पाटण दि. २१:- पाटण तालुक्यातील बनपुरी गांवामध्ये मुंबई शहरातून आलेल्या ४३ वर्षीय महिलेचा गावांत आल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू झाला असून ताईचीवाडी शिरळ या गांवातील ७० वर्षीय व्यक्ती ही अहमदाबाद येथून गांवी आल्यानंतर त्यास कोरोनाची लागण झाली असल्याने पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.पाटण तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढू नये याकरीता मतदारसंघाचे आमदार,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तातडीने तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेवून तात्काळ त्यांनी कोरोना रुग्ण सापडलेल्या बनपुरी आणि ताईचीवाडी (शिरळ) या दोन्ही गांवाना भेटी देत या गांवातील जनतेला धीर दिला व नाकाबंदी काळात या गांवामधील जनतेला जीवनावश्यक वस्तू देण्याच्या तसेच या गांवातील नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याच्याही सुचना अधिकाऱ्यांना केल्या.
पाटण तालुक्यात सुमारे ७४ हजार नागरिक हे मुंबई, पुणे तसेच इतर राज्यातून आपल्या मुळगांवी आले आहेत मात्र तालुक्यात कोरोनाची कुणालाही लागण झाली नव्हती दोन तीन दिवसापुर्वी बनपुरी येथील महिलेचा मुंबईहून आल्यानंतर मृत्यू झाला तर ताईचीवाडी (शिरळ) येथे आढळून आलेल्या एका रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत. या दोन्ही गांवात आता १४ दिवसांकरीता नाकाबंदी करण्यात आली असून या दोन्ही गावांत कोरोनाचा प्रसार होवू नये याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याकरीता व या गांवातील जनतेला या १४ दिवसात आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तू देण्याचे नियोजन करण्याकरीता, जनतेची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन करण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी काल तातडीने तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेत या दोन्ही गांवाना भेटी दिल्या व येथील सर्व परिस्थितीची पहाणी केली.या भेटीत या गांवातील जनतेला आधार देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना तालुका प्रशासनाने तातडीने करण्याच्या सुचना दिल्या.
यावेळी सुचना देताना ना.शंभूराज देसाई म्हणाले, या दोन्ही गांवात आता १४ दिवस नाकाबंदी करण्यात येणार असल्याने गांवातील जनतेला जीवनावश्यक साहित्य,भाजीपाला पुरविण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे तसेच आवश्यकतेनुसार गांवातील जनतेची दिवसातून किमान एकदा आरोग्य तपासणी करणेकरीता आरोग्य पथक याठिकाणी नेमण्यात यावेत.येथील प्राथमिक आरेाग्य उपकेंद्रामध्ये औषधांचा साठा कमी असेल तर शेजारच्या प्राथमिक आरेाग्य केंद्रातून तसेच ग्रामीण रुग्णालयातून औषधसाठा उपलब्ध करुन देण्यात यावा.गावांत २४ तास पिण्याच्या पाण्याची तसेच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सक्त सुचना देत ना.देसाईंनी या गावांतील पदाधिकाऱ्यांना तसेच ग्रामस्थांना भिऊन जाण्याचे काही कारण नाही प्रशासन सेवेकरीता तत्पर आहे.मात्र या काळात प्रत्येकांने घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे कोणतीही अडचण आली तरी डायरेक्ट मला संपर्क करा. नाकाबंदीच्या काळात या गांवामध्ये कोणतीही अडचण जनतेला येणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेत आहोत. कोरोनाचा प्रसार गांवामध्ये होणार नाही याकरीता आपणच आपली काळजी घेणे गरजेचे असून या दोन्ही गांवातील जनतेने घरातून बाहेर न पडता स्वत:ची व परिवाराची काळजी घ्यावी असे सांगून त्यांनी या दोन्ही गांवामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासण्या तात्काळ करुन घेणेत याव्यात जेणेकरुन आपल्याला कोरोनाच्या प्रसाराचा अंदाज येईल व त्यादृष्टीने या गांवामध्ये आणखीन काही उपाययोजना कराव्या लागतील का? याचेही नियोजन करता येईल असेही यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी. पाटील,कोयनेचे सपोनि महेश बावीकट्टी,ढेबेवाडीचे सपोनि उत्तम भजनावळे यांची याठिकाणी उपस्थिती होती.
चौकट:- नाकाबंदीच्या काळात सेवेत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जेवणांची व्यवस्था करा- ना.शंभूराज देसाई.
कोरोनाचे रुग्ण सापडल्याने या दोन्ही गांवात नाकाबंदी करण्यात आली असून या काळात सेवेत असणारे पोलिस, महसूलचे, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका व ग्रामसेवक ही यंत्रणा दिवसरात्र या गांवामध्ये काम करीत असून सेवेतील या अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही ना.शंभूराज देसाईंनी या भेटीत आस्थेवाईकपणे विचारपुस करीत या अधिकारी, कर्मचाऱ्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्याच्याही सुचना त्यांनी यावेळी वरीष्ठांना दिल्या.
No comments:
Post a Comment