Sunday 17 May 2020

शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या मागणीनूसार केंद्र शासनाने साखर उद्योगासाठी भरीव पॅकेज दयावे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची साखर कारखानदारांच्या वतीने मागणी.




सातारा दि.17:- राज्यातील अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढणेकरीता केंद्र शासनाने सहकारी साखर उद्योगाला मदत करावी,सहकार्य करावे अशा पध्दतीचे मागणी करणारे लेखी पत्र देशाचे माजी कृषी मंत्री,सहकारातील गाढे अभ्यासक आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीसाहेबांना दिले आहे.शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या या मागणीनुसार केंद्र शासनाने व विशेषत: देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीसाहेबांनी यावर धोरणात्मक निर्णय घेवून अडचणीत सापडलेला सहकारी साखर उद्योग सावरण्याकरीता साखर उद्योगांना केंद्र शासनाकडून भरीव पॅकेज दयावे अशी मागणी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी राज्यातील सहकारी साखर कारखानदारांच्या वतीने केली आहे.
देशाचे माजी कृषीमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीसाहेबांना अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर कारखानदारीला वाचविण्याकरीता दिलेल्या लेखी पत्राच्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.त्यावेळी पवारसाहेबांच्या मागणीला दुजोरा देत याची खऱ्या अर्थाने गरज होती कारण गत तीन वर्षापासून महाराष्ट्रातील संपुर्ण साखर कारखानदारी प्रचंड आर्थिक अडचणीमधून जात आहे.जागतिक आणि देशातंर्गत बाजारापेठांमध्ये मोठया प्रमाणात साखरेचे भाव कोसळले आहेत त्यामुळे सर्वच सहकारी साखर कारखाने प्रचंड आर्थिक तफावतीमध्ये आले आहेत. ज्यावेळी केंद्रसरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दयावयाचा ऊसाच्या दराचा (एफआरपीचा) भाव निश्चित केला त्यावेळी बाजारामध्ये असणारा साखर विक्रीचा दर आणि प्रत्यक्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देत असताना साखरेला बाजारात मिळालेल्या दरातील फरक पाहिला तर किमान एका साखरेच्या पोत्याला 700 ते 800 रुपये ही घट याठिकाणी आली आहे. केवळ साखरेचे अनिश्चित भाव, साखरेचे कोसळलेले भाव हेच सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडण्यामागचे प्रमुख कारण असल्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीसाहेबांकडे जी लेखी पत्रानुसार विनंती केली आहे ती अतिशय योग्य आणि गरजेची असून आदरणीय पवारसाहेबांच्या विनंतीनुसार केंद्राने यावर धोरणात्मक निर्णय घ्यावा व ही मदत सहकारी साखर उद्योगाला या घडीला देणे अत्यंत गरजेचे आहे.
 दरम्यान कोरोनाचे लॉकडाऊन सुरु होण्यापुर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे सांगली जिल्हयामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते त्यावेळी त्या कार्यक्रमास मी देखील उपस्थित होतो. कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी मी पवारसाहेबांची भेट घेतली व पवारसाहेबांना याच विषयासंदर्भात मी लेखी पत्र देवून अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाची ही सर्व परिस्थिती त्यांचे निदर्शनास आणून देत आर्थिक अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढणेसंदर्भात केंद्र शासनानेच एखादे भरीव पॅकेज दयावे  या अनुषगांने त्यांचेबरोबर माझी चर्चा देखील झाली होती. त्यावेळी कोरोनामुळे एवढे दिवस लॉकडाऊन होईल असे कुणालाही वाटले नव्हते.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर केंद्र सरकार एवढया मोठया घोषणा करीत आहे त्यातलाच एक छोटासा हिस्सा म्हणून केंद्रशासनाने सहकारी साखर उद्योगाला भरीव पॅकेज जाहीर करावे याची भरीव मदत सहकारी साखर उद्योगाला,ऊस उत्पादक शेतकरी,कारखान्यात काम करणारे कामगार,तोडणी मजुर या सगळयांनाचा होईल.त्यामुळे पवारसाहेबांनी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीसाहेबांकडे केलेल्या मागणीनुसार केंद्र शासनाने सहकारी साखर उद्योगाला भरीव पॅकेज दयावे अशी महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्याच्या वतीने आम्ही सर्व साखर कारखानदार केंद्र शासनाकडे मागणी करीत आहोत.असेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई शेवठी बोलताना म्हणाले.
चौकट:- पवारसाहेब सहकार व जागतिक स्तरावरील साखरेचा अभ्यास असणारे मोठे नेते. - ना.शंभूराज देसाई
देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे सहकारातील तसेच देशातील आणि जागतिक स्तरावरील साखरेचा गाढा अभ्यास असणारे एक मोठे नेते आहेत त्यांनी अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर उद्योगासंदर्भात अभ्यासपुर्ण अशी विनंती देशाचे माननीय पंतप्रधानाकडे केली आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या या मागणीचा केंद्र शासनाने व माननीय पंतप्रधानांनी गांभीर्याने विचार केल्यास अडचणीतील सहकारी साखर कारखानदारी आणि कारखान्यांना ऊस घालणारे शेतकरी या दोघांनाही आर्थिक उभारी येईल असेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले.

No comments:

Post a Comment