दौलतनगर दि.०५:- मतदारसंघातील
जनतेच्या कामांकरीता साधा १ कोटी रुपयांचा निधी आणण्याची ज्यांची कुवत नाही ते
माजी आमदार पुत्र सत्यजितसिंह पाटणकर वाडयात बसून मी पाटण मतदारसंघात केलेल्या
१८०० कोटी रुपयांच्या निधीची मापे काढत आहेत. सत्यजितसिंह पाटणकर मी केलेल्या
विकासकामांची जरुर मापे काढा माझे तुम्हाला जाहीर आवाहन आहे तुमचे ते कामच
आहे.माझी मापे काढली नाहीत तर तुम्हाला विचारणार तरी कोण? गत पाच वर्षात तुमच्या
पक्षप्रमुखांनी दिलेला ०१ कोटी रुपयांचा निधी सोडला तर पक्षातील इतर मान्यवरांकडून
तुम्हाला साधा ०१ रुपयांचा जादा निधी मिळविता आला नाही.तुम्हाला १८०० कोटी
रुपयांचा निधी काय कळणार?१८०० कोटी रुपयांचा निधी आणायला आणि तो जनतेच्या
कामांसाठी मार्गी लावण्याकरीता महाशय धमक लागते.मी मंजुर करुन आणलेला १८०० कोटींचा
निधी कुठे आणि कुठल्या गांवात खर्च झाला हे विधानसभा निवडणूकीची मते मागायला
तुम्ही जाल तेव्हा मी नाही पाटण मतदारसंघातील जनताच तुम्हाला सांगेल,कारण निवडणूकीच्या
प्रचारात तुमचाच पंचनामा करायला मतदारसंघातील जनता आता सज्ज झाली आहे असा विश्वास
आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.
केसे ता.कराड येथे जलसंपदा विभागाकडून मंजुर केलेल्या कोयना
नदीकाठी सरंक्षक भिंत व घाट बांधणे या २ कोटी १५ लाख ८६ हजार रुपयांच्या कामांचे
भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते आयोजीत करण्यात आले होते याप्रसंगी आमदार शंभूराज
देसाई बोलत होते.यावेळी जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील,कराड खरेदी विक्री संघाचे
माजी अध्यक्ष हणमंतराव चव्हाण,शिवदौलत सहकारी बँकचे चेअरमन मिलींद पाटील,प्रभाकर
शिंदे,कारखाना संचालक बबनराव भिसे, तुकाराम डुबल, लक्ष्मण
देसाई,अविनाश पाटील,अविनाश देसाई,प्रकाश बाबर,काशिनाथ बाबर,आनंदराव कदम,सुनिल
निकम,संदिप साळुंखे,फारूख पटेल,शिवाजीराव गायकवाड,शंकरराव थोरात,प्रविण थोरात,कोयना धरण व्यवस्थापनचे उपअभियंता श्रीमती नाईकनवरे आदी
मान्यवरांची उपस्थिती होती.
आमदार
शंभूराज देसाई म्हणाले,मी मतदारसंघाचा आमदार म्हणून पाच वर्षात केलेल्या विविध
विकासकामांचा जाहीर अहवाल तोही मतदारसंघातील गणवाईज पाटण मतदारसंघातील जनतेला
अर्पण केल्यानंतर माजी आमदार पुत्रांनी आपल्या अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली
असल्याचे समजले. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मी केलेली विकासकामे जनतेसमोर
मांडताना या महाशयानी या कामांचा पंचनामा करण्याचे आवाहन केल्याचे वाचनात आले.
