दौलतनगर दि.२9:- चिपळुण कराड या राष्ट्रीय महामार्गास केंद्र शासनाने
दिलेल्या निधीतून या रस्त्याचे काम हे सन २०१९ च्या डिसेंबर महिन्यापर्यंत पुर्ण
करण्याचे नियोजन होते परंतू यातील २५ टक्केही रस्त्याचे काम पुर्ण झाले नसून या
रस्त्याच्या कामांमुळे नागरिक,शेतकरी व प्रवासीवर्गांने दररोज मोठया अडचणींचा
सामना करावा लागत असून सुरवातीला हे काम गतीने सुरु होते मात्र सध्या हे काम
संथगतीने सुरु असून हे काम मुदतीत पुर्ण करुन घेणेकरीता सार्वजनीक बांधकाम मंत्री
यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची लवकरात लवकर बैठक घेवून
अधिकारी व ठेकेदारी घेतलेल्या कंपनीला आदेश दयावेत अशी मागणी आमदार शंभूराज
देसाईंनी तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून विधानसभेत केली यावर सार्वजनीक बांधकाम
मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी आमदार शंभूराज देसाईंना बरोबर घेवून या
रस्त्यासंदर्भात लवकरच राष्ट्रीय महामार्गाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवू असे
उत्तर आज सभागृहात दिले.
शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील यांनी
बांधकाम विभागाशी संबधित उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नावर बोलताना आमदार
शंभूराज देसाईंनी चिपळुण कराड रस्त्यांच्या कामांस ठेकेदाराकडून टाळाटाळ व दिरगांई
होत असल्याने याचा मोठा त्रास पाटण मतदारसंघातील नागरिक,शेतकरी व प्रवासीवर्गांना
होत असल्याची बाब सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास
आणून दिली व लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची आपले
अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेवून हा रस्ता मुदतीत पुर्ण करण्याचा आदेश
आपणांमार्फत देण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, केंद्रीय भूपृष्ठ
वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी आमच्या मागणीवरुन रस्ते वाहतूक
आणि महामार्ग मंत्रालय,राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत चिपळूण ते कराड या राज्यमार्गाला गुहागर-चिपळूण-कराड-जत-विजापुर
असा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून दोन वर्षापुर्वी या कामांस मंजुरी देत या रस्त्याचे राष्ट्रीय
महामार्गाचे काम करणेकरीता आवश्यक असणारा निधीही मंजुर केला.या मार्गामध्ये माझे
पाटण विधानसभा मतदारसंघातील घाटमाथा ते कराड हा भाग असून या रस्त्याच्या कामाकरीता
एकूण ३९० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.सन २०१९ च्या डिसेंबर महिन्यापर्यंत घाटमाथा
ते कराड या रस्त्याच्या भागाचे काम पुर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्गाचे होते
परंतू संबधित ठेकेदाराकडून रस्त्याचे २५ टक्केही काम पुर्ण झाले नाही. सुरवातीला
हे काम गतीने सुरु होते मात्र सध्या हे काम संथगतीने सुरु असून रस्त्याच्या कामांत
संबधित ठेकेदाराकडून टाळाटाळ होत असल्याने कामात मोठी दिरंगाई होत आहे. याचा मोठा
त्रास पाटण मतदारसंघातील जनतेला, शेतकरी व प्रवासी वर्गांना होत असून रस्त्याच्या
कामांमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सध्या पावसाळा
सुरु झाला असून रस्त्याचे काम अपुरे राहिल्यामुळे याचा नाहक त्रास जनता सहन करीत
आहे. जनतेची, शेतकरी तसेच प्रवासी वर्गाची मोठया प्रमाणात होणारी ही गैरसोय लक्षात
घेवून या रस्त्याचे काम मुदतीत पुर्ण करुन घेणेकरीता सार्वजनीक बांधकाम मंत्री म्हणून
आपण राष्ट्रीय महामार्गाच्या वरीष्ठ
अधिकाऱ्यांची लवकरात लवकर आपले अध्यक्षतेखाली बैठक घेवून अधिकारी व ठेकेदारी
घेतलेल्या कंपनीला आदेश दयावेत ही बाब राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री यांच्या
निदर्शनास आणून दिली व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची यासंदर्भात तात्काळ
बैठक लावण्याची मागणी केली यावर बांधकाम मंत्री सार्वजनीक बांधकाम मंत्री
ना.चंद्रकांत पाटील यांनी आमदार शंभूराज देसाईंना बरोबर घेवून या रस्त्यासंदर्भात
राष्ट्रीय महामार्गाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची संबधित ठेकेदार कंपनीची लवकरच बैठक
घेवू असे उत्तर आज सभागृहात दिले.
No comments:
Post a Comment