Sunday 18 August 2019

सुपने मंडलातील नुकसानग्रस्तांना सर्वांना मदत मिळेल याची काळजी घ्या. नुकसानीचे पंचनामे तात्काळ दया आमदार शंभूराज देसाईंच्या सर्व अधिकाऱ्यांना सुचना. आमदार शंभूराज देसाईंनी घेतली सुपने मंडलातील बैठक.




           दौलतनगर दि. १८:-पाटण विधानसभा मतदारसंघात मागील महिन्यातील दि.२६ जुलै पासून सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे व कोयना धरणातून मोठया प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीकाठी महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे अनेक गांवाचा संपर्कही तुटला होता.पाटण मतदारसंघातील सुपने मंडलातील म्होर्पे, तांबवे, साजूर व केसे या गांवामध्ये कोयना नदीचे पाणी घुसले होते.आता महापुर ओसरला आहे सगळे रस्ते,पुल वाहतूकीकरीता खुले झाले आहेत.अतिवृष्टीमुळे अनेक गांवामध्ये मातीची राहत्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत,तर अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेतीबरोबर शेतीपिकांचेही व सार्वजनीक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या जनतेला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देणेकरीता तातडीने पंचनाम्यांच्या कामांला लागा व सुपने मंडलातील एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचीत राहता कामा नये याची काळजी घ्या अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी कराड तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
              नुकत्याच झालेल्या महापुरपरिस्थिती व अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्यां पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलातील सर्व गांवाची स्वतंत्र बैठक आमदार शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली वेदांत मंगल कार्यालय तांबवे फाटा याठिकाणी कराड तालुक्यातील सर्व तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे अधिकाऱ्यांना सुचना केल्या.या बैठकीस कराडचे उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे,तहसिलदार अमरदीप वाकडे,कराडचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार,कराड शहर पोलिस निरिक्षक धुमाळ,सार्वजनिक बांधकाम,जिल्हा परिषद बांधकाम,पाटबंधारे विभाग,कृषी,पाणी पुरवठा,सार्वजनीक आरोग्य, शिक्षण, वीज वितरण,विभागाचे सर्व शाखा अभियंता हे शासकीय अधिकारी तर जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील, पंचायत समिती सदस्य सविता संकपाळ,हणमंतराव चव्हाण,प्रभाकर शिंदे,शिवाजी गायकवाड, लक्ष्मण देसाई, अविनाश पाटील,म्होर्पे सरपंच तुकाराम डुबल,आनंदा कळके या प्रमुख पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थित होती.
              यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी सुपने मंडलातील म्होर्पे, तांबवे, साजूर व केसे या गांवामध्ये कोयना नदीचे पाणी घुसल्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रथमत: माहिती घेतली. या गांवामध्ये किती लोकांना स्थलांतरीत करण्यात आले होते. त्या लोकांपर्यंत तातडीची मदत म्हणून ब्लँकेट तसेच धान्य वाटप करण्यात आले होते.मी स्वत: साजुर आणि तांबवे गांवातील पुरबाधित जनतेची भेट घेवून त्यांना तातडीची मदत दिली आहे.अतिवृष्टीमुळे या गांवामधील मातीची राहत्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत तर कोयनेच्या पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेती पाण्यात गेल्यामुळे येथील तसेच इतर भागातील शेतीपिकांचेही व सार्वजनीक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले असून यामध्ये ग्रामीण रस्त्याचे तसेच नदीकाठच्या विहीरी पाण्याखाली गेल्याने पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे, तर नदीकाठच्या उपसा जलसिंचन योजनांचेही मोठे नुकसान झाले आहे.शेतीपिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले असून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पंचनाम्यांची प्रक्रिया पुर्ण करुन घ्यावी पाटण तालुक्यात अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्यांचे पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून याही विभागातील अधिकाऱ्यांनी पंचनाम्यांच्या कामांत हयगय करु नये. झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तयार करुन ते शासनास सादर करावेत त्याची एक प्रत माझेकडेही देण्यात यावी.लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई तसेच सार्वजनीक मालमत्तेची पुर्नंबांधणी करणेकरीता आवश्यक असणारा निधी शासनाकडून मंजुर करुन आणण्यास आपणांस मदत होईल. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास शासन तयार आहे त्यामुळे सुपने मंडलातील एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचीत राहता कामा नये याची काळजी कराड तालुक्यातील अधिकाऱ्यांनी प्राधान्याने घ्या अशाही सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
चौकट:- तांबवे पुलाचे काम लवकरात लवकर पुर्ण करा.
             तांबवे येथील पुलाचे काम रखडल्यामुळे या विभागातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असून या पुलाचे काम युध्दपातळीवर हाती घेवून येत्या चार दिवसात ते पुर्ण करुन घ्यावे अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजभोज यांना दुरध्वनीवरुन दिल्या तसेच याठिकाणी उपस्थित असणाऱ्या सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही पुलाच्या कामात चालढकल करु नका दोन दिवसात दुचाकी वाहने तरी  या पुलांवरुन जाण्याचे नियोजन करा अशाही सुचना केल्या.


No comments:

Post a Comment