Monday 5 August 2019

तातडीचे काम असेल तरच बाहेर पडा- आमदार शंभूराज देसाईंचे आवाहन. अतिवृष्टीत सतर्क राहण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना, जनतेलाही विनंती.





           दौलतनगर दि. ०५:-  कोयना धरणातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असून पावसाचे प्रमाण वाढत आहे.ठिकठिकाणी कोयना नदीचे पाणी मुख्य रस्त्यावर,पाटण शहरात शिरले आहे.त्यामुळे तातडीचे अत्यंत महत्वाचे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे.अशी विनंती आमदार शंभूराज देसाईंनी जनतेला केली असून कोयना धरणातून दोन-दोन तासाला जादाचे पाणी सोडण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने पुरपस्थितीवर नियंत्रण करणेकरीता तालुक्यातील प्रशासन सज्ज आहे तसेच घराबाहेर कुणीही लहान मुलांना घेवून जाऊ नये याकरीता तालुका प्रशासनाच्यावतीने आवाहनही करण्यात येत आहे.पोलीस यंत्रणेला स्ट्रायकींग फोर्स यासारखी जादा पोलीस कुमक पाठविणेसंदर्भात वरीष्ठ अधिकारी यांना सुचित केले असून पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांचेशी माझे बोलणे झाले असून या सर्व परिस्थितीवर माझे वैयक्तीक लक्ष आहे.त्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सुचना आमदार शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
           पाटण शहरात कोयना नदीचे ठिकठिकाणी घुसलेले पाणी पाहण्याकरीता तसेच पुरपरिस्थिती नियंत्रणात आणणेकरीता आमदार शंभूराज देसाईंनी पाटण शहरातील मुख्य रस्त्यासह पाणी घुसलेल्या ठिकाणांची पहाणी केली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले.यावेळी प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,या प्रमुख अधिकाऱ्यासंह विविध खात्यांचे तालुका प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
                यावेळी आमदार शंभूराज देसाई पाटण येथील धांडे पुल तसेच एसटी स्टॅन्ड व लायब्ररी चौक येथे कोयना नदीतून घुसलेल्या व मुख्य रस्त्यावर पहाणी करताना प्रातांधिकारी,तहसिलदार तसेच पोलीस यंत्रणांना नदीचे पाणी मोठया प्रमाणात रस्त्यावर आले असून आलेले पाणी पहाण्याकरीता शहरातील नागरिक व महिला लहान मुलांसह रस्त्यावर येत आहेत हे चुकीचे आहे. पाण्यात एखादयाचा पाय घसरण्याची भिती असल्याने अत्यंत महत्वाचे,दवाखान्यातील वगैरे काम असेल तरच नागरिंकानी घराचे बाहेर पडावे तसेच जिथे पाणी जादा प्रमाणात आहे तिथे जाणे टाळावे.कोयना धरणात पावसाचे प्रमाण जादा असल्याने मोठया प्रमाणात पाण्याचा साठा होत आहे.त्यामुळे दर दोन तासाला धरणातील पाणी सोडण्याचे प्रमाणही वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. येथील परिस्थिती पाहून मी स्वत: कोयना धरणाकडे जाणार असून पुरपरिस्थीती हातळण्याकरीता सर्व तालुका प्रशासनाचे अधिकारी सज्ज आहेत.मुख्य रस्त्यावरील पाण्यामध्ये युवक दुचाकी गाडया घेवून जात आहेत पोलीस यंत्रणांनी अशा ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी यांच्या नेमणूका करुन अशाप्रकारे कोणी स्टंटबाजी करीत असल्यास त्यांना रोखावे.नागरिकांनीही तालुका प्रशासनाला सहकार्य करावे असे आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले. तसेच नावडी,मंद्रुळहवेली, जमदाडवाडी मळावस्ती या गांवामध्येही कोयना नदीचे पाणी शिरले आहे.नावडी गावचा संपर्क तुटलेला असून शासकीय अधिकाऱ्यांनी येथे सतर्क रहावे अशाही सुचना त्यांनी यावेळी केल्या तसेच आमदार शंभूराज देसाईंनी सांगवड येथील सिध्देश्वर मंदीराच्या मागील बाजूच्या खचलेल्या संरक्षक भिंतीचीही यावेळी पहाणी केली.
चौकट:- एस.टी.स्टॅन्डमध्ये अडकलेल्या ५० प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.
              एस.टी स्टॅन्ड परीसरात घुसलेल्या पाण्याची पहाणी करताना स्टॅन्डमध्ये ५० प्रवाशी अडकले असल्याची बाब येथील आगारप्रमुखाने आमदार देसाईंच्या निदर्शनास आणून देता त्यांनी तातडीने कार्यकर्त्यांला फोन करुन टॅक्टर मागवून घेवून एस.टी.स्टॅन्डमधील ५० प्रवाशांना बाहेर काढेपर्यंत ते या परिसरात थांबून राहिले व त्यांना साळुंखे हायस्कुल येथे सुखरुप स्थलांतरीत केले तसेच त्यांना तातडीने खाणेकरीता नाष्त्याचीही सोय आमदार देसाईंनी करुन संध्याकाळी त्यांचे भोजनाची व्यवस्थाही आमदार शंभूराज देसाईंनी केली.
        चौकट:- आमदार शंभूराज देसाईनी जेसीबी (JCB) तून पाटण गाठले.
              कराड चिपळूण मुख्य रस्त्यावर येरफळे ते म्हावशी यादरम्यान कोयना नदीचे मोठया प्रमाणात पाणी आल्याने याठिकाणची वाहतूक बंद होती.पाटण शहराला पाण्याने विळखा घातल्याने पाटण येथे जाणे निकडीचे असल्याने प्रसंगवधान साधून आमदार शंभूराज देसाईंनी याठिकाणी जेसीबी बोलवून त्या जेसीबी मधून पाटण गाठले व येथील पुरपरिस्थितीची अधिकाऱ्यांसमवेत पहाणी केली.आमदार देसाईंच्या जेसीबी प्रवासामुळे जनतेसाठी कर्तव्य बजावणारा कर्तव्यदक्ष आमदार म्हणून सोशल मिडीयावर खुप चर्चा सुरु आहे.


No comments:

Post a Comment