दौलतनगर दि.११:-महाराष्ट्राचे
पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करण्याची
क्षमता होती मात्र लोकनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत हे महाराष्ट्राचे
दुर्दैव असल्याची कबुली दस्तुरखुद्द राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री यांनी दिली
असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्र
राज्याच्या प्रगतीचा पाया रचण्याचे अतुलनीय कार्य केले असल्याचे प्रतिपादन आमदार
शंभूराज देसाई यांनी केले.
दौलतनगर.ता पाटण येथे राज्य शासनाने उभारलेल्या
महाराष्ट्र दौलत या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकामध्ये मोठया
दिमाखात महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा 109 वी
जयंती सोहळा संपन्न झाला या समारंभात आ.देसाई बोलत होते.या कार्यक्रमास सातारा
इतिहास मंडळाचे अध्यक्ष व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचेवर शिवाजी विद्यापीठामध्ये
एम फिल केलेले प्रा.आत्माराम थोरात, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा
नेते यशराज देसाई,जयराज देसाई,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सह्याद्री
हॉस्पीटलचे संचालक दिलीपराव चव्हाण,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन
अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,ॲड.मिलिंद पाटील या प्रमुख
पदाधिकाऱ्यांसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील
पदाधिकारी,लोकनेतेप्रेमी जनतेची मोठया संख्येने प्रमुख उपस्थिती होती.
आ.देसाई म्हणाले,महाराष्ट्र राज्याला नवी दिशा
देऊन विकासप्रवाहात आणण्यामध्ये लोकनेत्यांचा सिंहाचा वाटा आहे असून संपूर्ण
महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा पाया रचणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कर्मभूमित
चिरंतन स्मारकासाठी आवश्यक असणारा निधी मिळावा याकरीता तत्कालीन आघाडी सरकारकडे
सातत्याने प्रयत्न केले परंतू तत्कालीन आघाडी सरकारने जाणीवपूर्वक हा प्रस्ताव
टाळण्याचा प्रयत्न केला. ज्या काँग्रेस पक्षाकरीता लोकनेते यांनी अतुलनीय कार्य
केले त्याच पक्षाच्या मातब्बरांनी लोकनेते यांचे स्मारकासाठी निधी दिला नाही मात्र
भाजप सेना युतीच्या सरकारने मुख्यमंत्री देवेद्रं फडणविस यांच्या
मार्गदर्शनाखाली कुठलाही विचार न करता लोकनेत्यांचे या प्रस्तावाला एकमुखाने या
प्रस्तांवाला तात्काळ परवानगी देत मंजुरी देऊन हे स्मारक तात्काळ उभे केले.
युतीच्या शासनाच्या हे ऋृण कधीही न फेडता येणारे आहे. महाराष्ट्र दौलत या शताब्दी
स्मारकाच्या माध्यमातून लोकनेते साहेबांच्या नावाला साजेसे असे काम केले जाईल जेणे
करुन भविष्यात महाराष्ट्र दौलत चा रमणीय आणि मोहक परिसर पाहण्यासाठी राज्याच्या
कानाकोपऱ्यातून पर्यटक येतील असा विश्वास व्यक्त करुन लोकनेते बाळासाहेब देसाई
यांनी आपल्या विविध मंत्री पदाचा उपयोग तालुक्यातील,जिल्हयातील आणि महाराष्ट्रातील
जनतेच्या विकासासाठी केला आपल्या कर्तत्वाने महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम त्यांनी
शेवटच्या क्षणापर्यंत केले.संपूर्ण भारत देशात कोणत्याच राज्यात गोरगरीब
विद्यार्थ्यांसाठी ईबीसी सवलत नसताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी ईबीसी सवलत
देणारे देशातील पहिले शिक्षणमंत्री ठरले.आज कोणत्याही नेतृत्वामध्ये ती धमक दिसून
येत नाही म्हणूनच तर प्रसिद्ध लेखक प्र.के.अत्रे यांनी महाराष्ट्रातील लोकांचा
नेता म्हणून स्व.बाळासाहेबांना लोकनेते ही पदवी बहाल केली.सागंली,सातारा,कोल्हापुर
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता कोल्हापुर येथे
शिवाजी विद्यापीठाची निर्मिती केली.लोकनेत्यांनी महाराष्ट्राला दिशा देऊन राज्याला
विकास प्रवाहात आणत असताना पाटण
तालुक्याची जडण घडण करण्याचेही मोलाचे कार्य केले.त्यांच्या कार्याचा गौरव आजही
महाराष्ट्रात होत आहे त्यांचे आदर्श विचार आजच्या युवा पिढीने आत्मसात करणे गरजेचे
असून लोकनेते यांना त्यांचे १०९ जयंतीनिमित्त पाटण मतदारसंघातील तमाम जनतेच्या
वतीने विनम्र अभिवादन करत असल्याचेही आ.शंभूराज देसाईंनी सांगितले.
यावेळी प्रा.आत्माराम थोरात
म्हणाले,माणसातील देव म्हणजे लोकनेते राजकारणाबरोबर आपल्या मातीवर प्रेम करणारा
लोकनेत्यांसारखा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. जनतेच्या भल्यासाठी वेळप्रसंगी कायदा बदला म्हणणारे
कणखर नेतृत्व म्हणून लोकनेत्यांची ओळख महाराष्ट्रात असून त्यांच्यामुळे या
तालुक्याबरोबर जिल्हयातील अनेकजण हे उच्चपदावर काम करत आहेत. लोकनेते यांच्या पावलावर
पाऊल टाकत त्यांचे नातू आ.शंभूराज देसाई यांची वाटचाल सुरु आहे हे पाटण
मतदारसंघाचे भाग्य आहे.हजारो कोटी रुपयांची विकासकामे अक्षरक्ष: खेचून आणणारा
रोखठोक आमदार महाराष्ट्राच्या 288 आमदारामध्ये शोधूनही सापडणार नसल्याचे प्रा.थोरात
यांनी यावेळी स्पष्ट केले व लोकनेते यांना त्यांचे १०९ जयंतीनिमित्त विनम्र
अभिवादन करुन आदराजंली वाहिली. यावेळी जाळगेवाडी येथील चि.रोहन जगदाळे व गिरेवाडी
येथील कु.अक्षरा माने या विद्यार्थ्यासहित जयवंतराव शेलार,ॲड.डी.पी.जाधव,डॉ. दिलीपराव
चव्हाण यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे स्वागत अशोकराव पाटील यांनी केले तर
आभार प्रा.विश्वनाथ पानस्कर यांनी मानले.
चौकट: पश्चिम महाराष्ट्रातील पहिले
मोठे डिजिटल क्लासरूम महाराष्ट्र दौलतमध्ये.
राज्य शासनाने सुमारे १० कोटी रुपये
खर्च करुन बांधलेल्या महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाचा
पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून या आधुनिक स्मारकामध्ये प्रथमच लोकनेते
यांचा जयंतीचा समारंभ घेणेत आला.अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा या स्मारकामध्ये असून
ग्रामीण भागातील मुलामुंलीना स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाकरीता तब्बल 50 लाख
रुपये खर्चाचे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले आणि सर्वात मोठे डिजिटल क्लासरुम तसेच
5 लाख रुपये खर्चाचे केवळ रेफरन्स बुक या स्मारकामध्ये उभारण्यात येत आहे याचा
उपयोग नक्कीच पाटण मतदारसंघातील ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे
होण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
No comments:
Post a Comment