दौलतनगर दि.२८:- पाटण विधानसभा मतदारसंघातील वन विभागांच्या हद्दीत येणाऱ्या
एक हेक्टरच्या आतील रस्त्यांच्या व पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या कामांना मान्यता
मिळणेबाबत पाटणचे आमदार सुरवातीपासूनच आग्रही आहेत.त्यांनी अनेकदा हा प्रश्न माझे
निदर्शनास आणून दिला आहे.पाटण मतदारसंघातील जे प्रस्ताव १ हेक्टरच्या आतील आहेत त्यास
तात्काळ मान्यता देण्याचे अधिकार हे जिल्हा वनसंरक्षक यांना दिले आहेत १ हेक्टरवरील
प्रस्ताव हे केंद्राकडे मान्यतेकरीता सादर करावे लागतात त्यानुसार राज्य शासनाच्या
अखत्यारितील या प्रस्तावांना येत्या १० दिवसाच्या आत मान्यता देणार असल्याची घोषणा
राज्याचे वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत या मतदारसंघाचे आमदार
शंभूराज देसाईंच्या तारांकीत प्रश्नावर केली.
पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी
त्यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पाटण आणि कराड तालुक्यातील मौजे गणेवाडी
ठोमसे,हुंबरणे,कसणी धनगरवाडा, कोळेकरवाडी (डेरवण), जळव डफळवाडी,पांढरेपाणी,नागवाणटेक
(पाचगणी),पाणेरी (धनगरवाडा), निवी, आटोली, पाळेकरवाडी (बहूले),बेलदरे व म्होर्पे या १३
गांवाना व वाडयावस्त्यांना जोडणा-या रस्त्यांची कामे व पिण्याच्या पाण्याच्या
योजनांची कामे करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीतील मान्यता मिळणेबाबतचा तारांकीत
प्रश्न आज विधानसभेत उपस्थित केला.
यावेळी
प्रश्नावर आपले मत मांडताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटण विधानसभा मतदारसंघात
सह्याद्रीच्या
पर्वतरांगामध्ये डोंगरी व दुर्गम भागात अनेक गांवे व वाड्या वस्त्या वसल्या असून
डोंगरी भागातील अनेक गांवाना जोडणारे रस्ते तसेच करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजना
या वनविभागाच्या हद्दीतून जात आहेत पाटण मतदारसंघातील अशी १३ गांवे व
वाडयावस्त्यां आहेत.यापुर्वी दि.०४.०८.२०१६ रोजी यासंदर्भातील तारांकीत प्रश्न सभागृहात
चर्चेला आला होता.यातील दोन गांवाना वनविभागाने मान्यता दिली आहे उर्वरीत ११
गांवाना अद्यापही मान्यता मिळाली नाही यास मान्यता कधी देणार असा सवाल आमदार
शंभूराज देसाईंनी वनमंत्री यांना केला. यावर बोलताना वनमंत्री ना.मुनगंटीवार यांनी
वनविभागाच्या मान्यतेकरीता येणारे जे
प्रस्ताव १ हेक्टरच्या आतील आहेत त्यास तात्काळ मान्यता देण्याचे अधिकार हे जिल्हा
वनसंरक्षक यांना राज्य शासनाने अगोदरच दिले आहेत मात्र १ हेक्टरवरील प्रस्ताव हे
केंद्राकडे मान्यतेकरीता सादर करावे लागतात तसा वनविभागाचा नियमच आहे.आजच हा तारांकीत
प्रश्न सभागृहात झालेनंतर सन्माननीय आमदार शंभूराज देसाई यांचेबरोबर वन विभागाचे
सचिव आणि त्यांच्या विभागातील सर्व अधिकारी यांची बैठक घेण्याच्या सुचना मी वन
सचिव यांना देतो आणि पाटण मतदारसंघातील जे प्रस्ताव १ हेक्टरच्या आतील आहेत त्यास
मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा वनसंरक्षक यांना आहेत त्या प्रस्तावांना येत्या १०
दिवसात मान्यता दयावी व जे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेकरीता सादर करावयाचे
आहेत ते तात्काळ तयार करुन राज्य शासनाच्या वनविभागाच्या शिफारशीस केंद्र शासनाकडे
सादर करावेत अशा सक्त सुचना वन विभाग सचिव व संबधित जिल्हा वनसंरक्षक यांना मी
तातडीने देत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रश्नोत्तराच्या
तासाला क्रंमाक २ ला आलेला हा तारांकीत प्रश्न सुमारे अर्धा तास सभागृहात गाजला.यास
वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी
सकारात्मक असे उत्तर दिल्याने आमदार शंभूराज देसाईंनी त्यांचे जाहीर आभार मानले.
No comments:
Post a Comment