Wednesday, 19 August 2020

पुरपरिस्थितीवर मी स्वत: लक्ष ठेवून, तालुक्यातील शासकीय यंत्रणा सतर्क. गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी केली पुरपरिस्थितीची पहाणी.

 


दौलतनगर दि.१९:-आजमितीला कोयना धरणामध्ये ९२.१७ टीएमसी पाणीसाठा असल्याने सध्या कोयना धरणातून ५५,४८६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सलगपणे सुरु आहे.त्यामुळे तालुक्यातील नेरळे व मुळगांव येथील पुल पाण्याखाली गेले आहेत.५५,४८६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असूनही पुरपरिस्थिती अटोक्यात आहे. पावसाचा जोर हळू हळू कमी होवू लागला आहे.कोयना धरणातील पाणी सोडणेसंदर्भातील योग्य नियोजन कोयना धरण व्यवस्थापनाने केले आहे त्यामुळे मागीलप्रमाणे यंदा पुराची परिस्थिती निर्माण होणार नाही तरीही मी स्वत: पुरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे तसेच तालुक्यातील शासकीय यंत्रणाही सतर्क असल्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.

             गेली चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसाचे पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज मुळगाव व नेरळे येथील पाण्याखाली गेलेल्या कोयना नदीवरील पुलांची शासकीय अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व नियोजनासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक घेण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते.

             यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,नायब तहसिलदार प्रशांत थोरात, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड,वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ए.व्ही.राख,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,उपविभागीय जलसंधारण अधिकारी अविनाश पदमाळे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील,जि.प.बांधकाम विभागाचे आर.एस.भंडारे,पाणी पुरवठा विभागाचे ए.वाय. खाबडे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चंद्रकांत यादव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील, कोयनानगरचे सपोनी एम.एस.भावीकट्टी यांची उपस्थिती होती.

          याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाईंनी सांगितले,पुरपरिस्थिती संदर्भात यापुर्वी तालुका प्रशासनाच्या दोन तीन बैठका घेवून योग्य नियोजन केले आहे. आपत्ती काळात योग्य व्यवस्थापन व नियोजन करुन तालुका प्रशासनाने सतर्क रहावे यामध्ये हलगर्जीपणा करु नका,जागृत रहा अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तालुक्यातील प्रशासन सतर्क असून कोयना धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात वडनेरी समितीने ज्या काही गाईडलाईन दिल्या आहेत त्यानुसार कोयना धरण व्यवस्थापनाकडून त्याचे पालन केले जात आहे. गत चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीपातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सध्या धरणामध्ये ९२.१७ टीएमसी पाणीसाठा  झाला आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे १० फुटांनी उघडून धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पुरपरिस्थिती अटोक्यात आहे.मागील वर्षाप्रमाणे यंदा पुरपरिस्थिती निर्माण होईल अशी कोणतीही परिस्थिती नाही.तसेच पावसाचे प्रमाण पाहून कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करणेसंदर्भातील नियोजनही करण्याच्या सुचना कोयना धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. असे सांगत त्यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाने कुठे दरड पडली असेल तेथील वाहतूक सुरुळीत करणेसंदर्भातही सुचना केल्या.कृष्णा खोरेच्या वांग मराठवाडी,उत्तरमांड,तारळी व मोरणा गुरेघर धरणातील पाणीसाठयासंदर्भात बैठकीत माहिती घेतली तसेच आरोग्य विभागाचाही या बैठकीत त्यांनी आढावा घेतला.

                चौकट:- तर... मला डायरेक्ट फोन करा- ना.शंभूराज देसाई.

               उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नियंत्रणाखाली तहसिल कार्यालयात २४ तास आपतकालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन उभारले आहे.आपत्ती काळात काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ या कक्षामध्ये प्रथमत: माहिती दया. प्रशासन सतर्क आहेच परंतू कसलीही अडचण भासल्यास डायरेक्ट मला फोन करा असेही आवाहन ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत केले.

Wednesday, 12 August 2020

धरण व्यवस्थापनाने पाणी सोडण्याची वेळ आली तर दिवसाचे सोडावे. रात्री धरणातील पाणी न सोडण्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अधिकाऱ्यांना आदेश.