१८०० कोटींचा म्हणे फसवा विकास केला आहे. अहो महाशय १८०० कोटी कशाला म्हणतात हे
तरी आपल्या लक्षात येते का? आपली गुणवत्ता पाच वर्षात केवळ ०१ कोटी रुपयांचा निधी
मतदारसंघातील कामांना आणायची तीही पक्षप्रमुखांच्या मेहनबानीने.तुमच्या
पक्षप्रमुखांनी तीही मेहनबानी तुमच्यावर केली नसती तर गत पाच वर्षात तुम्हाला ०१
रुपयांचाही निधी मतदारसंघातील जनतेच्या विकासा करीता आणता आला नसता. गत पाच वर्षात
मी १८०० कोटीचा विकास केला का नाही याचा दाखला येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत
देण्यासाठी पाटण मतदारसंघातील विकासकामे मार्गी लागलेली गावेच्या गावे आणि
वाडयाच्या वाडया सज्ज झाल्या आहेत या गावातील आणि वाडयावस्त्यावरील मतदार
विधानसभेची निवडणूक कधी लागतेय याचीच वाट पहात आहेत कारण त्या त्या गांवामध्ये आणि
वाडयावस्त्यांमध्ये गत पाच वर्षात झालेल्या विकासकामांची जी आतापर्यंत सत्तेत
असताना तुमच्या पिताश्रींना जमली नाहीत ती अनेक विकासकामे झाली आहेत आणि त्याची
चेष्टा करणारे तुम्ही तुमचा पंचनामा याच निवडणूकीत करण्याचा विडा याच गावांनी व
वाडयावस्त्यांनी उचलला आहे हे तुम्हाला निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर लक्षात येईल.
मी केलेला विकास जनहितार्थ आहे का फसवा आहे हे सांगायला मला तुमच्या दाखल्याची गरज
नाही. सत्यजितसिंह पाटणकर तुम्ही विधानसभेची निवडणूक एकदा नव्हे दुसऱ्यांदा
लढवायला निघाला आहात तरीही तुमच्या लक्षात येईना की मतदारसंघातील जनता आता किती
सुज्ञ झाली आहे. ढेबेवाडीतल्या माणसांना कोयना, तारळयातल्या माणसांना कुंभारगांव,
सुपन्यातल्या लोकांना पाटण आणि मोरणेतल्या लोकांना मल्हारपेठ विभागात झालेला विकास
माहिती आहे.पाटण मतदारसंघातल्या आठ विभागातील जनतेला ढेबेवाडी, कुंभारगांव, कोयना,
तारळे, चाफळ, मोरणा, मल्हारपेठ आणि सुपने विभागात कुठे आणि कसा विकास झाला आहे हे
उघडपणे माहिती आहे. त्यामुळे या विभागातला विकास त्या विभागात जावून सांगण्याची
गरज मला भासली नाही आणि भासणार देखील नाही कारण तुमच्या मते हे विभाग असले तरी
माझे मते पाटण विधानसभा मतदारसंघ एक आहे. आणि या एका पाटण विधानसभा मतदारसंघातील
जनतेला कुठल्या मतदारसंघात आमदारांनी काय काय विकास केलाय हे जाहीरपणे माहिती
आहे.तुम्हीच वाडयात बसून असल्यामुळे तुम्हाला त्या त्या विभागात जावून विकास
पाहण्याची वेळ येणार आहे.विभागाविभागातील जनतेची काळजी तुम्ही करु नका मतदारसंघाचा
आमदार म्हणून मी याकरीता सक्षम आहे आणि हे मतदारसंघातील जनतेनेही आता ओळखले आहे
त्यामुळे मी केलेल्या विकासकामांची काय पोलखोल करायची आहे ती करुन घ्या कारण
पोलखोल विकासकामांची करताना पोलखोल तुमची होणार आहे विकासकामांचा ध्यास घेतलेल्या
पाटण मतदारसंघातील जनता आता येणाऱ्या निवडणूकीत तुमच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाना
भीक घालणार नाही हे मात्र विसरु नका असा सल्लाही आमदार शंभूराज देसाईंनी
सत्यजितसिंह पाटणकरांना यावेळी बोलताना दिला आहे.
No comments:
Post a Comment