Tuesday 6 November 2018

मतदारसंघाच्या विकासासाठी कोटींचा निधी आणायला विधानसभेत पोटतिडकीने बोलावे लागते. आमदार शंभूराज देसाई.





 मी केवळ सत्तेत असणा-या सत्ताधारी पक्षाचा एक आमदार आहे.आपले विरोधकही सत्ताधारी पक्षाचे अनेक वर्षे आमदार होते.आमदारांना मिळणारा निधी यावरच समाधान मानले असते तर मतदारसंघात प्रलंबीत राहिलेली विविध विकासकामे मार्गी न लागता ती प्रलंबीतच राहिली असती. जशी माजी आमदारांच्या आमदारकीच्या काळात प्रलंबीत राहिली. मतदारसंघातील विविध कामे मार्गी लावायची असतील तर शासनाशी भांडून आपले प्रश्न विधानसभेत मांडून शासनाच्या तिजोरीतून जादाचा निधी आणणारा आमदार आपल्या सारख्या डोंगरी तालुक्याला पाहिजे.गत चार वर्षात मतदारसंघाचा आमदार म्हणून विधानसभेत पोटतिडकीने बोललो आणि कोटयावधींचा निधी शासनाच्या तिजोरीतून पाटण मतदारसंघातील विविध विकासकामांकरीता मंजुर करुन आणला असल्याचे प्रतिपादन करीत मतदारसंघाच्या विकासासाठी मतदारसंघाचे माजी आमदार कधी विधानसभेत पोटतिडकीने बोललेले कुणी एैकले आहे काय? असा उपरोधिक टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी माजीमंत्री पाटणकर यांचे नाव न घेता लगाविला.
आंब्रग ता.पाटण येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत २ कोटी १० लक्ष रुपयांच्या निधीच्या वाडीकोतवडे ते आंब्रग गावपोहोच रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,जिल्हा परिषद सदस्य सौ.सुग्रा खोंदू,माजी सदस्य जालंदर पाटील,बशीर खोंदू,माजी पंचायत समिती सदस्य नथूराम कुंभार,विष्णूपंत देसाई,शिवशंभो दुध संघाचे माजी चेअरमन गणेश भिसे,ॲड.मारुती देसाई,आंब्रग सरपंच संतोष गुरव,सदस्य तानाजी जगताप,मारुती पवार,सौ.सुरेखा पवार,सौ.विणा पवार, शंकर पवार,राजू पवार,दिनकर कोळेकर,रमेश गालवे,उदय देसाई,प्रदीप जाधव,इरफान चाफेरकर,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता पी.डी.कदम,उपअभियंता विलास पानस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटण तालुक्यात यापुर्वी सलग पाच वेळा आमदारपद आणि एकदा राज्याचे कॅबिनेट मंत्री होण्याची संधी तालुक्यातील जनतेने विरोधकांना दिली.या २६ वर्षात विरोधकांकडून विकासाचे राजकारण तालुक्यात झाले नाही म्हणूनच तालुक्यातील अनेक विकासकामे प्रलंबीत राहिली.या गांवामध्ये गत चार वर्षात २ कोटी ४६ लाख रुपयांची जी प्रलंबीत कांमे राहिली होती ती पुर्ण केली.आंब्रग गाव देसाई गटाच्या पाठीशी ठाम उभे आहे म्हणूनच या गांवाला विकासाच्या बाबतीत झुकते माफ देण्याचा माझा कायम प्रयत्न राहिला आहे.विधानसभेच्या निवडणूकीनंतर झालेल्या पंचायत समिती,जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत या गांवाने मताधिक्कयामध्ये वाढ केली आहे ही आंनदाची बाब आहे.असाच पाठींबा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीतही या गांवाने कायम ठेवावा.या विभागात मागील वर्षी एकाच दिवशी धावडेच्या माळरानावर सुमारे १२ कोटी रुपयांच्या अनेक रस्त्यांच्या कामांची भूमिपुजने केली यातील अनेक कामे पुर्ण झाली तर काही कांमे प्रगतीपथावर आहेत.हातात सत्ता असताना विरोधकांना जे जमले नाही ते हातात सत्ता नसताना त्यांना शक्यच नाही हे तालुक्यातील प्रत्येक गांवाने आणि वाडीवस्तीने आता ओळखले आहे.तालुक्याच्या अनेक गांवामध्ये गावाला डोळयाला दिसतील अशी विविध विकासकांमे आपण गत चार वर्षात मार्गी लावली आहेत.ते माजी आमदारांना जमले नाही त्यांनी केलेली डोळयाला दिसतील अशी कामे प्रत्येक गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये दाखवून दयावीत असे आवाहन करीत आमदार देसाई म्हणाले,माजी आमदार हे राज्याचे बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.बांधकाम मंत्री असताना देखील स्वत:च्या मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांवर त्यांनी दोन ठिकाणी टोल बसविला यावरुनच त्यांची कार्यक्षमता लक्षात येते.बांधकाम खात्याच्या किल्ल्या त्यांच्या हातात असताना देखील ते बिनटोलचा रस्ता मतदारसंघातील जनतेला देवू शकले नाहीत मी आमदार म्हणून राज्याच्या नाहीतर केंद्राच्या तिजोरीतून ३२० कोटी रुपयांचा प्रमुख रस्ता मंजुर करुन आणला त्याचे काम सध्या सुरु आहे या रस्त्यावर एकाही ठिकाणी टोल नाही.हा फरक त्यांच्या आणि माझे कामांमधील आहे.त्यांच्या २६ वर्षाच्या आमदारकीची कारकीर्द आणि माझे केवळ १० वर्षाची आमदारकीची कारकीर्द पाहिली तर माजी मंत्रयांना लाजवेल एवढया कोटयावधी रुपयांची विविध विकासकांमे मी शासनाकडून मंजुर करुन आणली आहेत येणा-या निवडणूकीत त्यांच्या कामांचा आणि माझे कामांची तुलना करुनच मतदारसंघातील जनतेने तालुक्याचा आमदार निवडावा.जो विकासाच्या कामांमध्ये उजवा असेल तोच या तालुक्याचे नेतृत्व करेल ही खुणगाठ मतदारसंघातील मतदारांनी मनाशी घट्ट बांधावी असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले.
चौकट:- समाजाच्या मनामध्ये विष पेरणा-यांचा प्रचार हाणून पाडा. शंभूराज देसाई.
निवडणूका आल्या की,फोडाफोडी,जनतेचा बुध्दीभेद व मतांचा सौदा कशाप्रकारे करायचा यामध्ये आपले विरोधक तरबेज आहेत.पाच वर्षातून एकदा मतदान मागायला यायचे.स्वत: काही करायचे नाही आणि दुसरा करतोय त्यांच्या कामांसंदर्भात बुध्दीभेद करायचा.स्वत: काहीही न करता जनतेच्या मनामध्ये विष पेरणा-यांचा प्रचार पारावर बसून, चौकाचौकात बसून सुज्ञ जनतेने हाणून पाडणे गरजेचे असल्याचे मत आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केले.



No comments:

Post a Comment