 

 

दौलतनगर दि. १२:- आजमितीला कोयना धरणामध्ये ७७.१८ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातच पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे तुर्तास तरी कोयना धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन नाही त्याचबरोबर कोयना धरणासह पाटण तालुक्यातील कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पातील पाणीसाठाही मुबलक झाला आहे.पाटण तालुक्यातील कोयना धरण असो वा मध्यम धरण प्रकल्पे असोत या धरण प्रकल्पातील पाणी सोडण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर आली तर याची पुर्वकल्पना देवून धरण व्यवस्थापनाने धरणातील पाणी दिवसाचे सोडावे,रात्री नागरिक बेसावध असताना कोणत्याही धरणातील पाणी सोडू नये असे सक्त आदेश गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील सर्व धरण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना व प्रशासनाला दिले आहेत.  

            आज ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयामध्ये पाटण तालुक्यातील कोयना धरणासह कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पात झालेला पाणीसाठयासंदर्भात व पुढील करावयाच्या नियोजनाच्या अनुषंगाने बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,कोयनानगरचे सपोनी एम.एस.भावीकट्टी,कोयना धरण तसेच कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पाच्या व्यवस्थापनचे संबधित अधिकारी यांची उपस्थिती होती.

            याप्रसंगी प्रारंभी ना.शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या कोयना धरणात होणाऱ्या पाणीसाठयासंदर्भात व पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेनंतर पाणी विर्सगासंदर्भातील सविस्तर माहिती घेवून कोयना धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन करावे असे सांगत गतवर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कोयना धरणातही पाणीसाठा मर्यादित झाला आहे.गतवर्षी आज तारखेला जेवढा पाणीसाठा हवा होता तो यावेळी नाही. आज धरणात ७७.१८ इतका पाणीसाठा आहे. महाबळेश्वर असो किंवा नवजा असो येथे मोठया प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाण्याची चांगली आवक होते. मात्र याचठिकाणी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. आजरोजी कोयना धरण परिसरातील नवजाला ७५ मिलीमीटर तर आजअखेर एकूण ३१२५ मिलीमीटर आणि महाबळेश्वरला ६६ मिलीमीटर तर आजअखेर एकूण ३०३८ मिलीमीटर इतकाच पाऊस झाला असल्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी प्रमाणात होत आहे.प्रतिवर्षी सरासरी १५ ऑगस्टपर्यंत कोयना धरणामध्ये पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होतो मात्र यावेळी १५ ऑगस्टला पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्याची शक्यता कमी आहे.मागील वर्षी सर्वत्रच पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कोयना धरणातून असो वा इतर मध्यम धरण प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या मोठया प्रमाणातील पाण्यामुळे आणि ओढयानाल्यानांही पावसाचे जादा पाणी आल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. सुर्दैवाने यंदा ही परिस्थिती नाही.

            आता पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही धरणातून पाणी सोडण्याचे तुर्तास तरी नियोजन नाही तरीही कोयना धरणासह इतर मध्यम धरण प्रकल्पातील पाणी सोडण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर आली तर पाणी सोडण्याची पुर्वकल्पना या धरणाच्या तसेच तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांना दयावी आणि धरणातील पाणी हे रात्रीचे न सोडता ते दिवसाचे सोडावे.रात्री नागरिक बेसावध असतात त्यामुळे पुढील नियोजन करताना अनेक अडचणी निर्माण होतात. दिवसाचे पाणी सोडले तर किती प्रमाणात पाणी नदीला येणार आहे याचा अंदाज येतो व दळणवळण असो किंवा नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भाने इतर उपाययोजना असोत यासंदर्भात प्रशासनालाही योग्य नियोजन करता येते असे ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत सांगितले. 

कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासकीय यंत्रणेने आणि जनतेनेही सतर्क रहावे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना सुचना, जनतेला आवाहन.

 

       

दौलतनगर दि.१२:- पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आजमितीला ही संख्या ३८१ झाली असून यापैकी २४८ रुग्ण बरे झाले आहेत. तर ११२ रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत २१ रुग्ण मयत झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. तरीही संसर्गाची साखळी अनेक गांवात वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याकरीता शासकीय यंत्रणेने सतर्क रहावे अशा सक्त सुचना शासकीय अधिकाऱ्यांना देत तालुक्यातील जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.  

              पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज पाटण तालुक्यातील कोरोना उपाययोजना संदर्भातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची तहसिल कार्यालय पाटण याठिकाणी तातडीची बैठक घेतली. यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,नायब तहसिलदार थोरात, कोयनानगरचे सपोनी एम.एस.भावीकट्टी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी.पाटील तसेच पाटण नगरपंचायतीचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

           याप्रसंगी प्रारंभी पाटण शहरात करण्यात आलेल्या संपुर्ण लॉकडाऊन संदर्भातील माहिती प्रांताधिकारी तसेच नगरपंचायतीच्या अधिकाऱ्याकडून घेतली.कन्टेंनमेंट झोन किती ठिकाणी करण्यात आले आहे. गर्दी टाळण्याकरीता कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याप्रकारची माहिती घेत  ना.शंभूराज देसाई म्हणाले,दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होवू लागल्यामुळे पाटण तालुक्यातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेक गांवामध्ये कोरोना संसर्ग वाढू लागला असल्याने प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजनांना गती देण्याची गरज आहे.अनेक गांवानी गांवामध्ये कनेंटमेन्ट झोन केले आहेत तरीही संख्या वाढू लागली असल्याने काळजी वाढत आहे.प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी शिथीलता मिळाली असली तरी नागरिकांनीही नियमांचे पालन करुन शासकीय यंत्रणेला सहकार्य करणे गरजेचे आहे. असे सांगत त्यांनी प्रातांधिकारी यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात जेवढया मर्यादा आहेत तेवढया प्रमाणात हायरिस्कमधील लोकांची सोय करावी. तिथे लोकांकडून कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची काळजी प्रशासनाने घ्यावी तसेच शासनाने आता हायरिस्कमधील लोकांच्यावर घरच्या घरी उपचार करण्याच्या सुचना केल्या आहेत.परंतू आपल्या शासकीय यंत्रणेमार्फत हायरिस्कमधील लोकांचे विलगीकरण करताना आवश्यक ती उपाययोजना त्याठिकाणी आहे का? याची प्रत्यक्ष पहाणी करुन कार्यवाही करावी अशा सुचना दिल्या.पाटणमधील संस्थात्मक विलगीकरणाकरीता शासकीय वसतीगृह  घेतले आहे त्याठिकाणी जाणारा रस्ता नादुरुस्त असल्याने अनेक अडचणी येत असून सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करुन घेण्याच्या सुचना सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ना.शंभूराज देसाईंनी दिल्या व जनतेही प्रशासनाचे तुम्हाला सहकार्य आहेच परंतू आपणही प्रशासनाला सहकार्य करुन स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन केले.

        यावेळी प्रातांधिकारी श्रीरंग तांबे यांनी पाटण तालुक्यात रुग्ण आढळलेली ९२ गांवे असून कन्टेंटमेन्ट झोनची संख्या १०८ होती त्यापैकी ४६ गांवामधील कन्टेंटमेन्ट झोन उठविण्यात आले आहेत सध्या ६२ गांवामध्ये कन्टेंटमेन्ट झोन असल्याची माहिती दिली.

चौकट:- जनतेने विनाकारण घराच्या बाहेर पडू नये.

             कोरोनाचा प्रार्दूभाव वाढू लागला असल्यामुळे पाटण तालुक्यातील जनतेने,वयोवृध्द लोकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये.तसेच लहान मुलेही घराच्या बाहेर पडणार नाहीत याची काळजी जनतेने घ्यावी. विनाकारण गर्दीची ठिकाणे टाळावी असे आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.

Monday, 10 August 2020

कोरोना संकटामुळे रविराज देसाई यांचा दि.12 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्तचे सर्व कार्यक्रम स्थगित वाढदिवसानिमित्त परगावी जाणार.

 

 

दौलतनगर दि.10:- मोरणा शिक्षण संस्थेचे व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट,२०२० रोजीचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्त पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ व लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सह.पतसंस्था यांच्यावतीने आयोजीत करण्यात येणारे सर्व कार्यक्रम यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे स्थगित करण्यात आले आहेत.कोरोना संकटामुळे यादिवशी ते परगांवी जाणार असून कुणीही प्रत्यक्ष न भेटता दुरध्वनीवरुन शुभेच्छा दयाव्यात अशी माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ यांच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली  आहे.

