Monday 23 April 2018

परमार्थाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून पारायण सोहळे आयोजीत करावेत. देसाई घराण्याचे योगदान मोलाचे ह.भ.प पारस महाराज मुथा यांचे प्रतिपादन.


      परमार्थात निरपेक्ष जीवन जगण्याची शक्ती आहे. मानवाने कोणतीही अपेक्षा न ठेवता आपले जीवन व्यतीत करावे. भगवंताने मानवाला खुप दिले आहे जेवढे दिले आहे त्यातच समाधान मानून मानवाने समाजकार्य करावे. परमार्थाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना जेव्हा मानवाच्या मनी जागी होते तेव्हा असे सोहळे साजरे होतात. आज महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे नातू आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नाने गत आठ वर्षापासून साजरा होत असलेल्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयामध्ये कीर्तनाचे दुसरे पुष्प गुंफण्याची संधी माझेसारखे पामराला मिळाली हे माझे भाग्य असून देसाई घराण्याचे योगदान आणि कार्य खुप मोलाचे असल्याचे प्रतिपादन अहमदनगर रामायणाचार्य, येथील ह.भ.प पारस महाराज मुथा यांनी केले.
        दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३५ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजीत श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयामध्ये कीर्तनाचे दुसरे पुष्प ह.भ.प पारस महाराज मुथा यांनी गुंफले. याप्रसंगी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. कीर्तन सोहळयास आमदार शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
       याप्रसंगी बोलताना ह.भ.प पारस महाराज मुथा म्हणाले, देव कुणी पाहिला आहे. संत महंत सांगतात म्हणून आपण देव आहे असे म्हणतो, परंतू देवासारखी माणसे या भूतलावर जन्माला आली आहेत त्यातीलच एक नांव म्हणजे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई. परमार्थ सांगतो, राज्यकर्त्यांनी भगवंत रामासारखे असावे, माझे ते तुझे आणि तुझे ते ही तुझेच अशी भूमिका भगवंत रामचंद्राची होती.तोच आदर्श लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी ठेवून पाटण तालुक्यातील जनतेकरीता माझे ते तुझे आणि तुझे ते ही तुझेच ही भूमिका ठेवून कार्य केले. म्हणूनच कोयनेला एवढे मोठे धरण उभे राहू शकले आणि याचा प्रकाश संपुर्ण महाराष्ट्रभर पसरला. त्यांचे पाटण तालुक्यातील जनतेकरीता केलेले कार्य गौरवास्पद तर आहेच परंतू महाराष्ट्रातील जनतेकरीताही त्यांनी मंत्री या नात्याने घेतलेले निर्णय हे कौतुकास्पद आहेत. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक ही ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा या प्रतिज्ञेचे तंतोतत पालन करणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुलांना ईबीसीची सवलत दिल्यामुळे आज माझेसारखे अनेक गरीब कुटुंबातील मुले शिकु शकली, मोठी होवू शकली. त्यामुळे अनेकांचे संसार आज सुखाचे पाहयला मिळत असून या कुंटुंबामध्ये आनंद पहावयाला मिळत आहे. लोकनेते नसते तर आज मीही आपणांपुढे कीर्तनाला उभा राहिलो शकलो नसतो.गोरगरीब जनतेकरीता अवर्णनीय कार्य करणा-या महात्मांचे पुतळे उभारुन त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जयंती व पुण्यतिथी साज-या केल्या जातात. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने लोकनेत्यांचे नातू आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नाने गत आठ वर्षापासून या प्रांगणात तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे ही बाब कौतुकास्पद आहे. यंदाचे हे ९ वे वर्ष आहे. आता काही अडचण नाही हा सोहळा अखंडीतपणे याठिकाणी सुरुच राहील अशी मला आशा वाटते. परमार्थाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना आमदार शंभूराज देसाई यांच्या मनी निर्माण झाली आणि त्यांनी पुढाकार घेवून आपले आजोबांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा पारायण सोहळा आपल्या भाविक भक्तांसाठी आयोजीत केला परमार्थांची सेवा करण्याची संधी तुम्हा आम्हाला मिळवून दिली याकरीता त्यांना दयावेत एवढे धन्यवाद कमी आहेत. ते स्वत: जातिनिशी या सोहळयामध्ये कायमस्वरुपी सहभागी असतात हे त्याहून अधिक चांगले आहे.असे सांगून त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाला अनुसरुन एक उदाहरण देताना म्हणाले, प्रत्येकाला विरोधक, स्पर्धक हे असावेत, विरोधक आणि स्पर्धक असल्याशिवाय मानवी जीवनाची प्रगती किंवा उध्दार होत नाही. संकटाविना मिळालेले यश हा विजय असतो परंतू संकटासह मिळालेले यश हा इतिहास असतो.आणि तो इतिहास प्रत्येक जन्माला आलेल्या मानवाने रचणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी कीर्तनाकरीता कन्या सासु-याशी जाय, मागे परतूनी पाहे तशे झाले माझया जीवा केव्हा भेटशी केशवा या निवडलेल्या अभंगामुळे पारायण सोहळयातील वातावरण भावनिक झालेचे पहावयास मिळाले. कीर्तनानंतर आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते ह.भ.प पारस महाराज मुथा यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment