Wednesday 20 May 2020

पाटण तालुक्यात आता काळजी वाढली,खबरदारी घ्या. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना. पाटण तालुक्यात कोरोनाचे तीन रुग्ण सापडल्याने उपाययोजनेकरीता ना.शंभूराज देसाईंनी घेतली तातडीची बैठक.



           
दौलतनगर दि.२० :- कोरोनाच्या संकटात सातारा जिल्हयात सर्वात जास्त मुंबई,पुणे व इतर राज्यातून नागरिक हे पाटण तालुक्यात आले आहेत.लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत सुमारे ६५ हजार तर चौथ्या टप्प्याच्या सुरवातीला सुमारे नऊ हजार असे एकूण ७४ हजार नागरिक आजमितीला तालुक्यात आले आहेत.इतके दिवस कोरोनांचा संसर्ग तालुक्यात नव्हता परंतू बाहेरगांवाहून आलेले तीन व्यक्ती या कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने धोका आणि काळजी दोन्ही वाढले आहे. या तीन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या तातडीने तपासण्या करुन घ्या. आता खऱ्या अर्थाने खबरदारी घेणे गरजेचे आहे नाहीतर गेली दोन महिने घेतलेल्या खबरदारीवर आणि उपाययोजनेवर पाणी फिरेल.ज्या गांवात जास्त लोक बाहेरगांवाहून आले आहेत त्यांना घराच्या बाहेर पडू न देण्याची जबाबदारी आता प्रशासनाची आहे त्यापध्दतीने अधिकाऱ्यांनी कामाला लागावे अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या.
          पाटण तालुक्यात मागील दोन दिवसात कोरोनाचे तीन रुग्ण सापडल्याने तसेच त्यातील दोघांचा मृत्यू झाल्यामुळे खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज पाटण तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची दौलतनगर ता.पाटण येथे तातडीची बैठक घेतली.यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.चंद्रकांत यादव,डॉ.दत्तात्रय डोंगरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी.पाटील,सपोनि तृप्ती सोनावणे,नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी,ढेबेवाडीचे सपोनि उत्तम भजनावळे, कोयनानगरचे सपोनि एम.एस.बावीकट्टी यांची उपस्थिती होती.
            याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,बाहेरगांवाहून आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन घरातच थांबावे,बाहेर पडू नये बाहेरगांवाहून आलेल्यांनी घरात राहणेच तालुक्याच्या आणि गावांच्या हिताचे होणार आहे हे मी वारंवार आवाहन बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांना करीत आहे.कोरोनाचा धोका दिवसेदिवस वाढत आहे.गेली दोन महिने पाटण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नव्हता पंरतू अचानक तीन रुग्ण सापडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील दोन दिवसात मुंबई शहरातून तालुक्यात आलेल्या बनपुरी येथील महिलेचे तसेच भारसाखळे येथील पुरुषाचे कोरोना पॉझिटिव्हमुळे निधन झाल्याने पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता जे लोक बाहेरगांवाहून तालुक्यात आले आहेत ज्या गांवात बाहेरगांवाहून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी पोलीस आणि महसूल विभागाने गावभेटी देवून हे लोक घरातच कसे राहतील यावर प्रशासनाने जादा लक्ष दयावे जेणेकरुन कोरोनाचा प्रसार वाढणार नाही.पोलीस यंत्रणेला बंदोबस्ताकरीता यंत्रणा कमी पडत असेल तर जिल्हा पोलिस अधिक्षकांना सुचना करुन मी जादाची यंत्रणा पाटण तालुक्यात देण्यास सांगतो. परंतू आता कुठलाही निष्काळजीपणा करु नका.न आलेले संकट आता आपल्या तालुक्यावर आले आहे. हीच वेळ आहे खबरदारी घेण्याची.असे सांगून ते म्हणाले बनपुरी, भारसाखळे व शिरळ या गांवात आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात किती व्यक्ती आल्या आहेत अशाची यादी तयार करुन तात्काळ त्यांच्या आरोग्याच्या तपासण्या करुन घ्या त्यांचे नमुने तपासणीकरीता सादर करा अशा सुचना ना.शंभूराज देसाईंनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
चौकट: बाहेरगांवाहून आलेल्यांनो सावधता बाळगा- ना.देसाईंचे आवाहन.
            पाटण तालुक्यात बाहेरगांवाहून आलेल्यांची संख्या जास्त असली तरी कोरोनाचा संसर्ग तालुक्यात नव्हता आता चौथ्या टप्प्यामध्ये बाहेरगांवाहून आलेल्यांमध्ये दुर्दैवाने संसर्ग होवू शकतो हे दोनतीन दिवसापुर्वी मुंबईहून आलेल्या दोन व्यक्तींच्या निधनामुळे आपल्या लक्षात आले आहे त्यामुळे चौथ्या टप्प्यात बाहेरगांवाहून आलेल्यांनो जरा सावधता बाळगा,आपला त्रास गावाकडंच्याना होणार नाही काळजी घ्या असे आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी या बैठकीत केले. 

No comments:

Post a Comment