 पत्रकांत म्हंटले आहे की,मोरणा शिक्षण संस्थेचे व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट रोजी प्रतिवर्षी वाढदिवस साजरा करण्यात येतो त्यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ यांच्यावतीने पाटण तालुक्यातील सातारा रहिवाशी असणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा तसेच ज्या पालकांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट, २०२० चा वाढदिवस व वाढदिवसानिमित्ताचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. कोरोनामुळे पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून वाढदिवसादिवशी ते परगांवी जाणार असून कोरोनामुळे कुणीही प्रत्यक्ष न भेटता दुरध्वनीवरुन शुभेच्छा दयाव्यात असे रविराज देसाईंनी सांगितले असल्याचेही लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Sunday, 9 August 2020

आपत्ती काळात तालुका प्रशासनाने अगोदरच जागृत रहावे, हलगर्जीपणा नको. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या तालुका प्रशासनाला सुचना.

                                     

दौलतनगर दि. 10:  आजमितीला कोयना धरणामध्ये ७२ टीएमसी पाणीसाठा आहे.गतवर्षीच्या प्रमाणात ०८ टीएमसी ने पाणीसाठा कमी आहे त्यामुळे तुर्तास तर कोयना धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन नाही त्यातच पावसाचा जोरही कमी झाला आहे. तरीही आपत्ती काळात योग्य व्यवस्थापन व नियोजन करुन तालुका प्रशासनाने सतर्क रहावे यामध्ये हलगर्जीपणा करु नका,जागृत रहा व कोयना धरण व्यवस्थापनने वडनेरी समितीने ज्या काही गाईडलाईन दिल्या आहेत त्याचे पालन करा अशा सक्त सुचना गृह राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनाला दिल्या.

            आज ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रतिक्षालय इमारत लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तहसिलदार समीर यादव,कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे,वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ए.व्ही. राख,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,उपविभागीय जलसंधारण अधिकारी अविनाश पदमाळे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील,जि.प.बांधकाम विभागाचे आर.एस.भंडारे,पाणी पुरवठा विभागाचे ए.वाय. खाबडे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.चंद्रकांत यादव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,तालुका कृषी अधिकारी बी.एस.बुधावले,उंब्रजचे सपोनी अजय गोरड, कोयनानगरचे सपोनी एम.एस.भावीकट्टी,ढेबेवाडी सपोनी यू.डी.भजनावळे यांची उपस्थिती होती.

             याप्रसंगी प्रारंभी ना.शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या कोयना धरणात होणाऱ्या पाणीसाठयासंदर्भात व पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेनंतर पाणी विर्सगासंदर्भातील सविस्तर माहिती घेवून कोयना धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन करावे असे सांगत उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नियंत्रणाखाली तहसिल कार्यालय याठिकाणी २४ तास आपतकालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आपत्ती काळात तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ या कक्षामध्ये माहिती देण्याचे काम अधिकारी यांनी करावयाचे असून यावर तात्काळ तोडगा काढून आपतकालीन परिस्थिती दुर करावयाची आहे.आपले विभागाकडील अधिकारी,कर्मचारी यांची नेमणूक आपआपल्या कार्यालयामध्ये संबधित अधिकारी वर्गाने करावयाची असून संबधित अधिकारी व कर्मचारी यांचे दुरध्वनी क्रमांक तहसिलदार यांचेकडे देवून आपण काय काय व्यवस्था केली आहे याची माहिती सादर करावयाची आहे.

