल्याची चर्चा सध्या देसाई साखर कारखान्याच्या प्रशासकीय वर्गातून व्यक्त होत आहे.
             मंत्री शंभूराज देसाई यांची  १९८६ साली आपले शैक्षणिक जीवन अर्धवट सोडून वयाच्या १९ व्या वर्षीच पाटण च्या राजकारणात एंट्री झाली.मंत्री देसाई यांची कमी वय असतानाही त्यांच्या कामाची जशी पद्धत होती,जो जोश,अभ्यासू वृत्ती आणि जी आक्रमकता होती अगदी तशीच पद्धत  पुन्हा ३० वर्षानंतर आमदार देसाई यांचेच सुपुत्र यशराज देसाई यांच्या कामांतून दिसून येत आहे.  महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण  चालू असतानाच त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत वयाच्या अवघ्या २० व्या वर्षीच पाटणच्या राजकारणात प्रचाराच्या निमित्तानें एंट्री करून आपल्या कामाची पद्धत,जोश ,आक्रमकता आणि अभ्यासू वृत्ती दाखवून दिली. वैशिष्ठ्य म्हणजे  मंत्री 'शंभूराज' आणि 'यशराज 'या वडील मुलाच्या  राजकीय कार्यात हुबेहूब साम्य असल्याची चर्चा पाटण तालुक्यात सुरु झाल्या आणि 'यशराज' पाटण मतदारसंघातील तरुणाईचे आयडॉल बनले.यशराज यांनी आपल्या वडीलांसारखेच अभ्यासू आणि श्रवणीय परंतु उपस्थितांची ,आणि जनतेची मने जिंकणारी आकर्षक भाषणे करून मतदारांमध्ये आपली नवी क्रेझ निर्माण केली.
              आता सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधान सभेच्या निवडणुकीत पाटण मतदारसंघातून आमदार म्हणून शंभुराज देसाई  तिसऱ्यांदा निवडून आले आणि राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार मध्ये गृह ,अर्थ ,उत्पादन शुल्क अशा एकूण महत्वाच्या पाच राज्यमंत्री खात्यांची जबाबदारी देण्यात आली.परिणामी मंत्री देसाई हे राज्याच्या कामांत व्यस्त झाले.त्यामुळे मंत्री देसाई यांच्या मतदारसंघाला हातभार लावण्यासाठी लोकाग्रहास्तव  'यशराज' यांना पुन्हा मतदारसंघात एन्ट्री घ्यावी लागली.गेल्या सहा महिन्यांपासून ते साखर कारखान्याची धुरा यशस्वीपणे सांभाळताना दिसत आहेत.त्यासाठी ते दररोज सातारा ते कारखाना येऊन कारखान्याच्या प्रत्येक विभागाची प्रत्यक्ष स्पॉट वर जाऊन माहिती घेत आहेत. संबंधित विभागाकडे असलेल्या कामांचा सविस्तर आणि अभ्यासपूर्वक आढावा घेऊन आवश्यक ते बदल,करण्यासाठी जाग्यावर निर्णय घेताना दिसत आहेत.एवढेच नव्हे तर कारखान्याची आर्थिक स्थिती,कामगारांचे प्रश्न,कारखान्याचे अधिक उत्पन्न वाढीसाठी लागणारी अत्याधुनिक साधनसामुग्री यासाठी प्रशासनाला करावया लागणारी कार्यवाही या   संदर्भात ते स्वतः  निर्णय घेताना दिसत आहेत.'यशराज' यांची  काम करण्याची  नियोजनबद्ध अभ्यासपूर्वक 'शैली' मुळे मंत्री शंभुराज देसाई यांच्याच कार्यशैलीचा हुबेहूब अनुभव येत असल्याने दादांनी घेतलेले निर्णय नेहमीच संस्थेच्या आणि कामगारांच्या भल्याचेच ठरत असल्याने कारखान्याचा कामगार वर्ग आणि प्रशासन वर्ग बेहद्द खुश व समाधानी दिसत आहेत.
          जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत 'यशराज' यांनी आपल्या 'पहिल्याच इनिंग' मध्ये  एखाद्या मुरलेल्या राजकीय नेत्याला ही लाजवेल असे काम करून पाटण मतदार संघावर  आपल्या कार्याची भुरळ पाडली असतानाच आता केवळ सहा महिन्यात साखर कारखान्याचे आदर्श नियोजन व कारभार करून राजकारणातील आपली 'दुसरी इनिंग' ही यशस्वीपणे पेलत असल्याचे सिद्ध केले आहे.त्यामुळे ज्यांच्या अभियांत्रिक संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली अशा हुशार तरुण अभियंता आणि 'मंत्रीपुत्राच्या' अंगी असलेल्या राजकीय  यशस्वी संघटन कौशल्याची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात होताना दिसत आहे. 
चौकट: कारखाना व बँकेच्या उमेदवारांचे घेतले इंटरव्ह्यू ...!
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना आणि शिवदौलत सहकारी बँके मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अनेक उमेदवारांनी नुकताच इंटरव्ह्यू दिला. ते सर्व इंटरव्ह्यू राज्याचे मंत्री आणि आपले पिताश्री ना शंभुराज देसाई  यांच्या मार्गदशनखाली स्वतः  'यशराज' यांनी दिवसभर  विश्रांती न घेता कारखानास्थळी थांबून पूर्ण केले.त्यामुळे 'यशराज दादा' यांच्या अभ्यासपूर्वक  इंटरव्ह्यू मधून होणाऱ्या या सर्व नवीन नियुक्त्या  गुणवत्तेवरच होणार अशी चर्चा ही पाटण मतदारसंघात उमटत आहेत.