Friday 15 May 2020

कोरोनाच्या संदर्भात वाशिम जिल्हा ग्रीनझोन मध्ये आहे भविष्यातही तसाच राहणेसाठी प्रयत्नशील - पालकमंत्री ना.शंभूराज देसाई बाहेर जिल्ह्यातून आलेल्या मजुरांची काळजी घेण्याचे वाशिम जिल्हयातील अधिकाऱ्यांना आदेश.


सातारादि.१५ :- वाशिम जिल्हा ग्रीनझोनमध्ये असून तो तसाच कायम राहील याकरीताचे अतिशय चांगले नियोजन वाशिम जिल्हाप्रशासनाला बरोबर घेवून आम्ही सर्वांनी एकत्रितपणे केले असून वाशिम जिल्हा प्रशासनाच्या नियोजनबध्द कामकाजामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. वाशिम जिल्हयातील  परराज्यात,परजिल्हयात अडकलेल्या मजुरांना वाशिम जिल्हयात परत आणण्यासाठी मी या जिल्हयाचा पालकमंत्री या नात्याने प्रयत्नशील असून दोन चार दिवसापासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर परजिल्ह्यात, परराज्यात असलेले अनेक मजूर जिल्ह्यात परतले आहेत.या मजुरांची काळजी घ्या,त्यांची आरोग्य तपासणी करून घ्या, विलगीकरण कक्षात त्यांची गैरसोय होणार नाही,याची दक्षता घ्या,असे आदेश पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज वाशिम जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांना दिले.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या व पुढे करावयाच्या विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज १५ मे रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत ते बोलत होते.यावेळी ना.शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले.तर वाशिमवरुन खासदार भावना गवळी,आमदार राजेंद्र पाटणी,आमदार अमित झनक,जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना,पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास सोनटक्के,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर तर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार गोपीकिशन बाजोरिया हे या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते.
यावेळी खासदार भावना गवळी म्हणाल्या,जिल्ह्यातील काही मजूर इतर राज्यात सुद्धा अडकलेले आहेत.त्यांना जिल्ह्यात परत येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.त्यासाठी संबंधित राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून आपल्या जिल्ह्यातील मजुरांना परत आणण्याची व्यवस्था करावी.तसेच  आमदार राजेंद्र पाटणी म्हणाले,जिल्ह्यातील मोठा मजूर वर्ग इतर जिल्ह्यात व इतर राज्यात आहे.त्यापैकी अनेकजण जिल्ह्यात परतले असले तरी काही मजूर अद्यापही पुणे, मुंबई व सुरत या महानगरांमध्ये अडकलेले आहेत.त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत.तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांसाठी चांगल्या दर्जाच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात व सगळयांच्या मागणीनुसार सीसीआय मार्फत होत असलेल्या कापूस खरेदीची गती वाढविण्यात यावी. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी आमदार निधीची रक्कम उपलब्ध करून देवू,असे यावेळी सांगितले.आमदार अमित झनक म्हणले,गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही.ही रक्कम लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्यास आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मदत होईल.जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत पीपीई कीट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना सुद्धा अशा प्रकारे कोरोना विषाणूपासून बचावासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे.यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजना, कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती याविषयी माहिती दिली. 
यावेळी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, मुंबई, पुणेसह इतर जिल्ह्यातून परतलेल्या मजुरांची संख्या मोठी असून त्यांना गावातील प्राथमिक शाळा अथवा इतर ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.ग्रामस्तरीय समितीमार्फत याबाबतचे नियोजन केले जात असून याठिकाणी मजुरांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.तसेच जे मजूर अजूनही जिल्ह्याबाहेर अडकलेले आहेत, अशा मजुरांची जिल्हानिहाय यादी तयार करून सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या. संबंधित जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून या मजुरांना जिल्ह्यात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगत त्यांनी जिल्ह्यात परतलेल्या मजुरांच्या हाताला भविष्यात काम उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे.त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जॉब कार्ड बनवून रोजगार देणे शक्य होईल का, याबाबतचा आराखडा सादर करावा, तसेच जिल्ह्यात परतलेल्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला तात्काळ धान्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात सीसीआयमार्फत सुरु असलेली कापूस खरेदी व नाफेडमार्फत करण्यात येत असलेली चना, तूर खरेदी अधिक गतीने होणे आवश्यक आहे. तसेच नोंदणी केलेल्या सर्वच शेतकऱ्यांचा कापूस व तूर खरेदीची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत काही सुचना या बैठकीत मांडण्यात आल्या आहेत राज्याचे पणनमंत्री आज सातारा जिल्हयात असून त्यांच्याशी मी चर्चा करुन मार्ग काढतो असे सांगितले तर यापूर्वी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये होमगार्डच्या मानधनाचा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर हा प्रश्न निकाली निघाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम मिळणेबाबत जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा करावा मीही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांचेशी संपर्क साधून ही नूकसानभरपाई लवकरात लवकर मिळणेबाबत प्रयत्न करतो असे त्यांनी शेवठी सांगितले.

No comments:

Post a Comment