              आपतकालीन व्यवस्थापन कक्षामध्ये एक जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात यावी असे सांगून त्यांनी तहसिलदार यांनी मंडलाधिकारी,तलाठी यांचेमार्फत कोयना नदीकाठच्या गावांना या काळात सतर्क राहण्याच्या सुचना कराव्यात तसेच गटविकास अधिकारी यांनी ग्रामविस्तार अधिकारी,ग्रामसेवक यांना त्या त्या विभागातील वैद्यकीय अधिकारी यांच्या संपर्कात राहून मान्सुन काळात साथीचे रोग पसरणार नाहीत याकरीताच्या उपाययोजना कराव्यात.प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,ग्रामीण रुग्णालय याठिकाणी यावरचा औषधसाठा आताच करुन ठेवावा.असे सांगत ना.शंभूराज देसाई यांनी वीज वितरण विभागाचा आढावा घेतला. हा आढावा घेताना या विभागाने प्रामुख्याने दक्ष आणि जागृत रहावे अशा सुचना त्यांनी दिल्या ते म्हणाले,पाऊस येणार असे वातावरण होण्याअगोदरच वीज वितरण विभागाचे अधिकारी काम लागेल म्हणून वीज बंद करीत आहेत या अगोदर उभ्या पावसात कधी वीज गेली नव्हती जिथे खरोखर अडचण जाणवत आहे त्याठिकाणी वीज बंद करण्यास हरकत नाही परंतू पाऊस पडायच्या आतच वीज बंद करणे चुकीचे आहे यासंदर्भात अनेक ठिकाणच्या तक्रारीदेखील आल्या आहेत त्यात वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुधारणा करावी.आपत्ती काळात तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी यांनी योग्य ते नियोजन करावे विनाकारण कारवाई करण्याची वेळ कुणी आणू नये असे सांगत गतवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी पुरपरिस्थिती येणार नाही असा विश्वासही त्यांनी शेवठी बोलताना व्यक्त केला.

                चौकट:-  तालुक्यातील धरणातील पाणी सोडण्यापुर्वी प्रशासनाने पुर्वकल्पना दयावी.

पाटण तालुक्यातील कोयना धरणासह कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पातील पाणीसाठा किती आहे कोणत्या धरणातून कधी पाणी सोडणार आहे याचा सविस्तर आढावा ना.शंभूराज देसाईंनी घेत धरणातून पाणी सोडताना प्रशासनाने याची पुर्वकल्पना तालुक्यातील लोकप्रतिनिधी व जनतेला दयावी असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मल्हारपेठ औटपोस्टचे पोलीस स्टेशन करण्याची प्रक्रिया एक महिन्यात पुर्ण करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या मंत्रालयीन अधिकाऱ्यांना सुचना.

 


दौलतनगर दि.10:- मल्हारपेठ ता.पाटण येथील पोलीस औट पोस्टचे अपग्रेडेशन करुन पोलीस स्टेशन करण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. यासंदर्भात मी आमदार असताना अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला असून मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे पोलीस स्टेशन करण्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया एक महिन्याच्या आत पुर्ण करा जेणेकरुन शासनाकडून कराड चिपळूण या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर मल्हारपेठ येथे नव्याने पोलीस स्टेशनची निर्मिती करता येईल यात विलंब नको लवकरात लवकर हा प्रस्ताव मान्यतेकरीता शासनाकडे सादर करा अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी गृह विभागाच्या मंत्रालयीन वरीष्ठ अधिकाऱ्यांना केल्या.

              गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली आज मंत्रालय येथे मल्हारपेठ,ता.पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन पोलीस स्टेशन करण्यासंदर्भातील बैठक पार पडली.यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे गृह विभागाच्या मंत्रालयीन वरीष्ठ अधिकाऱ्यांना सुचना केल्या.या बैठकीस गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड,अप्पर पोलीस महासंचालक जग्गनाथन,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके,सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते हे गृह विभागाचे व वित्त विभागाच्या अव्वर सचिव गावकर यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱी उपस्थित होते.

                मल्हारपेठ,ता.पाटण हे पाटण विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती ठिकाण असून येथील औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी नविन पोलीस स्टेशन करण्यात यावे ही बरेच वर्षाची मागणी आहे.मल्हारपेठला नवीन पोलीस स्टेशन करणेकरीता सन 2001 मध्ये राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सन 2007 मध्ये या प्रस्तावासंदर्भात विधानसभेत तारांकीत प्रश्न दाखल केलेनंतर तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर. पाटील यांनी सदर प्रस्ताव हा तपासणीकामी पोलीस महासंचालक यांचेकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या प्रस्तावावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे मल्हारपेठ ता. पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन नवीन पोलीस स्टेशन करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित राहिला.आता या प्रस्तावास विलंब न लावता एक महिन्याच्या आत मल्हारपेठ ता. पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन करणेसंदर्भातील सर्व प्रक्रिया पुर्ण करा व हा प्रस्ताव मान्यतेकरीता शासनाकडे सादर करा अशा सुचना ना.शंभूराज देसाईंनी या बैठकीत दिल्या.

 

Sunday, 2 August 2020

वाढलेल्या टेस्टमुळे कोरोना बाधितांची संख्या वाढलेली दिसत आहे, जनतेने घाबरु नये. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे जनतेला आवाहन.

        

            दौलतनगर दि. 02:-  दि.01 ऑगस्टपासून सातारा जिल्हा अनलॉक करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या टेस्ट घेण्याचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत देखील वाढ होवू लागली आहे.परंतू कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले असल्यामुळे जनतेने घाबरण्याचे कारण नाही. जनतेने घाबरुन न जाता आता जिल्हा अनलॉक झाला आहे म्हणून बाहेर फिरत बसण्यापेक्षा कामानिमित्तच घराच्या बाहेर पडा व स्वत:ची काळजी घ्या असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.

        काल पाटण जि.सातारा येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली कोरोना आजाराच्या उपाययोजना व अनलॉक काळात प्रशासनाने घ्यावयाची काळजी यांसदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील,जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत,डॉ.सुधीर धुमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये,पाटण प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,सहा.गटविकास अधिकारी विजय विभूते,पाटण नगरपंचायत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, तालुका वैद्यकीय अधिकारी रघूनाथ पाटील,ग्रामीण रुग्णालय वैद्यकीस अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

         प्रारंभी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोनाच्या संदर्भातील आढावा घेतला.यामध्ये काही त्रुटी आढळल्या त्याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी सुचना केल्या.पाटण तालुक्यात संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये काही त्रुटी होत्या त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सुचना देत संस्थात्मक विलगीकरण कक्षांची वाढ करावयाची असल्यास आवश्यक सोईसुविधांनी युक्त अशा ठिकाणी हायरिस्कमधील लोकांचे विलगीकरण करावे. हायरिस्कमधील लोकांचे विलगीकरण करताना त्यांना वेळेवर जेवण त्यांची राहण्याची सोय होते का नाही याची महसूल तसेच आरोग्य प्रशासनाने तपासणी करावी. संस्थात्मक विलगीकरण कक्षांच्या बाहेर अद्यावत अशा रुग्णवाहिका तैनात करण्यात याव्यात.पाटण सारख्या शहरात खाजगी डॉक्टरांच्या हॉस्पीटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार होतील याची सोय करावी लागली तर ती करावी.

          आज दि.01 ऑगस्टपासून जिल्हा अनलॉक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे गर्दीत वाढ होणार आहे. प्रशासनाने याची काळजी घेणे गरजेचे आहे. अनलॉकच्या काळात प्रशासनावर आता जादाचा भार पडणार असला तरी समन्वयाने कुठेही वाद विवाद होणार नाही याची दक्षता विशेषत: आमचे पोलीस विभागाने घ्यावी. अनलॉकमुळे कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होणार असल्याने आपण सतर्क राहिलो तर जनताही सतर्क राहील. त्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात असे त्यांनी बैठकीत सांगितले.

          दरम्यान सातारा जिल्हयातील सर्व जनतेला आवाहन करताना त्यांनी अनलॉकमुळे कामाव्यतिरिक्त कुणीही घराच्या बाहेर पडू नये, स्वत:च स्वत:ची आणि आपल्या कुटुंबांची काळजी घ्या. कोरोना टेस्ट वाढविण्यात आल्याने आपल्याला कोरोना रुग्णांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.परंतू यातून बरे होणाऱ्यांची संख्याही चांगली आहे त्यामुळे कुणीही घाबरुन जावू नका, सातारा जिल्हयातील सर्व प्रशासन आपली काळजी घेणेकरीताच गेली चार महिने कशोशीने प्रयत्न करीत आहे.सातारा जिल्हयातील जनतेनेही आपल्या सुरक्षिततेसाठी जिल्हयातील असो वा तालुकास्तरावरील सर्व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी या बैठकीत केले.

         दरम्यान अनलॉकच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या वतीने सातारा जिल्हयात कोणकोणत्या उपाययोजना महसूल, पोलीस व आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्या आहेत याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह  व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बैठकीत दिली. उपस्थितांचे स्वागत प्रातांधिकारी श्रीरंग तांबे व आभार तहसिलदार समीर यादव यांनी मानले.